Saturday 29 February 2020

कोर्ट परिसरात मोबाईलवर गाणे वाजविणे पडले महागात

Image result for court hammerदेवरी,दि.29- देवरीच्या न्यायालय परिसरात एका फौजदारी प्रकरणात तारखेवर आलेल्या एका आरोपीला कोर्ट परिसरात मोबाईलवर गाणे वाजविणे चांगलेच महागात पडल्याची घटना आज शनिवारी (दि.29) घडली. दरम्यान, देवरीचे प्रथम श्रेणी न्यायाधीश शेख मोहम्मद वसीम अक्रम मोहम्मद जलालुद्दीन यांनी सदर आरोपीला 500 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिचगड पोलिसांनी दाखल केलेल्या एका गुन्हातील आरोपी रामेश्वर लालाजी बर्वे, राहणार ककोडी हा आज तारीख असल्याने देवरीच्या कोर्टात पेशीवर आला होता. दरम्यान, कोर्ट सुरू असताना रामेश्वर हा कोर्ट परिसरात मोबाईलवर गाणे वाजवित होता. यामुळे न्यायाधीसांनी त्याचा मोबाईल जप्त केला. आरोपीने कोर्टाला मोबाईल परत मिळण्यासाठी अर्ज केला होता. यावर न्यायाधीसांनी त्याला 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या या निकालामुळे मोबाईल शौकिनांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.

राष्ट्रवादीच्या युवा जिल्हा उपाध्यक्षपदी युगेश बिसेन

देवरी,दि.29-  गेल्या बुधवारी (दि.26) कोहमारा येथे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या जिल्हा आढावा बैठकीत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी युगेशकुमार छोटेलाल बिसेन यांची नियुक्ती करण्यात आली.
एरिया 51 मध्ये आयोजित या सभेच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब भाई शेख हे होते.  यावेळी कार्याध्यक्ष रविकांत  वर्पे, गोंदिया जिला अध्यक्ष किशोर तरोणे, चन्द्रिकापुरे मैडम यांची प्रमुख उपस्थिती होती. 
युगेश बिसेन यांनी आपल्या निवडीचे श्रेय आमदार मनोहर चन्द्रिकापुरे, माजी आमदार राजेन्द्र जैन, विजय शिवनकर, रमेश ताराम, सी. के. बिसेन यांना दिले आहे. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी श्री बिसेन यांचे अभिनंदन केले आहे.

Friday 28 February 2020

सात हजाराची लाच घेतांना केटीएसचा सहा.अधिक्षक जाळ्यात

गोंदिया,दि.28ः येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयाचे सहायक अधीक्षक देवानंद वासनिंक यांना तक्रारदाराकडून सात हजार रुपयांची लाच घेताना आज शुक्रवारला(दि.28) रंगेहाथ पकडण्यात आले.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गोंदिया पथकाने केली.
वासनिक हे 8 मार्च 2019 गोंदियातील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत असून रुग्णालयातील एका कर्मचार्या विरूध्द गुन्हा नोंद असल्याचे पोलीस व्हेरिफिकेशन अहवाल वरिष्ठापासून लपविण्यासाठी लाचेची मागणी केली होती. वासनिक याने तक्रारदारास 14 जानेवारी रोजी आपल्या कार्यालयीन कक्षात बोलावून पोलीस ठाणे कळमेश्वर येथून तुझे पोलीस व्हेरिफिकेशन अहवाल प्राप्त झाले आहे.त्यामध्ये वर्ष 2017 मध्ये जुगार गुन्हाची नोंद असल्याचे नमूद करुन ते वरिष्ठापासून लपविण्यासाठी 10 हजाराची मागणी केली.मात्र तक्रारदारास लाच द्यायची मुळीच द्यायची इच्छा नसल्याने त्यांनी गोंदिया येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.त्या तक्रारीच्या आधारे पोलीस उपअधिक्षक रमाकांत कोकाटे यांच्या नेतृत्वातील पथकाने सापळा रचून ही कारवाई केली.या सहायक अधिक्षकाविरूद्ध गोंदिया शहर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यत आला आहे.

राज्यात होणार ओबीसींची स्वतंत्र जनगणना?; विधानसभेत सर्वपक्षांचे एकमत

मुंबई(विशेष प्रतिनिधी),दि.28 -ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावी ही सबंध महाराष्ट्राची व देशाची मागणी आहे. देशातील एकूण लोकसंख्येत ५४ टक्के ओबीसी आहेत. मात्र, असे असूनही एक नागरिक म्हणून ओबीसींच्या मूलभूत गरजा पूर्ण होतात की नाही याची माहिती उपलब्ध नाही. यासाठी ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावी अशी मागणी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज सभागृहात केली.ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावी या राज्य सरकारच्या मागणीचे केंद्र सरकारकडून आलेल्या नकारात्मक उत्तराचे विधानसभा अध्यक्षांनी सभागृहात वाचन केले, त्यावेळी भुजबळ यांनी सभागृहात स्वतंत्र ओबीसी जनगणनेबाबतची आपली मागणी उपस्थित केली.
यावेळी कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी बिहार राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात ओबीसी समाजाची वेगळी जनगणना करावी अशी मागणी केली.गेल्या कित्येक वर्षांपासून ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेची मागणी करण्यात येत आहे. २०१० साली गोपीनाथ मुंडे, शरद पवार व समीर भुजबळ यांनी स्वतंत्र ओबीसी जनगणनेची मागणी केली होती. मात्र अजूनही या प्रस्तावाला मान्यता मिळालेली नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. समाजातील प्रत्येक घटकासाठी काम करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे या स्वतंत्र ओबीसी जनगणनेच्या मागणीत कोणतंही राजकारण न करता या मागणीच समर्थन करावं. व ही जातनिहाय जनगणना करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेत्यांनी एकत्र यावं अशी मागणीही भुजबळ यांनी सभागृहात केली
या मागणीला विरोधकांनीही समर्थन दिले. यावेळी विधानसभेत बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, १९९० पासून ओबीसी समाजाच्या जनगणेची मागणी होत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींना राज्य सरकारकडून केंद्राला प्रस्ताव दिला होता, अनेक मुख्यमंत्र्यांनीही प्रस्ताव दिला होता. त्यावर नरेंद्र मोदींची सही होती, देशात 54 % ओबीसींची संख्या असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे ओबीसी जनगणना होणे आवाश्यक आहे असे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांना जात नसते पण नरेंद्र मोदी हे स्वत: ओबीसी समाजाचे आहेत. छगन भुजबळांनी केलेली मागणी योग्य आहे.ओबीसींची वेगळी जनगणना व्हायलाच हवी. वंचितांच्या मदतीसाठी त्याची आवश्यकता आहे. हा राजकारणाचा प्रश्न नाही.आज आपल्याकडं मनुष्यबळ आहे. कम्प्युटरसारखं तंत्रज्ञान असताना जातीनिहाय जनगणनेला नेमकी काय अडचण असा प्रश्नही भुजबळ यांनी उपस्थित केला.
ओबीसी मंत्री विजय वड्डेटीवार यांनीही राज्यातील विविध जिल्ह्यात ओबीसींचे आरक्षण कमी असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.सोबतच 27 टक्याचे आरक्षण 19 टक्यावर आणून 52 टक्के ओबीसींची कुचंबणा करण्यात आल्याचे सांगितले.सोबतच 90 टक्के ओबीसी अधिकारी कर्मचारी हे पदोन्नतीच्या प्रतिक्षेत असल्याचे सांगितले.

“देशाचे पंतप्रधान स्वत: ओबीसी आहेत”-फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनीही चर्चेत सहभागी होत ओबीसीच्या वेगळ्या जनगणनेला भाजपचा पाठिंबाच आहे. त्यासाठी पंतप्रधानांकडे धोरणात्मक प्रस्ताव घेऊन जाऊ असे विचार मांडले.ओबीसी जनगणेला आमचे समर्थन आहे, हा धोरणात्मक निर्णय आहे, पंतप्रधान योगायोगाने ओबीसी असल्याने आपण सर्वांनी पंतप्रधानांकडे जाऊन जातनिहाय जनगणनेची मागणी करु, लवकरच पंतप्रधानांना भेटू असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले. तसेच विरोधी पक्षनेते फडणवीस आपल्यासोबत आहेत, ओबीसी जनगणनेला त्यांची साथ आहे, केंद्राची साथ नसली तरी आपण महाराष्ट्रात ओबीसी जनगणना करुन देशाला दाखवून देऊया. महाराष्ट्र हे जगातील पहिले राज्य आहे, ज्यामध्ये शाहू महाराजांनी वंचित घटकांना पहिल्यांदा आरक्षण देऊन मुख्य प्रवाहात आणले असे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांनी सांगितले.

