Wednesday 29 March 2017

BS-III वाहनांच्या विक्रीवर बंदी; 8 लाख वाहने कुचकामी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): वाहनांच्या कार्बन उत्सर्जनामुळे होणारे प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी 1 एप्रिलपासून बीएस-IV ही नवी मानके लागू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर बीएस-III वाहनांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिल्याने वाहननिर्मिती क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.
व्यापारी फायद्यापेक्षा करोडो लोकांचे प्रकृती अधिक महत्त्वाची आहे, असे सांगत न्यायाधीश मदन लोकुर, दीपक गुप्ता यांच्या खंडपीठाने 31 मार्चनंतर बीएस-III वाहनांची नोंदणी करू नये असे निर्देश सरकारला दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे आता 1 एप्रिलपासून बीएस-III वाहने विकता येणार नाहीत. 
वाहन निर्मार्त्यांच्या संघटनेने व सरकारी वकिलांनी बीएस-III वाहनांचा सध्या असलेला साठा विकण्यासाठी 1 वर्षाची परवानगी न्यायालयाकडे मागितली होती. परंतु, यापुढे बीएस-IV इंजिन असलेल्या वाहनांच्या विक्रीलाच परवानगी मिळेल, हे कार कंपन्यांना माहीत होते. त्यामुळे आता या निर्णयावर आक्षेप घेता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. 
भारत स्टेज-IV उत्सर्जन मानकाची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून होणार आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपन्यांकडे सध्या बीएस-III मानके असलेली 8.24 लाख वाहने आहेत. या निर्णयामुळे सार्वजनिक वाहतूक महामंडळांच्या गाड्यांवरही मोठा परिणाम होणार आहे. 

धोनीची वैयक्तिक माहिती लीक; साक्षीचा मंत्र्यांवर संताप

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था)- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी वैयक्तिक माहिती लीक झाल्याने त्याची पत्नी साक्षीने माहिती व प्रसारण मंत्री रवीशंकर प्रसाद यांच्यावर संताप व्यक्त केला आहे. प्रसाद यांनीही धोनीची माहिती हटविण्याचे आदेश दिले.
धोनीची वैयक्तिक माहिती लीक होण्याचा आधार कार्डच्या प्रमोशन कार्यक्रमात प्रकार घडला. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या ट्विटर हँडलवरुन धोनीच्या आधार कार्डची कॉपी ट्वीट करण्यात आली. त्यानंतर प्रायव्हसी नावाचा काही प्रकार आहे का, असा प्रश्न ट्विटवरून साक्षीने रवीशंकर प्रसाद यांना केला. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे लोक धोनीच्या घरी जाऊन, तो आधार कार्डचा वापर कसा करतो, त्याची माहिती अपडेट करत होते. अशाच एका ट्वीटमध्ये धोनीचा आधार कार्ड फॉर्म प्रसिद्ध करण्यात आला. ज्यावर साक्षीने आक्षेप घेतला.
साक्षीच्या ट्विटला प्रसाद यांनीही तातडीने उत्तर देत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या ट्विटमधून काही वैयक्तिक माहिती लीक झाली आहे का, असा प्रश्न उपस्थित केला. यावर साक्षीने आधार कार्ड फॉर्ममध्ये वैयक्तीक माहिती भरलेली आहे. तो फॉर्म अपलोड करण्यात आल्याचे सांगितल्यानंतर प्रसाद यांनी याची तातडीने दखल घेत ट्विट हटवण्यास सांगितले. तसेच हा प्रकार करणाऱ्याविरोधात कारवाई करण्यात येईल, असे आश्वासनही दिले.

मोदींवर टीका केल्याने रामचंद्र गुहांना धमकी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका केल्याने ई-मेलच्या माध्यमातून धमकी देण्यात येत असल्याचे प्रसिद्ध लेखक व इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी सांगितले.
गुहा यांनी ट्विट करत याबाबतचा खुलासा केला. त्यांनी म्हटले आहे, की एकसारखे धमकीचे मेल मला पाठविण्यात आले आहेत. त्यामध्ये पंतप्रधान मोदी आणि भाजपवर टीका न करण्याचे लिहिण्यात आले आहे. या मेलमध्ये भाजप अध्यक्ष अमित शहा यांनाही लक्ष्य करण्यात आल्यावर धमकाविण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शाहमध्ये ईश्वरी अंश असून जग बदलण्यासाठी त्यांना निवडले गेले आहे. त्यामुळे या दोघांवर टीका करणाऱ्यांना भगवान महाकाल चांगलीच शिक्षा करेल.
गुहा यांनी केलेल्या दाव्यानुसार, मेल पाठविणाऱ्या व्यक्तीने त्यांना मोदींची इंदिरा गांधींशी आणि अमित शहा यांची संजय गांधींसोबत तुलना न करण्यास सांगितले आहे. अशा प्रकारे विचार करणारे व लिहिणारे तुम्ही कोण आहात, असा प्रश्नही विचारण्यात आला आहे. या प्रकरणी गुहा यांनी तक्रार दाखल केली आहे.

स्पर्धा परीक्षेला पर्याय नाही- आ. संजय पुराम

देवरी येथे तालुकास्तरीय शिबीराचे आयोजन

देवरी - आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना आपले ध्येय साध्य करावयाचे असेल तर स्पर्धा परीक्षेच्या उत्तम तयारीला पर्याय नाही, असे प्रतिवादन आमगाव विधानसभा क्षेत्राचा आमदार संजय पुराम यांनी देवरी येथे केले. स्थानिक दीनबंधू ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने आफताब मंगल कार्यालयात गेल्या रविवारी (ता.26) एक दिवसीय  स्पर्धा परीक्षा  व पोलिस भर्तीपूर्व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
 या शिबीराचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे जिल्हा महामंत्री वीरेंद्र अंजनकर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी आ. पुराम हे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून देवरी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे, उपाध्यक्ष ओमप्रकाश रामटेके, सभापती रितेश अग्रवाल,आफताब शेख,  नगरसेवक यादोराव पंचमवार, प्रवीण दहिकरआदी मान्यवर उपस्थित होते.
शिबीरात उपस्थित शिबिरार्थींना मुख्याधिकार चिखलखुंदे यांनी 12वी नंतर पुढे काय, या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. पोलिस निरीक्षक राजेश तटकरे यांनी विद्यार्थ्यांनी परीक्षेची भीती मनातून काढण्याचा सल्ला देत अधिकारी हे सामान्य कुटुंबातूनच घडत असल्याचे सांगितले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी, या विषयावर वनपरिक्षेत्राधिकारी रोशन राठोड, डॉ. कोळेकर आदींनी मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक संस्थेेचे अध्यक्ष कुलदीप लांजेवर यांनी केले. संचलन जितेंद्र रहांगडाले यांनी केले. उपस्थितांचे आभार घनशाम निखाडे यांनी केले. शिबीराच्या आय़ोजनासाठी सुनील गहाणे, प्रवीण बारसागडे. राधेशाम धनबाते, अरूण मानकर, मयुर कापगते, गोपाल चनाप, हर्षवर्धन मेश्राम, निखील शर्मा, महेंद्र लांजेवार आदींनी सहकार्य केले.

जि. प. अध्यक्षांनी उभारली बिरसीत शिक्षणाची गुढी




आमगावः  गोंदिया जिल्हा परिषदेच्या  "गुढी पाडवा प्रवेश वाढवा" या अभिनव उपक्रमांतर्गत सन् 2017-18 या वर्षात पहिल्या वर्गात प्रवेश घेणा-या बालकांचे प्रवेश व सत्काराला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरू करण्यात आले. दरम्यान, काल तालुक्यातील बिरसीच्या  जि.प. प्राथमिख शाळेत पहिल्या वर्गात प्रवेशित 20  मुला मुलींचा सत्कार अंकलिपी व पुष्पगुच्छ देऊन जि.प अध्यक्ष ऊषाताई मेंढे यांचे हस्ते करण्यात आला.
 विद्यार्थ्यांना चौमुखी ज्ञान व सर्वागिण विकास हा जि प शाळेतून प्राप्त होतो. यासाठी सर्व पालकांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेतच भरती करावे, असे आवाहन श्रीमती मेंढे यांनी अध्यक्ष स्थानावरून बोलताना  व्यक्त  केले.    या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आमगाव पं. स. चे सभापती हेमलता डोये , पं.स. सदस्य लोकेश अग्रवाल, उपसरपंच मुनेश्वर खोब्रागडे, केंद्रप्रमुख  डी.एल. गुप्ता, जामखारी चे भैयालाल बावनकर, शा.व्य.स. उपाध्यक्ष ममता पटले, मुख्या. एल यू खोब्रागडे, सदस्य सारीका पटले, उर्मीला बावनथडे व श्रीमती पटले, तंत्रस्नेही शिक्षक विकास लंजे आदी मान्यवर उपस्थित होते.सर्व प्रथम गावात प्रभात फेरी काढून प्रवेश वाढविण्यासंबधी जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमा प्रसंगी  सभापती डोये, गुप्ताजी ,सारीका पटले व एल यू खोब्रागडे यांनी आपापले विचार व्यक्त केले. 
 कार्यक्रमाचे संचलन वर्षा बावनथडे यांनी केले. उपस्थितांचे आभार पक्षीमित्र जैपाल ठाकूर यांनी केले. 

BERARTIMES_ Feb29-Mar04_2017





Tuesday 28 March 2017

नववर्षाच्या स्वागतासाठी देवरी येथे बाइकरॅली

देवरी- मराठी नववर्षाचे औचित्य साधून देवरी येथे बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
स्थानिक धुकेश्वरी मंदीरातून सुमारे साडे अकराच्या सुमारास ही रॅली काढण्यात आली होती. ही रॅली राष्ट्रीय महामार्गावरून गणेश चौक, पंचशील चौक, चिचगड मार्गाने शहरात फिरवण्यात आली. यावेळी शहरात आनंदाचे आणि उल्हासाचे वातावरण निर्माण झाले होते.

