Thursday 31 October 2019

लाखनी येथे सतर्कता जागरूकता सप्ताहाचे आयोजन


लाखनी: ३०
नेहरू युवा केंद्राचा उपक्रम
नेहरू युवा केंद्र, भंडारा द्वारे तालुका लाखनी येथे युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय द्वारे आज सतर्कता जागरूकता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. भगिनी निवेदिता महिला मंडळ आणि युवा मंडळ यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भगिनी निवेदिता सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला तालुका युवा कोर प्रतिनिधी अश्विनी मुरकुटे, शालिनी वंजारी, अनुराधा भांडारकर, लता पडोळे, श्याम वंजारी, सुधाकर खेडीकर आणि मोठ्या संख्येने युवा युवती उपस्थित होते.

स्थानिक येथील धनश्री महिला पतसंस्थेचे नूतन इमारतीचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न

लाखनी: 31

धनश्री महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था लाखणी नवीन इमारतीचे उद्घाटन आज दिनांक 31 ऑक्टोबर 2019 रोज गुरुवारला पतसंस्थेचे अध्यक्ष श्रीमती शीला मोहन भांडारकर, उपाध्यक्ष श्रीमती कमल गणवीर, श्रीमती अपर्णा लाखनीकर, श्रीमती शीला जुनघरे, श्रीमती गीता बेलखोडे, श्रीमती गीता पटले, सौ सुमन निर्वाण, रोजिना अकबानी, श्रीमती कामुना वासनिक आणि मुख्यव्यवस्थापिका कुमारी लता पडोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी बँकेच्या अध्यक्षा शीला भांडारकर यांनी महिला पतसंस्था महिलांना स्वावलंबी करण्यासाठी किती महत्वपूर्ण आहे ते सांगताना. पतसंस्था अनेक वर्षे प्रतिकूल परिस्थिती तून पुढे आली आणि आज पतसंस्थेची स्वतः ची सुसज्ज इमारत होताना आनंद होत आहे. महिलांचा विश्वास आणि निस्वार्थ काम यामुळे पतसंस्था मोठी झाली आहे. असे बोलत पतसंस्था ही शाश्वत असून अनेक वर्षे ही समाजासाठी चालत राहील असा विश्वास आहे. या कार्यक्रमाला प्रास्ताविक आणि आभार व्यवस्थापिका लता पडोळे यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला आणि सभासद उपस्थित होते.

देवरी एमआयडीसीतील स्टील कंपनीत 7 कामगार जळाल्याची घटना


देवरी,दि. 31ः  येथील एमआयडीसीमध्ये गेल्या काही महिन्यापूर्वी जिल्ह्याच्या पालकमंत्र्याच्या हस्ते उदघाटन झालेल्या  ग्राझिया टुलीओ लाईफस्टाईल प्रायव्हे़ट लिमिटेड कंपनी (स्टील प्लांट)येथे प्राथमिक माहितीनुसार आज गुरुवारला काम सुरु असताना वितळलेल्या लोखंडाचा द्रव्य अंगावर पडल्याने दुपारी 1 वाजेच्या सुमारास कामावर असलेल्या  7 कामगार भाजल्याची घटना घडली.
जखमी कामगारात बिरबल, अजित सोनटक्के, पंचदेवराव,  सुनिल कुमार राव,यादव,अरशद अंसारी हे सर्व 90 टक्क्याच्यावर भाजले गेले असून यापैकी तिघांना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय व उर्वरित जखमींना गोंदिया वैद्यकिय महाविद्यालयात हलविण्यात आले आहेत.यासंदर्भात तेथील सुरक्षारक्षक काहीही बोलायला तयार नसल्याने सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही. देवरी पोलिसात प्रकरणाची नोंद करण्यात आली असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. मात्र, अद्यापही गुन्ह्याची नोंद करण्यात आली नव्हती.

मिळालेल्या माहितीनुसार, येथे कारखान्यामध्ये कच्च्या लोखंडावर प्रक्रिया करून लोखंडी साहित्य तयार करण्यात येते. या कामावर पुरुष कामगारांसह महिला कामगारही कामावर असल्याची माहिती आहे. घटनेनंतर प्रत्यक्ष घटनास्थळावर असलेल्या महिला कामगारांनी या कंपनीमध्ये सुरक्षाविषयक साधने कामगारांना पुरविली जात नसल्याची तक्रार माध्यमांच्या प्रतिनिधींकडे केली. उल्लेखनीय म्हणजे या कंपनीत अल्पमजुरीवर कामगारांकडून काम करवून घेत त्यांचे शोषण होत असल्याचे समोर येत आहे. याशिवाय या कामगारांचा कोणताही विमा या कंपनीने उतरविला नसल्याची कुजबूज परिसरात होती. सदर कंपनी लागू असलेल्या कायद्याची सर्रास पायमल्ली करीत असल्याने पोलिस प्रशासन या कंपनीविरोधात कोणती कार्यवाही करते, याकडे देवरीवासियांचे लक्ष लागून आहे.

