Wednesday, 5 September 2018

ब्लॉसम पब्लिक स्कुल येथे कृष्ण जन्माष्टमी साजरी

देवरी:5सप्टे. येथील लोकप्रिय शाळेत अग्रगण्य ब्लॉसम पब्लिक स्कुल येथे कृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव निर्मल अग्रवाल, प्राचार्य डॉ. सुजित टेटे आणि अनिता निखारे प्रामुख्याने उपस्थित होते. दरवर्षी कृष्ण जन्मोत्सव मोठ्या थाटात शाळेत साजरा केला जातो. ठरल्या प्रमाणे चिमुकले विध्यार्थी राधा आणि कृष्णाच्या वेशभूषेत सहभागी झालेले होते.
सहभागी राधा आणि कृष्णानीं आपले मनोगत स्वतंत्रपणे व्यक्त केले आणि सामूहिकरित्या नृत्य सादर केले.
सरते शेवटी कृष्णाच्या वेशभूषेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी दही हंडी फोडून आनंद द्विगुणित केला. सर्वांना बक्षीशे आणि प्रसाद वितरण करण्यात आले. कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी शिक्षिका सरिता थोटे, कलावती ठाकरे, श्रमिका पातोडे, मनीषा काशिवार आणि नलु टेम्भरे यांना देण्यात आली होती.
सदर कार्यक्रमात मोठ्या संख्येत पालक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशासाठी नितेश लाडे, राहुल मोहुर्ले, विश्वाप्रित निकोडे, चंद्रकांत बागडे, वैशाली टेटे यांनी सहकार्य केला.

Monday, 3 September 2018

चिचगड वसतिगृहात जन्माष्टमी साजरी

चिचगड: 2सप्टें. शा. आ. मुलांचे व मुलींचे वसतीगृह चिचगड आणि छत्रपती प्रतिष्ठान चिचगड यांचे संयुक्त विध्यमाने श्री कृष्ण जन्माष्टमी निम्मित भव्यशोभा यात्रा, दहीहंडी आणि गोपाळकाला कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडण्यात आला.
याप्रसंगी दोन्ही वसतिगृहाच्या मुले आणि मुली श्री कृष्ण आणि राधा तसेच भारत माता तसेच क्रांतीवीर बिरसा मुंडा यांचे वेशभूषा धारण करून शोभायात्रे मध्ये सहभागी झाले होते.
प्रसंगी चिचगड गावात वेगवेगळ्या जागी दहीहंडी वसतीगृह आणि गावातल्या होतकरू नवयुवकाद्वारे फोडण्यात आली.
आणि समस्त गावात गोपाळकाला वाटप करण्यात आला.
गावातील आदरणीय आणि माननीय यक्ती कडून झाकी मध्ये संमिलीत प्रत्येक वेशभूषा धारण केलेल्या मुले आणि मुलींना पारितोषिक देण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दोन्ही वसतिगृहाच्या गृहपाल किशोर देशकर , कुमुद देशकर, सर्व मुले आणि मुली तसेच छत्रपती प्रतिष्ठान च्या सर्व कार्यकर्त्यांनी अथक आणि मोलाचे साथ आणि सहकार्य केले.