गोरेगाव येथे किशोरी उत्कर्ष सप्ताह उत्साहात


गोरेगाव, २५ -  स्थानिक शहीद जान्या तिम्या विद्यालयात राष्टीय माध्यमिक शिक्षण विभागांतर्गत मुलीच्या शिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी किशोरी उत्कर्ष मंच सप्ताहाचे आयोजन  गेल्या १६ मार्च ला करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा. पी.एम.शेख होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन श संध्याताई ठवकर , आरोग्य पर्यवेक्षिका मीना हलमारे, संध्या डुंभरे, पंकजा डुंभरे, बि के वैशाली, सौदर्यतज्ज्ञ शितला मुंडाफोळे, स्वाती मेंढे आदी मान्यवर उपस्थित होते.
  कार्यक्रमाची सुरुवात हमारी ही मुठ्ठीमे मे आकाश सारा या  प्रेणात्मक गिताव्दारे करण्यात आली.मुलींना शालेय शिक्षण घेतांना येणा-या अडचणी व यावरील उपाययोजना यावर मार्गदर्शन प्राचार्य शेख यांनी केले  ग्रामिण भागातील मुलीच्या शिक्षणास  पायाभुत जीवन कौशल्य, आरोग्य, सामाजीक, आध्यामिक, समुपदेशन अभ्यास कसा करावा तसेच नैसर्गिक सौंदर्य चिकीत्सा, हेअर डैसिंग, साडी परिधान, मेकअप या विभिन्न विषयावर मार्गदर्शन या किशोरी उत्कर्ष मंच सप्ताहात देण्यात आल्या 
दैनदिन आहार, वैद्यकीय सल्ला,घरघुती नैसर्गिक उपचार, फळ व झाडांचा सौदर्यासाठी उपयोग, संस्कार भारती रांगोळी , शिवनकाम, टाकावु वस्तु मधुन टिकावु वस्तु बनविणे या संदर्भात माहीती देण्यात आली 
सुत्रसंचालन व्ही एन चौधरी यांनी केले कार्यक्रमाची सांगता आनंद मेळाव्याने करण्यात आली व किशोरीना रोख रक्कम व बक्षीस देण्यात आले आभारप्रदर्शन माधुरी गजबे यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकोत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांनी सहकार्य केले

Monday 27 March 2017

'लेक वाचवा, लेक शिकवा' संदेश गावापर्यंत पोचविणाऱ्या नागपूरच्या युवांचे देवरी येथे स्वागत



देवरी - स्त्री भ्रूण हत्येला देशातून कायम हद्दपार करून महिला शिक्षणाचे महत्व देशवासियांना पटवून देण्याचे उद्देशाने सुरू केलेल्या 'लेक वाचवा, लेक शिकवा' अभियान देशभरात पोचविण्यासाटी नागपूरच्या 10 युवक-युवतींनी नागपूर ते रायपूर सायकल रॅली काढली. या रॅलीचे देवरी जंगी स्वागत करण्यात आले.
नागपूरच्या गांधीबाग परिसरातूनरविवारी (ता.26) सकाळी 8 वाजे निघालेल्या या रॅलीचे देवरी शहरात काल रविवारी रात्री 8 वाजता  या युवक-युवतींचे आगमन झाले. या युवकांनी अवघ्या 24 तासात नागपूर ते रायपूर हे 300 किमीचे अंतर पार करण्याचे उद्दिट्ये ठेवले आहे. देवरी शहरवासींयातर्फे या  अपार युवाग्रुपमधील सदस्यांचे अर्बन बॅंकेचे महेश जैन यांनी स्वागत केले. यावेळी पोलिस उपनिरीक्षक सूर्यकांत सपताळे, रितेश अग्रवाल, गोपाल तिवारी, अनिल शर्मा, नरेश जैन आदींनी स्वागत केले. दरम्यान या ग्रुप मधील सदस्यांना अल्पोपहार देण्यात आले. या ग्रुप मधील सदस्यांमध्ये सिमरन मेश्राम, ऐश्वर्या मेश्राम,अंजली गेडाम, अपूर्व नायक, रजत वानखेडे, रोशन झुनझुनकर,सुरेश लांगे, शत्रूघ्न पटले, आकाश चौरीया आमि शिवराज खुटीया यांचा समावेश आहे.
स्त्रीयांवर होणारे अत्याचार, स्त्रीभ्रूण हत्या, हुंडाबळी, स्री-पुरूष असमानता या विषयावर नागरिकांचे प्रबोधन व्हावे, या उद्देशाने या रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे या ग्रुपमधील सदस्यांनी सांगितले. मुलींना शिक्षित केले तर समाजाची प्रगती शक्य आहे. आज सर्वच क्षेत्रात महिला आपले वर्चस्व सिद्ध करू लागल्या आहेत. अशा परिस्थितीत गावागावातील मुली ह्या शिक्षणापासून वंचित राहू नये, असा मनोदय सुद्धा त्यांनी व्यक्त केला. येत्या डिसेबर पासून कश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत 20-20 दिवसांची रॅली करून गावागावात प्रबोधनात्मक रॅलीचे आयोजन करण्याचा मानसही त्यांनी यावेळी बोलून दाखविला. या युवांच्या कार्याचे देवरीवासीयांनी भरभरून कौतुक केले.


Sunday 26 March 2017

ओबीसी सेवासंघ आणि संघर्ष समितीचे संयुक्त सभा उत्साहात

गोंदिया- गोंदिया जिल्हा ओबीसी सेवा संघ आणि ओबीसी संघर्ष कृती समितीच्या मासिक बैठकीचे आयोजन काल (ता.25) गोंदिया येथे करण्यात आले होते.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कार्याध्यक्ष अमर वऱ्हाडे हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून सावन कटरे हे उपस्थित होते. यावेळी सभेला खेमेंद्र कटरे, विनायक येेडेवार, पी डी चौहान, चंद्रकुमार बहेकार, शिशिर कटरे, डॉ रहांगडाले आदी मान्यवर उपस्थित होते.
 या बैठकीत  ओबीसी सभासद नोंदणी अभियानाची सुरवात करणे, अभियानाचे प्रारुप ठरविणे आणि साहित्य निर्मिती करणे, येत्या 7 ऑगस्ट रोजी दिल्ली येथे आयोजित महाधिवेशनात सहभागी होण्यासाठी नियोजन करणे  आदी विषयावर सखोल चर्चा करण्यात आली.

सालेकसा येथे आरोग्य शिबीराचे आयोजन

सालेकसा- सत्य सामाजिक संस्था, आशा हॉस्पीटल कामठी आणि गोंदिया पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने सालेकसा तालुक्यातील जमाकुडो आणि दर्रेकसा येथे आरोग्य शिबीराचे आयोजन  गेल्या शुक्रवारी (ता.24) आले होते.
सालेकसा तालुका हा अतिदुर्गम, आदिवासी आणि जंगलव्याप्त असा तालुका असून येथे नक्षलवाद ही प्रमुख समस्या आहे. त्यामुळे या तालुक्यात राहणारे नागरिक सतत दहशतीखाली वावरत असतात. अशा परिस्थितीत नागरिकांच्या मनातील भीती दूर करून त्यांना विकासाच्या प्रवाहात सामील करण्याची मोठी जबाबदारी पोलिस विभागावर येऊन ठेपली आहे. यासाठी पोलिस आणि जनता यांच्यात नेहमी सुसंवाद साधण्यासाठी पोलिस प्रशासन नेहमी अग्रणी भूमिका घेते. यासाठी सेवाधर्म हा पोलिसांनी निवडलेला एक उत्तम मार्ग म्हणता येईल. या माध्यमातून पोलिस आणि जनता एकत्र येऊन विकासाचा रथ पुढे नेणे सोपे ठरू शकेल.
पोलिस आणि जनता यांच्यात विश्वासाचे नाते वृध्दींगत होण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांचे मार्गदर्शनात देवरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे  दर्रेकसा येथील सहायक पोलिस निरीक्षक मते, पोलिस उपनिरीक्षक कदम, शिंदे, पडवल सतत प्रयत्नशील असतात. याचाच एक भाग म्हणून सालेकसा तालुक्यातील दर्रेकसा आणि जमाकुडो या भागातील रुग्णांचे आरोग्यतपासणी साठी गेल्या शुुक्रवारी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात 231 रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 12 रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. निवड झालेल्या रुग्णांवर नागपूर येथे टप्प्याटप्प्याने शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती देवेंद्र गणवीर यांनी दिली आहे.



Saturday 25 March 2017

रजा न घेता 1 एप्रिलपर्यंत बँका सुरु ठेवा- रिजर्व्ह बॅंक

मुंबई, दि. 25 - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांना 1 एप्रिलपर्यंत रजा न घेता कामकाज सुरु ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. शनिवार-रविवार सुट्टीच्या दिवशीही बँकांनी कामकाज सुरु ठेवावे असे रिझर्व्ह बँकेने आपल्या अधिसूचनेत म्हटले आहे.  
सर्व सरकारी बँका आणि काही खासगी बँकांना सुट्टीच्या दिवशीही कामकाज सुरु ठेवण्यास रिझर्व्ह बँकेने सांगितले आहे.  येत्या 31 मार्चला 2016-17 हे आर्थिकवर्ष संपणार असून, 1 एप्रिलपासून नव्या आर्थिकवर्षाची सुरुवात होणार आहे. 
सरकारी आर्थिक व्यवहार आणि कर भरण्याची सोय उपलब्ध रहावी या हेतूने रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेची काही निवडक कार्यालयेही सुरु राहणार आहेत. 