बेरार टाईम्स दिपोत्सव अंक दि.30 ते 5 नोव्हेंबर 2019









देवरी एमआयडीसीतील टुलीप कंपनीत 5 कामगार आगीने जळाल्याची घटना

देवरी,दि.31ःयेथील एमआयडीसीमध्ये गेल्या काही महिन्यापुर्वीच जिल्ह्याच्या पालकमंत्र्याच्या हस्ते उदघाटन झालेल्या टुलीप कंपनीत आज गुरुवारला कामावर असलेल्या 4 ते 5 कामगारांचा आगीने जळाल्याची घटना घडल्याचे वृत्त येत आहे.(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)

Monday 28 October 2019

क्षेत्राच्या विकासात सर्वांचे सहकार्य अपेक्षित- आ.सहसराम कोरोटे


मॉ धुकेश्वरी परिसरात दीपावली मिलन उत्साहात

देवरी,दि.२८-  गेल्या अनेक वर्षापासून आमगाव विधानसभा क्षेत्रात लोकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचा योग मला लाभला. सातत्याने करीत असलेले जनसंपर्क आणि जनसेवा करण्याची संधी मला ईश्वरकृपेने मिळाली. परिणामी, लोकांनी मला प्रेमापोटी आपल्या क्षेत्राचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिली. त्यामुळे माझी जबाबदारी आता वाढली आहे. या क्षेत्राचा सर्वांगीण विकास करणे, हा एकमेव ध्येय मी उराशी बाळगून आहे. मात्र, आपल्या भागाचा विकास करण्यासाठी मला आपण सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. आपल्या सहकार्याशिवाय मी पुढे जाणार नाही, असे प्रतिपादन आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार सहसराम कोरोटे यांनी देवरी येथे बोलताना केले.दरम्यान, मॉ धुकेश्वरी मंदीर परिसरात सर्वधर्मिय दीपावली मिलन उत्साहात पार पडले.
ते देवरी येथील मा धुकेश्वरी परिसरात धुकेश्वरी ट्रस्टच्या वतीने आयोजित दीपावली मिलन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून न्यायमूर्ती संतोष कुर्वे, माजी नगराध्यक्ष सुमन बिसेन,ठाणेदार कमलेश बच्छाव, नगरसेवक सीता रंगारी, झामqसग येरणे, माजी सभापती राधेश्याम बगडीया, जिल्हा परिषद सदस्य उषा शहारे, माजी जिप सदस्य पारबता चांदेवार, सामाजिक कार्यकत्र्या सीमा कोरोटे,  कुलवंतqसग भाटिया, परमजितqसग भाटिया, के.सी.शहारे, महेंद्र मेश्राम, जुमेदखान, सय्यद, श्री.तिवारी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अ‍ॅड. प्रशांत संगीडवार यांनी केले.संचलन आणि आभार कुलदीप लांजेवार यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कुवरलाल भेलावे, प्रेमकुमार रिनाईत, आनंद नळपते, प्रा. मधुकर शेंद्रे, बाबूराव क्षिरसागर, संजय मलेवार, राजकुमार शाहू, छोटेलाल बिसेन,  शिवकुमार परिहार, दिनेश भेलावे, माया राजनकर आदी पदाधिकाèयांनी सहकार्य केले.

