Sunday 18 April 2021

जुगार खेळणाऱ्या 11 आरोपींकडून चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत

 देवरी पोलिसांची धडक कार्यवाही


देवरी,दि.18- देवरी पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या मरामजोब आणि शेडेपार परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर धडक कार्यवाही करीत एकूण 11 अरोपींसह 4 लाख 8 हजार 560 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात देवरी पोलिसांना यश आले आहे. या दोन्ही कारवाया काल शनिवारी सायंकाळी 7 ते 9 वाजेदरम्यान करण्यात आल्या. या दोन्ही गुन्ह्यातील आरोपींवर मुंबई जुगारबंदी कायद्यानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

 सविस्तर असे की, देवरी तालुक्यातील शेडेपार शेतशिवार आणि मरामजोब नजिकच्या झुडपी जंगलात काही इसम जुगार खेळत असल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळाली. या मिळालेल्या माहितीवरून, अप्पर पोलिस अधीक्षक यांचे नेतृत्वातील एका पथकाने सुमारे साडेसातच्या सुमारास शेडपार नजिक शेतशिवारात सुरू असलेल्या जुगार अड्यावर धाड टाकून चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या. यामध्ये उमेश शाहू, कवलदीपसिंग भाटिया, अविनाश ढवळे, आणि रोशन बागवा यांचा समावेश आहे. या आरोपींकडून 2 मोबाईल सह एकूण 43 हजार910 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. 

दुसरी कार्यवाही ही मरोमजोब परिसरातील झुडपी जंगलात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर करण्यात आली. यामध्ये एकूण 11 आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले असून त्यांचेकडून 7 मोबाईल, 5 मोटारसायकलींसह 3 लाख 64 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या दोन्ही गुन्ह्यातील आरोपींवर देवरी पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. देवरी पोलिसांनी केलेल्या या कारवायांबद्दल परिसरातील नागरिक पोलिसांचे कौतूक करीत असून अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.

Saturday 17 April 2021

खा. सुनील मेंढे यांनी केली गोंदिया जिल्ह्यातील वैद्यकीय व्यवस्थेची पाहणी.


गोंदिया.दि.17- खा.सुनील मेंढे यांनी गोंदिया जिल्ह्यातील वाढत्या कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी शहरातील शासकीय तथा खाजगी वैद्यकीय व्यवस्थेचा आढावा घेतला. रुग्णांसाठी वाढीव खाटांची व्यवस्था  करणे, वैद्यकीय उपकरणे व औषधी सहजरीत्या उपलब्ध व्हावी यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

सिंधी समाज बांधवांसोबत भेट घेवून कोरोना विषाणूच्या या भयावह परिस्थितीवर कशा प्रकारे मात करता येईल, याबाबत सविस्तर चर्चा केली. स्थानिक सिंधी मनिहारी धर्मशाळेत ७० खाटांचे कोविड सेंटर उभारण्याचे ठरविण्यात आले. या ठिकाणी वैद्कीय सेवा  देण्यासाठी खा. मेंढे यांनी डॉ. दीपक बाहेकर यांना विनंती केली. यावेळी राजकुमार नोतानी, मनोहर आसवानी, महेश आहुजा, शंकरलाल मेघांनी, हरिराम आस्वानी, राजू चावला, नारी चांदवानी, प्रेम चांदवानी, सुनील रामानी, आशिष फुंदनानी, अनिल हुंदानी, सुनील चावला, धरम खटवानी, श्रीचंद डोडानी, राम लालवानी, रवी बोधानी, नरेश लालवानी,  मनोज दूर्गानी, अशोक जयसिंघानिया, आदेश शर्मा,व गूड्ड चांदवानी उपस्थित होते.

याशिवाय नजीकच्या हिवरा गावात सहयोग हॉस्पिटल यांच्या सहकार्याने कोविड सेंटर उभारण्या बाबत खा. मेंढे यांनी जयेश रमादे  यांचे सोबत भेट घेवून  चर्चा केली.
I.M.A. गोंदिया शाखेचे अध्यक्ष डॉ. विकास जैन, डॉ.राजेंद्र जैन, डॉ. गौरव बग्गा, डॉ. राणा, डॉ.भगत यांचे सोबत बी.जे. रुग्णालयाला भेट दिली व कोरोना परिस्थितीवर मात करण्यासाठी चर्चा करण्यात आली.  यावेळी सर्व वैद्यकीय अधिकारी, परिचारक यांच्या कर्तव्यपालनाचे कौतुक केले.
लायंस परीवार गोंदिया व गोंदिया विधान सभा ग्रुप च्या सदस्यातर्फे तात्पुरते रुग्णालय उभारण्याचे ठरविण्यात आले. या कामी  दीपक कदम, गजेन्द्र फुंडे, रितेश अग्रवाल, कालूराम अग्रवाल,  प्रतिक कदम, आदेश शर्मा, राजेश कनोजीया  यांचे विशेष  सहकार्य लाभणार आहे.  
भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री संजय पुराम व त्यांच्या पत्नी कोरोनाग्रस्त असून डॉ. बजाज यांचे रुग्णालयांत उपचार घेत आहेत, त्यांची भेट घेवून लोकसेवेसाठी लवकर रुजू व्हावे, अशी सदिच्छा व्यक्त केली. यावेळी डॉ बजाज यांचेशी श्री पुराम यांचे प्रकृती बद्दल विचारपूस केली व कोरोना काळातील रुग्ण सेवे बद्दल त्यांचे आभार मानले.

कोविड रुग्णालयातील खाटांची क्षमता वाढवा -ना. विजय वडेट्टीवार

 


  गोंदिया, दि.17 : जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत असून उपचारासाठी खाटांची संख्या कमी पडत आहे. ही बाब लक्षात घेवून कोविड रुग्णालयातील खाटांची क्षमता वाढविण्याच्या सूचना आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिल्या.