सहकाऱ्यांना बाहेर ठेवण्यात आनंद नाही- गिरीश बापट

'त्या' 19 आमदारांचे निलंबन मागे घेण्याचे संकेत
मुंबईगेल्या तीन दिवसापासून निलंबनाच्या मुद्द्यावर विधानसभेच्या कामकाजावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहेत्यामुळेविरोधी पक्षातील १९ आमदारांचे निलंबन मागे घेण्याचे संकेत सरकाच्या वतीने आज (शनिवार) विधानसभेत देण्यात आले.
सत्ताधारी व विरोधक ही एकाच रथाची दोन चाकं असून आमच्या सहकाऱ्यांना बाहेर ठेवण्यात आम्हालाही आनंद होत नसल्याचे निवेदन संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत केले आहे.
बापट म्हणाले१९ आमदारांचे निलंबन शिस्त भंगाच्या कारणामुळे करण्यात आले होतेआता हे निलंबन मागे घेणारच नाही असे नाहीअसे बापट यांनी स्पष्ट केलेलोकशाहीत विरोधी पक्षांचे आगळेवेगळे व महत्वाचे स्थान असून सत्ताधारी व विरोधक ही एकाच रथाची दोन चाके असल्याचेही बापट यांनी सांगितलेगेले दोन दिवस कामकाजात विरोधक नाहीत, याची आम्हाला सातत्याने जाणीव होत असल्याचे सांगत या मुद्द्यावर मुख्यमंत्रीविरोधी पक्षनेतेगटनेत्यांच्या अनेक बैठका झाल्यायावर तोडगा काढण्याचे प्रयत्न केले असल्याचे बापट यांनी स्पष्ट केलेनिलंबनाच्या मुद्द्यावर सरकारही सकारात्मकच असून अधिवेशन संपण्यास अजून काही दिवस बाकी आहेतत्यामुळे कामकाजाच्या पुढच्या दिवशी२९ रोजी मुख्यमंत्रीविरोधी पक्षनेतेसर्वपक्षीय गटनेते यांची बैठक घेऊन चर्चा करून मार्ग काढू, असे आश्वासन बापट यांनी यावेळी बोलताना दिले.
सरकारची ही भूमिका स्पष्ट करत येत्या २९ तारखेला विरोधकांनी सन्मानाने या सभागृहात यावे, असे आवाहन बापट यांनी विरोधी पक्षांना केलेविरोधी पक्ष हे आमचे सहकारी असून आमच्या सहकाऱ्यांना बाहेर ठेवण्यात आम्हालाही काही आनंद होत नसल्याचे गिरीश बापट यांनी यावेळी स्पष्ट केले.
काँग्रेसच्या १० व राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ सदस्यांचे अर्थसंकल्पाच्या सादरीकरणादरम्यान गोंधळ घातल्याबद्दल ३१ डिसेंबरपर्यंत निलंबन करण्यात आले होतेयानंतर निलंबन मागे घेईपर्यंत विधीमंडळ कामकाजावर बहिष्कार टाकण्याची भूमिका विरोधी पक्षांनी घेतलीगेले दोन दिवस विरोधकांच्या रिकाम्या बाकांसमोरच विधानसभेचे कामकाज चालू होतेया पार्श्वभूमीवर संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांच्या या स्पष्टीकरणामुळे सरकारने आता विरोधकांबाबत नरमाईची भूमिका घेतल्याचे दिसत आहे

अन्‌ पोलिस ठाण्यात विरोधकांचा संताप..!

मुंबई  - मंत्रालयात मारहाण झालेल्या शेतकरी रामेश्वर भुसारे यांना भेटायला गेलेल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना पोलिस अधिकाऱ्यांनी खोटी माहिती दिल्याने मरिन ड्राइव्ह पोलिस स्टेशनमध्ये नेत्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार, शेकाप नेते जयंत पाटील यांच्यासह इतर नेते व आमदार आज दुपारी पोलिस स्थानकात भेटायला गेले. मात्र अटकेतील शेतकरी भुसारे यांना न्यायालयात घेऊन गेल्याची माहिती संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी नेत्यांना दिली.
यामुळे अजित पवार यांनी थेट शेतकरी भुसारे यांनाच मोबाईलवरून संपर्क केला. त्या वेळी भुसारे पोलिस स्टेशनमधेच कैदेत ठेवल्याचे समोर आले. यामुळे संतापलेल्या शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी आतमधे जाऊन ज्या खोलीत डांबून ठेवलेल्या भुसारे यांना घेऊन आले. यामुळे सर्वच नेत्यांचा संताप झाला. पोलिस अधिकाऱ्यांना तर अजित पवार यांनी फैलावरच घेतले. खोटं बोलता, ही काय लोकशाही आहे काय, असा सवाल करत एवढी हिम्मत कशामुळे, या शब्दांत खडसावले.
संबंधित शेतकऱ्याला समोरचे दातचं नसताना तो चावा कसा घेतो अन्‌ त्याने चावा घेतला असेल तर त्यालाच सात टाके पडतील अशी जखम का होते, चावा घेतलेला पोलिस आतापर्यंत कुठे दडवून ठेवला आहे, असा प्रश्नांचा भडिमार अजित पवार यांनी केला.
सरकारच्या दबावाखाली पोलिस यंत्रणा काम करत असून, लोकशाहीची दडपशाही असल्याचा संताप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.
आजच्या या प्रसंगाने विरोधी पक्षनेते कमालीचे संतापले असून, शेतकरीविरोधी सरकारच्या धोरणांचा जनतेत जाऊन पंचनामा करू, असा इशारा दिला आहे.

खासदार गायकवाड यांचा घरी परतण्यासाठी रेल्वेने प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला मारहाण करणारे शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड यांना विमान कंपन्यांनी काळ्या यादीत टाकल्यानंतर त्यांनी घरी परतण्यासाठी रेल्वेने प्रवास करावा लागला. 
खासदार गायकवाड यांना फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाइन्सने (एफआयए) पाच कंपन्यांच्या विमानांत त्यांना तिकीटच न देण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. यामुळे आता रेल्वेने प्रवास करण्याशिवाय दुसरा पर्याय त्यांच्यासमोर उरला नाही. खासदार गायकवाड हे रात्री दिल्लीहून ऑगस्ट क्रांती एक्स्प्रेस या रेल्वेने मुंबईत आले. प्रवासादरम्यान कोटा रेल्वे स्थानकावर पत्रकारांशी त्यांची वादावादी झाल्याचेही वृत्त आहे. गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हाही दाखल झाल्याने त्यांना अटक होण्याचीही शक्‍यता आहे. 
एअर इंडियाच्या आर. सुकुमार या संबंधित अधिकाऱ्याने खासदार गायकवाड यांचे वर्तन "सडकछाप' होते, असे सांगून त्यांच्याविरुद्ध पोलिस कारवाईच झाली पाहिजे, असे ठामपणे सांगितले आहे. गायकवाड यांनी आपल्याला मारहाण केली व विमानाच्या दारातून खाली ढकलून देण्याचा प्रयत्न केला. मारहाण करणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे, अशी कोणाची समजूत होऊ नये, यासाठी गायकवाड यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, असे या कर्मचाऱ्याचे म्हणणे आहे.

Friday 24 March 2017

देवरी येथे पोलिस भरती व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

देवरी-  देवरी येथील दीनबंधू ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने पोलिस भरतीपूर्व व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन  शिबीराचे आयोजन येत्या रविवारी (ता.26) करण्यात आले आहे.
स्थानिक आफताब मंगल कार्यालयात आयोजित या शिबीराचे उद्घाटन आमदार संजय पुराम यांचे अध्यक्षतेत भाजपचे जिल्हा महामंत्री वीरेंद्र अंजनकर यांचे हस्ते सकाळी 11 वाजता होणार आहे. या शिबीराला प्रमुख मार्गदर्शक म्हणून देवरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. सदस्य अल्ताफ शेख, देवरी नगरपंचायतीचे उपाध्यक्ष ओमप्रकाश रामटेके, बांधकाम सभापती आफताब शेख,सभापती रितेश अग्रवाल, नगरसेवक यादोराव पंचमवार, प्रवीण दहिकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 
या शिबीरात भाग घेणाऱ्या शिबीरार्थींना पहिल्या सत्रात मार्गदर्शन करण्यासाठी देवरी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे (विषय- 12 वी नंतर पुढे काय?), डॉ. विजय कोळेकर ( कृषी आणि पशूसंवर्धन विभाग- महाराष्ट्र लोकसेवा आयोगासाठी करावयाची तयारी) आणि वनपरिक्षेत्राधिकारी रोशन राठोड (वनविभाग या घटकाचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगात महत्व ) तर दुसऱ्या सत्रात देवरीचे ठाणेदार राजेश तटकरे (विषय- स्पर्धा परीक्षा कशासाठी?) आणि उपनिरीक्षक सपताळ (विषय- पोलिसभरती पूर्व मार्गदर्शन) उपस्थित राहणार आहेत. 
तरी या शिबीराचा लाभ घेण्यासाठी युवक-युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहेत. इच्छुकांनी 9404029475, 9764477571 या क्रमांकावर नोंदणीसाठी संपर्क करण्याचे कळविले आहे.

रामगडच्या जि.प. शाळेत डिजीटल वर्ग खोलीचे उद्घाटन

देवरी - पंचायत समिती देवरी अंतर्गत येणाऱ्या पालांदूर जमी. केंद्रातील रामगडच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एका डिजीटल वर्गखोलीचे उद्घाटन  गेल्या बुधवारी (ता.22) करण्यात आले. दरम्यान, पालांदूर जमी, केंद्राच्या शिक्षण परिषदेच्या बैठकीचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते.
या डिजीटल वर्गखोलीचे उद्घाटन सुकळीच्या सरपंच लीला मुंदी यांचे अध्यक्षतेत पालांदूरचे केंद्रप्रमुख एन एस लंजे यांचे हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोरेश्वर पुराम, रमेश केराम, देवरी समूह साधन केंद्राचे विषयतज्ज्ञ मस्के, श्रीमती पटले, घरडे, कंभरे, राऊत, घासले, निपाणे, रामटेके, ठवकर, हुडरा, खोब्रागडे, उके, मडावी, राठोड, मिरी, जांभूळकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आणि रांगोळी स्पर्धेचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. वर्गखोली डिजीटल करण्यासाठी  ग्रामपंचायतीने 15 हजार आणि शिक्षण व गावकरी मिळून 15 हजाराचा निधी पुरविला.यावेळी गावकऱ्यासाठी भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे संचलन श्री. आर.बी.धमगाये यांनी केले. प्रास्तविक मुख्याध्यापक एम.के.चव्हान यांनी तर उपस्थितांचे आभार  हुंडरा यांनी मानले. यावेळी पालांदूर केंद्रातील सर्व शिक्षक आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Thursday 23 March 2017