Sunday 27 October 2019

यंदा सर्वाधिक २३ महिला झाल्या आमदार

मुबंई(वृत्तसंस्था)दि.26ः- २०१९ पर्यंत विधानसभेच्या १३ निवडणुका झाल्या आहेत. त्यात आतापर्यंत ३ हजार ७४४ आमदार विजयी झाले. यापैकी १६० महिलांना विधानसभेत प्रतिनिधित्व मिळाले. पुरुषांच्या तुलनेत हे प्रमाण फक्त ४.२७ टक्केच आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक २३ महिला यंदाच्या (२०१९) निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. गतवेळी २० होत्या. त्यामुळे तुलनेने यंदा सर्वाधिक ७.९८ टक्के महिला आहेत. पाच वर्षांत १.०४ टक्क्यांनी महिला आमदार वाढल्याचे वैशिष्ट्यही अधोरेखित करण्यासारखे आहे.
महाराष्ट्र फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचा असल्याचे प्रचारात नेहमी बोलले जाते. त्यामुळे हे राज्य देशातील इतर राज्यांच्या तुलनेत पुरोगामी असल्याची नेहमी चर्चा असते. काही अंशी ते खरेही असेल. कारण यंदाच्या (२०१९) निवडणुकीत ३ हजार २३७ उमेदवारांनी निवडणूक लढवली. त्यापैकी २३७ महिला होत्या. २३७ मधून २३ महिला विजयी झाल्या आहेत. २८८ पुरुषांच्या तुलनेत ७.९८ टक्के प्रतिनिधित्व महिलांना मिळणे हे सर्व राज्यांच्या तुलनेत विचार केला तर सर्वाधिक आहे. पण निवडणुकांमध्ये पन्नास टक्के महिलांचे मतदान असते, त्या तुलनेत विचार केला तर हे प्रमाण मात्र नगण्य  मान्य करावे लागेल.२०१४ पर्यंतच्या १२ निवडणुकांमध्ये २९ हजार ६६९ उमेदवार रिंगणात होते. त्यात एकूण १२ निवडणुकांमध्ये १ हजार ३९४ महिलांनी उमेदवार म्हणून भाग घेतला. सर्व निवडणुकांत १३७ महिलांनाच आमदार होता आले आहे. त्यामध्ये आता यंदाच्या २३ महिला आमदारांची भर पडून महिला आमदारांचा आकडा गेल्या ५७ वर्षांचा १६० पर्यंत गेला आहे. १९७२ मधील दुष्काळाची चर्चा चवीने केली जाते. या निवडणुकीत महिला आमदारांचाही दुष्काळ होता. कारण ५६ महिलांनी रिंगणात उडी घेतली खरी, पण एकही विजयी होऊ शकली नाहीत.१९७८ ला सर्वात कमी अर्थात ५१ महिलांपैकी ८ विजयी झाल्या होत्या.
महायुतीच्या २३ पैकी १३, मुंबईत सर्वाधिक ७ महिला आमदार
जिंतूर- मेघना बोर्डीकर(भाजप) केज-नमिता मुंदडा(भाजप) नाशिक मध्य-देवयानी फरांदे(भाजप) नाशिक पश्चिम-सीमा हिरे(भाजप) देवळाली-सरोज अहिरे(राष्ट्रवादी) चोपडा-लताबाई सोनवणे(शिवसेना) साखरी-मंजुळा गावित(अपक्ष) पाथर्डी-मोनिका राजळे(भाजप) चिखली-श्वेता महाले(भाजप) अमरावती-सुलभा खोडके(काँग्रेस) तिवसा-अॅड.यशोमती ठाकूर(काँग्रेस) वरोरा-प्रतिभा धानोरकर(काँग्रेस) पर्वती-माधुरी मिसाळ(भाजप) कसबा पेठ-मुक्ता टिळक(भाजप) सोलापूर मध्य-प्रणिती शिंदे(काँग्रेस) तासगाव-सुमनताई पाटील(राष्ट्रवादी) धारावी-वर्षा गायकवाड(काँग्रेस) मीरा-भाइंदर-गीता जैन भायखाळा-यामिनी जाधव(शिवसेना) बेलापूर-मंदा म्हात्रे(भाजप) दहिसर-मनीषा चौधरी(भाजप) गोरेगाव-विद्या ठाकूर(भाजप) वर्सोवा-भारती लव्हेकर(भाजप)