         17 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात कोविड उपाययोजना संदर्भात आढावा बैठकीत बेड उपलब्धता, आरोग्य सुविधा, कोविड केअर सेंटर, लस उपलब्धता, रेमडेसिव्हर, ऑक्सीजन उपलब्धता व रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधेबाबत आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार सहेषराम कोरोटे, जिल्हाधिकारी दिपक कुमार मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिपकुमार डांगे, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

         मंत्री विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले, रुग्णालयातील बेडची क्षमता वाढविण्यात भर देण्यात यावा तसेच ज्या रुग्णालयामध्ये मनुष्यबळाची कमतरता आहे त्या ठिकाणी खाजगी हॉस्पीटल व डॉक्टर्सची मदत घेण्यात यावी. खाजगी हॉस्पीटलमध्ये बेडच्या उपलब्धतेबाबत विशेष लक्ष देण्यात यावे. जिल्ह्यात RTPCR Antigen टेस्टींग वाढविण्यात याव्यात. ऑक्सीजनचा पुरवठा वाढविण्यात यावा. ऑक्सीजनच्या पुरवठ्यासाठी राजनांदगाव जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. रेमडेसिव्हर इंजेक्शनचा पुरवठा वाढविण्यात आला असून लवकरच उपलब्ध होणार आहे. खाजगी व शासकीय रुग्णालयातील कोरोना रुग्णांची माहिती सांकेतिक स्थळावर (डॅशबोर्डवर) प्रसिध्द करण्यात यावी. पोलीस यंत्रणेने संचारबंदीमध्ये पोलीस बंदोबस्त चोख ठेवावा. कोरोना उपाययोजनेवर जिल्हा नियोजन समितीमधून 30 टक्के निधी खर्च करण्यात यावा. कोरोना उपाययोजनेबाबत आपण निधीची मागणी करा, निधी कमी पडू देणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.

         सभेला निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, नगरपरिषचे मुख्याधिकारी करण चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.नरेश तिरपुडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरिश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन कापसे, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते व जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे उपस्थित होते.


 

प्राणवायू अभावी केटिएस रुग्णालयात मृत्यू झाल्याचे वृत्त निराधार - अधिष्ठाता


गोंदिया,दि.17- प्राणवायूच्या पुरवठयाअभावी रुग्णांचा मृत्यू झाल्याची कोणतीही घटना कुंवर तिलकसिह सामान्य रुग्णालय, गोंदिया येथे घडलेली नाही, असा खुलासा जिल्हा शल्य चिकित्सक अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया यांनी संयुक्त प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
    शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय अंतर्गत कुंवर तिलकसिंह सामान्य रुग्णालय, गोंदिया येथे  १५ एप्रिल २०२१ रोजी तसेच १६ एप्रिल २०२१ रोजी १५ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू प्राणवायू अभावी अवघ्या दीड तासात झाल्याचे वृत्त काही वृत्तपत्रातून आणि समाजमाध्यमातून प्रसिद्ध झाले होते.. सदर वृत्त हे निराधार असून प्राणवायुच्या पुरवठयाअभावी रुग्णांचा मृत्यू झाल्याची कोणतीही घटना कुंवर तिलंकसिह सामान्य रुग्णालय, गोंदिया येथे घडलेली नाही.
  याशिवाय कुंवर तिलंकसिह सामान्य रुग्णालय, गोंदिया येथे१०० खाटांचे  रुग्णालय १२० खाटांचे अशा प्रकारचे कक्ष कोविड तसेच संशयीत रुग्णांच्या उपचारासाठी कार्यरत आहेत  या ठिकाणी एकाच वेळी जास्तीत जास्त २२० कोविड रुग्ण भरती असतात रुग्णांच्या तब्बेतीवर २४ बाय डॉक्टर तसेच नर्सिग आरोग्य कर्मचारी लक्ष ठेऊन असतात उपचार करतात. दिनांक १४ एप्रिल २०२१ रोजी १९, दिनांक १५ एप्रिल २०२१ रोजी १५ दिनांक १६ एप्रिल २०२१ रोजी १७ कोविड तसेच संशयीत रुग्णांचे मृत्यू झाले होते.. सदर रुग्णांचे कोविडच्या अतिगंभीर आजारामुळे त्यांचे मृत्यु झालेले आहेत.. दिनांक १५ एप्रिल २०२१ रोजी ऑक्सीजन सिलेंडरचा साठा उपलब्ध होता गरजेप्रमाणे रिक्त असलेले ऑक्सीजन सिलेंडर भरुन घेण्याची कार्यवाही रुग्णालय स्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावर करण्यात आली.
  जिल्हयातील रुग्णांचे नातेवाईक फार मोठया प्रमाणात गर्दी करतात. तसेच उपचारामध्ये हस्तक्षेप करतात आरोग्य कर्मचारी यांच्या कामामध्ये बाधा आणतात. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना, डॉ. नरेश तिरपुडे, अधिष्ठाता, शा.वै. रु, गोंदिया डॉ. अमरीश मोहबे, जिल्हा शल्यचिकीत्सक, केटिएस सामान्य रुग्णालय, गोंदिया यांची जिल्यातील नागरीकांना विनंती आहे की, त्यांनी आरोग्य विभागातील कर्मचारी यांना कोरोना बाधीत रुग्णांची सेवा करण्यास अडथळा आणता सहकार्य करावे.

फ्रंट लाइन वर्कर्सना औषधोपचार उपलब्ध करून द्या- राज्य सरकारी कर्मचारी संघटना

गोंदिया,दि.17- कोरोना संकट काळामध्ये प्रथम फळीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तातडीने औषधोपचार उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी  राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने शासनाकडे केली आहे.
. सद्य परिस्थिती मध्ये कोरोना या संसर्गजन्य रोगाची वाढती परिस्थिती लक्षात घेता अनेक शासकीय अधिकारी / कर्मचारी हे फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करीत असून सदर रोगास बळी पडत आहेत. त्यामुळे त्यांच्या परिवारा पुढे फार मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. विशेष म्हणजे जे अधिकारी / कर्मचारी पोलीस, आरोग्य, महसूल यासारख्या शासनाच्या प्रमुख विभागात काम करीत असून आपल्या मनात कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता किंवा आपल्या नंतर आपल्या आप्तांची चिंता न बाळगता आपले कर्तव्य पार पाडीत आहेत आणि याचा परिणाम त्यांच्या जीवावर तसेच त्यांच्या आप्तांच्या जीवावर देखील होत आहे, अशा परिस्थितीमध्ये संबंधित कर्मचाऱ्याला किंवा त्याच्यामुळे त्याच्या परिवाराला जर सदर रोगाचा प्रादुर्भाव झाला असेल तर राज्यातील चिंताजनक परिस्थिती लक्षात घेता वेळेवर रुग्णालय, औषधोपचार यासारख्या अन्य आवश्यक बाबी वेळेवर मिळत नसून अनेक ठिकाणी रुग्णांना जीव देखील गमवावा लागत आहे. त्यामुळे शासनाच्या प्रमुख विभागात काम करणाऱ्या शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्याकरिता प्राधान्याने रुग्णालय तसेच औषधोपचार व इतर अनुषंगिक बाबी उपलब्ध करून रुग्णावर आवश्यक तो औषधोपचार करण्याच्या अनुषंगाने व्यवस्था करण्याचे नियोजन करण्याबाबत राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र चे सहसचिव आशिष रामटेके यांच्याद्वारे ना. श्री.नवाब मलिक, मंत्री अल्पसंख्यांक विकास व औकाफ, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता तथा पालकमंत्री गोंदिया जिल्हा यांच्या नावे निवेदन देण्यात आले. सदर निवेदन देतानी कोरोना विषयक परिस्थिती लक्षात घेता, सदर निवेदन मा.पालक मंत्री महोदय यांचे खाजगी सचिव मा. श्री. जमीर शेख यांच्यामार्फत देण्यात आले असून आवश्यक उपाययोजना करण्याबाबत विनंती करण्यात आली आहे.