भारत सर्वांत दुःखी देश

"यूएन'चा आनंदी देशांचा अहवाल जाहीर; नॉर्वे ठरला सरस, भारत 122 व्या स्थानावर 
नवी दिल्ली (PTI) : भारतात आनंद साजरा करण्यास निमित्त लागते. सण-उत्सवांची रेलचेल तर असतेच, शिवाय कौटुंबिक, सामाजिक स्तरावरील चांगल्या घटनांमुळे भारतीय लोक आनंदित होतात. मात्र, भारत पाकिस्तान आणि बांगलादेशपेक्षा दुःखी देश आहे, असा निष्कर्ष संयुक्त राष्ट्रसंघाच्या (यूएन) "वर्ल्ड हॅपिनेस्ट रिपोर्ट 2017'मध्ये (जागतिक आनंदी अहवाल) काढलेला आहे. आनंदी देशांच्या यादीत भारताचा क्रमांक अहवालात 122 वा आहे. जगातील सर्वांत आनंदी देश म्हणून नॉर्वेने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. गेल्या वेळी प्रथम असलेला डेन्मार्क आता दुसऱ्या स्थानावर आहे. 
"यूएन'च्या अहवालात एकूण 155 देशांचा समावेश केला आहे. आंतरराष्ट्रीय आनंदी दिवस सोमवारी (ता.20) साजरा करण्यात आला. त्या वेळी या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. यात भारताचा क्रमांक 122 वा असून, गेल्या वर्षी तो 118 व्या स्थानी होता. यंदा त्यात चार क्रमांकाने घसरण झाली आहे. त्यामुळे यंदा चीन, पाकिस्तान, नेपाळ, इराक हे देश भारताच्या पुढे गेले आहेत. हे क्रमांक ठरविताना संबंधित देशांमधील नागरिकांचे उत्पन्न, आरोग्यदायी जीवनशैली, सामाजिक सुरक्षा, व्यक्तिगत स्वातंत्र्य, भ्रष्टाचार व निःस्वार्थीपणा या घटकांची पाहणी करण्यात आली होती. असमतोलता, विश्‍वासाचे नाते म्हणजेच सरकारी व उद्योग पातळीवर भ्रष्टाचार मुक्त कारभार, एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या तुलनेत दरडोई उत्पन्न हेही लक्षात घेण्यात आले. तसेच आनंदाचे मूल्यमापन एक ते दहा क्रमांकात करण्यात आले आहे. 
सर्वांत आनंदी देशांचा अहवाल तयार करण्यास "यूएन'ने 2012 पासून सुरवात केली. जे देश विकासात मागे पडले आहेत त्यांना मार्ग दाखविणे हा याचा उद्देश असल्याचे सांण्यात येते. अहवालात नॉर्वे, डेन्मार्क, आइसलंड, स्विर्त्झलंड व फिनलंड या देशांनी पहिल्या पाचात स्थान मिळविले आहे. मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक हा देश शेवटच्या क्रमांकावर आहे. पश्‍चिम युरोप व उत्तर अमेरिकेनेही यात वरचे स्थान मिळविले आहे. यानुसार अमेरिका 14 व्या, तर ब्रिटन 19 व्या स्थानावर आहे. आफ्रिकन देश व संघर्ष पाचवीला पूजलेल्या देशांची कामगिरी फारशी चांगली हे या अहवालातून दिसून आले. 155 मध्ये 152 क्रमांकावर सीरिया असून येमेन, दक्षिण सुदान यांसारखे दुष्काळी देश अनुक्रमे 146 व 147 व्या स्थानावर आहेत. 

कर्जमुक्तीसाठी शिवसेनेचा धडक मोर्चा

साकोली - कर्जाच्या पाशात फसलेल्या शेतकऱ्यांची सरकारने कर्जमुक्ती करून सुटका करावी, या मागणीसाठी बुधवारी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले यांच्या नेतृत्वात शेकडो शिवसैनिकांनी धडक मोर्चा काढला. यावेळी उपविभागीय कार्यालयासमोर निदर्शने करून उपविभागीय अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 
शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहेत. त्यामुळे कुटुंब चालविताना त्यांची दमछाक होत आहे. मुलांचे शिक्षण मुलीचे लग्न कसे करावे, याची चिंता त्यांना आहे. अल्पश: आजारावर औषध घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे राहत नाही. अनेकांनी शेती परवडत नसल्याने शेतजमीन विकून दुसऱ्यांची गुलामगिरी सुरू केली. शेतीसाठी घेतलेले कर्ज संपण्याचे नावच घेत नाही. त्यासाठी शेवटचा पर्याय म्हणून घरदार व पत्नीचे दागिने विकण्याचा दुर्दैवी प्रसंग ओढवत आहे. चिंताग्रस्त होऊन शेतकरी आत्महत्या करण्याच्या घटनेत सातत्याने वाढ झाली आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचे आश्‍वासन देणाऱ्या सरकारला आता कर्जमाफी देण्याचा विसर पडला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी द्यावी. शेतमालाला योग्य भाव द्यावा. कृषिपंपासाठी शेतकऱ्यांना 24 तास वीज द्यावी, आदी मागण्यांसाठी त्वरित घोषणा करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. 
या मोर्चात शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले यांच्या नेतृत्वात उपजिल्हाप्रमुख संजय रेहेपाडे, राजेश बुराडे, संदीप वाकडे, पुरुषोत्तम सोनवाने, भरत वंजारी, युवासेना जिल्हाप्रमुख मुकेश थोटे, वाहतूक सेनाप्रमुख दिनेश पांडे, जिल्हा प्रसिद्धिप्रमुख अमित मेश्राम, जिल्हा विद्यार्थी सेना जितेश ईखार, जिल्हा कार्यकारणी सचिव ओमेश्वर वासनिक, तालुकाप्रमुख प्रकाश मेश्राम, हंसराज अगाशे, अरविंद बनकर, राजू ब्राह्मणकर, माजी तालुकाप्रमुख नरेश करंजेकर, प्रमोद मेंढे, शहरप्रमुख सूर्यकांत इलमे, नितीन सेलोकर, नरेश बावनकार, युवासेना तालुकाप्रमुख प्रणय कांबळे, किशोर चन्ने, शुभम बरापात्रे, विभागप्रमुख हितेश बडवाईक व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते. 

शिव्या ऐकून घ्यायला मी भाजपचा खासदार नाही- गायकवाड

नवी दिल्ली - शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेने मारहाण केल्यानंतर 'एएनआय'शी बोलताना शिव्या ऐकून घ्यायला मी भाजपचा खासदार नाही, शिवसेनेचा आहे, असे गायकवाड यांनी म्हटले आहे.

देवरी नगरपंचायतीच्या बाजार लिलावाची प्रक्रिया पूर्णत्वाकडे

आठवडी बाजाराच्या लिलावातून नगरपंचायतीला मिळाले 10 लाख 70 हजाराचे उत्पन्न

देवरी- देवरी शहराच्या हद्दीत भरणाऱ्या बाजाराच्या लिलाव प्रक्रियेला नगर पंचायतीच्या सभागृहात सुरवात झाली असून आठवडी बाजाराची बोली 10 लाख 70 हजारावर सोडण्यात आले.
 या आठवडी बाजाराचे कंत्राट जैपाल शहारे, प्रभू डोंगरे व मुन्नी वाघमारे या तिघांना मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले

टोल माफीऐवजी टोलधाड; 18 टक्के दरवाढ

मुंबई - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील प्रवास आता महागणार असून, सरकारने टोलमाफीऐवजी पुन्हा टोलधाड केली आहे. द्रुतगती मार्गावर 18 टक्के दरवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
या निर्णयामुळे मुंबई-पुणे प्रवास महाग होणार आहे. 1 एप्रिलपासून टोल दरात वाढ होणार आहे. 18 टक्के टोल वाढ होणार असल्याने वाहनधारकांना मोठी किंमत मोजावी लागणार आहे. 
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने 2004 मध्ये काढलेल्या अध्यादेशानुसार दर तीन वर्षांनी टोलच्या दरात 18 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार ही वाढ करण्यात आली आहे. 95 किमी लांबी असलेला द्रुतगती मार्ग 1 मार्च 2002 मध्ये सुरु करण्यात आला होता.
राज्य सरकारने अनेक मार्गांवरील टोल बंद करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता. द्रुतगती मार्गावरील टोलची मुदत संपल्याच्या बातम्या नुकत्याच प्रसिद्ध झाल्या होत्या. पण, आता टोल बंद होण्याऐवजी पुन्हा टोलवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे नागरिकांच्या खिशाला आणखी झळ बसणार आहे.
असे असणार दर - 
कार - 195 रुपयांवरुन 230 रुपये
मिनी बस आणि लहान मालवाहु वाहने - 300 ते 355 रुपये
ट्रक - 418 ते 493 रुपये
बस - 572 ते 675 रुपये

गृहकर्जाचा हप्ता दोन हजारांनी स्वस्त होणार

नवी दिल्ली : सर्वसामान्यांना आता गृहकर्जाच्या मासिक हप्त्यामध्ये दोन हजार रुपये किंवा त्याहून अधिक सवलत मिळू शकते. 
अठरा लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या नागरिकांसाठी जाहीर केलेल्या गृहनिर्माण योजनांची अंमलबजावणी 1 जानेवारीपासून सुरू झाली असून, केंद्रीय गृहनिर्माण आणि दारिद्र्य निर्मूलन मंत्री वेंकय्या नायडू यांनी एका कार्यक्रमात योजनेसंबंधी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. 
याबाबत बोलताना नायडू म्हणाले की, "कर भरण्याशिवाय देशाच्या आर्थिक प्रगतीत मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे घर खरेदीसारखी अत्यंत प्रामाणिक महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी मदत मिळणे हा त्यांचा हक्क आहे". ज्या नागरिकांना गृहकर्ज मंजूर झाले आहे आणि अद्याप ज्यांचे अर्ज अद्याप विचाराधीन आहेत अशा सगळ्याच व्यक्ती या अंशदानासाठी पात्र असल्याचेही त्यांनी सांगितले. 
बांधकाम क्षेत्राला गती देण्यासाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पहिल्या घरांच्या खरेदीसाठी सवलतीच्या दोन योजना सरकारने आणल्या होत्या. सध्या 6 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या व्यक्तीला पहिल्या घराच्या खरेदीसाठी गृहकर्जावरील व्याजावर अंशदान मिळते. आता सरकारने या योजनेसाठी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 18 लाख रुपयांपर्यंत नेली आहे. सरकारचे 2022 पर्यंत सर्वांसाठी घर हे उद्दिष्ट आहे. गृहकर्ज व्याजारावरील सवलत आताच्या 15 वर्षांच्या मुदतीऐवजी केवळ 20 वर्षे मुदतीच्या कर्जासाठी लागू असणार आहे.
या योजनेत उत्पन्नाच्या गटानुसार अंशदानाचे दर वेगळे असणार आहेत. वार्षिक उत्पन्न सहा लाख रुपये असलेल्या व्यक्तीला मूळ कर्जाच्या रकमेतील 6 लाख रुपयांवर 6.5 टक्के व्याज सवलत मिळत आहे. यासाठी एकूण कर्जाच्या रकमेवर मर्यादा नाही. एखाद्याने 9 टक्‍क्‍याने गृहकर्ज काढले असेल, तर त्याला त्यातील 6 लाख रुपयांवर केवळ 2.5 टक्के व्याज द्यावे लागेल. यानंतर 12 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्यांना गृह कर्जातील 9 लाखांच्या मूळ रकमेवरील व्याजात 4 टक्के सवलत मिळेल. तसेच, 18 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्यांना गृह कर्जातील 12 लाखांच्या मूळ रकमेवरील व्याजात 3 टक्के सवलत मिळेल. या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी नॅशनल हाउसिंग बँक (एनएचबी) आणि हुडको यांची निवड करण्यात आली आहे.