अवकाळी पावसाचा धान पिकांना फटका-राष्ट्रवादीचे निवेदन

सडक अर्जुनी,दि.27 :गोंदिया जिल्ह्यात तीन चार दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाचा धान पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला. पावसामुळे कापणी केलेले धान भिजल्याने शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हिरावल्या गेल्या. यामुळे शेतकºयांवर आर्थिक संकट ओढावले आहे. त्यामुळे नुकसानीचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका सडक अर्जुनी तालुक्यातील पुतळी येथील शेतकऱ्यांना बसला. खरीप हंगामातील हलका धान निसवला असून कापणीचा हंगाम सुरू आहे. शेतकरी दिवाळीपूर्वी हलक्या धानाची कापणी करुन तो विक्रीसाठी आणणू दिवाळी साजरी करतात. मात्र तीन चार दिवसांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कापणी केलेले धान भिजले.काही भागात जोरदार पाऊस झाल्याने बांध्यामध्ये पाणी साचल्याने धान सडला. त्यामुळे धानाच्या कळपा काळ्या पडला असून धान पाखड झाला.अवकाळी पावसाचा चारशे ते पाचशे हेक्टरमधील धान पिकाला बसला.यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी तहसीदारांना दिलेल्या निवेदनातून केली. शिष्टमंडळात जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर,डॉ.अविनाश काशिवार, प्रमोद लांजेवार, चंद्रसेन कापगते, ग्यानीराम कापगते, देवाजी पर्वते, शिवदास डोंगरवार,विनायक डोंगरवार,शांतीलाल कापगते,गुलाब डोंगरवार यांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील गोंदिया, अर्जुनी मोरगाव, देवरी,आमगाव, सालेकसासह इतर भागात सुध्दा शनिवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही भागात एक ते दीड तास पाऊस झाल्याने याचा या भागातील धानपिकांना सर्वाधिक फटका बसला.सध्या खरीप हंगामातील धानाची कापणी सुरु आहे. मात्र शनिवारी झालेल्या पावसाचा फटका कापणी करुन बांध्यामध्ये ठेवलेल्या धान भिजला. बांध्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने कापणी केलेल्या धानाच्या कळपा भिजल्या. त्यामुळे धान पाखड होण्याची शक्यता आहे.तर शेतामध्ये उभा असलेला धान सुध्दा पाऊस आणि वाऱ्यामुळे झोपला. यामुळे धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.यावर्षी धान पिकाच्या वाढीसाठी अनुकुल वातावरण मिळाल्यामुळे पिकांची चांगली वाढ झाली. त्यामुळे यंदा बंफर उत्पादन होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र अवकाळी पावसाचा धान पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे

बच्चू कडूंच्या प्रहारचा शिवसेनेला पाठिंबा

मुंबई,दि.27(वृत्तसंस्था): महायुतीमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदावरुन दबावाचं राजकारण सुरू असताना शिवसेनेला प्रहार जनशक्ती पक्षाचा पाठिंबा मिळाला आहे.
प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडूंनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी प्रहारचे आमदार राजकुमार पटेलदेखील उपस्थित होते. प्रहार जनशक्ती पक्ष संपूर्ण ताकदीने शिवसेनेच्या सोबत राहणार असल्याची ग्वाही कडू यांनी दिली. त्यामुळे दबावाच्या राजकारणात शिवसेनेचं सामर्थ्य वाढले आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली आमदार बच्चू कडू आणि राजकुमार पटेल यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी कडूंनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला. शेतातील पेरणी ते कापणीपर्यंतची कामे रोजगार हमी योजनेतून करणे, दिव्यांग आणि आदिवासी बांधवांच्या योजनांची अंमलबजावणी आणि अचलपूर, मेळघाट मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडवण्याच्या मुद्द्यांवर शिवसेनेला पाठिंबा दिल्याचं कडूंनी सांगितले.सर्वसामान्य नागरिकांच्या, आदिवासींच्या, शेतकऱ्यांच्या, मजुरांच्या, दिव्यांग बांधवांच्या प्रश्नांवर प्रहार आणि शिवसेनेची वैचारिक भूमिका समान असल्याने त्यांना शिवसेनेला पाठिंबा दिल्याचे कडू म्हणाले. प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेला पाठिंबा देत असल्याचं पत्रदेखील यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना दिले. प्रहारचे संस्थापक आमदार बच्चू कडू अचलपूरचे, तर राजकुमार पटेल मेळघाटचे प्रतिनिधीत्व करतात.