भंडारा जि.प.चे माजी अध्यक्ष तथा कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते टोलसिंह पवार काळाच्या पडद्याआड

टोलसिंह पवार

  गोंदिया,दि.17- गोंदिया- भंडारा जिल्ह्याच्या राजकारणातील एक वजनदार आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व म्हणून दरारा असणारे भंडारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष  टोलसिंह पवार हे काल शुक्रवारी (दि.16) रात्री साडे दहाच्या सुमारास काळाच्या पडद्याआडे गेले. मृत्यू समयी ते 85 वर्षाचे होते.

सविस्तर असे की, स्व. पवार यांना प्रकृती स्वास्थ्यामुळे दोनदिवसांपूर्वी गोंदियाच्या बजाज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांनी रुग्णालयातून सुटी घेतली. ते सुरतोली येथे असलेल्या त्यांच्या निवासस्थानी आल्यावर त्यांचे आपल्या मित्रमंडळीशी फोनवर बोलणे केले. घरच्यामंडळीशी संवाद साधत असताना त्यांची प्रकृती अचानक खालवली आणि थोड्याच वेळात त्यांची इहलोकीची यात्रा संपुष्टात आली. मृत्यू पश्चात त्यांचे मागे दोन मुले, चार मुली, माजी जिप सदस्य दीपक पवार आणि नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे. त्याशिवाय गोंदिया-भंडारा जिल्ह्यात मोठ्या संख्येने असलेल्या त्यांच्या चाहत्यावर दुःखाचे डोंगर कोसळल्याच्या भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.  

गोंदिया-भंडारा जिल्ह्याची राजकारणात स्व. टोलसिंह पवार यांचे नाव आजही आदराने घेतले जाते. त्यांचा राजकारणातील प्रदीर्घ प्रवास आणि अनुभव याचा जिल्ह्याच्या विकासात मोठा वाटा आहे. त्यांनी सुरतोलीचे सरपंच पदापासून तर  देवरी पंचायत समितीचे उपसभापतीपद, भंडारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविले आहे. कॉंग्रेस पक्षातही ते मोठ्या पदावर राहिले आहेत. ते कायद्याचे उत्तम जाणकार म्हणूनही नावाजलेले होते. गोंदिया जिल्हा निर्मितीकरीता त्यांचे योगदान अमूल्य आहे. देवरी तालुक्याच्या विकासाचा पाया रचण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या निधनामुळे दोन्ही जिल्ह्याच्या राजकारणातील एका प्रकाशमान ताऱ्याचा अस्त झाला आहे.

स्व. टोलसिंह पवार यांचेवर आज दहा वाजता स्थानिक मोक्षधामावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Wednesday 14 April 2021

जवाहर नगर आयुध निर्माणी रुग्णालयाला खासदार सुनील मेंढे यांची भेट

भंडारा,दि.14- जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता परिसरातील शासकीय, निमशासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये समन्वय साधून रुग्णांवर उपचार करण्याच्या दृष्टीने खासदार सुनील मेंढे यांनी जवाहर नगर येथील आयुध निर्माणी रुग्णालयाला भेट देऊन तेथील वैद्यकीय अधिकारी व इतर अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

जिल्ह्यात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे अनेक अडचणी निदर्शनास येत आहेत. रुग्णांलयातील खाटांची संख्या अपुरी पडत आहे. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी जास्तीत जास्त व्यवस्था उपलब्ध करण्याच्या दृष्टीने खासदार सुनील मेंढे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी त्यांनी जवळील आयुध निर्माणीच्या रुग्णालयाला भेट दिली.
रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर तेथे ऑक्सिजन पुरवठा असलेल्या खाटा रुग्णांना कश्या प्रकारे उपलब्ध करून देता येईल या दृष्टीने पाहणी व चर्चा करण्यात आली. आयुध निर्माणी जवाहर नगर चे रुग्णालय व वैद्यकिय अधिकारी यांचे सहकार्य मिळाल्यास रुग्णसेवेचा ताण कमी करता येईल असे खासदारानी सुचविले. कोरोना चाचण्या व लसीकरण वाढविण्याबाबत जनजागृती करण्याच्या सूचना ही खा. मेंढे यांनी केल्या.
यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी संदीप कदम, आमदार नरेंद्र भोंडेकर, उपविभागीय अधिकारी राठोड उपस्थित होते. आयुध निर्माणी चे उपस्थित महाव्यवस्थापक तिवारी, उपमहाव्यवस्थापक शेंद्रे, पंत, देशमुख, रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कश्यप, डॉ. त्रिपाठी आणि डॉक्टर चिंधालोरे यांनी संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले.

‘पाणंद रस्ता योजना’ प्राधान्य क्रमावर घेणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 

अमरावती, दि. 14 : शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पोहोचण्यासाठी पाणंद रस्ता आवश्यक आहे. ज्याप्रमाणे महामार्ग महत्त्वाचा आहे, त्याचप्रमाणे शेती विकासासाठी पाणंद रस्ता महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांची ही गरज लक्षात घेऊन पाणंद रस्ता ही योजना प्राधान्य क्रमावर घेण्यात येणार आहे. त्यामुळे या योजनेस निधी आणि निर्णय प्रक्रिया गतीने होण्यास मदत मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

अचलपूर येथील उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालय परिसरात अचलपूर आणि चांदूरबाजार या तालुक्यातील सहाशे किलोमीटर लांबीच्या पाणंद रस्त्याचे भूमिपूजन आज करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थिती दर्शवली. त्यावेळेस ते बोलत होते.

अचलपूर येथील कार्यक्रमाला राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासह नगराध्यक्ष सुनीता फिसके, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध देशमुख, उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार आदी उपस्थित होते.

दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमाला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, रोहयो मंत्री संदिपान भुमरे, पालकमंत्री यशोमती ठाकूर, खासदार नवनीत राणा, आमदार राजकुमार पटेल, किरण सरनाईक, विभागीय आयुक्त पियूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल आदी उपस्थित होते.

श्री. ठाकरे म्हणाले, विदर्भाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या दुसऱ्या कार्यक्रमाला आज उपस्थित राहत आहे. या कार्यक्रमाआधी नागपूर येथील विधी विद्यापीठाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर अचलपूर येथील कार्यक्रमाला उपस्थित राहत आहे. हे दोन्ही कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत.