मुंडीपार येथे डिजिटल शाळेचे उद्घाटन


देवरी,दि.२३:प्रगत व शैक्षणिक महाराष्ट्र व डिजिटल इंडिया या उपक्रमा अंतर्गत तालुक्यातील बर्‍याच ठिकाणी जि.प. प्राथमिक शाळा डिजिटल होत आहेत. या उपक्रमांतर्गत लगतच्या मुंडीपार या गावातील जि.प. प्राथमिक शाळेत डिजिटल वर्गखोलीचे उद््घाटन करण्यात आले.
सरपंच गणेश तवाडे यांच्या हस्ते तर भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका महामंत्री कुलदीप लांजेवार यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष अतिथी म्हणून पं. स. सदस्य अर्चना ताराम, घनश्याम निखाडे तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस पाटील अमृत बोहरे, ग्रा.पं. सदस्य कमलेश मडावी, शा. व्य. समिती अध्यक्ष जगदीश बोहरे, केशव मेंढे, दादुराम बन्सोड, धनलाल बन्सोड, राजेंद्र बागडे, ज्ञानेश्‍ववर बागडे उपस्थित होते.
विद्येची देवता माता सरस्वती व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून डिजिटल वर्गखोलीचे मान्यवरांच्या हस्ते उद््घाटन करण्यात आले. यावेळी उद्घाटक तवाडे यांनी गावाच्या व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी ग्रामपंचायतचे धोरण व नियोजनाविषयी माहिती दिली. अध्यक्ष लांजेवार यांनी पालकांनी विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानयुक्त शिक्षणाकडे प्रवृत्त करून विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षा विषयी आवड निर्माण करावी, जेणेकरून या नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थी भविष्यात प्रशासकीय सेवेत पोहचू शकतील, असे प्रतिपादन केले.

प्रथम डिजिटल अंगणवाडीचा मान जेठभावडाला


देवरी दि.२३: विविध आदर्श उपक्रमांसाठी प्रसिद्ध झालेल्या देवरी तालुक्यातील जेठभावडा या गावाने पुन्हा एकदा मानाचा तूरा रोवला आहे. तालुक्यातील पहिली डिजिटल अंगणवाडी म्हणून जेठभावडा येथील अंगणवाडीला मान प्राप्त झाला आहे. गावकर्‍यांनी लोकसहभागातून हा मान मिळविला आहे.तालुक्यातील आदिवासी, नक्षलग्रस्त व अतिदुर्गम भागातील जेठभावडा ग्रामपंचायतमध्ये विकासाची परंपरा अविरत सुरू असून डिजिटल अंगणवाडीने यात पुन्हा भर घातली आहे. अंगणवाडीला डिजिटल करण्यासाठी लोकसहभाग व ग्रा.पं.च्या महिला व बालकल्याणाच्या दहा टक्के खर्चातून हातभार लागला. या डिजिटल अंगणवाडीचा उद््घाटन सोहळा बुधवार, २२ मार्चला आयोजित करण्यात आला होता. यानिमित्त महिला मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले होते.
डिजिटल अंगणवाडीचे उद््घाटन जि.प.च्या महिला व बालकल्याण माजी सभापती सविता पुराम यांच्या हस्ते तर पं.स.च्या सभापती देवकीताई मरई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. याप्रसंगी पं.स.चे उपसभापती संगीता भेलावे, सरपंच डॉ.जे.टी.रहांगडाले, उपसरपंच भोजराज गावडकर, विठ्ठल डोंगरे, हंसराज साखरे, रविंद्र बोरकर, गितांजली शहरे, रिमा गावडकर, कल्पना गावडकर, शुभद्रा किरसान यांच्यासह संपूर्ण गावकरी महिला व पुरूष बहुसंख्येने उपस्थित होते.
या डिजिटल अंगणवाडीसाठी स्वर्गीय संतलाल अग्रवाल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचे देवरीचे नातू अंशुल अग्रवाल यांनी सहा हजार रुपये दान दिले. या अंगणवाडी केंद्रामध्ये शिकणारे गरीब आदिवासी समाजाचे मुले-मुली ही एखाद्या शहरातील इंग्रजी शाळेप्रमाणे शिकतील व तसे ज्ञान त्यांना मिळेल. या निमित्त गावातील महिलांना जनजागृती करण्यासाठी महिला मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले होते.प्रास्ताविक एकात्मीक बालविकास प्रकल्प अधिकारी टी.व्ही.पौनीकर यांनी केले. संचालन सुमेद बन्सोड यांनी तर आभार राजकुमार गावडकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी कु.दिपाली नवधळे, रोहिणी, सुशिला देशमुख, जांभुळकर आदिंनी सहकार्य केले.

Wednesday 22 March 2017

देवरीच्या राजाराम सलामेंना आदिवासी सेवक पुरस्कार जाहीर

पुरस्कार वितरण 27 मार्चला नाशिक येथे होणार
मुंबई,,दि.२२(berartimes.com)-: महाराष्ट्रात आदिवासींच्या विकासाकरिता उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल कार्यकर्ते तसेच सामाजिक संस्थांना सन 2015-16 व 2016-17 या दोन वर्षांचे ‘आदिवासी समाजसेवक’ आणि‘आदिवासी सेवा संस्था’ पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये 16 व्यक्ती आणि 7 संस्थांचा समावेश आहे. हे पुरस्कार दि. 27 मार्चला नाशिक येथे समारंभपूर्वक वितरीत करण्यात येतील, असे आदिवासी विकास मंत्री विष्णु सवरा यांनी सांगितले.आदिवासींच्या सर्वांगीण विकासात योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांना हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो. व्यक्तीस 25 हजार रुपये तर संस्थेस 50 हजार रुपये अशी पुरस्काराची रक्कम आहे.
समाजसेवक पुरस्कारार्थी पुढीलप्रमाणे :प्रमोद गोपाळराव गायकवाड, नाशिक,रमेश एकनाथ रावले, कळवण,बापुराव बजरंग साळवे, राजूर, डॉ.कांतीलाल मांगीलाल टाटीया, नंदुरबार,सरस्वती गंगाराम भोये, जव्हार, लक्ष्मण सोमा डोके जव्हार,हरेश्वर नथु वनगा डहाणू, मनोहर गणू पादीर, पेण,रामेश्वर सिताराम नरे पेण,भगवान माणिकराव देशमुख, कळमनुरी,श्रीमती पुर्णिमा शोभानाथ उपाध्ये धारणी,सुनिल गुणवंत देशपांडे धारणी, सदाशिव डोमा घोटेकर, पांढरकवडा, सुखदेव नारायण नवले,औरंगाबाद,राजाराम नवलुजी सलामे देवरी,प्रमोद शंकरराव पिंपरे,गडचिरोली.
आदिवासी सेवा संस्था पुरस्कार प्राप्त संस्थांची नांवे-शाश्वत संस्था, मंचर, जि. पुणे, विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर संचलित राष्ट्र सेवा समिती, ग्रामविकास केंद्र, वसई, जि.पालघर, डॉ.हेडगेवार सेवा समिती, नंदुरबार, आम्ही आमच्या आरोग्यासाठी, कुरखेडा,जि.गडचिरोली, वनवासी कल्याण आश्रम, महाराष्ट्र प्रदेश, नाशिक, सुयश चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी संचलित राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, कासार आंबीवली, ता. मुळशी, जि.पुणे.

दोघांना अटक : कोब्राच्या विषाची तस्करी पकडली

नागपूर दि.22:: कोब्रासारख्या जहाल सापाच्या विषाची तस्करी करणाऱ्या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली. त्यांच्याकडून लाखोंचे विष आणि इनोव्हा कार जप्त केली. रोशन गिरीधर अमृतवार (वय १९) आणि गोपालसिंग रेनसिंग गौर (वय ३३)अशी या दोघांची नावे आहेत. रोशन तळोधी बाळापूर (नागभिड, जि. नागपूर) आणि गौर हुडकेश्वर (नागपूर) येथील रहिवासी आहे. साप आणि त्याच्या विषाची तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटसोबत या दोघांचे संबंध असल्याचा संशय आहे.चौकशी केल्यानंतर प्रकरण वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या अख्त्यारितील असल्याचे लक्षात आल्यामुळे या दोघांना वनाधिकाऱ्यांच्या हवाली करण्यात आले.
हिंगण्याच्या नोगा कंपनीजवळ पांढऱ्या रंगाची इनोव्हा कार (एमएच ३१/ सीव्ही ७३१९) बराच वेळेपासून उभी असल्यामुळे एमआयडीसी पोलिसांना संशय आला. त्यांनी कारमध्ये बसलेल्या रोशन आणि गौर यांना विचारपूस करताच ते असंबंध उत्तरे देऊ लागले. त्यामुळे त्यांच्यावरील संशय बळावला. पोलिसांनी कारची झडती घेतली असता त्यात छोट्या बॉटल्स (टेस्ट ट्यूब बॉटल) मध्ये विशिष्ट द्रव भरून दिसले. त्याबाबत पोलिसांनी या दोघांना विचारणा केली असता त्यात सापाचे विष असल्याचे त्यांनी सांगितले. हे विष विकायला आणल्याचीही आरोपींनी कबुली दिली. त्यामुळे ठाणेदार सुनील महाडिक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक रमेश तायडे, हवलदार पप्पू यादव, दिनेश जुगनाके, सुशील श्रीवास्तव आणि आशिष दुवे यांनी या दोघांना एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेले.