Friday 25 October 2019

भाजपला शहरी भागातही धोबीपछाड


देवरी नगरात जबरदस्त फटका

देवरी,दि.25 - 66-आमगाव विधानसभा मतदार संघातील भाजपचा गड असलेल्या शहरी मतदारांमध्ये सुद्धा यावेळी कमालीची नाराजी दिसून आली आहे. यातही सर्वाधिक विकासकामे झालेल्या देवरी नगरामध्येच भाजपचे उमेदवार संजय पुराम यांना जबरदस्त फटका बसला. परिणामी, कार्यकर्त्यांचा अतिउत्साह भाजपला नडल्याची चर्चा या मतदारसंघात निकाल घोषित झाल्यापासून सुरू झाल्या आहेत. 
काल गुरुवारी (दि24) देवरीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आमगाव विधानसभेतील मतगणना पूर्ण करण्यात आली. काँग्रेसचे सहसराम कोरोटे आणि भाजपचे विद्यमान आमदार संजय पुराम यांच्यात अत्यंत चुरशीची लढत झाली. यावेळी भाजपचा गड असलेल्या आमगाव तालुक्याला भेदण्यात सहसराम कोरोटे यांना यश आले. याशिवाय सालेकसा आणि काँग्रेसचा परंपरागत मतदार असलेला देवरी तालुक्यातही या निवडणुकीत भाजपला डोके वर काढता आले नाही. उल्लेखनीय म्हणजे देवरीच्या विकासासाठी प्रचंड मेहनत घेऊनही आमदार संजय पुराम यांना येथे मतांची आघाडी घेता आली नाही. सालेकसा तालुक्यात सुद्धा भाजप काँग्रेसच्या तुलनेत मागे राहिला. एकंदर या निवडणुकीच्या निकालाकडे बघितल्यास सामना तुल्यबळ झाल्याचे दिसून आले.यावेळी संघ आणि भाजपचा गड असलेल्या आमगाव तालुक्यातून काँग्रेसला अवघ्या 14 मतांची आघाडी मिळाली असून आमगाव शहरात श्री कोरोटे हे 57 मतांनी आघाडीवर होते. सालेकसा तालुक्याचा विचार केला तर भाजप येथे 505 मतांनी पिछाडीवर राहिली. सालेकसा नगरात सुद्धा कोरोटे हे  180 मतांनी आघाडीवर होते. देवरी तालुक्यात काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत भाजपवर 6 हजार 816 मतांची दमदार आघाडी घेतली. एकट्या देवरी शहराचा विचार केला तरी श्री. पुराम हे कोरेटींपेक्षा 483 मतांनी पिछाडीवर होते. या निवडणुकीची विशेषता म्हणजे श्री. कोरोटे यांनी आपल्या विजयासाठी गेल्या पाच वर्षापासून प्रचंड जनसंपर्क वाढविला तर याउलट श्री. पुराम यांच्या कार्यकर्त्यांचा अतिउत्साह त्यांच्या अंगलट आल्याची चर्चा मतदार संघात आहे.

Thursday 24 October 2019

विदर्भात भाजपाला 18 जागांवर फटका




नागपूर- एक-एक करत निवडणुकीचे निकाल लागत आहेत. यात भाजपला मोठे धक्के बसत आहेत. पक्षातील बड्या नेत्यांना परभावाचा सामना करवा लागत आहेत. त्यातच आता नागपुरातही भाजपला दोन जागांवर काँग्रेसने धक्का दिला.निवडणुकीचे निकाल येताच भाजपचे काही मोठे नेते पराभूत झाले आहेत. यातच मुख्यमंत्र्यांचा नागपूरातही भाजपला दोन ठिकाणी धक्का बसला आहे. नागपूर पश्चिममधून भाजपचे उमेदवार सुधाकर देशमुख आणि नागपूर उत्तरमधून डॉ. मिलिंद माने यांचा काँग्रेसकडून दारुन पराभव झाला आहे. काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे पश्चिममधून तर उत्तरमधूण माजी मंत्री राऊत विजय झाले आहेत.राज्यात महायुतीची सत्ता कायम राहणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. मात्र भाजपा , शिवसेनेच्या जागा कमी झाल्या आहेत. अब की बार 200 पार अशी घोषणा महायुतीनं केली होती. मात्र प्रत्यक्षात महायुती जवळपास 160 जागा जिंकताना दिसत आहेत.
आमचे पैलवान तेल लावून तयार आहेत. मात्र समोर कोणी पैलवानच दिसत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांची खिल्ली उडवली होती. मात्र विरोधकांनी चांगली लढत देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली लढणाऱ्या भाजपाला दणका दिला.विजयी उमेदवार आणि आघाडी यांचा विचार करता भाजपाच्या पारड्यात सध्या 104 जागा आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपाला 122 जागा जिंकल्या होत्या. मात्र या निवडणुकीत भाजपाला 18 जागांवर फटका बसला. योगायोगाची गोष्ट म्हणजे भाजपानं विदर्भात नेमक्या अठराच जागा गमावल्या आहेत. विदर्भातल्या एकूण 63 पैकी तब्बल 45 जागांवर भाजपानं 2014 मध्ये विजय मिळवला होता. मात्र यंदा विदर्भात भाजपाला 27 जागांवर समाधान मानावं लागलं आहे.मुख्यमंत्र्यांचं होमग्राऊंड समजल्या जाणाऱ्या विदर्भात महाआघाडीनं जोरदार मुसंडी मारली. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला विदर्भात 10, तर राष्ट्रवादीला अवघी एक जागा मिळाली होती. मात्र यंदा काँग्रेस , राष्ट्रवादीनं विदर्भात भाजपाला धक्का दिला. या निवडणुकीत काँग्रेसनं विदर्भात 17 जागा जिंकल्या. तर राष्ट्रवादीनं 6 जागा मिळवल्या. यंदा विदर्भात इतरांनी 8 जागांवर विजय मिळवला. भाजपाला सत्ता दिल्यास वेगळ्या विदर्भाचा मुद्दा निकाली लागेल, अशी जनभावना होती. त्यामुळेच गेल्या निवडणुकीत विदर्भवासीयांनी भाजपाला भरभरुन मतदान केलं होतं. मात्र गेल्या पाच वर्षांत वेगळ्या विदर्भाच्या हालचाली झाल्या नाहीत. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी वेगळ्या विदर्भाचा मुद्दा उपस्थित केला होता. मुख्यमंत्रीपदाची साडेचार वर्षे पूर्ण झाल्यानंतर मी स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा मार्गी लावणार असल्याचं फडणवीसांनी आपल्याला खासगीत सांगितलं होतं, असं पवार यांनी म्हटलं होतं. मात्र ही बाब फडणवीस यांनी फेटाळून लावली. त्याचा फटका भाजपाला विदर्भात बसला का, याची चर्चा आता सुरू झाली आहे.