शेतकऱ्यांना वीज, पाणी अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे शेतामध्ये पोहोचण्यासाठी पाणंद रस्ते महत्त्वाचे आहेत. राज्याच्या विकासासाठी ज्याप्रमाणे महामार्ग आवश्यक आहेत, त्याप्रमाणे ग्रामीण भागाच्या विकासासाठी पाणंद रस्त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करण्याची क्षमता या पाणंद रस्त्यामध्ये आहे. या रस्त्याचे खडीकरण झाल्यास शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर पोहोचणे सुलभ होईल.

शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार खंबीरपणे उभे आहे. त्यांना कर्जमुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. परंतू सध्याच्या कोरोनाच्या संकटामुळे यास उशीर होत आहे. कोरोनाचे संकट हे अधिक आहे. परंतु शेतकऱ्यांच्या विकासासाठी जे काही शक्य आहे, त्या कामांना प्राधान्य दिले जाईल. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्राधान्याने विचार केला जाईल. ज्याप्रमाणे आज पाणंद रस्त्याचा विषय मार्गी लागला आहे, अशाच पद्धतीने एकजुटीने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी सरकार सोबत असावे. आज पाणंद रस्त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होत आहे, ही कामे वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

देशात पुन्हा लॉकडाऊन? अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचे संकेत

 देशात कोविडच्या रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ

नवीदिल्ली, दि.14- कोविड-19च्या झापाट्याने होणारा प्रसारामुळे देशात चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. दीड लाखांहून अधिक रुग्ण संख्या सापडत असल्याने परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी देशभरात लॉकडाऊन लावण्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. महाराष्ट्रात आधीच संचारबंदीची घोषणा झाली आहे, तर अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर लॉकडाऊनसारखे निर्बंध लावण्यात आळे आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी तसे सूचक संकेत दिले आहेत.

सीतारमण यांचेप्रमाणे, देशात कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने पसरत असली तरी व्यापक पातळीवर लॉकडाऊन करण्याचा केंद्राचा कुठलाही इरादा नाही. लॉकडाऊन केल्याने देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था ठप्प होण्याची शक्यता आहे. परिणामी, गतवर्षी प्रमाणे लॉकडाऊन होणार नाही. असे असले तरीही साथरोग रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर कठोर पावले उचलण्यात येतील..
अर्थमंत्रालयाने ट्वीटच्या माध्यमातून म्हटले आहे की, साथीला रोखण्यासाठी पाच सूत्री रणनीती आखण्यात आली आहे. यामध्ये  तपासणी, माहिती संकलित करणे,उपचार करणे, सलीकरण आणि संक्रमण रोखण्यासाठी देशात सुरू असलेल्या माहितीचे विवरण केले आहे.

देशात दुसरी लाट झपाट्याने पसरत असून  अनेक राज्यात मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. यात महाराष्ट्र, छत्तीसगड, दिल्ली, हरियाणा, उत्तरप्रदेश, आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे.  गेल्या 24 तासात तब्बल 1 लाख 14 हजारावर रुग्ण आढळले आहेत. तर मृतांचा आकडेवारीने सु
द्धा हजारी ओलांडली आहे.

Tuesday 13 April 2021

भंडारा येथे “ना नफा ना तोटा” तत्वावर वैनगंगा कोविड सेंटर सुरू

 


भंडारा, दि.13-कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कोणीही उपचारा शिवाय राहू नये, या उदात्त हेतूने खासदार सुनील मेंढे यांनी “समाज जागृती प्रतिष्ठान” व “आय एम ए” भंडारा यांच्या माध्यमाने वैनगंगा कोविड सेंटर म्हणजे कोरोना रुग्णालय सुरु केले. शहरातील लक्ष्मी सभागृहातल्या या कोविड सेंटर मध्ये आज गुढीपाडव्याला, खा. सुनील मेंढे आणि जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत रूग्णसेवेला सुरुवात करण्यात आली.

जिल्ह्याची कोरोना रुग्णांची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे, रूग्णालयात खाटा मिळणे कठीण झाले आहे. उपचारा अभावी कुणालाही जीव गमवावा लागू नये, म्हणून खा. सुनील मेंढे यांनी पुढाकार घेत समाज जागृती प्रतिष्ठान आणि आय एम ए च्या सहकार्याने कोरोना रुग्णालय सुरू केले. मागील आठ दिवसा पासून सर्वतोपरी लक्ष घालून “वैनगंगा कोविड सेंटर” या नावाने ५० खाटांचे रुग्णालय श्री.दलाल यांच्या मालकीच्या लक्ष्मी सभागृहात सुरु करण्यात आले. रुग्णांसाठी ऑक्सिजन पूरवठ्याची व्यवस्था असलेल्या खाटाही येथे उपलब्ध आहेत.   रुग्णोपचाराची सर्व व्यवस्था येथे करण्यात आली आहे, फक्त अतिदक्षता विभागाची सोय येथे राहणार नाही.
इंडियन मेडिकल असो. चे सदस्य असलेल्या डॉक्टरांनी सेवा देण्याचा निर्धार केला असून शासकीय दरापेक्षा माफक दरात येथे उपचार केले जाणार आहेत. येथे उपचार घेण्यासाठी रुग्ण दाखल होण्यास सुरुवात झाली आहे
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी संदीप कदम म्हणाले की, स्वयंसेवी संस्था आणि काही डॉक्टरांनी एकत्रितपणे सुरू केलेले हे रुग्णालय अनेकांसाठी आधार ठरणार आहे. खा. सुनील मेंढे यांनीही डॉक्टरांचे कौतुक करीत रुग्णसेवेचे हे कार्य ईश्वरीय असल्याचे सांगितले. यावेळी माजी आमदार चरण वाघमारे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. आमदार नरेंद्र भोंडेकर यांनीही भेट देवून उपक्रमाला शुभेच्छा दिल्यात.
डॉ. मुकेश थोटे, डॉ. ओम गिरेपुंजे, डॉ. सुचित्रा वाघमारे, डॉ.तेहमीना अली, डॉ.घडसिंग, डॉ.पंकज साकुरे, डॉ.ओंकार नखाते, डॉ.चिन्मय खोटेले त्यांचे सहकारी डॉक्टर, परिचारक, लक्ष्मी सभागृहाचे मालक श्री. दलाल, सनफ्लँग कंपनीचे अधिकारी श्री. श्रीवास्तव या प्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयएमएचे सचिव डॉ. योगेश जिभकाटे तर संचालन डॉ. गौरव भांगे यांनी केले.

ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करा- विजय वडेट्टीवार


महात्मा ज्योतीबा फुले  जयंती साजरी


 नागपूर दि.13-क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रीय ओबीसी महासंघ व महाज्योति यांच्या वतीने  ११ एप्रिल २०२१ रविवारला भारतात साय ६ ते साय १० पर्यंत ,अमेरिका सकाळी ८.३० वाजता  व दुपारी १.३० वाजता लंडन येथून ऑनालाईन वेबिनार घेण्यात आले होते या वेबिनारचे उद्घाटन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते झाले.

 यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दिल्ली राज्याचे मंत्री राजेंद्र पाल गौतम, सेवानिवृत्त न्यायाधीश व्ही. ईश्वरैया, भाजप ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष डॉ. के. लक्ष्मण,  हरियाणाचे माजी खासदार राजकुमार सैनी, इंदरजीत सिंग, अमेरिकेतून लीड इंडिया फाउंडेशन चेअरमन डॉ. हरी इपण्णापल्ली, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, महाज्योतिचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप कुमार डांगे, वेबिनर अध्यक्ष व महासंघाचे  समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे उपस्थित होते. ओबीसी फेडरेशनचे सचिव जी. करूनानिधी, कलिंदी महाविद्यालयाच्या सहाय्यक प्रा. डॉ. सीमा माथूर यांनी महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. या वेबिनार मध्ये विविध राज्यातील विविध संघटनेचे पदाधिकारी हंसराज जागिड न्यू दिल्ली, जाजूला श्रीनिवास तेलंगणा, जसपाल सिंग खिवा पंजाब, धर्मेंद्रसिंग कुशवाह मध्यप्रदेश, राकेश यादव बिहार, वी. आर. जोशी केरला ,अयाझ कुरेशी जम्मू काश्मीर, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सर्व शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते, सर्वानुमते ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करा, केंद्रात स्वतंत्र ओबीसीचे मंत्रालय करा, रोहिणी आयोग रद्द करून नवीन आयोग तयार करा , ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नती मध्ये आरक्षण द्या, व महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्या असे ठराव पारित करण्यात आले.     वेबिनार  चे प्रस्तावित राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी केले, संचालन डॉ. वर्षां वैद्य आणि सौ.अबोली ठाकरे, आभार प्रदर्शन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव तथा कार्यक्रम समन्वयक सचिन राजुरकर यांनी केले, सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता लीड इंडिया फाउंडेशन चे डॉ. राम, डॉ. अनिल नाचपल्ले, प्रसिद्धी प्रमुख रोशन कुंभलकर, रोहित हरणे, ऋषभ राऊत, अँड. अनंत गुलक्षे, वर्षा कोल्हे, सोनिया वैद्य यांनी परिश्रम घेतले.

भंडारा आज 1135 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह,12 मृत्यू

 • आज डिस्चार्ज 837

• बरे झालेले रुग्ण 19646
• एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 30982
• क्रियाशील रुग्ण 10888
• एकूण मृत्यू 448
• रिकव्हरी रेट 63.41 टक्के
• मृत्यू दर 01.44
• आजच्या टेस्ट 9243
भंडारा, दि.13 :- जिल्ह्यात आज 837 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 19646 झाली असून आज 1135 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 30982 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 63.41 टक्के आहे.
आज 9243 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 1135 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत 2 लाख 61 हजार 43 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 30982 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.
जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 460, मोहाडी 106, तुमसर 76, पवनी 126, लाखनी 111, साकोली 154 व लाखांदुर तालुक्यातील 102 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 19646 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 30982 झाली असून 10888 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 12 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 448 झाली आहे.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 63.41 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 01.44 टक्के एवढा आहे.
शासकीय व खाजगी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राईब करावी असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.
नागरिकांना आवाहन
• कोवीडपासून बचावासाठी मास्क हा आपला मुख्य संरक्षक आहे, मास्कचा सदैव आणि योग्य वापर करा.
• साबण आणि पाण्याने हात वारंवार कमीत-कमी 20 सेकंद व्यवस्थित धुवा.

महाराष्ट्र में लॉकडाऊन का विरोध कर रहे देवेन्द्र फडणवीस शिवराज सिंह चौहान से पूछे मध्यप्रदेश में लॉकडाऊन क्यों?- मुकेश शिवहरे

 गोंदिया। संपूर्ण महाराष्ट्र प्रदेश में सबसे ज्यादा गंभीर स्थिति और कोरोना का हमला पुरा महाराष्ट्र प्रदेश झेल रहा है, एैसी

स्थिति में राज्य में स्थितियां नियंत्रण करने के लिये लॉकडाऊन जरुरी था, लेकिन भारतीय जनता पार्टी के नेता हर हाल में राजनीति करने पर उतारु है, एक तरफ


वो अन्य दलों की सरकार बन जाए तो खरीद फरोख्त करके अपनी सरकार बनाने का प्रयास करते हैं तो वहीं अपने विश्वासपात्र और भ्रष्ट नौकरशाहों के माध्यम से सरकारों पर झुठे आरोप लगाकर सरकार की छबी खराब करना चाहते हैं। जबकि स्वयं भाजपा के नेताओं को जब सत्ता में रहने का मौका मिलता है तो वो तब आम जनता और किसान मजदूरों के लिये कुछ नहीं करते, बल्कि कुछ चंद उद्योगपतियों के हाथों राज्य और देश की अस्मत बेचने पर उतारु हो जाते हैं, एैसा निशाना गोंदिया जिले के शिवसेना जिलाप्रमुख मुकेश शिवहरे ने राज्य के पूर्व मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस पर लगाया है।

मुकेश शिवहरे ने कहा कि महाराष्ट्र विकट परिस्थितियों से जुझ रहा है, लेकिन एैसे समय में भी भाजपा राजनीति और षडयंत्र कर रही है। श्री शिवहरे ने कहा कि देवेन्द्र फडणवीस बार बार लॉकडाऊन का विरोध कर रहे हैं, तो हम पूछना चाहते हैं कि लॉकडाऊन के लिये नीतियां अलग अलग होगी क्या? जो सवाल फडणवीस उद्घव जी से करना चाहते हैं, वही सवाल वे पहले शिवराज सिंह चौहान से क्यों नहीं कर सकते। शिवहरे ने कहा कि मध्यप्रदेश में भी लॉकडाऊन लगाया गया, और वहां पर जिले की परिस्थितियों के अनुसार लॉकडाऊन लगाया जा रहा है, जबकि मध्यप्रदेश में कोरोना वायरस का कहर महाराष्ट्र से बहुत कम है। महाराष्ट्र जैसे इतने बड़े प्रदेश में जितनी व्यापक व्यवस्थाओं की जरुरत है, उसके लिये लॉकडाऊन आवश्यक हो गया। हॉस्पिटलों में अब बेड नहीं मिल पा रहे हैं, ऑक्सीजन सिलेंडर और रेमेडिसीव्हीर जैसे उपयोग इंजेक्शन की कमी है, जिसके इंतजाम करने के प्रयास किये जा रहे हैं, और सरकार पुरी मुस्तैदी से लगी हुई है, लेकिन एैसे समय में भी देवेन्द्र फडणवीस को राजनीति की पड़ी है, यह साबित करता है कि आम जनता को भारतीय जनता पार्टी को अच्छी तरह से समझ लेना चाहिये। शिवहरे ने कहा कि देवेन्द्र फडणवीस कितने भी जतन कर लें, उनकी दुषित मानसिकता कामयाब होने वाली नहीं है।