व्याघ्र प्रकल्पातील बांबू तोडणाऱ्या नऊ जणांना अटक

सडक-अर्जुनी दि.22: नवेगावबांध व्याघ्र प्रकल्पात जावून बांबू तोडणे त्या भागातील नागरिकांना महागात पडले. वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय डोंगरगाव/डेपो अंतर्गत येणाऱ्या खडकी कक्ष क्र.५६३ मधील जंगलात बांबूची चोरी करताना वनपरिक्षेत्र अधिकारी दीपक बागडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह जाऊन नऊ आरोपींना पकडण्यात यश मिळविले.राजगुडा येथील प्रदीप बोरकर, सुनील मडावी, सुरेश मडावी, प्रमोद विठोडे, उमेश उईके, विनोद इळपाते, कैलाश आचले, रमेश उईके यांना मुद्देमालासह पकडण्यात आले. हे आरोपी नेहमी वन्यजीव विभागातील वनाची चोरी करीत असल्याची चर्चा होती.व्याघ्र प्रकल्पातून बांबू आणणे व त्यातून चटई बनवून विकणे हा यांचा धंदा होता. २० मार्च रोजी सकाळी १० वाजता खडकी बिटमध्ये या नऊ आरोपींना पकडण्यात आले. आरोपींना अटक करून २४ मार्चपर्यंत वन कोठडी घेण्यात आली आहे.आरोपी राजगुडा येथील आहेत. ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी बागडे, वनरक्षक शुभम बरैय्या, शैलेंद्र भदाणे, संजय कटरे, क्षेत्र सहायक राजू तिरपुडे, परशुराम जोशी, विशेष व्याघ्र संरक्षण दलाचे वनपरिक्षेत्र अधिकारी रिता वैद्य व त्यांच्या चमुने ही कारवाई केली.

BERARTIMES_ MAR 22-28,2017





Sunday 19 March 2017

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा शेतकरी कर्जमुक्तीला पाठिंबा


नागपूर,दि.१९-राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या आज रविवारला झालेल्या बैठकित सध्या महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या शेतकरी हिताच्या कर्जमुक्ती प्रश्नावर चर्चा करण्यात आली. महासंघाचे राजकीय संयोजक माजी खासदार डॉ.खुशाल बोपचे यांनी शेतकरी हा आपल्या ओबीसी समाजातील सर्वात मोठा घटक असल्याने त्यांच्या कर्जमुक्तीसाठी ओबीसी महासंघानेही पुढाकार घेऊन शासनाचे लक्ष वेधणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावर बैठकीला उपस्थित सर्व मान्यवरांनी शेतकरी कर्जमुक्तीच्या प्रश्नावर राष्ट्रीय ओबीसी महासंघ कर्जमुक्तीच्या बाजूने असल्याचे सांगत प्रस्तावाचे समर्थन केले. दरम्यान, यावेळी ओबीसी मंत्रालयासंदर्भात शासनाचे अभिनंदन सुद्धा करण्यात आले.
शासनाने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, यासाठी लवकरच राज्याचे मुख्यमंत्री यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे ठरविण्यात आले. ही बैठक राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संयोजक प्राचार्य डॉ.बबनराव तायवाडे यांच्या अध्यक्षतेत धनवटे नॅशनल कॉलेजच्या सभागृहात पार पडली. या बैठकित दिल्ली येथे आयोजित द्वितीय राष्ट्रीय अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यास्थळासह तालुकापातळीवर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे गठण करण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. शासनाने ओबीसी मंत्रालयात नेमणुका करताना ओबीसींना प्राधान्य देण्यात यावे, सोबतच राज्य मागासवर्ग आयोगावर ओबीसी चळवळीतील लोकांना शासनाने सामावून घेत ओबीसी मंत्रालयाचे कामकाज व अंमलबजावणीसाठी शासनाने ओबीसी चळवळीतील तज्ज्ञासोबतंच बैठक घेण्याविषयी चर्चा करण्यात आली. पहिल्या टप्यात विदर्भात ओबीसी विद्यार्थी चळवळ व ओबीसींची युवा आघाडी मजबूत करण्यावरही चर्चा झाली. सभेला निमंत्रक सचिन राजुरकर, प्राचार्य अशोक जिवतोडे, सुषमा भड, प्रा. जेमिनि कडू, मनोज चव्हाण, प्रा.रमेश पिसे, जीवन लंजे, शरद वानखेडे, गुणेश्वर आरीकर, निकेश पिणे, विनोद उलीपवार, श्री गायकवाड, प्रा.संजय पन्नासे, उज्वला महल्ले आदी मान्यवर उपस्थित होते.

एनपीएस कर्मचाऱ्यांना हक्क हवा, भीक नको - वितेश खांडेकर, प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटना


१ नोव्हेंबर २००५ नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना शासनाने डीसीपीएस / एनपीएस योजना सुरू केली. या योजनेत समाविष्ट कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला कोणतेही अनुदान किंवा योजना देय नसल्याने त्यांच्यावर वेठबिगारी करण्याची वेळ येत आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटना अशा कुटुंबीयांना कुटुंबनिवृत्ती योजना मिळावी, यासाठी मागील वर्षभरापासून विविध मोर्चे आंदोलन करीत आहे. याच्या परिणामस्वरूप मुंबई येथे सुरू असलेल्या आर्थिक अधिवेशनात मा. आमदार दत्तायत्र सावंत, कपिल पाटील व श्रीकांत देशपांडे  यांच्या १६ मार्च रोजी तारांकित प्रश्न क्रमांक ३१ च्या लेखी उत्तरात मा. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अशी माहिती दिली की, नवीन पेंशन योजनेतील कर्मचारी यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या खातीजमा असलेली संचित रक्कम व रुपये १० लाख देण्याची शिफारस शासनाकडे करण्यात येत आहे. पण ज्या केंद्रशासनाच्या धर्तीवर राज्यशासनाने नवीन पेंशन योजना लागू केली त्या केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्याचा सेवेत मृत्यू झाल्यास कुटुंबनिवृत्ती वेतननुसार पेंशन दिली जाते. एवढेच नव्हे तर लोकसभेत व राज्यसभेत या संदर्भात प्रश्न विचारला असता तत्कालीन वित्तमंत्री पी. चिदंबरम साहेबांनी असे उत्तर दिले होते की, नवीन पेंशन योजना  ही नियत वयोमानाने निवृत्त होणारे सरकारी कर्मचारी यांच्या मिळणाऱ्या मासिक वेतनाचा पर्याय आहे. मात्र, अपंगत्व व मृत्यू अशा कारणाने निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना जुन्या पेंशन योजनेनुसार लाभ मिळतील. याच निर्णयाचा आधार घेत उत्तरप्रदेश, राजस्थान व उत्तराखंड सरकार आपापल्या राज्यकर्मचाऱ्यांना वरीलप्रमाणे लाभ देत आहेत. महाराष्ट्र राज्याने केंद्राप्रमाणे लागू केलेली पेंशन योजना असली तरी महाराष्ट्र शासन आपल्या कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे कुटुंबनिवृत्ती वेतन का देऊ शकत नाही, असा सवाल महाराष्ट्र शासनाचे कर्मचारी करीत आहेत.
वित्तमंत्री यांच्या लेखी उत्तरात असे म्हटले आहे की, ज्यांची सेवा १० वर्षे झाली आहे, अशांनाच शासनाकडून मदत मिळेल. पण ज्यांची सेवा १० वर्षापेक्षा अधिक झाली आहे, त्याचे काय? हा प्रश्न अनुत्तरित आहे. या होणाऱ्या अन्यायाविरोधात महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटना तीव्र आंदोलन करेल, असे संकेत संघटनेचे अध्यक्ष वितेश खांडेकर यांनी दिले. या आंदोलनात कर्मचाऱ्यांनी अधिकाकाधिक संख्येने सामील होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

कर्जमाफी उत्तर प्रदेशपुरती; कर्जमाफी हे केंद्र सरकारचे राष्ट्रीय धोरण नाही- नायडू

हैदराबाद-शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन फक्त उत्तर प्रदेशपुरतेच मर्यादित असून ते केंद्राचे ‘राष्ट्रीय धोरण’ नाही, असे केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी स्पष्ट केले.

भाजपच्या नेतृत्वाने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले आहे. ते फक्त त्या राज्यापुरतेच मर्यादित आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी हे काही मोदी सरकारचे राष्ट्रीय धोरण नाही, असे नायडू म्हणाले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवरून लोकसभेत विरोधक भाजपला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत, त्या पार्श्वभूमीवर नायडू यांनी हे स्पष्टीकरण दिले. लोकसभेत चर्चेत विरोधी खासदारांनी या मुद्द्यावर केंद्र सरकारला घेरले होते.