मुल्ला येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

देवरी,दि.28 - येथून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या मुल्ला येथे आज पहाटेच्या सुमारास एका 20 वर्षीय युवकाने आपल्या बेल्टच्या साहाय्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना (दि.28) रोजी घडली. दरम्यान, देवरी पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
मृताचे नाव किशोर शोभेलाल भलावी (वय 20) राहणार मुल्ला असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किशोर हा काल गावात एका लग्न समारंभात गेला होता. तेथे त्याचे काही लोकांशी भांडण झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृत किशोरवर चोरीचा आड घेत त्याला जबर मारहाण झाल्याची चर्चा गावात आहे. किशोर हा संवेदनशील आणि चांगल्या वर्तणुकीचा मुलगा असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. लग्न समारंभात त्याला मारहाण होत असताना त्याचे वडील शोभेलाल यांनी मध्यस्थी करून किशोरला घरी आणले होते. मात्र,नंतर तो घरी कोणालाही न सांगता बाहेर निघून गेला. काही लोकांच्या मते किशोर हा पूर्वी बेल्ट लावत नव्हता. कालच त्याने पहिल्यादा नवीन बेल्ट खरेदी करून लग्न समारंभात गेल्याची चर्चा आहे. मध्यरात्रीच्या सुमारास गावालगत असलेल्या शेतशिवारात किशोरने बेल्टच्या साहाय्याने झाडाला गळफास घेतला . सकाळी गावातील एका इसमाला तो मृतावस्थेत आढळून आल्यावर घटना उजेडात आली. किशोरने गळफास घेतला की कोणी त्याची हत्या तर केली नसावी, असा संभ्रम गावकऱ्यांना पडला असून गावात उलटसुलट चर्चांना पेव फुटला आहे. घटनेतील सत्य  हे पोलिस तपासानंतरच बाहेर येईल.

Monday 24 February 2020

कर्जमुक्ती योजनेची जिल्हयात अंमलबजावणी सुरु;जिल्हयात 35 हजार 325 पात्र लाभार्थी

सिल्ली -शहापूर येथे आधार प्रमाणिकरणास प्रारंभ
भंडारा,दि.24:- राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहिर करुन त्याची आज पासून अंमलबजावणी सुरु झाली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी योजनेची पहिली यादी जाहिर केली आहे. या नुसार भंडारा जिल्हयातील सिल्ली व शहापूर येथे प्रायोगिक तत्वावर कर्जमुक्तीचे आधार प्रमाणिकरण सुरु झाले असून या दोन्ही ठिकाणी 240  सभासद आहेत. आज कर्जमुक्तीचे आधार प्रमाणिकरण पावती वितरित करुन योजनेचा शुभारंभ झाला असून उर्वरित सभासदांची यादी 28 फेब्रुवारी रोजी प्रसिध्द केली जाणार आहे. जिल्हयात 35 हजार 325 लाभार्थी कर्जमुक्तीसाठी पात्र आहेत.
ग्रामपंचायत कार्यालय येथील आपले सरकार सेवा केंद्र, शहापूर येथे जिल्हा उपनिबंधक मनोज देशकर, भंडारा जिल्हा सहकारी सरव्यवस्थापक संजय बरडे व सहाय्यक उपनिबंधक विलास देशपांडे   यांनी सभासदांना कर्जमुक्ती योजनेची आधार प्रमाणिकरण पावती वितरित केली. जिल्हा सहकारी बँकेच्या शहापूर शाखेस उपनिबंधक मनोज देशकर यांनी भेट देवून कर्जमुक्तीच्या कामाचा आढावा घेतला.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत भंडारा जिल्हयातील ज्या शेतकऱ्यांकडे 1 मार्च 2015 ते 31 मार्च 2019 पर्यंत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त कर्ज खात्यात अल्पमुदत पीक कर्जाची 30  सप्टेंबर 2019 रोजी मुद्दल व व्याजासह थकीत असलेली व परतफेड न झालेली रक्कम 2 लाखापर्यंत आहे. अशा शेतकऱ्यांचे अल्प, अत्यल्प, भूधारक या प्रमाणे जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता त्यांच्या कर्ज खात्यात 2 लाखापर्यंत कर्ज मुक्तीचा लाभ या योजनेत देण्यात येणार आहे. जिल्हयातील सर्व राष्ट्रीयकृत बँकेने त्यांच्याकडील 10,110 व भंडारा सहकारी बँकेने 25,215 पात्र लाभार्थ्यांची माहिती शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड केली आहे.
प्रायोगिक तत्वावर शासनाने जिल्हयातील भंडारा तालुक्यातील शहापूर व सिल्ली या दोन गावांमध्ये राष्ट्रीयकृत बँक व ग्रामीण बँक तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिध्द केली आहे. सदर यादी शहापूर व सिल्ली गावांमधील सेतुकेंद्र, ग्रामपंचायत कार्यालय, विविध सेवा सहकारी सोसायटी तसेच संबंधित बँकेच्या शाखेत लावण्यात आली आहे. पात्र शेतकरी सभासदांनी सदरहू यादीत आपले नाव असल्यास संबंधित आपले सेवा केंद्र , सिएससी केंद्र  तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेच्या आधार प्रमाणिकरण केंद्रावर आपले बँक पासबुक व आधारकार्ड घेवून आधार क्रमांक प्रमाणिकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मनोज देशकर यांनी केले आहे.

कर्जमुक्तीचा आनंद मोठा
माझ्यावर सोसायटीचे 1 लाख 54 हजार 671 रुपये कर्ज होते. महाराष्ट्र शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत कर्जमुक्ती दिली.  योजनेची प्रक्रिया सुलभ व जलद होती. कार्यालयात चकरा माराव्या लागल्या नाहीत. आज कर्जमुक्तीची आधार प्रमाणिकरण पावती प्राप्त झाली आहे.  ही अतिशय समाधानाची बाब असून कर्जमुक्त झाल्याचा आनंद मोठा आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा  मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला आहे.
– कमलाबाई रुपचंद हजारे,शहापूर

देवरी नपच्या मुख्याधिकारीपदी अजय पाटणकर रुजू

मुख्याधिकारी पाटणकर
देवरी,दि. 24 - देवरी नगरपंचायतीच्या मुख्य अधिकारी पदाचा कार्यभार आज सोमवारी (दि.24) अजय राजेंद्र पाटणकर यांनी स्विकारला आहे.
श्री पाटणकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना नप पदाधिकारी
देवरी नगर पंचायतीचे तत्कालीन मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे यांची लाखनीचे मुख्याधिकारी म्हणून स्थानांतर झाल्याने देवरीचे मुख्याधिकारी पद हे रिक्त झाले होते. यामुळे देवरी नगरपंचायतीची प्रशासकीय जबाबदारी देवरीचे तहसीलदार विजय बोरुडे यांचेकडे होती. बऱ्याच दिवसांपासून नियमित मुख्याधिकारी पदाच्या प्रतिक्षेत देवरीकर होते.
तत्कालीन मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे यांच्या कामाच्या धडाक्याने देवरीकर चांगलेच परिचित होते. नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी श्री पाटणकर यांचेकडून सुद्धा नागरिकांना बऱ्याच अपेक्षा आहेत. विशेषत रस्त्यावरील अतिक्रमण, पिण्याचे पाणी, स्वच्छता, आरोग्य, रोशनाई आणि सुरळित वाहतुक आदी बाबींची नागरिक त्यांच्याकडून अपेक्षा बाळगून आहे.

दंडबैठकांच्या वेदनेने विव्हळल्या विद्यार्थिनी!

चंद्रपूर,जि.24ः- जिल्ह्यात अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील मुलींना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून राज्य शासनाचे समाज कल्याण विभाग कोट्यवधी रुपये खर्च करते. त्यातीलच चिमूर येथील शासकीय अनुसूचित जाती मुलींची निवासी शाळा असून, शाळेतील दहावीच्या ३६ विद्यार्थिनींना शाळेच्या मुख्याध्यापिकेने दोनशे उठबैठका मारण्याची शिक्षा सुनावल्यामुळे शाळेतील विद्यार्थिनींच्या पायावर सूजन व दुखण्याचा त्रास झाल्याने सहा विद्यार्थिनींना शुक्रवारी महाशिवरात्रीच्या दिवशी चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दोन-तीन तासांचे औषधोपचार करून सुट्टी देण्यात आली. मात्र, शाळेतील मुख्याध्यापिकेकडून हा घृणास्पद प्रकार घडल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून, शैक्षणिक क्षेत्रात खळबळ माजली आहे.
चिमूर येथे शासकीय अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची निवासी शाळा असून, इयत्ता ६ ते १0 वीपर्यंत अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील मुलींना या निवासी शाळेत शिकविले जाते. गुरुवारी शाळेतील ३६ विद्यार्थिनींना शाळेच्या मुख्यधापकाकडून २00 उठबैठका मारण्याची शिक्षा गुरुवारी सुनावली. त्यामुळे विद्यार्थिनींच्या पायावर सूजन व दुखण्याचा त्रास सुरू झाला. यात सुबोधी सर्वज्ञान घुटके (१६), संगिनी प्रज्ञाशील गेडाम (१६), साक्षी देविदास मालके (१६), सुप्रिया कणीला सुखदेवे (१६), सानिया प्रभू खोब्रागडे (१६), नंदिनी अशोक रामटेके (१६) या सहा विद्यार्थिनींच्या पायावर सूजन व दुखण्याचा जास्त त्रास झाल्याने महाशिवरात्रीच्या दिवशी चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दुपारी ११वाजून ५0 मिनिटांनी उपचारासाठी भर्ती करण्यात आले. त्यात तेथील डॉक्टरांनी इंजेक्शन व औषध उपचार करून दोन-तीन तासांनी सुट्टी देण्यात आली.
एकीकडे शासन शिक्षणासाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत असून, शासनाच्या शासकीय अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींच्या शाळेतील मुख्याधापक, शिक्षक कर्मचारी यांच्याकडून विद्यार्थिनींना अशी गंभीर इजा पोहोचेपर्यंत शिक्षा देणे येणार्‍या काही दिवसांत दहावीच्या परीक्षेवर विपरीत परिणाम पडण्याची शक्यता आहे. तसेच मुलींच्या मनावर आघात करणारी घटना असून, या गंभीर व घृणास्पद प्रकाराची चौकशी करून यातील दोषींवर कार्यवाही करण्यात यावी, अशी पालकांच्या तीव्र भावना आहे.
आरोप खोटे -मुख्याध्यापिका
दहावीच्या विद्यार्थिनींची परीक्षा होती. त्याचदरम्यान प्रार्थनेची वेळ झाली. त्यावेळी विद्यार्थिनी हुल्लड करीत होत्या. त्यांनी राष्ट्रीय कर्तव्याचे उल्लंघन केले. त्यामुळे त्यांना शिक्षा देण्यात आली. कर्तव्याची जाण व्हावी, हाच मुख्य उद्देश होता. दंडबैठका मारायला लावल्या. पण, दोनशे बैठका मारायला लावल्या नाहीत. माझ्यावर केलेले आरोप खोटे आहेत, असे मुख्याध्यापिका दुशिला मेश्रामने सांगितले.