तिरोड्यात रुग्णालयाची तोडफोड;आरोपी ताब्यात

 तिरोडा,दि.13 : खैरलांजी मार्गावरील दया हॉस्पिटलमध्ये एका गंभीर रूग्णाला उपचारासाठी चार इसमांची आणले. रुग्णाची तपासणी केल्यावर तो गंभीर असल्यामुळे व बेड रिक्त नसल्यामुळे डॉक्टरांनी गोंदियाला हलविण्याचा सल्ला दिला. पण रूग्णाला भरती का करीत नाही, असा मुद्दा उपस्थित करून चारही आरोपींनी हॉस्पिटलची तोडफोड केली. तसेच डॉक्टरला मारहाण करून धमकी दिली. ही घटना सोमवार, 12 एप्रिल रोजी रात्री 10.30 वाजता घडली. या प्रकरणातील चारही आरोपींना तिरोडा पोलिसांनी अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये महेंद्र परिहार रा. बोदा अत्री, संजयकु


मार प्रीतीचंद येडे, अनिलकुमार प्रीतीचंद येडे व जितेंद्र प्रीतीचंद येडे तिन्ही रा. पार्डी नागपूर यांचा समावेश आहे.

फिर्यादी डॉ.संदीप विठ्ठलराव मेश्राम रा. झाकीर हुसेन वॉर्ड तिरोडा यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, ते 12 एप्रिल रोजी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास दया हॉस्पिटल खैरलांजी रोड तिरोडा येथे हजर होते. त्यावेळी खैरबोडी येथील रूग्णाला बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले. फिर्यादी यांनी रूग्णाला तपासून तो गंभीर आहे, बेड उपलब्ध नसल्यामुळे रुग्णाला गोंदियाला घेऊन जा, असा सल्ला दिला.

मात्र, रुग्णाला भरती का करीत नाही म्हणून सदर चारही आरोपींनी फिर्यादीला थापडाने मारहाण केली. फिर्यादीच्या कॅबिनच्या काचा फोडण्याचा प्रयत्न केला. ऑक्सीजन सिलेंडर लात मारून खाली पाडले. रुग्णाच्या बेडला लात मारून हिंसक कृत्य करून दवाखान्यातील काचेच्या दरवाजाची तोडफोड करून 50 हजार रूपयांचा नुकसान केलेला आहे. तसेच फिर्यादीला शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिलेली आहे.

फिर्यादीच्या तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी भादंविच्या कलम 452, 427, 323, 504, 506, 34 सहकलम 4 महाराष्ट्र वैद्यकीय सेवा-व्यक्ती आणि वैद्यकीय संस्था (हिंसक कृत्य व मालमत्ता हानी व नुकसान यांना प्रतिबंध) अधिनियम 2010 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्यातील चारही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. तपास पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक हनवते करीत आहेत.

Sunday 28 March 2021

गोंदियात 107 रुग्ण पॉझिटिव्ह,51 रुग्णांना डिस्चार्ज

गोंदिया,दि.28 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून आज 28 मार्च रोजी प्राप्त अहवालात जिल्ह्यात नवे 107 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. 51 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी औषधोपचारातून कोरोनावर मात केल्याने त्यांना आज सुट्टी देण्यात आली आजपर्यंत 15,633 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. 14,705 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 740 आहे. 564 क्रियाशील असलेले बाधित रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 188 रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 94.06टक्के आहे. बाधित रुग्णांचा मृत्यू दर 1.20 टक्के आहे तर डब्लिंग रेट 380.2 दिवस आहे.

होळीच्या पूर्वसंध्येला तिरोडा पोलिसांनी जप्त केला 1.82 लाखांचा माल

 तिरोडा,दि.28 : होळी सणाच्या वेळी कायदा व सुवयवस्था राहावी यासाठी तिरोडा पोलिसांचा दररोज विशेष अभियान राबवून अवैध धंद्यावर धाडसत्र सुरु आहे. त्यानुसार मिळालेल्या गुप्त माहितीवरून शनिवार, 27 मार्च रोजी सकाळी 9 ते रात्री 8 वाजतापर्यंत एकूण 9 ठिकाणी छापे घालून 1 लाख 81 हजार 850 रूपयांचा माल जप्त करण्यात आला.


  • 1. मेंढा-सुकडी येथील झुडपी जंगल शिवारात सुरु असलेल्या रनिंग भट्टीवर छापा टाकण्यात आला. त्यामध्ये दिलीप राधेश्याम खरोले, ऍलन संजय बरियेकर, जतीन दिलीप खरोले, अनमोल हंसराज बरियेकर सर्व राहणार संत रविदास वॉर्ड तिरोडा हे मोहफुलांची दारू काढताना मिळून आले. त्यांच्याजवळून 1100 किलो सडवा मोहफूल किंमत 88 हजार रुपये, रनिंग भट्टी साहित्य, 2 मोटरसायकल असा एकूण 1 लाख 65 हजार 150 रूपयांचा माल जप्त करण्यात आला.
  • 2. प्रतिमा विनय उके रा. वडेगाव हिच्या घरी 200 किलो सडवा मोहफुल किंमत 16 हजार रुपये, 20 लिटर मोहदारू किंमत 2 हजार रुपये असा एकूण 18 हजार रूपयांचा माल मिळून आलेला आहे.
  • 3. आशा राजेंद्र भोंडेकर रा. संत रविदास वॉर्ड तिरोडा हिच्या घरझडतीत 20 लिटर मोहदारू किंमत 2 हजार रूपयांचा माल मिळून आलेला आहे.
  • 4. मुन्नी रमेश चौरे रा. संत रविदास वॉर्ड तिरोडा हिच्या घरझडतीत 20 लिटर मोहदारू किंमत 2 हजार रूपयांचा माल मिळून आलेला आहे.
  • 5. सीमा अनिल राऊत रा. संत कबीर वॉर्ड तिरोडा हिच्या घरझडतीत 30 लिटर मोहदारू किंमत 3 हजार रूपयांचा माल मिळून आलेला आहे.
  • 6. गीता छोटेलाल दमाहे रा. गुरुदेव वॉर्ड तिरोडा हिच्या घरझडतीत 20 लिटर मोहदारू किंमत 2 हजार रूपयांचा माल मिळून आलेला आहे.
  • 7. शांता सीताराम बावणे रा. चिखली हिच्या घरझडतीत 20 लिटर मोहदारू किंमत 2 हजार रूपयांचा मिळून आलेला आहे.
  • 8. निर्मला भोला रंगारी रा. चिखली हिच्या घरझडतीत 30 लिटर मोहदारू किंमत 3 हजार रूपयांचा माल मिळून आलेला आहे.
  • 9. अंजना विजय लिल्हारे रा. भूतनाथ वॉर्ड तिरोडा हिच्या घरझडतीत 10 लिटर मोहदारू किंमत 1 हजार रूपयांचा माल मिळून आलेला आहे.