निर्णयास राज्ये मोकळी
शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची की नाही, हे पूर्णत: राज्याचे स्रोत व आर्थिक व्यवहार्यतेवर अवलंबून आहे. ते (राज्ये) त्यांचा निर्णय स्वत:च घेण्यास मोकळे आहेत.
- व्यंकय्या नायडू, केंद्रीय मंत्री

Gmailवरुन पैसे पाठवता येणार

अँड्रॉइड फोन युजर्सना यापुढे फोनमधील जीमेल अँपद्वारे पैसे पाठवता आणि स्वीकारता येणार आहे. गुगलने हे नवीन फिचर नुकतेच बाजारात आणले आहे. ही सुविधा गुगलतर्फे मोफत देण्यात येत आहे. सध्या ही सुविधा फक्त अमेरिकेतील युजर्ससाठी उपलब्ध असली तरी लवकरच ती सर्वांसाठी देणार असल्याचे गुगलतर्फे सांगण्यात आले आहे.
'फि-फ्री' या नावाच्या या फिचरमध्ये जीमेल अँपमधून फोटो किंवा फाईल पाठवली जाते, त्याच पद्धतीने आता पैसे पाठवता येणार आहेत. हे पैसे वापरकर्त्यांना स्वतःच्या बँकेतही जमा करता येणार आहेत.या फिचरद्वारे पैसे पाठवणे ई-मेल मध्ये एखादी फाईल पाठवण्याइतकेच सोपे आहे.
गुगलने काही वर्षांपूर्वी ऑनलाईन व्यवहारांसाठी गुगल वॅलेट हे फिचर बाजारात आणले होते. मोबाईलवरुन जीमेल वापरणाऱ्यांसाठी हे फिचर उपलब्ध नसल्याने ते तितकेसे लोकप्रिय ठरले नाही.
जीमेलचे जगभरात जवळपास 1 अब्ज वापरकर्ते आहेत त्यापैकी 75 टक्के लोक मोबाईल वरुन जीमेलचा वापर करतात. जगभरातील स्मार्टफोन युजर्सपैकी 80 टक्के युजर्स अँड्रॉइड ऑपरेटींग सिस्टीम असलेले फोन वापरतात. त्यामुळे या नव्या फिचरचा जास्तीत जास्त लोक वापर करतील अशी गुगलला अपेक्षा आहे.

Saturday 18 March 2017

मांडोदेवी देवस्थानातर्फे चैत्र नवरात्रोत्सव ः सर्वजातीय सामुहिक विवाह सोहळा ५ एप्रिलला


 २९ पासून ज्योती कलश पर्व

 गोरेगाव : पूर्व विदर्भातील प्रसिध्द तिर्थक्षेत्र श्री सुर्यादेव मांडोदेवी देवस्थान येथे दरवर्षीप्रमाणे यंदा २९ मार्चपासून चैत्र नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी सुमारे १ हजार ५०० हून अधिक ज्योती कलश स्थापन करण्यात येणार आहे. दरम्यान यावर्षी देवस्थान समितीतर्फे सर्वजातीय सामूहिक विवाह सोहळ्याची परंपरा निरंतर कायम ठेवत ५ एप्रिल रामनवमीच्या पर्वावर सायंकाळी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती देवस्थान कमेटीचे सचिव विनोद अग्रवाल यांनी दिली. 
श्री सुर्याटोला मांडादेवी देवस्थान समिती चैत्र नवरात्रोत्सवसाठी तयारीला झाली आहे. यावर्षी २९ मार्चपासून चैत्र नवरात्र उत्सवाला प्रारंभ होत आहे. २९ मार्च रोजी ज्योतिकलश स्थापित करण्यात येणार आहे.
५ एप्रिलला रामनवमीच्या पर्वावर २५ वर्षाच्या परंपरानुसार सर्व जातीय सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्यात सहभागी होणाऱ्या नवदाम्पत्यांची नोंदणी शासनाच्या शुभमंगल सामुहिक विवाह योजनेत करण्यात येणार आहे. यामुळे नवदाम्पत्याला योजनेतील १० हजार रूपयाचे अनुदान प्राप्त करण्यात येणार आहे. या शिवाय समितीकडून ‘रजत वर्ष’ निमित्त प्रत्येक जोडप्याला मांडादेवीची चांदी मूर्ती, पंखा, कपडे, जिवनोपयोगी साहित्य व इतर वस्तू भेट स्वरूप देण्यात येणार आहे. या सोहळ्यात जास्तीत जास्त संख्येत वर-वधूनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक समितीचे अध्यक्ष भैय्यालाल सिंदराम, सचिव विनोद अग्रवाल, मुन्नालाल असाटी, सिताराम अग्रवाल, डॉ.लक्ष्मण भगत, कुसन घासले, डॉ.जितेंद्र मेंढे, गणपतलाल अग्रवाल, नंदकिशोर गौतम, पोषण मडावी, हुवूâमचंद अग्रवाल, योगराज धुर्वे, श्याम ब्राम्हणकर, शिवा सराटे, सखाराम सिंदरा, शालीराम ऊईके, रामदास ब्राम्हणकर यांनी केले आहे. सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होण्याऱ्या  वर-वधूंनी मो.९६७३९२२०००, ९७९४५८०२१७ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

पाचवे राज्यस्तरीय व्यसनमु्क्ती साहित्य संमेलन अमरावतीमध्ये

गोंदिया,दि.18 (berartimes.com) – देशातील पाचव्या व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाचे आयोजन अमरावतीमध्ये करण्यात आले असून यावेळी संमेलनाचे उद्घाटन व राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराचे वितरण सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री ना. राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील. अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिध्द खंजेरी वादक राष्ट्रीय प्रबोधकार सत्यपाल महाराज  तर उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष अमरावतीचे पालकमंत्री तथा उद्योग, खणिकर्म, पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील राहाणार आहेत.गोंदिया येथील पत्रकार नरेश रहिले यांना यावेळचा महात्मा गांधी व्यसनमुक्त पुरस्कार जाहिर झाला असून त्यांना या कार्यक्रमात गौरवान्वित येणार आहे.
19 आणि 20 मार्च रोजी आयोजित व्यसनमुक्ती साहित्य संमेलनात व्यसनमुक्ती क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या आणि समाजासमोर आदर्श ठरलेल्या पंचवीस व्यक्ती तसेच सोळा संस्थांना व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या साहित्य संमेलनात विविध कार्यक्रमांची रेलचेल राहाणार आहे. मनोरंजन तसेच प्रबोधनात्मक कार्यक्रमांसोबतच विविध सामाजिक विषयांवर चर्चासत्रांचे आयोजनही करण्यात आले आहे. व्यसनाधिनता आणि महिलांचा लढा, युवकांना व्यसनांचा विळखा, अंमली पदार्थांचे महाराष्ट्राला आव्हान, साहित्यिक आणि प्रसार माध्यामांची जबाबदारी अशा अनेक विषयांवर चर्चासत्रांमध्ये विचारमंथन करण्यात येणार आहे.
राज्यातील विविध विषयांतील मान्यवर विचारवंत, पत्रकार, अभ्यासक, लेखक चर्चासत्रात सहभागी होणार आहेत. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी वीस मार्चला नशाबंदी मंडळाच्या वतीने ‘व्यसनमुक्तीचा ऑर्केस्ट्रा’चे आयोजन केले आहे. संमेलनाच्या शेवटच्या सत्रात संत साहित्यातील व्यसनमुक्तीचा संदेश या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
दोन दिवसीय साहित्य संमेलनाला कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, गृह व नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, ऊर्जा, पर्यटन, अन्न व औषधी प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार प्रामुख्याने उपस्थित रहाणार आहेत. तसेच अमरावतीचे महापौर संजय नरवणे जिल्हा पिरषद अध्यक्ष सतीष उईके, खा. आनंदराव अडसूळ, खा. रामदास तडस, आ. श्रीकांत देशपांडे, आ. डॉ. सुनील देशमुख, आ. विरेंद्र जगताप, आ. ओमप्रकाश कडू, आ. ॲड. यशोमती ठाकूर, आ.अनिल बोंडे, आ. रविकुमार राणा, आ. प्रभुदास भिलावेकर, आ. रमेश बुंदेले, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे सचिव डॉ. सुरेंद्रकुमार बागडे, आयुक्त पियुष सिंह आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.

घोनाडी आरोग्य केंद्रातील परिचारिकेचा अकस्मात मृत्यू

गोंदिया- देवरी तालुक्यातील घोनाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत येणाऱ्या सिंगणडोह आरोग्य उपकेंद्रात कार्यरत आरोग्य सेविकेचा अकस्मात मृत्यू झाल्याची नोंद देवरी पोलिसात करण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवरी तालुक्यातील घोनाडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या सिंगणडोह आरोग्य उपकेंद्रात रेखा अर्जुन गोफणे (वय 28) हल्ली मुक्काम सिंगणडोह  या आरोग्य सेविका म्हणून कार्यरत होत्या. आज घोनाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सभा आटोपून त्या आपल्या राहते घरी परतल्यावर त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्यामुळे त्यांना चिचगडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते. दरम्यान, प्रकृती अधिकच खालावल्याने रुग्णाला देवरीच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, सायंकाळी तीन ते चार वाजेच्या दरम्यान देवरी येथे उपचारासाठी आणत असताना त्यांचा वाटेतच मृत्यू  झाला. देवरी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास देवरी पोलिस करीत आहेत.

Sunday 12 March 2017

तुमसरच्या वीरपुत्राचे छत्तीगडमध्ये हौतात्म्य

भंडारा, दि. 12 : छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या गस्ती पथकावर केलेल्या हल्ल्यात 12 जवान शहीद झाले. सुकमा जिल्हयात शनिवारी सकाळी ही घटना घडली. यामध्ये भंडारा जिल्ह्यातील तुमसरच्या वीरपुत्राला वीरमरण आले.
 भंडारा जिल्हयातील तुमसर येथील हौतात्म्य पत्करलेल्या वीरपूत्राचे नाव मंगेश बालपांडे असे आहे.
 शहीद मंगेशचे पार्थिंव छत्तीसगड येथील हेलीकॉप्टरने भंडारा येथील पोलीस मैदानावर आणण्यात आले. शहीद मंगेश याला जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, तुमसरचे आमदार चरण वाघमारे, पोलीस अधीक्षक विनिता साहू, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पृथ्वीराज बी.पी., निवासी उपजिल्हाधिकारी अशोक लटारे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक रश्मी नांदेडकर, भंडारा नगराध्यक्ष सुनिल मेंढे यांनी पुष्पचक्र वाहून भावपूर्ण श्रध्दांजली वाहीली.
छत्तीसगडमधील सुकमा येथे नक्षल्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेला  34 वर्षीय मंगेश हा दोन चिमुकल्यांचा पिता होता.