Sunday 23 February 2020

आईच्या निधनाचा निरोप आला तरी किर्तन करत राहिले; तेरवी, मुंडणही न करण्याचा सत्यपाल महाराजांचा निर्णय

आईचा देह केला वैद्यकीय महाविद्यालयाला दान, वृद्धांसाठी अन्नदान

अकोला,दि.23 – प्रख्यात सप्तखंजिरीवादक सत्यपाल महाराजांचे वर्धा जिल्ह्यातील एका गावात सायंकाळी कीर्तन सुरू असतानाच अकोटमध्ये घरी शुक्रवारी त्यांच्या आई सुशीलाबाई चिंचोळकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. कीर्तन सुरू असताना अंतिम दर्शनासाठी घरी तत्काळ निघता येणे शक्य नसल्याने आईच्या इच्छेप्रमाणे अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात देहदान करावे, असे त्यांनी नातेवाइकांना सांगितले. दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सर्वोपचारमध्ये येऊन त्यांनी आईचे अंतिम दर्शन घेतले.
दरम्यान, आईच्या निधनानंतर मी केशदान करणार नाही, तेरवी करणार नाही. २१ मेपासून माझ्या आश्रमात मी गरीब व गरजू वृद्ध व्यक्तींसाठी दैनंदिन जे‌वणाची व्यवस्था करणार आहे, असे श्री गुरुदेव सेवा मंडळाचे ज्येष्ठ प्रचारक तथा राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी शनिवारी जाहीर केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी-पुण्यस्मरण महोत्सवात ते बोलत होते.यावेळी बोलताना सत्यपाल महाराज यांनी परंपरांना फाटा देत त्याऐवजी गरजू ज्येष्ठांना अन्नदान करण्याचा संकल्प केला. हाच ग्रामगीतेचा विचार आहे. तसेच अज्ञातांच्या गोळीबारानंतर उपचारादरम्यान मृत्यू झालेले प्रहार जनशक्ती पक्षाचे अकोट येथील माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांनाही यावेळी मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

‘मरने की फिकर क्यों करता है?’
सत्यपाल महाराज म्हणाले, आपल्यावरही चाकूहल्ला झाला होता. मात्र ‘मरने की फिकर क्यों करता है? मरना तो बराबर आयेगा. तू ऐसी फिकर कर ले मन में, मरना तुझसे झुक जायेगा’ या भजनाप्रमाणे आपण निरंतर कार्य करत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या मातोश्रींच्या स्मरणार्थ २१०० रुपयांचा निधी त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीला दिला.

Saturday 22 February 2020

कत्तलीसाठी जाणारी जनावरे पकडली

चिचगड पोलिसांची कार्यवाही

चिचगड,दि.22-  छत्तीसगड राज्यातून नागपूरातील कत्तलखान्याच्या दिशेने जनावरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक गेल्या गुरूवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास चिचगड पोलिसांनी नाकाबंदी करून जप्त केला. या कार्यवाहीमध्ये एकूण 30 जनावरांसह सव्वा सहा लाखाच्या मुद्देमाल घेतले आहे. दरम्यान, पकडलेल्या वाहनातील चालक व वाहक अंधाराचा फायदा घेत सोडून जंगलाच्या दिशेने फरारी झाले. चिचगड पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे

पोलिसांना खबऱ्याच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार, नजिकच्या छत्तीसगड राज्यातून जनावरे अवैधरीत्या कतलीसाठी जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर चिचगडचे ठाणेदार अतुल तवाडे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने ककोडी-चिचगड मार्गावरी कुनबीटोला नजीक नाकाबंदी केली. या नाकाबंदी दरम्यान तपासणीसाठी वाहन क्र. सीजी 4 जेडी 9756 याला रोखण्याचा इशारा दिला असता सदर चालकाने आपल्या ताब्यातील वाहन 100 मीटर दूर नेऊन अंधाराचा फायदा घेत आपल्या साथीदारासह पोबारा केला.. या वाहनाची तपासणी केली असता त्यात 30 जनावरे दाटीवाटीने कोणत्याही वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय वाहतूक करताना आढळून आले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार कवलजितसिंग भाटीया हे करीत आहेत.

Thursday 20 February 2020

शपथपत्रात माहिती लपवल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांना जामीन मंजूर

नागपूर,दि.20- निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करताना माहिती लपवल्याप्रकरणी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी कोर्टात हजेरी लावली. नागपूर न्यायालयात झालेल्या या सुनावणीमध्ये फडणवीस यांना दिलासा मिळाला. त्यांना 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. फडणवीस यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना आपल्याविरुद्ध असलेल्या गुन्ह्यांची माहिती लपविली होती असा आरोप होता. यानंतर माजी मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले.
पत्रकार परिषदेला संबोधित करताना फडणवीस म्हणाले, निवडणुकीत चुकीची माहिती दिली होती असे आरोप लावण्यात आले होते. त्यासंदर्भात मी कोर्टात हजेरी लावली आणि पुढील तारीख मिळाली. कोर्टाकडून आपल्याला जामीन मंजूर झाला असेही ते पुढे म्हणाले. "निवडणुकीत जिंकण्यासाठी मुद्दाम माहिती लपविली होती असा आरोप माझ्यावर लावण्यात आलेला नाही. माझ्याविरुद्ध जे काही आरोप दाखल करण्यात आले होते ते केवळ सार्वजनिक जीवनात केलेली आंदोलने आणि संघर्षांवरून करण्यात आले होते. माझ्या विरोधात कुठल्याही स्वरुपाचे वैयक्तिक असे गुन्हे दाखल झालेले नाहीत." एवढेच नव्हे, तर या खटल्यांमागे कोण आहेत आणि कुणाचे षडयंत्र आहे याची आपल्याला माहिती आहे. दरम्यान, सर्वच निवडणुकींमध्ये माझा 50 टक्के पेक्षा अधिक मतांनी विजय झाला आहे. कोर्टात यासंदर्भात सुनावणी सुरू असल्याने आपल्याला जास्त काही बोलता येणार नाही. कोर्टाकडून मला न्याय मिळेल याची खात्री आहे असेही फडणवीस यांनी सांगितले आहे.

हत्या प्रकरणातील ७ आरोपी गोंदिया शहर पोलीसांच्या ताब्यात

गोंदिया,दि.20- जुन्या वैमनस्यातून मुर्री शिवारातील एका फार्म हाऊसमध्ये सुरेश यादव (४४) या इसमाची बंदुकीने गोळी झाडून १४ फेबुवारीच्या रात्री ८ वाजताच्या सुमारास हत्या करण्यात आली होती. या घटनेतील ७ आरोपींना गोंदिया शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडण्यात यश मिळविले आहे.
पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी  जगदीश पांडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, सपोनी विवेक नार्वेकर, कैलास गवते, रमेश गर्जे, नितिन सावंत, विजय राणे, उपपोलिस निरीक्षक तेजेंद्र मेश्राम व पोलिस कर्मचाऱ्यांनी आरोपींकडून गावठी हत्यार,२ जिवंत काडतूस व इतर साहित्य मध्यप्रदेशातील किरणापूर व जिल्ह्यातील इतर ठकाणातून ताब्यात घेतले. त्यामध्ये .नरेश नेतराम नागपुरे (३१)रा.कृष्णपुरा वॉर्ड गोंदिया, दुर्गेश उर्फ डेनी खरे (२९) आझाद वॉर्ड वसंतनगर गोंदिया, धीरज उर्फ भोला मुन्नालाल उके (२८) गणेश चौक वसंतनगर गोंदिया,राजा महेश सांडेकर (२५) रा.सावराटोली,मोहित दिलीप मराठा(३१)रा.संजयनगर गोविंदपूर,अजय दीपक बनसोड (३०)गड्डाटोली व नारायण संतोष शर्मा(२१)रा.कृष्णपुरा वार्ड गोंदिया ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील आरोपी नारायण शर्मा याने आपल्या मृृत भावाच्या खुनाचा राग मनात धरुन सुरेश यादव यांना मारहाण करुन छातीत गोळी घालूून ठार केले होते. सुरेश यादवचा मुलगा गोलू यादव हा मुरली शर्मा हत्याप्रकरणातील आरोपी असून मृत सुरेश यादवचा मुलगा आहे.
.सिंधी कॉलनी शंकर चौक येथील सुरेश यादव हा नेहमीप्रमाणे १४ फेब्रुवारी रोजी मुर्री शिवारातील एफसीआय गोदामाच्या मागील शेतातील फार्म हाऊसमध्ये होता.रात्री ८ वाजता सुमारास काही युवकांनी बंदुकीने गोळी झाडून त्याची हत्या केली होती. या घटनेची तक्रार गोंदिया शहर पोलिस ठाण्यात काजल रमेश यादव हिने करीत सदर आरोपीवर शंका व्यक्त केली होती. घटनेतील गांभीर्य बघून आरोपीच्या शोधत पाच पथक तयार करण्यात आले होते. पोलिस निरीक्षक बबन आव्हाड पुढील तपास करीत असून कमी वेळात आरोपींना शोधून काढल्याबद्दल पोलिस अधिक्षकांनी तपास पथकाचे अभिनंदन केले आहे. 