असा एकूण 1 लाख 81 हजार 950 रूपयांचा माल जप्त करण्यात आलेला आहे. सदर कारवाई तिरोडा उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक योगेश पारधी, पोउपनि केंद्रे, महिला पोउपनि राधा लाटे, पोलीस हवालदार चेटुले, दामले, नापोशि बांते, बरवैया, बर्वे, श्रीरामे, मुकेश थेर, पोशि सवालाखे, दमाहे, बिसेन, उके, अंबादे, शेख महिला नपोशि भूमेश्वरी तीरीले यांनी केलेली आहे.

अजित पवारांचा संजय राऊतांवर निशाणा

 बारामती--मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपांनंतर अनिल देशमुख वादात आडकले आहेत. यावरुन विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडत आहेत. यातच, शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही देशमुखांवर 'रोखठोक'मधून टीका केली. यानंतर आता संजय राऊतांच्या टीकेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

अजित पवार यांनी आज बारामतीत कोरोना परिस्थितीची आढावा बैठक घेतली. त्यानंतर विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात पत्रकारांशी बोलत असताना म्हणाले की, 'महाविकास आघाडी सरकार हे तीन पक्षांचे आहे. तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे शिवसेनेत कुणाला मंत्रिपद द्यायचे याचा निर्णय उद्धव ठाकरे घेत असतात. काँग्रेसमध्ये सुद्धा कुणाला मंत्रिपद द्यायचे याचा अधिकार हा सोनिया गांधी यांना आहे आणि राष्ट्रवादीमध्ये 1999 पासून मधली 5 वर्षे वगळता सरकारमध्ये काम करतोय. पवार साहेबांना 50 वर्षांचा राजकीय अनुभव आहे. त्यामुळे कुणाला मंत्रिपद द्यायचे, कुणाला कोणता विभाग द्यायचा, हे राष्ट्रवादीमध्ये तेच ठरवतात. इतरांनी वक्तव्य केले तर समजू शकतो. पण महाविकास आघाडीमध्ये असताना मान्यवरांनी एकमेकांना अडचणीत आणण्याचे वक्तव्य करू नये. कुणी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये, अशी टीका अजित पवारांनी राऊतांवर केली.

काय म्हणाले होते संजय राऊत ?

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून लिहिले की, अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे शरद पवारांनी गृहमंत्री पदाची माळ अनिल देशमुखांच्या गळ्यात टाकली. या पदाची एक प्रतिष्ठा व रुबाब आहे. दिवंगत आर. आर. पाटील यांच्या गृहमंत्री म्हणून कार्यपद्धतीची तुलना आजही केली जाते. संशयास्पद व्यक्तीच्या कोंडाळ्यात राहून गृहमंत्री पदावरील कोणत्याही व्यक्तीस काम करता येत नाही. पोलिस खाते आधीच बदनाम, त्यात अशा गोष्टींमुळे संशय वाढतो, असे मत राऊतांनी व्यक्त केले होते.

आज 56 नवीन कोरोना बाधित तर 47 कोरोनामुक्त

गडचिरोली,दि.28: आज जिल्हयात 56 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 47जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 10490 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9960 वर पोहचली. तसेच सद्या 421 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 109 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.95 टक्केसक्रिय रूग्णांचे प्रमाण 4.01 टक्के तर मृत्यू दर 1.04 टक्के झाला.

          नवीन 56 बाधितांमध्ये गडचिरोलीतील 17अहेरी तालुक्यातील 8आरमोरी तालुक्यातील 3भामरागड तालुक्यातील 1,  चामोर्शी तालुक्यातील 2धानोरा तालुक्यातील 1एटापल्ली तालुक्यातील 04कुरखेडा तालुक्यातील 1तर वडसा तालुक्यातील 19 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 47 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 18,  आरमोरी 7भामरागड 08धानोरा 6एटापल्ली 02कुरखेडा 02तर वडसा  मधील 4 जणांचा समावेश आहे.

    नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील बाधितामध्ये नवेगाव 01,साई नगर 02अमीर्झा 01वनश्री कॉलोनी 02राखी गुरवडा02गणेश नगर 01कन्नमवार वार्ड 01आंनद नगर 01,गीलगाव 02गोकूल नगर वार्ड 5 सोनकूर 01,  जेप्ररा 01अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये आलापल्ली 08स्थानिक 01नागेपल्ली 1आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये  स्थानिक 03,  भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 01एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये  स्थानिक 02चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये  स्थानिक 02धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये सीआरपीएफ 01एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये मारपल्ली 2कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये कस्तुरर्बा वार्ड 01आर्शीवाद वार्ड 01किदवही वार्ड 01हनुमान वार्ड 03,  कुरुड 4विसारो 01,कोन्डाला 02मधुबन कॉलोनी 04गांधी वार्ड 02तर इतर जिल्हयातील  बाधितामध्ये 2 जणांचा समावेश आहे.

माझी हार्डडिस्क फुटत आहे!; दीपाली यांचे मृत्यूपूर्वी पतीला भावनिक पत्र

 


अमरावती: हरीसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी  दीपाली चव्हाण  यांनी वरिष्ठ अधिकारी विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून स्वतःवर गोळ्या झाडत आत्महत्या केल्याने राज्यभर खळबळ उडाली आहे. दीपाली चव्हाण यांनी मृत्यूपूर्वी तीन पत्रे लिहिल्याचे समोर आली असून यात त्यांनी आपल्या पतीला लिहिलेले भावनिक पत्र मन हेलावून टाकणारे आहे. पहिले पत्र वरिष्ठ अधिकारी श्रीनीवास रेड्डी यांना, दुसरे पतीला आणि तिसरे आई शंकुतला चव्हाण यांच्या नावे लिहिले आहे. ही तिन्ही पत्रे धारणी पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.

दीपाली चव्हाण यांनी पती राजेश मोहिते यांना लिहिलेले पत्र अतिशय भावनिक आहे. हे पत्र जशास तसं...