Saturday 11 March 2017

उत्तर प्रदेशात दलित-ओबीसी मुख्यमंत्री व्हावा- साक्षी महाराज

वृत्तसंस्था
लखनऊ, दि. 11 – उत्तरप्रदेशात भाजपाने प्रचंड मोठी आघाडी घेत रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. उत्तरप्रदेशात भाजपा सत्तेवर येणार आहे हे जवळजवळ निश्चित झालं आहे. त्यामुळे आता सत्तेनंतरची समीकरणं जुळवणं सुरु झाल्याचं दिसत आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये जोरदार मुसंडी मारल्यानंतर भाजपा खासदार साक्षी महाराजांनी ओबीसी कार्ड टाकलं असून मुख्यमंत्रीपदी दलित किंवा ओबीसी व्यक्ती विराजमान व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली आहे.
उत्तरप्रदेशात भाजपा 290 जागांवर आघाडीवर असून समाजवादी पक्ष आणि काँग्रेस 75 आणि मायावतींची बसपा 20 जागांवर आघाडीवर आहे. विशेष म्हणजे भाजपाला 1991 नंतर पहिल्यांदाच उत्तरप्रदेश निवडणुकीत इतकी मोठी आघाडी मिळाली आहे. 1991 मध्ये भाजपा 221 जागांसह बहुमत मिळवत सत्तेत आली होती. विशेष म्हणजे त्यावेळी भाजपाने राम मंदिराचा मुद्दा उचलला होता. मात्र या निवडणुकीत राम मंदिराचा उल्लेखही झाला नाही. भाजपाने मुख्यमंत्रिपदाचा दावेदार जाहीर केलेला नसून संसदीय बोर्ड याबाबतचा निर्णय घेईल, असं जाहीर केलं आहे. सत्तेत आल्यानंतर आता मुख्यमंत्री नेमका होणार कोण हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. उत्तरप्रदेशात 20 ते 22 टक्के दलित समाज आहे, तर 27 टक्के मागासवर्गीय आहेत. हे लक्षात घेता दलित किंवा ओबीसींना मुख्यमंत्रिपद मिळावं, अशी साक्षी महाराजांची इच्छा आहे.

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा भ्याड हल्ला, 11 जवान शहीद



वृत्तसंस्था रायपूर/सुकमा, दि. 11 – छत्तीसगडमधील सुकमा येथे नक्षलवाद्यांनी शनिवारी सकाळी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकडीवर (सीआरपीएफ) भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात 11 जवान शहीद झाले आहेत. तर 5 जवान जखमी झाले. सुकमा जिल्ह्यातील भेज्जी परिसरातील ही घटना आहे.शनिवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास नक्षलवाद्यांनी सीआरपीएफ तुकडीवर गोळीबार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय राखीव पोलीस दलाची तुकडी सराव करत असताना नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्ल्याच्या बातमीला मुख्यमंत्री रमन सिंग यांनी देखील दुजोरा दिला आहे.
माओवाद्यांचा प्रभाव असलेल्या सुकमा जिल्हयातील भेज्जीच्या जंगलात सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास कोटाचेरू नावाच्या खेड्याजवळ ही घटना घडली. भेज्जी पोलिस ठाण्याच्या हद्दीत हे जंगल आहे. जंगलात जाणारा रस्ता सुरू करण्यासाठी CRPF च्या 219 बटालियनचे गस्त पथक गेले असताना जवानांच्या ताफ्यावर नक्षलवाद्यांनी हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले.
सहायक उपनिरीक्षक हिरालाल जांगडे, आरक्षक नरेंद्रकुमार सिंह, मंगेश पांडे, रामपालसिंह यादव, गोरखनाथ, नंदकुमार अतरम, सतीशचंद्र वर्मा, के. शंकर, वी.आर. मंदे, जगजितसिंह आणि सुरेश अशी हुतात्मा झालेल्या जवानांची नावे आहेत. जखमी जवानांमध्ये जगदीश प्रसाद निसोडे, जयदेव परमाणिक, मो. सलीम यांचा समावेश आहे. चौथ्या जखमी जवानाच्या नावाची अद्याप खात्री झाली नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “सुकमामधील CRPF जवानांच्या मृत्यूने दुःख झाले. हुतात्म्यांना आदरांजली व त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी.””सुकमातील परिस्थितीविषयी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्याशी मी बोललो. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते सुकमा येथे जाणार आहेत,” असे मोदी यांनी सांगितले.

गोव्यात भाजपला धक्का; मुख्यमंत्री पराभूत

वृत्तसंस्था
पणजी दि. 11 –: गोव्यात मतमोजणीच्या पहिल्या फेरीत मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा धक्कादायक पराभव झाला. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पराभूत होत असल्याने गोवा भाजपसाठी हा निकाल चिंतेचा विषय ठरताना दिसत आहे.मुख्यमंत्री पार्सेकर यांना धोबीपछाड देत काँग्रेसचे दयानंद सोपते यांनी मांद्रे मतदारासंघात 3500 मतांनी पराभूत केले. ‘जायंट किलर’ सोपते हे गोवा काँग्रेसचे हीरो ठरले आहेत. काँग्रेस सकाळपासून आघाडी घेत असल्याचे चित्र आहे. सकाळी दहा वाजता 8 जागांवर काँग्रेस आघाडीवर होता, तर भाजपचे 6 उमेदवार आघाडीवर होते. इतर राज्यांच्या निवडणूक निकालांमध्ये भाजपने सुरवातीपासून मुसंडी मारल्याचे चित्र असले तरी गोव्यात मात्र या पक्षाला धक्का बसला आहे.

Thursday 9 March 2017

नव्या सुरक्षित फीचर्ससह दहा रुपयांची नवी नोट लवकरच चलनात

मुंबई- नव्या फीचर्ससह दहा रूपयांची नवी नोट लवकरच चलनात येणार असल्याची घोषणा रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) केली आहे. नव्या नोटेवर राष्ट्रपिता महात्मा गांधी सीरिज 2005 मधील नोटांवरील दोन्ही नंबर पॅनेलमध्ये (L) हे अक्षर असणार आहे. तसेच, RBI चे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांची या नोटेवर स्वाक्षरी असेल.

नोटबंदीनंतर आरबीआयने पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या आहेत. त्यानंतर आता दहा रुपयांची नवीन नोट लवकरच चलनात येणार आहे. या नोटेवर दोन्ही पॅनलमधील नंबराचा आकार डावीकडून उजवीकडे वाढत जाईल. पहिल्या तीन अल्फा न्युमरिक कॅरेक्टर्सचा आकार मात्र कायम राहील. 2017 मध्ये या नोटा छापल्या जाणार आहेत.

8 ऑक्टोबर 2016 ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. त्यासोबत पाचशे आणि 1 हजार रुपयांच्या जून्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. त्यानंतर पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नवीन नोटा रिझर्व बँकेने चलनात आणल्या. त्याचप्रमाणे आता नव्या फीचर्ससह दहा रूपयांची नोट चलनात येणार आहे. मात्र, सध्या चलनात असलेल्या दहाच्या नोटा कायम राहणार आहेत.

प्रशांत परिचारक अखेर दीड वर्षांसाठी निलंबित


मुंबई, दि. 9 - भारतीय सैनिकांच्या पत्नींबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने वादग्रस्त भाजपचे आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विधानपरिषद सभापतींनी प्रशांत परिचारक यांना दीड वर्षांसाठी निलंबित केलं आहे. प्रशांत परिचारक यांच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. प्रशांत परिचारक यांच्या निलंबनासाठी मागणी करत विरोधकांनी घोषणाबाजी केली होती, ज्यामुळे सभागृहाचं कामकाज अर्धा तासासाठी तहकूबही झालं होतं.
सभागृहाची अप्रतिष्ठा होईल असे गैरवर्तन सभागृहाबाहेर करणाऱ्या विधिमंडळ सदस्यावर कोणत्या नियमाखाली कारवाई करावी यावरून निर्माण झालेली कोंडी दोन दिवस काथ्याकूट करूनही न सुटल्याने विधान परिषदेचे कामकाज बुधवारीही ठप्प राहिले होते.
  •  भाजपा पुरस्कत पंढरपूरचे आ. प्रशांत परिचारक यांना बडतर्फ केल्याखेरीज सभागृह चालू न देण्याच्या भूमिकेवर विधान परिषेद सदस्य ठाम होते. परंतु कारवाई नियमांच्या कात्रीत अडकली होती. ती फोडण्यासाठी सभापतींनी त्यांच्या दालनात गटनेत्यांची व नंतर अधिकाऱ्यांच्या अनेक बैठका घेतल्या. या प्रश्नावरून कामकाज दीर्घकाळ ठप्प राहू नये, यासाठी मध्यममार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू होते. तडजोड म्हणून आमदार परिचारक यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली पाहिजे. भविष्यात असे प्रसंग घडले तर काय करायचे हे ठरविण्यासाठी सात सदस्यांची एक सर्वपक्षीय समिती नेमली जाईल, असे सभागृह नेते व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले. पण अत्यंत हीन आणि कधीही न घडणारी कृती करणाऱ्या परिचारक यांना म्हणणे कशासाठी मांडू द्यायचे? त्यांना सभागृहातच काय विधीमंडळातही पाय ठेवू देणार नाही अशी भूमिका भाजपा वगळता शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण, काँग्रेसचे भाई जगताप, शरद रणपिसे, शेकापचे जयंत पाटील आदी सर्वपक्षीय सदस्यांनी घेतली. परिणामी बुधवारचे कामकाज ठप्प झाले होते. 
     परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नीविषय खेदजनक विधान निवडणुकीच्या प्रचारात केले होते. त्याचे तीव्र पडसाद देशभर उमटले. सैनिकांच्या संघटनांनी याविषयी तीव्र भावना व्यक्त केल्याची चर्चा सभापतींच्या दालनात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह गटनेत्यांची ही बैठक अत्यंत स्फोटक झाली. सदस्याच्या सभागृहाबाहेरील वर्तणुकीसाठी त्याच्यावर निलंबन किंवा बडतर्फीची कारवाई केल्यास तसा पायंडा पडेल आणि कोणीही कोणाच्याही वागणुकीवरून सदस्यांच्या बडतर्फीची मागणी करेल. त्यामुळे अधिवेशन संपेपर्यंत परिचारक यांना निलंबीत करावे आणि हा विषय संपवावा, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचे समजत होते. मात्र आ. परिचारक यांचे कृत्य सामान्य नसून देशासाठी वीरमरण आलेल्या जवानाच्या वीरपत्नीचा त्यांनी हीन शब्दांत अवमान केला आहे. त्यामुळे विधान परिषदेची व महाराष्ट्राचीही देशभर बदनामी झाली आहे. म्हणून कठोर शासन व्हायला हवे असे धनंजय मुंडे म्हणाल्याचे समजते.

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...