मानधनवाढीसाठी स्वयंपाकी महिलांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देतांना(छाया-सतिश पारधी)
गोंदिया,दि.20 : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालिका शाळेतील स्वयंपाकीन महिलांना १० महिन्यांऐवजी १२ महिन्यांचे मानधन देण्यात यावे, या मागणीसाठी स्वयंपाकी महिलांनी सोमवारपासुन लक्षवेधी उपोषणाला सुरवात केली.आज जिल्हा परिषद कार्यालयासमोर शासनाविरोधात जोरदार घोषणा देत लक्ष वेधून घेतले.या आंदोलनाला गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी भेट देत विधानमंडळाच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्याचे आश्वासन दिले. शाळा व्यवस्थापन समिती दोन महिलांना कामावर घेऊन एका स्वयंपाकी महिलेचे मानधन एक हजार रुपए वाटुन देत आहे. २०० ते ३०० विद्यार्थ्यांमागे तीन महिलांना प्रत्येकी एक-एक हजार रुपए घेण्यास बळजबरी करत आहेत. सदर मानधन अत्यल्प असुनही स्वयंपाकीन महिला व पुरूष शाळांमध्ये पोषण आहार शिजवुन देण्याचे काम करत आहे. म्हणुन स्वयंपाकीन महिलांना किमान वेतन लागु करण्यात यावे, अशी तक्रार आणि मागणी यावेळी स्वयंपाकी महिलांनी केली.

स्वयंपाकीन महिलांना सेवेतुन काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्वयंपाकीन महिलांना शाळा व्यवस्थापन समिती इतर महिलांकडुन पैसे वसुल करून त्यांना कामावर घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मानधनातुन अर्धे मानधन दुसºया महिलांना देण्याची हुकू मशाही शाळा व्यवस्थापन समित्या चालवत आहेत. अर्धे मानधन देत नसाल तर उद्यापासुन येऊ नका अशा धमक्या दिल्या जात असल्याचा आरोपही यावेळी स्वयंपाकी महिलांनी केला. तचेच शाळा व्यवस्थापन समित्यांनी शासनाच्या नियमांचा भंग केला आहे. त्यामुळे शासन नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे व स्वयंपाकीन महिलांना नियुक्त करण्याचा अधिकार शाळा व्यवस्थापन समित्यांकडुन काढण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

शेतमजुर लालबावटा संघटनेच्यावतीने मोर्चा

निदर्शने करतांना लालबावटा युनीयन पदाधिकारी
गोंदिया,दि.20-भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या लालबावटा शेतमजदूर संघटनेच्यावतीने विविध मागण्यांना घेऊन आज(दि.२०)फुलचूर नाक्यापासून मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.मोच्र्याचे नेतृत्व राज्य कार्यकारीणी सदस्य हौसलाल रहांगडाले,शेखर कनोजिया,जिल्हासचिव शेतमजदूर यूनियन रामचंद्र पाटिल,चरणदास भावे,कल्पना डोंगरे,प्रल्हाद उके,छनुजी रामटेके,अशोक मेश्राम,बाबुलाल राऊत,रायाबाई मारगाये,पुष्पा कोसरे यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा पोचल्यानंतर दिलेल्या निवेदनात गोqवद पानसरे यांच्या मारेकèयांना शिक्षा देण्यात यावी,अतिक्रमण व वनजमिनीचे पट्टे धारकाच्या नावे करणे,मनरेगा मजुरांना ५०० रुपये प्रतीदिवस मजुरी लागू करणे,आवास योजनेअंतर्गत समान ५ लाख रुपये देणे,शेतकरी,शेतमजुरांना ५ हजार रुपये मासिक पेंशनचा कायदा करणे,शेतमजुराच्या मुलांना उच्चशिक्षणापर्यंत निशुल्क शिक्षण देणे,दलित आदीवासीवरील अत्याचार बंद करणे यासह अनेक मागण्याचा समावेश होता.

लखनसिंह कटरे लिखित काव्यसंग्रहाचे विमोचन

आमगाव,दि.20ः-लखनसिंह कटरे (अपराधी) लिखित 'आखीर बचता तो अंधेरा ही है' या काव्यसंग्रहाचे विमोचन सेवानवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेंद्र तुरकर यांच्या हस्ते सेवानवृत्त वरिष्ठ विस्तार अधिकारी भेय्यालाल कटरे यांच्या अध्यक्षतेखाली १९ फेब्रुवारी रोजी बोरकन्हार येथे करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्याम कटरे, अँड. तिलकसिंह परधीउपस्थित होते. लखनसिंह कटरे हे मराठी साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य असून त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागात जिल्हा उपनिबंधक पदावर यशस्वीपणे कार्य केले आहे. त्यांनी विविध नियतकालीन व वर्तमानपत्रात लेखन केले असून ते झाडीबोली साहित्य मंडळ साकोलीचे संस्थापक सस्य आहेत. सेवानवृत्तीनंतर ८ मराठी ग्रंथ प्रकाशित केले असून धर्मपत्नी उषादेवी कटरे यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांनी 'आखीर बचता तो अंधेरा ही है' या काव्यसंग्रहाचे विमोचन स्वगावी बोरकन्हार येथे करण्यात आले.
या काव्यसंग्रहात एकूण २८ कवितांचा समावेश असून काही रेखाचित्रांसाही समावेश आहे. सुरेंद्र तुरकर यांनी लखनसिंह कटरे हे मराठी भाषेच्या सानिध्यात राहूलनही त्यांचे हिंदी भाषेवर प्रभुत्व असल्याचे सांगितले. भैय्यालाल कटरे यांनी मानकर गुरुजींच्या पुण्याईमुळे आम्ही शिक्षण घेऊ शकल्याचे सांगितले. याप्रसंगी सिता रहांगडाले, मिलिंद रंगारी, श्रावणलाल ठाकूर उपस्थित होते. यावेळी मिलिंद रंगारी यांनी लखनलाल कटरे यांचा शाल देऊन सप्तनीक सत्कार केला.

सुदृढ राहण्याकरिता आरोग्याची नेहमी काळजी घ्या - आ.रहांगडाले

 मेंढा येथे आरोग्य उपकेंद्र इमारतीचे भूमिपूजन.
तिरोडा,दि.20:- आपल्या आरोग्याच्या बाबतीत काही ठराविक नियमांचे पालन कधीही फायद्याचेच ठरते. आहार आणि व्यायामातील नियामितपणा, तसेच झोपेच्या किंवा कामाच्या नियमित सवयी ह्या सर्वच गोष्टींनी आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. पण ह्यामधील काही सवयींचा जर अतिरेक झाला तर तो मात्र आपल्याला नुकसानकारक ठरू शकतो. उदाहरणार्थ वजन कमी करण्यासाठी जर डायट पाळायचे झाले तर डायट प्रमाणे आपले खानपान सांभाळणे चांगले. पण वजन जलद घटविण्याच्या मोहापायी डायटिंग चा अतिरेक करून शरीराला आवश्यक तेवढे अन्न ही न मिळू देणे हे मात्र हानिकारक ठरू शकते असे आमदार रहांगडाले मेंढा येथील भूमिपूजन कार्यक्रमात संबोधित केले.जिल्हा वार्षिक आठ आरोग्य योजना  २०१९-२० अंतर्गत मेंढा येथे आरोग्य उपकेंद्र इमारतीकरिता ८०.०० लक्ष मंजूर असून सदर वास्तूचे भूमिपूजन आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते  नुकतेच संपन्न झाले यावेळी माजीजि.प.उपाध्यक्ष मदन पटले,जी.प.सदस्या सौ.रजनीताई कुंभरे, प.स.सदस्य रमनिक सयाम, कृ.ऊबास संचालक मिलिंद कुंभरे, दिनेश चोबरे,सरपंच गौरीशंकर टेंभरे ,रामकिशोर ठाकूर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.शीतल मोहने, कनिष्ठ अभियंता प्रवीण दमाहे व उपसरपंच अनिल नेवारे, सदस्य रंजिता भिसेन,कल्पना कटरे,माधुरी बिसेन, जयश्री सुरसाउत व गावकरी उपस्थित होते.