आमगावात काँग्रेसने रोवला विजयाचा झेंडा


आमदार पुराम यांचे स्वप्न भंगले


देवरी,दि.24 -गेल्या 21 तारखेला घेण्यात आलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आमगाव मतदार संघात काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीने विजयाचा झेंडा रोवला. यामुळे भाजपचे विद्यमान आमदार संजय पुराम यांचा दुसऱ्यांदा आमदार होण्याचे स्वप्न भंगले. काँग्रेसचे उमेदवार सहसराम कोरोटे यांनी पुराम यांचा 7 हजार 420 मतांनी धुव्वा उडविला.
स्थानिक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये पार पडलेल्या आमगाव विधानसभा मतदार संघाच्या मतमोजणीला संथपणे सुरवात झाली होती. दरम्यान, 18 फेरी मध्ये ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने मतमोजणी सुमारे अडीच तास खोळंबली होती. यामुळे येथील अंतिम निकाल रात्री सव्वा सातच्या सुमारास आला.यावेळी त्या बुथवरील मतगणना व्हीव्हीपॅटची मोजणी करून पूर्ण करण्यात आले.
या मतगणनेत काँग्रेसचे सहसराम कोरोटे यांना 88 हजार 265 मते मिळाली. यामध्ये 587 पोस्टल मतदानाचा समावेश आहे. त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी भाजपचे विद्यमान आमदार संजय पुराम यांना 80 हजार 745 (502 पोस्टल) मते मिळाली. काँग्रेसचे बंडखोर रामरतन राऊत यांची या निवडणुकीत पूर्ण हवा निघाल्याचे स्पष्ट झाले. त्यांना केवळ3 हजार 546मतांवर समाधान मानावे लागले. बहुजन वंचित आघाडीचे सुभाष रामराम यांना 3 हजार 359,  बहुजन समाज पक्षाचे अमर पंधरे यांना 3 हजार 165, उमेशकुमार सरोटे यांना 964, ईश्वरदास कोल्हारे यांना 566, ऊर्मिलाबाई टेकाम यांना 400, निकेश गावळ यांना 1 हजार 281 मते  मिळाली. यावेळी नोटाने कमाल करीत चक्क 1 हजार 884 मते मिळवली. निवडणुक निर्णय अधिकारी रवींद्र राठोड यांनी कॉंग्रेसचे सहसराम कोरोटे हे 7 हजार 420 मतांनी विजयी झाल्याचे जाहीर केले