Saturday, 1 September 2018

न्यू सीता पब्लिक स्कूल च्या मिनी गोविंदानी थाटात फोडली दहीहंडी



देवरी,दि.01 -  स्थानिक सीबीएसई संलग्न न्यू सीता पब्लिक स्कूल व सीता पब्लिक स्कूलच्या वतीने संयुक्तरीत्या जन्माष्टमीचा  कार्यक्रम आज (दि.01) देवरी येथे आयोजित करण्यात आला होता. 
या दोन्ही शाळेतील पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यासाठी कृष्ण-राधा वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत नर्सरी ते पहिल्या वर्गातील सर्वच विध्यार्थी सहभागी झाले होते. पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गटवार दहीहंडी सजावट स्पर्धा घेण्यात आली.  या स्पर्धेतील सर्वच स्पर्धकांनी आपापले कसब पणाला लावले. यामध्ये दिशा पटले ही सर्वोत्कृष्ठ ठरली. दोन्ही शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थीनीनी गोविंदापथके बनवून दहीहंडी फोडण्यासाठी प्रयत्न केले. न्यू सीता पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांनी चार थरांचा मानवी मनोरा उभारून हंडी फोडली. सर्व विजेत्यांना व गोविंदाना पारितोषिक देण्यात आले. .
या कार्यक्रमाप्रसंगी सीता शिक्षण संस्था चे उपाध्यक्ष अंकित अग्रवाल हे उपस्थित होते. स्पर्धेत मूल्यांकन पालक प्रतिनिधी सौ. गजबे ,सौ. नंदागवळी व श्री. श्रीवास्तव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राचार्य रवी खरवडे व मुख्याध्यापक संजय बिंझलेकर यांच्या मार्गदर्शनात हरिश उके, भुपेंद्र सूर्यवंशी, मनोज पेटकुले, रीना चांदेवार ,  प्रियांका लाडे यांच्यासह सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी सहकार्य केले.

मृत कर्मचाऱ्याच्या विधवेला ग्राहक पतसंस्थेची मदत

देवरी,दि.1- एकीकडे आमदार खासदारांना गलेलठ्ठ पगार आणि कोट्यवधीचा आरोग्य विम्याचे कवच पुरवून शासकीय तिजोरीची लूट करणारे सरकार, दुसरीकडे मात्र अंशदायी पेंशन योजनेतील कर्मचाऱ्याचा सेवाकालात मृत्यू झाल्यास त्याला कोणतेही आर्थिक संरक्षण देत नाही. परंतु, आपल्या एका सहकाऱ्यावर ती दुर्दैवी वेळ आल्याने त्याच्या विधवेला मदतीचा हात म्हणून दोन लाखाची मदत करण्याचे पुण्यकार्य ग्राहक पतसंस्था भंडारानी केले. सरकार निष्ठूरपणे वागत असली तरी समाजातील माणुसकी अद्याप हरपली नसल्याचे उदाहरण यानिमित्ताने देवरी तालुक्यात समोर आले आहे.
 सविस्तर असे की, 2005 नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना डीसीपीएस योजना लागू आहे. परंतु, या योजनेत असताना  एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याला कोणत्याही प्रकारचा आर्थिक आधार मिळत नाही. परंतु, ग्राहक पतसंस्था भंडारा तर्फे माणुसकी जपत मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार देऊन समाजात चांगला संदेश दिला आहे. देवरी तालुक्यातील वडेकसा जि.प.शाळेतील शिक्षक अनुहरलाल जांभुळकर यांचे आकस्मिक निधन झाले.  दुःखाची कुऱ्हाड कोसळल्याने त्यांचे कुटुंबीय आर्थिक विवंचनेत सापडले. प्रशासनाने आर्थिक मदतीबाबतीत हात झटकले.असे असताना ग्राहक पतसंस्था भंडाराने जांभुळकर कुटुंबियांना दोन लाख रुपये सानुग्रह निधी देत आधार दिला आहे. 
यावेळी गटसाधन केंद्रात आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात ही मदत श्रीमती जांभूळकर यांना सोपविण्यात आली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश कश्यप, प्राथमिक शिक्षक समितीचे जी.एम.बैस, गजानन पाटणकर, बहेकार सर, वाघाडे सर, खांडेकर सर, प्रवीण सरगर, सदाशिव पाटील, शीतलकुमार कनपटे, पंकज राठोड, यशवंत टेंभुर्णे,गणेश कांगने,राजकुमार बारसे इत्यादी शिक्षक उपस्थित होते.