हर ,हर ,महादेवाचा गजर प्रतापगडावर हिंदू ,मुस्लिम,तिबेटीयांच्या एकतेचे प्रदर्शन

बोंडगावदेवी(विनायक राखडे)ः   राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या व गोंदिया जिल्ह्यापासून 85 किलोमीटर अंतरावर असलेल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील  अर्जुनी-मोर पासून नवेगाव [बांध ]राष्ट्रीय उद्यानापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या झाडी, झुडपी वनराईने त्याचप्रमाणे डोंगरदऱ्यांच्या पायथ्याशी इटीयाडोह धरनाच्या कुशीत असलेला प्रतापगड सर्वांच्या परिचयाचा आहे .या प्रतापगडावर हिंदू-मुस्लीम सह तिबेटी बांधवांचे धार्मिक ऊत्साह या ठिकाणी पार पडतात .चारशे वर्षाचा इतिहास हिंदू-मुस्लीम तिबेट एकतेचेत प्रतीक  आहे.प्रतापगडच्या या इतिहासिक यात्रेला 21 फरवरी पासून सुरुवात होत आहे .दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षात ही यात्रा येत असते ,यात्रेमध्ये राजकीय सामाजिक धार्मिक भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहतात गोंदिया जिल्हा मुख्यालयापासून प्रतापगड 85 किलोमीटर अंतरावर नवेगाव (बांध )अर्जुनी मोरगाव तालुक्‍याच्या ठिकाणापासून 20 किलोमीटर अंतर आहे .याच परिसरात गोड राज्याचे राज्य असल्याने तटस्थ असा किल्ला सुद्धा आहे .या किल्ल्यापासून सानगडी किल्ल्यावर जाणारा आधीचा भुयार मार्ग 45 किलोमीटर अंतर असल्याचे वयोवृद्ध सांगत होते. अगदी उंच डोंगराच्या चौऱ्या गडावरभगवान शंकराचेमंदिर व मंदिराच्या बाजूला भव्यदिव्य भगवान शंकराची मूर्ती नंदीबैल स्थापना झालेली आहे .या भव्य मूर्ती वरती संकट कोसळून मूर्ती विद्रूप झाल्याने ,नवीन भव्य मूर्तीची स्थापना नानाभाऊ पटोले विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र (राज्य )यांनी 21.3फुटउंच असलेली नवीन मूर्तीची स्थापना करून अभिषेक करून महायज्ञ केला .
20 फरवरी रोजी महा यज्ञाची  समाप्ती  होऊन 21 फरवरी पासून या यात्रेला सुरुवात होत आहे .याच परिसरात  ख्वाजा उस्मानी गणी हारून यांचा दर्गा आहे .मोठ्या प्रमाणात हिंदू ,बांधव एकत्र भगवान शंकराचे व मुस्लिम बांधव दर्ग्यात जाऊन नमाज पढतात. याच परिसरात धरणाच्या कुशीत वसलेली तिबेट ,बंगाली वसाहत आहे. तिबेटी वसाहतीमध्ये  दिवाळीचा धार्मिक सण  जल्लोष असतो, या तिहेरी सणाला मोठ्या संख्येने भाविक _भक्त जनसमुदाय उपस्थित राहतो .भाविक भक्त प्रतापगडाच्या भेटी बरोबर इटियडोह धरण ,नवेगाव (बांध )रमणीय स्थळाला भेट देऊन  शांत मनाने गावाकडे वाढतात .प्रतापगड यात्रेला येणाऱ्या जाणाऱ्या साठी बस गाड्यांची सोय ,पिण्याच्या पाण्याची सोय ,भोजनाची व्यवस्था उपवासाचा नाश्ता यांची व्यवस्था असते . कार्यक्रमासाठी नानाभाऊ पटोले अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, आमदार मनोहर चंद्रिकापुरे ,माजी आमदार राजकुमार बडोले,मनोहरभाई पटेल अकादमीच्या अध्यक्ष वर्षा पटेल यांचेसह तालुक्यातील शेकडो  राजकीय नेते व भक्त जण उपस्थित राहणार आहेत. वनराईने व्यापलेला हा प्रतापगड परिसर पाहण्यासाठी भाविक उत्सुक असतात मुस्लिम बांधवांच्या वतीने दर्ग्याच्या परिसरात कव्वाली चे आयोजन केलेले आहे .प्रतापगड हिंदू-मुस्लीम व तिबेटी वसाहतीचे असे तिहेरी कार्यक्रम होतात .या कार्यक्रमाला कसल्याही प्रकारचा गालबोट लागत नाही. ही एक धन्यता आहे. हर बोला हर हर महादेव च्या गजरात भाविक मोठ्या संख्येने प्रतापगडाकडे रवाना होत आहेत. या परिसराला पर्यटक स्थळ बनविण्याचा नानाभाऊ यांचा प्रयत्न असून यामुळे परिसरातील बेरोजगारांना वर्षभर रोजगार मिळेल ,वन-उपजात मालावर प्रक्रिया उद्योग आणून आदिवासींना रोजगार मिळेल यासाठी नानाभाऊ पटोले प्रयत्नशील आहेत.

नवीन पेन्शन योजना लागू असलेल्या कर्मचा-यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ द्या - पेन्शन हक्क संघटन कर्मचाऱ्यांची आमदारांकडे मागणी

तिरोडा,दि.20:- राज्यात नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर राष्ट्रीय निवृत्ती योजना लागू करण्यात आली असून मृत कर्मचा-यांना सदर नवीन निवृत्तीवेतन योजना लाभाची नसल्याने केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना जुनी निवृत्तीवेतन योजना १९७२ चा लाभ देण्याबाबत ५ मे २००९ रोजी शासन निर्णय घेण्यात आला परुंतु राज्य शास नाने अद्याप या शासन निर्णयानुसार मृत कुटुंबियांच्या परिवारांना पेन्शनचा लाभ देण्याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही तसेच नवीन पेन्शन योजना लागू केल्यापासून मृत झालेल्या कुटुंबियांना लाभ देण्यात आलेला नाही यावर सरकारचे लक्ष वेधण्यात यावे यासंबधी निवेदन नवीन पेन्शन हक्क संघटनेच्या कर्माचा-यांनी आमदार विजय रहांगडाले यांचेकडे दिले यावेळी  संघटना अध्यक्ष संतोष रहांगडाले,संचालक पी.टी.रंगारी,संजय बोपचे, तारेन्द्र ठाकरे,अशोक बिसेन, रवींद्र भगत,मुकेश रहांगडाले,प्रवीण चौधरी,नितीन वादिचोर,प्रदीप धनवटे,प्रवीण राजेश जंजाळ व कर्मचारी उपस्थित होते.

चंद्रपूर येथे भाविकांच्या गाडीला अपघातः सहा ठार

चंद्रपूर,दि.20 :  मूल तालुक्यातील केसलाघाट येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव स्कॉर्पिओ गाडीने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ६ जण जागीच ठार झाले. तर ६ जण गंभीर जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व मृत व्यक्ती चंद्रपुरातील असून गोंदियावरून देवदर्शनाहून परतत असताना त्यांच्यावर काळाने झडप घातली.
केसलाघाट गावात बुधवारी रात्री उशिरा हा अपघात झाला. अपघातातील जखमींना तातडीने मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात इतका भीषण होता की स्कॉर्पिओचा अर्धा भाग ट्रकमध्ये घुसला. हा भाग कापला गेल्याने अपघाताची भीषणता वाढली. जितेंद्र पटपल्लीवार, मनीषा भोयर, अंकिता पेटकुले, क्रिश पाटील, सोमी पाटील, शीला पाटील, रेखा खटिकर अशी स्कॉर्पिओतील काहींची नावे हाती आली असून मृत व जखमींचा नेमका तपशील मिळालेला नाही.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात हलवले व तपास सुरू केला आहे. ट्रक नादुरुस्त होता. या ट्रकला भरधाव स्कॉर्पिओने धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