गोंदियात विनोद अग्रवालांनी एैतिहासिक विजय मिळविला

गोंदिया,दि.24ः–महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकालाला सुरवात झाली असून राज्यात पुन्हा भाजप सेना सरकार स्थापन करण्याकडे वाटचाल करीत आहे.त्यातच गोंदिया भंडारा जिल्ह्यात धक्कादायक निकाल आले असून गोंदिया मतदारसंघात आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच अपक्ष उमेदवाराच्या रुपात विनोद अग्रवाल यांनी सुमारे 28 हजाराच्यावरील मताधिक्याने विजय मिळविला आहे.या मतदारसंघातून अपक्ष उमेदवार कधीही आजपर्यंत निवडून आलेला नव्हता त्यातही एवढ्या मताधिक्यानेही कुणीच निवडून आलेला नव्हता.
यावेळी मात्र विनोद अग्रवालांना जनतेने भरभरुन देत विधानसभेत पाठविले आहे.त्यांच्या विजयाचा आकडा जसजसा वाढत चालला तसतसा गोंदिया शहरासह मतदारसंघातही जल्लोषाचे वातावरण सुरु झाले होते.8 व्या 9 व्याराऊंडपासूनच शहरात फटाकेफोडून जल्लोषाला सुरवात झालेली होती.अतिंम आकडेवारी जाहिर होताच जिल्हाक्रिडा संकुल परिसरातून विनोद अग्रवाल यांची भव्य मिरवणुक शहरात काढण्यात आली.त्यापुर्वी त्यांच्या निवासस्थानासमोर फटाकेफोडून कार्यकर्ते व नातेवाईकांनी जल्लोष साजरा केला.त्यांच्या या मिरवणुकीत शिव शर्मा,घनश्याम पानतवने,दिपक बोबडे यांच्यासह अनेक भाजपाचे नेते सहभागी झाले होते.
विशेष म्हणजे आमदार गोपालदास अग्रवालांनी मुख्यमंत्री प्रेमापोटी घेतलेला निर्णय त्यांच्यावर उलटला असून मुख्यमंत्र्यांनी एकाच दगडात दोन शिकार या निवडणुकीत केले आहे.अग्रवालांना भाजपात घेऊन काँग्रेसला कमजोर करीत मतदारसंघातून काँग्रेसलाही संपविले आणि पक्षात घेऊन त्यांना पराभूत करुन त्यांचे राजकारणही संपविल्याचे बोलले जात आहे.अग्रवाल हे काँग्रेसमधूनच लडले असते तर त्यांना भाजपही पराभूत करु शकली नसती हे भाजपलाही ठाऊक होते,त्यामुळेच त्यांना पक्षात घेण्यात आल्याचे म्हटले आहे.गोपालदास अग्रवाल यांना मिळालेल्या मताकंडे लक्ष दिल्यास ती सर्व मते काँग्रेसची असल्याची दिसून येत असून भाजपची 2 टक्क्ेच्यावर मते त्यांना मिळालीच नसल्याचा अंदाज आहे.भाजपची सर्व मते ही अपक्ष विनोद अग्रवाल यांच्याबाजूनेच गेल्याचे निकालावरुन दिसून येते तर काँग्रेसचे उमेदवार अमर वराडे यांनी 3 हजाराच्या जवळपास मते मिळणे हे सुध्दा खुप काही राजकीय गणित सांगणारे ठरले आहे.तर युवा स्वाभीमानचे जितेश राणे सुध्दा काहीही कमाल करु शकले नाही.विनोद अग्रवाल यांच्या विजयाने भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यामध्येच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये सुध्दा मोठा उत्साह व जल्लोष दिसून येत आहे.शहरातील विविध भागात फटाकक्यांची आतिषबाजी सुरु आहे.

तिरोड्यात भाजपचे विजय रहांगडाले 25 हजारांनी विजयी

तिरोडा,दि.24ः-महाराष्ट्र विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीत तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजय भरतलाल रहागंडाले यांनी मताधिक्याने विजय मिळवित ही जागा भाजपकडे कायम ठेवली आहे.
त्यांनी आपले प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रविकांत बोपचे यांचा पराभव केला.विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बंडखोर उमेदवार दिलीप बनसोड यांनी तिहेरी लढत निर्माण केल्यामुळे भाजपला लाभ मिळाला.बनसोड यांनी घेतलेल्या 33 हजार मतांनी राष्ट्रवादीच्या मतांची विभागणी झाली आणि भाजपच्या विजयाा मार्ग सुकर झाला.निकाल घोषीत होताच भाजप उमेदवार विजय रहागंडालेंच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. बहुजन समाज पक्षाचे कमल हटवार 2506, राष्ट्रवादी काँग्रेसचे  रविकांत बोपचे 50213,भारतीय जनता पक्षाचे विजय रहांगडाले 75773,अपक्ष  दिलीप बन्सोड 33092, वंचित बहुजन आघाडीचे संदीप तिलगामे 1600 मते आणि नोटा 1837 मते पडली.

मोदींनी सभा घेतलेल्या साकोली,परळीसह पाच ठिकाणच्या उमेदवारांचा पराभव

गोंदिया,दि.24 राज्यतील विधानसभा निवडणुकीचे चित्र जवळजवळ स्पष्ट होत आहे. एकीकडे भाजपा आणि शिवसेनेच्या युतीला बहुमत मिळताना दिसत असले तरी महाआघाडीनेही चांगली कामगिरी केल्याचे चित्र दिसत आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यात नऊ प्रचारसभा घेतल्या त्यापैकी चार ठिकाणी भाजपाला चांगलाच फटका बसल्याचे दिसत आहे.त्यातच 2014 च्या विधानसभा निवडणुकीतही तसेच घडले होते.2014 मध्ये गोंदियाला व ब्रम्हपुरीला आले असता भाजपचा अधिकृत उमेदवार हरला. यावेळी साकोलीला आले असता तिथे पालकमंत्री डाॅ.परिणय फुके यांना पराभवाचा फटका बसला.
पंतप्रधान नरेंद्र नोंदी यांची राज्यातील पहिली प्रचार सभा १३ ऑक्टोबर रोजी जळगाव घेतली. याच दिवशी पंतप्रधानांनी साकोली  येथेही सभा घेतली. साकोलीमधून काँग्रेसचे नाना पटोले आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. तसेच मोदींनी १७ ऑक्टोबर रोजी परळी मध्ये सभा घेतली तिथे पंकजा मुंडेना पराभव पत्करवा लागला.तर  पुणे आणि सातारा या दोन्ही जिल्ह्यांमध्ये भाजपाला चांगला फटका बसला आहे. पुणे शहरातील आठ मतदारसंघांपैकी तीन जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. अकोल्यामध्ये पंतप्रधानांची १६ ऑक्टोबर रोजी सभा झाली होती. या ठिकाणीही भाजपाने एक जागा गमावली आहे.सातारा येथे उदयनराजेना पराभव पत्करावा लागला.