प्रिय नवरोबा,

लिहून लिहून थकले. खूप डोकं दुखत आहे. मला तुझी आठवण येत आहे. तुमच्या सोबत बोलत बोलत मी तुम्हाला पत्र लिहित आहे. माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. आता नाही म्हणू शकत जिवापेक्षा जास्त कारण आता मी जीव देत आहे...

साहेब मला काय काय बोलले ते सगळं मी तुला सांगितलं. तू मला शांत राहायला सांगतोय मी शांत राहते. पण मला सहन नाही होत. तू नेहमी म्हणतोस माझी हार्डडिस्क भरली आहे. खरंच भरली आहे. साहेबाने मला पागल करून सोडलंय. माझा इतका अपमान कधीच कोणी केला नाही जितका शिवकुमार साहेब करतात... मी खूप सहन केलं पण, आता माझी लिमिट खरंच संपली आहे... यावर उपाय असू शकतो. मी सुट्टी घेऊ शकते पण, सुट्टी देखील तो मंजूर करत नाही. तुझ्याशी बोलायला हवं होतं. मी तुझी वाट पाहत होते घरी यायची... आज आई पण गावी गेली. घरी कोणीच नाहीये. घर खायला उठत आहे. मी हे पाऊल उचलत आहे मला माफ कर. जगातला सगळ्यात चांगला नवरा तू आहेस. माझ्यावर खूप प्रेम करतोस... मला मानसिक त्रास होत आहे म्हणून तू माझ्या जवळ येऊन राहिलास. आपण रेड्डी सरांना सगळं सांगून सुद्धा त्याचं त्रास देनं कमी झालं नाही.


मला माफ कर मी आपल्या बाळाला गमावलं...मला माफ कर तुला लग्नात दिलेली सगळी वचनं अर्धवट सोडून मी जात आहे... आपल्या संसाराला नजर लागली... माझ्या बोलण्याने मी कधी तुला दुखावलं असेल तर मला माफ कर. मी नेहमी म्हणते तू मला सोडून नको जाऊ पण, आज मी तुला सोडून जात आहे. माझ्या आत्महत्येला सर्वस्वी जबाबदार विनोद शिवकुमार, उपवनसंरक्षक गुगामल वन्यजीव विभाग चिखलदरा यास धरावे. त्याच्या मानसिक त्रासाला कंटाळून मी जीव देत आहे. आपला संसार अपूर्ण राहिला. पुढच्या जन्मी आपण नव्याने सुरुवात करू. माझ्यासाठी तू सगळं काही केलंस मीच कमी पडत आहे. माझी हार्डडिस्क फुटत आहे. त्यामुळे मी हा निर्णय घेत आहे. मला माफ कर. माझ्या मृत्यूला सर्वस्वी जबाबदार शिवकुमार आहे...

- दीपाली...

गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनील गिल्डा बालबाल बचावले

 


गडचिरोली दि. 28 मार्च- शहरातील कारगील चौकात दुपारी तीन वाजता दरम्यान कॉम्प्लेस कडून भरधाव वेगाने येणाऱ्या पोलीस वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुभाजकावर जाऊन वाहन पलटले. सुदैवाने यात प्राणहानी झाली नाही.या वाहनात गडचिरोलीचे नव्यानेच रूजू झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनील गिल्डा होते. या अपघातात दोन पोलीस कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

 कॉम्प्लेस कडून येणाऱ्या ट्रकला (क्रमांक टी.एस.08 यु इ  1569) ओवर टेक करून पोलीस वाहन क्रमांक एम.एच.3 सी.436  जात असताना वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण  सुटल्याने पोलीस वाहन हे दुभाजकावर पलटले. गडचिरोली उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून प्रनील गिल्डा हे सोमवारी रुजू झाले आहेत. मुख्य म्हणजे ट्रक चालकाची कोणतीही चूक नसतांना त्याला नागरिकांनी मारहाण केली. पोलिसांना वाहनातून काढण्याकरिता उदय धकाते, महेंद्र वाघमारे, बादल आरेकर आणि नंदू कुमरे यांनी मदत केली.

शववाहिका खोळंबली

सदर अपघात झाला त्यावेळी सामान्य रुग्णालय गडचिरोली येथून एक कोविड ने मृत्यू झालेल्याचे पार्थिव शववाहिके मधून नेत होते. वाहनांची रीघ लागल्याने तसेच नागरिकांची गर्दी झाल्याने शववाहकीला येथे जवळ-जवळ 15 मिनिटे थांबावे लागले होते. शव वाहिकेमध्ये कोविड मृतकाचे शव असल्याचे वाहनातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी सामाजिक कार्यकर्ते उदय धकाते यांना सांगितले. त्यांंनी  मित्रमंडळीसह शववाहिकेला पूढे जाण्यासाठी मार्ग सुरळीत करून दिला.

तहसील कार्यालयासमोर माकपच्या जिल्हा महासचिवाची कार पेटली

 


कुरखेडा-- येथील तहसील कार्यालयासमोर उभ्या असलेल्या कारने अचानक पेट घेतला. यामध्ये सुदैवाने प्राणहानी झाली नसली तरी आगीमुळे कारचे अतोनात नुकसान झाले आहे. सदर घटना शनिवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास घडली.

आरमोरी येथील मकपाचे जिल्हा महासचिव तथा माजी परिषद सदस्य अमोल मारकवार यांच्या मालकीची असलेली टाटा इंडिगो एम. एच. 33 ए 3218 या क्रमांकाची कार स्वतः मारकवार चालवीत होते. दरम्यान पाण्याची बाटली घेण्यासाठी मारकवार यांनी तहसील कार्यालयासमोर रस्त्याच्या कडेला कार उभी करून समोरच्या हॉटेलमध्ये गेले असता त्यांच्या पाठीमागे कारने अचानक पेट घेतला.
या दरम्यान शिवसेनेच्या वतीने महावितरणच्या कार्यालयात आयोजित आंदोलन आटोपून परत येत असताना माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांना कार इंजिनच्या भागातून पेट घेत असल्याचे लक्षात आले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता स्वतः व कार्यकर्त्या सोबत समोरच्या हॉटेलमधून बादलीने पाणी घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतू कार दुसऱ्या बाजूने पेट घेत होती. थोड्यावेळाने नगरपंचायतीच्या अग्निशमन वाहनाचे मदतीने आग विझवण्यात आली. यावेळी आंदोलनाच्या बंदोबस्तावर असलेले कुरखेडा पोलिस पोलिस पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुधाकर देडे, उपनिरीक्षक नारायण शिंदे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बघ्यांना घटनास्थळापासून दूर सारून कुरखेडा तळेगाव मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू केली. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही पुढील तपास कुरखेडा पोलिस करीत आहेत.

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...