जातनिहाय जनगणनेसाठी हजारों ओबीसींचा रस्त्यावर एल्गार


Add caption

अन्यथा ७० कोटी ओबीसींना सांभाळणे कठिण-इंजि.ढोबळे
गोंदिया,दि.१९ : भारतीय राज्यघटनेने ओबीसी प्रवर्गाला संवैधानिक अधिकार देत या प्रवर्गाला मागावसर्गीय असा दर्जा दिला. मात्र आजपर्यंतच्या प्रत्येक सरकारांनी ओबीसी प्रवर्गाला त्यांचे अधिकार बहाल करण्याकरिता प्रयत्न केले नाही. जेव्हा – जेव्हा या प्रवर्गाने आपल्या मागण्यांच्या पूर्ततेकरिता आंदोलनात्मक पवित्रा घेतला. तेव्हा-तेव्हा सत्ताधारी मंडळीने हे आंदोलन दाबण्याकरिता प्रयत्न केले. ओबीसी समाज हा भोळा आहे. हा समाज आता जागृत होत आहे. आता या समाजातील नागरिकांना आपले अधिकार कशामुळे मिळू शकले नाही, हे त्यांना कळले आहे. जेव्हा पर्यंत ओबीसी प्रवर्गाची स्वतंत्र जनगणना करून त्यांची आकडेवारी समोर येत नाही, तेव्हापर्यंत या समाजाला आपले अधिकार मिळणार नाहीत. ओबीसी प्रवर्ग देशात ६० टक्क्यांच्यावर आहे. आम्ही निवडून देतो त्या प्रतिनिधींनी आणि सरकारने आता ओबीसींचा अंत पाहू नये. आता आंदोलन म्हणजे दानपेटी झाली असून आमच्याकरिता मतदान म्हणजे मंदीर झाले आहे. या प्रवर्गातील ७० कोटी जनतेने आपल्या मनात ठाणले तर सत्ताही आमची राहिल आणि कायदेही आमचेच चालतील. यापुढे नेतेमंडळी आणि सरकारांने ओबीसींच्या हिताचे बोलले तरच त्यांचेही हित आहे, असे परखड मत ओबीसी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष इंजि. प्रदीप ढोबळे यांनी मांडले.
ओबीसी संघर्ष कृती समिती, ओबीसी राष्ट्रीय महासंघ, ओबीसी सेवा संघाच्या वतीने ओबीसी जनगणनेकरिता जिल्ह्यात ५ फेब्रुवारीपासूनु जनजागृती चेतना यात्रा काढण्यात आली होती. त्या यात्रेचा समारोप आज(दि.१९) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी येथील प्रशासकीय भवनासमोर करण्यात आला. दरम्यान जात निहाय जनगणना व्हावी, यासाठी हजारोच्या संख्येत आलेल्या ओबीसी समाज बांधवांनी भव्य रॅली काढून शासन विरोधात एल्गार पुकारला.त्यावेळी इंजि.ढोबळे मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्याध्यक्ष डॉ. खुशाल बोपचे, मार्गदर्शक ओबीसी सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. प्रदीप ढोबळे, ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे होते. अतिथी म्हणून सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. बी. एम. करमकर,अमर वराडे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सहसचिव खेमेंद्र कटरे, अधिकारी-कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप तिडके,ओबीसी सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष सावन कटरे,सभांजी बिग्रेडचे क्रांती ब्राम्हणकर,युवा स्वाभीमानचे जितेश राणे,आपचे पुरुषोत्तम मोदी, पुष्पा खोटेले,कैलास भेलावे, माजी जि.प. सभापती वाय.टी.कटरे, वाय. टी. कटरे, एस. यू. वंजारी, सुनील भरणे,सविंधान मैत्री संघाचे अतुल सतदेवे, निलम हलमारे,राजेश चांदेवार,राधेलाल पटले,जिवन लंजे,अवामे मुस्लीमचे  आदी उपस्थित होते.
इंजि.ढोबळे पुढे म्हणाले की, महात्मा गांधींनी लढलेली स्वातंत्र्याची लढाई राजकीय होती. त्यातून आम्हाला स्वातंत्र्य मिळाले. त्या लढ्यात सर्वात अधिका ओबीसी प्रवर्ग होता. मात्र या प्रवर्गाला अद्यापही सामाजिक स्वातंत्र्य मिळाले नाही. ओबीसी, एससी आणि एसटी प्रवर्गाला न्याय द्यावयाचा असेल तर सर्वात आधी न्यायव्यवस्थेत या प्रवर्गांचे प्रतिनिधी जाणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगीतले. यावेळी ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष बबलू कटरे यांनी ओबीसी समाजाला अद्याप त्यांचे अधिकार का मिळाले नाहीत. जनगणनेचे फायदे, अन्याय कुणामुळे आणि कशामुळे झाला यावर सविस्तर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्याध्यक्ष व राजकीय समन्वयक डॉ. खुशाल बोपचे यांनी संसदेत ओबीसी खासदारांची कशाप्रकारे दिशाभूल करण्यात येते यावर मार्गदर्शन केले. संचालन मनोज मेंढे, सुनील पटले यांनी केले. आभार राजीव ठकरेले यांनी मानले. कार्यक्रमाच्या आधी सुमारे ५०० दुचाकी आणि २० चारचाकी वाहनांवरून जिल्हाधिकारी कार्यालय ते जयस्तंभ चौक दरम्यान रॅली काढण्यात आली. सभेच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा, छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांच्या छायाचित्राला माल्यार्पण करण्यात आले. यशस्वितेकरिता शिशीर कटरे, लक्ष्मण नागपुरे, गणेश बरडे, विलास चव्हाण, सावन डोये,महेंद्र बिसेन, कैलाश भेलावे,पप्पू पटले, सी. पी. बिसेन, विजय फुंडे, आनंदराव कृपाण, सुनील भोंगाडे, रवी भांडारकर, कमल हटवार, हरीष ब्राम्हणकर, विनायक येडेवार, दिनेश हुकरे, मनोज डोये, मनोज शरणागत, गुड्डू कटरे, संजीव रहांगडाले, राजू चामट, उद्धव मेहेंदळे, राधेशाम भेंडारकर,भुमेश्वर चव्हाण,गौरव बिसेन,चौकलाल येडे,माधव तरोणे,दादा संग्रामे,शैलेष बहेकार,कृष्णा बहेकार,भुमेश शेंडे,नरेंद्र शिवणकर,सुरेंद्र मेंढे,अमृत शरणागत आदींनी सहकार्य केले.

रॅलीने वेधले लक्ष

यात्रेच्या समारोप प्रसंगी जिल्ह्यातील आठही तालुक्यातील ओबीसी समाज बांधव हजारोच्या संख्येने उपस्थित झाले होते. दरम्यान कार्यक्रमाच्या आधी दुचाकी ½व चारचाकी वाहनांवरून जिल्हाधिकारी कार्यालय ते जयस्तंभ चौक दरम्यान रॅली काढण्यात आली. सभेच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा, छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांच्या छायाचित्राला माल्यार्पण करण्यात आले.

आमदारांनी दिले आश्वासन

कार्यक्रम स्थळाला जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनीधींना आमंत्रीत करण्यात आले होते. त्यातील गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी हजेरी लावली. विधानसभेत अध्यक्ष नाना पटोले यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भातील ठरावाला आपण समती दर्शविली होती. ओबीसी प्रवर्ग अद्यापही मागासलेला आहे. पंतप्रधान मोदी यांना मी ओबीसींच्या स्वतंत्र जणगणनेकरिता पत्र लिहीणार असून जेव्हा केव्हा ओबीसींच्या मागण्यांचा विषय येईल, तेव्हा मी ओबीसींसोबत असल्याचे आश्वासन दिले.

या आहेत मागण्या 

राष्ट्रीय जनगणनेत ओबीसींची जनगणना करण्यात यावी, नोकरीत आरक्षण देण्यात यावे, शासकीय नोकरीत एससी, एसटी प्रवर्गातल रिक्त पदे विशेष भरती अभियान राबवुन भरण्यात यावी, खासगी उद्योगात ओबीसी, एसटी, एमटी यांना लोकसंख्येनुसार आरक्षण देण्यात यावे, एससी, एसबीसी विद्यार्थ्यांसारखीच ओबीसी विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिष्यवृत्ती देण्यात यावी, नॉनक्रिमिलेअरची अट रद्द करण्यात यावी, एससी,  एसटी,  शेतक-यांसारख्या ओबीसी शेतक-यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात यावा, ओबीसी कर्मचा-यांना प्रमोशनमध्ये आरक्षण देण्यात यावे, आरक्षण कायद्याची अंमलबजावणी न करणा-या अधिका-यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, संविधानाविरोधी शिक्षण कायदे थांबविण्यात यावे.