‘रिमोट’द्वारे वीज चोरी करणाऱ्यांची आता खैर नाही; महावितरणची आजपासून विशेष मोहीम

गोंदिया,दि.01 : नवनवीन युक्ती वापरून वीज चोरी करण्याचे प्रमाण वाढीस लागल्याच्या पृष्ठभूमीवर महावितरणकडून रिमोट कंट्रोलद्वारे वीज चोरी करणाºयांविरोधात राज्यभरात १ सप्टेंबर २०१८ पासून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. यात संबंधित ग्राहकांसह रिमोटची निर्मिती करणाºया कंपनी विरोधातही कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
महावितरणच्यावतीने वीज चोरीवर आळा घालण्यासाठी सातत्याने विविध उपाययोजना करण्यात येतात. वीज चोरी रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात विशेष मोहीम राबवून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येते; परंतु अलीकडच्या काही वर्षांत रिमोट कंट्रोलद्वारे वीज चोरी होत असल्याचे आढळून आले आहे. याबाबत मुंबईत ३० आॅगस्ट २०१८ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत अशा वीज चोरीच्या विरोधात विशेष मोहीम राबविण्याचा व कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही मोहीम १ सप्टेंबर २०१८ पासून संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे.
महावितरणच्या विद्युत मीटरमध्ये फेरफार करण्याचे कसब या यंत्रणेशी संबंधित कुशल कारागीर किंवा तंत्रज्ञांकडेच असते. वीज ग्राहकांकडून काही हजार रुपये घेऊन हे कारागीर रिमोट कंट्रोल तयार करून देतात. अशा तांत्रिक कारागिरांवरही आता महावितरणची करडी नजर आहे.
वीज चोरीची माहिती देणाºयास बक्षीस
रिमोटद्वारे वीज चोरी होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांनी महावितरणला त्याची माहिती द्यावी. अशा वीज चोरीची माहिती देणाºयांना वीज चोरीच्या अनुमानित रकमेच्या १० टक्के रक्कम रोख स्वरूपात बक्षीस म्हणून देण्यात येते, तसेच अशी माहिती देणाºयाचे नावदेखील गुप्त ठेवण्यात येते. त्यामुळे अशा वीज चोरीची माहिती देण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

भंडारा, गडचिरोली, बुलडाणा येथे पासपोर्ट सेवा केंद्र

गोंदिया,दि.01  : ‘पासपोर्ट आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या चौथ्या टप्प्यांतर्गत महाराष्ट्रात बुलडाण्यासह ११ नवीन पासपोर्ट सेवा केंद्र उघडण्यात येणार आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी शुक्रवारी नवी दिल्ली येथे ही माहिती दिली.
नागरिकांना त्यांच्या जिल्ह्यातच पासपोर्ट मिळावा यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने ‘पासपोर्ट आपल्या दारी’ या कार्यक्रमांतर्गत पोस्ट विभागाच्या मदतीने जानेवारी २०१७ मध्ये देशभरात २८९ पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्याचा कार्यक्रम हाती घेतला. टप्प्याटप्प्याने या कार्यक्रमाची अंमलबजावणी होत आहे. पहिल्या तीन टप्प्यात महाराष्ट्रात २५ पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्याची घोषणा करण्यात आली होती. यापैकी आतापर्यंत १४ नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरू झाली आहेत. तर ४ सप्टेंबर २०१८ रोजी बारामती येथे नवीन केंद्राची सुरुवात होणार आहे. आता राज्यात बुलडाणा, भंडारा, गडचिरोली, रामटेक, उस्मानाबाद, हिंगोली,परभणी, धुळे, रावेर, रायगड आणि भिवंडी याठिकाणी नवीन पासपोर्ट सेवा क्रेंद्र उभारण्यात येणार आहेत.
गेल्या दीड वर्षात १४ नवीन पासपोर्ट सेवा केंद्र उघडण्यात आली. यामध्ये वर्धा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, बीड, नांदेड, सांगली,कोल्हापूर, सातारा, घाटकोपर-विक्रोळी, पिंपरी-चिंचवड, पंढरपूर, नांदेड, सिंधुदुर्ग या शहरांचा समावेश आहे. या नवीन केंद्रांद्वारे पासपोर्ट वितरणाचे कार्यही सुरू झाले आहे. बारामती येथे ४ सप्टेंबर रोजी पासपोर्ट सेवा केंद्र सुरु होणार असून, यानंतर अकोला,अमरावती, चंद्रपूर, डोंबिवली, लातूर, माढा, मुंबई नॉर्थ सेंट्रल, मुंबई साऊथ सेंट्रल, नवी मुंबई, पनवेल याठिकाणी पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्याच्या दिशेने कामास सुरुवात होणार आहे.

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...