Sunday 16 February 2020

जनतेचे ते ऋण फेडण्याची वेळ आली आहे : विधानसभा अध्यक्ष पटोले

अर्जुनी मोरगाव,दि.16ः राज्य व राष्ट्रीय राजकारणात जाण्याची ताकद मला अर्जुनी मोर तालुक्यासह भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील जनतेने दिली आहे. सर्वांना न्याय मिळवून देणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. सत्तेचा उपयोग जनतेच्या विकासासाठी झाला पाहिजे. सत्काराच्या निमित्ताने असलेल्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करु. दर्जेदार शिक्षण, पिण्याचे पाणी, उत्तम दजार्ची आरोग्यसेवा, सुंदर रस्ते अशा जनसुविधा सोबतच मजुरांना मजुरी, सुशिक्षितांना रोजगार, शेतीवर आधारित उद्योग यासह जनतेच्या उदरनिवार्हाचा प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. जनतेने मला मोठे केले त्याचे ऋण फेडण्याची वेळ आता आली आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
ते कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १४ फेब्रुवारी रोजी आयोजित सत्कार समारोहात सत्कारमूर्ती म्हणून बोलत होते. यावेळी विविध ६१ संघटनेच्या वतीने ना. नाना पटोले व आ. मनोहरराव चंद्रीकापुरे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी न्या. ज्ञानदेव परसुरामकर होते. यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष भागवत नाकाडे, राकाँचे तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे, जिप सदस्य किशोर तरोणे, शिवनारायण पालीवाल, खरेदी-विक्रीचे अध्यक्ष नामदेव कापगते, बाजार समितीचे अध्यक्ष कासिम जमा कुरेशी, नगराध्यक्ष किशोर शहारे, राईस मिल संघटनेचे अध्यक्ष मुन्ना पालीवाल, माजी जिप अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख शैलेश जायस्वाल, लुनकरण चितलांगे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना र्शद्धांजली वाहण्यात आली.
ना. पटोले पुढे म्हणाले की, हा परिसर शेतीवर अवलंबून आहे. शेतीसाठी विहीर व सिंचनाच्या कामांना प्रथम प्राधान्य आपण देतो. धापेवाडा प्रकल्पाचे टप्पा दोनचे काम पूर्ण झाले असून टप्पा तीनचे काम लवकरच सुरु होणार आहे. भविष्यात धापेवाडाचे पाणी नवेगावबांधमध्ये पाडण्याचे आमचे प्रयत्न आहेत. झाशीनगर सिंचन प्रकल्पातील अचडणी लवकरच दूर करण्यात येतील. सीएसआरच्या माध्यमातून जनतेच्या पैशावर सुविधा निर्माण करण्याचा आमचा विचार आहे. टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून दजेर्दार शिक्षण, नवेगावबांध, गोठणगाव यासोबत प्रतापगड तिर्थक्षेत्राचा पर्यटन विकास करुन प्रतापगड यात्रा बारमाही सुरू करुन या तिन्ही क्षेत्राचे त्रिमूर्ती सर्किट तयार करुन बारमाही रोजगार उपलब्ध करुन देण्याचा आपला मानस आहे.
आ. मनोहरराव चंद्रिकापुरे म्हणाले की, सत्कार हा साक्षात्कार व चमत्कार असतो. नाना पटोले हे राष्ट्रीय व राज्यातील नेते असले तरी त्यांचा जीव व काळीज भंडारा-गोंदिया जिल्ह्यासह प्रामुख्याने अर्जुनी मोरगाव तालुक्यात आहे. अजुर्नी मोर. तालुका त्यांची कर्मभूमी आहे. जनता नाना पटोलेंवर जीवापाड प्रेम करते. शेतकर्‍यांना न्याय मिळवून देणे ही त्यांची जिज्ञासा आहे. त्यांच्या सोबतीने मी सुद्धा या विधानसभा क्षेत्राचा विकास साधण्याचा अविरत प्रयत्न करणार आहे. शिक्षण, आरोग्य, सिंचन, पिण्याचे पाणी व वीज या मूलभूत गरजांसोबतच अन्य विकास करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. झाशीनगर एरीकेशनचे काम वनखात्याच्या मंजुरीसाठी अडलेला आहे. मंजुरीची फाईल राज्य शासनाच्या माध्यमातून भारत सरकारकडे पाठविली आहे. वन जमिनीच्या पट्टे वाटप संदर्भांत जिल्हा परिषद क्षेत्र निहाय मेळावे लावून तिथेच अतिक्रमणधारकांना पट्टी देण्याची आमची योजना आहे.
धान उत्पादक शेतकर्‍यांना २ हजार ५१८ रुपये प्रतिक्विंटल भाव देण्यात येत आहे. शेतीसाठी वीज ८ तासाऐवजी १५ ते १६ तास वीज देण्याचा आम्ही शासनस्तरावर प्रयत्न करणार आहे. अजुर्नी मोर व सडक-अर्जुनी नगरपंचायत विकासाचा प्लॅन तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. राजकीय प्रवास संघर्षमय असतो. मात्र जनतेच्या आशीवार्दाने संघषार्तून मार्ग काढण्याची आम्ही ताकत निर्माण करु, असे आश्‍वासन आ. चंद्रिकापुरे यांनी दिले. प्रास्ताविक तालुका काँग्रेस अध्यक्ष भागवत नाकाडे यांनी केले. संचालन प्रा. लक्ष्मीकांत कापगते यांनी केले.

आदिवासी विद्याथ्र्यांची डि.बी.टी.योजना रद्द करा आ. कोरोटे

देवरी,दि.16- मागील सरकारने राज्यात आदिवासी समाजातील विद्याथ्र्याकरीता लावलेली डि.बी.टी. योजनेचा जिआर रद्द करावा अशी मागणी आमगांव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहेषराम कोरोटे यांनी केली आहे. ही मागणी मुंबई येथे पार पडलेल्या सर्व पक्षीय आदिवासी समाजाचे आमदार, माजी आमदार, खासदार व माजी खासदार यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरूवारी (ता.१३) आयोजित सभेत केली. या सभेच्या अध्यक्षस्थानी राज्याचे आदिवासी विकास मंत्री ना.के.सी.पाडवी हे होते.
याप्रसंगी सभेत आमदार सहेषराम कोरोटे यांनी आदिवासी समाजातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता मागील सरकारने राज्यात लावलेली डि.बी.टी.योजनेचा जीआर रद्द करावे आणि सध्या राज्यात नामांकित शाळेत दर्जेदार शिक्षणाकरीता आदिवासी विद्याथ्र्यांना पाठविण्यात येत आहे ते पाठविणे बंद करून राज्यातील सर्व आदिवासी शासकीय आश्रमशाळेत आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध करून त्याच ठिकाणी आदिवासी विद्याथ्र्यांना दर्जेदार शिक्षण देण्याची सोय करावी अशी मागणीही आमदार सहषराम कोरोटे यांनी सभेच्या माध्यमातून केली आहे. या सभेत राज्यातील आदिवासी समाजाचे सर्व पक्षीय आमदार,माजी आमदार, खासदार व माजी खासदार बहुसंख्येने उपस्थित होते.

देवरीत संत सेवालाल यांची जयंती उत्साहात


देवरी,दि.16- राष्ट्रीय महामार्गावर देवरी नजीक असलेल्या रूप रेस्टॉरन्ट येथे संत श्री सेवालाल महाराज यांची 281वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

वंसतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटना शाखा देवरीच्या वतीने आयोजत या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवरीचे उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड हे होते. यावेळी देवरीचे नगरसेवक यादोराव पंचमवार, प्रकाश चव्हाण, बापुराव राठोड, शंकर राठोड, प्रदीप राठोड, विलास राठोड,शिवम राठोड, गणेश कांगणे, धुमा नाईक, हरिदास राठोड, विष्णू राठोड, गोकूळ राठोड, सुनील राठोड, भूषण जाधव, रवी जाधव, कमलकिशोर चव्हाण, पंकज राठोड,सुमित चौधरी,प्रवीण सरगर आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक पंकज राठोड यांनी केले. सूत्रसंचालन अंकुश पवार यांनी केले. उपस्थितांचे आभार हरिदास राठोड यांनी मानले.


Saturday 15 February 2020

गोरेगावचे तहसीलदार पुनसे एसीबीच्या जाळ्यात

गोरेगाव,दि.15-  अवैध  मुरुम उत्खनन प्रकरणी कायदेशीर कार्यवाही न करण्यासाठी तक्रारदाराकडून एका खासगी इसमाच्या माध्यमातून 50 हजाराची लाच स्विकारल्यामुळे गोरेगावचे तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात आज (दि.15) शनिवारी अडकले.  लाचलुचपत विभागाच्या या कार्यवाहीमुळे गोंदिया जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
लाच स्विकारणाऱ्या आरोपी तहसीलदाराचे नाव शेखर शेषराव पुनसे (वय 48) राहणार गोरेगाव असे आहे. तर या कामी मदत करणारा खासगी इसमाचे नाव शाहित लतीफ पठाण असे आहे.
त्याचे असे की, तालुक्यातील हौसीटोली  याथील हुटकाल्या तलावातून अवाध मुरूम उत्खनना व वाहतुक केल्या प्रकणात कायदेशीर कार्यवाही  न करता तक्रारदारास मुक्त करण्यासाठी आरोपी तहसीलदार याने 50 हजाराच्या लाचेची मागणी केली. परंतु, तक्रारदारास लाच देणे मान्य न झाल्याने त्याने या प्रकरणाची तक्रार गोंदियाच्या लाचलुचपत विभागाकडे केली. यामुळे या विभागाने या बाबीची शहानिशा काल शुक्रवारी (दि.14) केली. सदर लाचेची रक्कम एका खासगी इसमाच्या माध्यमातून स्विकारल्यामुळे आरोप तहसीलदार आणि त्या खासगी इसमाला रंगेहाथ अटक करून त्यांचेविरोधात गोरेगाव पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
सदर कार्यवाही ला.प्र.वि.नागपूर परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर आणि अप्पर पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार यांचे मार्गदर्शनात पोनि.शशिकांत पाटील.सफौ.शिवशंकर तुमडे, नापोशि. रंजित बिसेन, डिगांबर जाधव, नितिन रहांगडाले, राजेंद्र बिसेन, मनापोशि. गिता खोब्रागडे, वंदना बिसेन यांनी पूर्ण केली

Friday 14 February 2020

चारचाकीला आग लागून वाहन जळाले

देवरी,दि.14ः- गोंदिया-आमगाव राज्यमार्गावरील मुल्ला गावाजवळ असलेल्या नाल्यानजीक आज शुक्रवारला(दि.14)पहाटे 3 च्या सुमारास एका चारचाकी वाहनाला शाटसर्किटने आग लागल्याची घटना घडली.यात जिवित हानी झाली नसली तरी वाहन पुर्णतःजळाले आहे.

ओबीसी विभागाचे नाव बहुजन कल्याण विभाग नव्हे, ओबीसी विभागच हवे! -खेमेंद्र कटरे

गोंदिया,दि.13ः – राज्य सरकारच्या आज झालेल्या बैठकीत ओबीसी विभाग (ईतर मागास वर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास ,विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग ) नाव बदलून बहुजन कल्याण विभाग करण्यात आले आहे. सदर विभागाच्या नाव बदलास राष्ट्रीय ओबीसी महा संघाने विरोध दर्शविला असून मागील सरकारने दिलेले ओबीसी मंत्रालय हेच नाव कायम ठेवावे, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सहसचिव व गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीचे मार्गदर्शक  खेमेन्द्र कटरे यांनी केली आहे.
 सरकारने एका आठवड्याच्या आत बहुजन कल्याण विभाग हे ठेवलेले नाव बदलून ओबीसी विभाग(मंत्रालय) न केल्यास आंदोलनात्मक पावित्रा घेण्याचा इशारा दिला आहे. राज्यात या विभागा अंतर्गत येत असलेले विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग हे केंद्रात ओबीसी प्रवर्गातच येत असल्याने ओबीसी मंत्रालय हेच नाव योग्य आहे. 8 डिसेंबर 2016 रोजी राष्ट्रीय ओबीसी महा संघाने काढलेल्या महामोर्चामुळे तत्कालीन राज्य सरकारला ओबीसी मंत्रालयाची घोषणा करावी लागली. त्यानंतर तत्कालीन सरकारने या मंत्रालयाचे विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास वर्ग विभाग असे नाव ठेवले होते. त्यावरही राष्ट्रीय ओबीसी महा संघाने आक्षेप घेत मोठ्या संख्येने असलेल्या ओबीसींचे नाव आधी घेण्याची मागणी केली. त्यानंतर राज्य सरकारने इतर मागास वर्ग हे नाव दिले. त्यात विद्यमान सरकारने ओबीसींची स्वतंत्र ओळख पुसून ओबीसी च्या अस्मितेवर घाला घातला आहे. सरकारने आजच्या मंत्रिमंडळात घेतलेला निर्णय त्वरित रद्द करून ओबीसी मंत्रालय (विभाग) हेच नाव कायम ठेवावे अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सहसचिव व गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीचे मार्गदर्शक  खेमेन्द्र कटरे यांनी दिलेल्या म्हटले आहे.

जन्माच्या तीन तासांत बदलले बाळाचे रक्त;गोंदियातील पहिलाच प्रयोग यशस्वी


गोंदिया,दि. 14 : एकेकाळी गोंदियातील रुग्ण लहान सहान कारणांकरिता नागपूर येथे पाठविण्यात येत होते. त्याचा आर्थिक भूर्दंड रुग्णाच्या नातलगांना सहन करावा लागत होता. शिवाय वेळ देखील वाया जात होता. नागपूरला जाण्याकरिता साडेतीन ते चार तासांचा वेळ लागत असल्यामुळे प्रसंगी रुग्णाचा जीव जाण्याची भिती देखील राहत होती. मात्र आजघडीला शहरात उच्च आरोग्य सेवा मिळण्यास सुरुवात झाली आहे. उच्चशिक्षण घेवून येथे डॉक्टर स्थिरावत आहेत. अत्यंत कठीण परिस्थितीत देखील रुग्णांना उपचार मिळू लागला आहे. कठीणात कठीण असा उपचार करण्यात येथील गोंदिया सेंट्रल हॉस्पीटलमध्ये नवजात शिशू विभागाचे विशेषज्ञ डॉ. सुनील बाळकृष्ण देशमुख यांनी करून दाखविला. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी येथील अर्चना दीपक गजभिये यांना प्रसूतीकरिता दाखल करण्यात आले. प्रसूती झाल्यानंतर बाळाच्या आईचा रक्तगट निगेटिव्ह असल्यामुळे बाळाला गर्भाशयातच अॅनिमिया झाला होता. त्यामुळे पिलीयाचा आजार वाढला होता. त्या बाळाच्या जीवाला धोका होता. त्यामुळे त्याचे रक्त बदलणे गरजेचे होते. डॉ. सुनील देशमुख यांनी हे प्रकरण अत्यंत शिताफीने हाताळले. बाळाच्या जन्माच्या दिवशीच अवघ्या ३ तासांच्या आत बाळाचे रक्त बदलण्यात आले. हा प्रयोग जिल्ह्यातील पहिलाच आहे. डॉ. देशमुख एमबीबीएस एमडी फेलोशिपप्राप्त आहेत. त्यांनी आपले शिक्षण केईएम या नामांकीत रुग्णालयात केले. त्या बाळाला सात दिवसांच्या आत सुटी देण्यात आली.  उल्लेखनीय म्हणजे अवघ्या ३० तासांत बाळाचे रक्त तीन वेळ बदलण्यात आले. रक्त बदलाची प्रक्रीया करण्यात डॉ. सुनील देशमुख यांना नवजात शिशू विभागाचे डॉ. उमेंद्र बोपचे, डॉ. विलास मेंढे आणि एनआयसीयू स्टाफने त्यांना सहकार्य केले.  


Monday 10 February 2020

ओबीसींची गणना करा नाही तर राष्ट्रीय जनगणनेवर ओबीसींचा बहिस्कार

ओबीसींच्या जनगणनेसाठी नागरिक रस्त्यावर उतरले



देवरी,दि.10- परक्या इंग्रजांनी ओबीसींची संख्या 1931 मध्ये निश्चित केली. मात्र, स्वतंत्र भारतात संविधानात तरतूद असताना सुद्धा ओबीसींची जनगणना केली जात नाही. येथे कुत्र्या माजरांची गणती होते, मग ओबीसींना त्यांचे संवैधानिक हक्क नाकारले का जात आहेत? देशात ओबीसींची जनगणनेचे आश्वासन देऊन देशात भाजप आघाडीने सत्तेचे सिंहासन मिळवले. तत्कालीन केंद्रीय मंत्री राजनाथसिंह यांनी संसदेत तसे आश्वासन सुद्धा दिले. असे असताना 2021 मध्ये होऊ घातलेल्या राष्ट्रीय जनगणनेच्या फार्मेट मध्ये ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना ठेवण्यात आला नाही. हा विश्वासघात आहे. जोपर्यंत केंद्रातील सरकार ओबीसींच्या गणती साठी स्वतंत्र रकाना देत नाही, तो पर्यंत ही गणना होऊ दिली जाणार नाही. ओबीसी समाज आता यासाठी रस्त्यावर उतरला आहे, असे प्रतिपादन ओबीसीसंघर्ष कृती समितीचे गोंदिया जिल्हाध्यक्ष बबलू कटरे यांनी उपविभागीय कार्यालयासमोर झालेल्या एका सभेत आज सोमवारी (दि.10) केले.
गेल्या 5 तारखेपासून जिल्ह्यात ओबीसी संघर्ष कृती समितीच्या वतीने ऱाष्ट्रीय जनगणना 2021 मध्ये ओबीसींची जनगणनेला घेऊन जनजागरण यात्रेची सुरवात करण्यात आली. या यात्रेचे काल रविवारी तालुक्यात आगमण झाले होते. संपूर्ण तालुक्यात भ्रमण करून या यात्रेचे स्थानिक उपविभागीय कार्यालयासमोर  एका जंगी सभेत रुपांतर  झाले. या यात्रेत ओबीसी नागरिकांसह राजकीय नेते, वकील, कर्मचारी-अधिकारी, शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने  उपस्थित झाले होते. दरम्यान, या यात्रेत सहभागी झालेल्यांनी गगनभेदी घोषणी देत ओबीसी जनगणनेची मागणी रेटून धरल्याचे दिसून आले.
पुढे बोलताना श्री कटरे म्हणाले की, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसींना न्याय देण्यासाठी जीवाचे रान केले. त्यांनी घटनेत 340 कलमांतर्गत ओबीसींच्या हक्काचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला. एससी-एसटीसाठी स्वतंत्र अनुसूची तयार करण्यात आली. मात्र,या देशातील स्वार्थी प्रवृत्तींनी ओबीसींची यादी तयार होऊ दिली नाही. परिणामी, 1931 नंतर ओबीसींची नेमकी संख्या किती, हे कळायला मार्ग नाही. यामुळे ओबीसींचे हक्क मारून त्यांच्या टाळूवरचे लोणी गब्बर लोक खात आहेत. याही वेळेस आपली गणती झाली नाही, तर पुढील 10 वर्षे आपल्याला येथील न्यायव्यवस्था सुद्धा तरतूद असतांना नेमक्या संख्येअभावी न्याय देऊ शकणार नाही. देशाची तिजोरी भरणारा आणि लोकांच्या पोटाची खळगी भरणाऱ्या देशातील ओबीसीला त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याची खेळी खेळली जात आहे. घटनेत तरतूद नसताना मराठा असो की सवर्ण आरक्षण एका रात्रीतून दिले जाते. मात्र, ओबीसींना घटनेत तरतूद असताना ते नाकारले जाते. आपले हक्क आपल्याला आता पर्यंत मिळायला पाहिजे होते. मात्र, आपल्या नालायक लोकप्रतिनिधींमुळे आपल्याला रस्त्यावर उतरावे लागत आहे, हे दुर्दैव आहे. मात्र, आपले अस्तित्व टिकविण्यासाठी आता ओबीसी समाज रस्त्यावर उतरला आहे. म्हणून सरकारने आपले डोके वेळीच ठिकाणावर आणनू ओबीसींची जणगणना केली पाहिजे असे आवाहन श्री कटरे यांनी केले. यावेळी संदीप तिडके, श्री गायधऩे, राजेश चांदेवार आदीनी सभेला संबोधित केले. या यात्रेत नगरसेवक प्रवीन दहिकर, अनिल येरणे, अड. भुषण मस्करे, छोटेलाल बिसेन, दिलीप द्रुगकर, ज्योतिबा धरमशहारे, जितेंद्र रहांगडाले,भोजराज फुंडे, चेतन उईके, सुदर्शन लांडेकर, बबलू गिऱ्हेपुंजे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. 

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...