आमगावात भाजप भुईसपाट

देवरी: 24 आज झालेल्या मत मोजणीत आमगाव विधानसभा मतदार संघात काँग्रेस रा का आघाडीचे उमेदवार सहासराम कोरेटे यांनी भाजप चे विद्यमान आमदार संजय पुराम यांना सुमारे 6500 मतांनी धोबीपछाड दिली. दीड दशकात सहासराम कोरोटे यांचे स्वप्न पूर्ण झाले.
21 ला होऊ झालेल्या निवडणुकीत आपले तन मन धन पनास लावून विजयाचा दावा करणाऱ्या भाजपच्या तोंडी अखेर अपयश बघावयास मिळाले. जनतेने आपल्या शक्तीचा आणि लोकशाहीच्या खऱ्या शक्तीचा रूप यावेळी या मतदान क्षेत्रात दाखविल्याचे दिसून येत आहे.

भंडारा जिल्ह्यात ६७ धान खरेदी केंद्रांना मंजुरी,गोंदियात प्रस्ताव रखडले

गोंदिया/भंडारा,दि.24ः-जिल्हा पणन अधिकारी भंडारा यांच्यामार्फत धान खरेदी सुरू होणार असून , जिल्हा पणन अधिकारी यांनी प्रस्तावित केल्याप्रमाणे जिल्ह्यात ६७ धान खरेदी केंद्रांना जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीप चंद्रन यांनी मंजुरी प्रदान केली आहे. आधारभूत खरेदीचा दर ‘अ’ प्रतीचे धान प्रती क्विंटल १८३५ रुपये व साधारण दर्जाचे धान प्रती क्विंटल १८१५ रुपये या प्रमाणे आहे.
शेतकर्‍यांनी खरेदी केंद्रावर धान विक्रीकरीता आणतांना स्वत:चे आधारकार्ड, बँक क्रमांक व ज्यावर धान पिकाची नोंद आहे. असा शेताचा चालु वर्षाचा सातबारा सोबत आणणे अनिवार्य आहे. तसेच १0 ऑक्टोबर २0१९ च्या शासन पत्रानुसार दिलेले विहित विनिर्देश, तालुकानिहाय खरेदी केंद्राची नावे व त्या केंद्रांना जोडलेली गावे याबाबत सविस्तर माहिती जिल्हा पणन अधिकारी भंडारा यांच्याकडून प्राप्त होईल. धान उत्पादक शेतकर्‍यांना काही अडचणी भासल्यास जिल्हा पणन अधिकारी एस. डब्ल्यु. हजारे यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

गोंदिया जिल्ह्यात  ६२ हमीभाव धान खरेदी केंद्र कार्यान्वित करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांना प्रस्ताव पाठवून मंजुरी मागितली होती. मात्र विधानसभा निडणुकीच्या प्रक्रियेत प्रशासकीय यंत्रणा गुंतल्याने अद्यापही जिल्ह्यात धान खरेदी केंद्र सुरू झालेले नाहीत. आता पाच दिवसावर दिवाळी आलेली आहे. धानच विकले गेले नाही तर दिवाळी कशी साजरी करायची, असा प्रश्न शेतकर्‍यांसमोर उभा आहे. त्यामुळे तातडीने धान खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी होत आहे. यासंदर्भात जिल्हा पणन अधिकारी जी.टी. खर्चे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होवू शकला नाही.
जिल्ह्यातील अनेक शेतकर्‍यांनी दिवाळी साजरी करण्यासाठी हलक्या धानाची कापणी व मळणी करून ते विक्रीकरिता शेतातील बांध्यात ठेवले असून धान खरेदी केंद्र सुरू होण्याची प्रतिक्षेत होते. अशात पद्धतीच्या पावसाने गत चाद्द दिवसापासून तळ ठोकला असल्याने शेतातील बांध्यात ठेवलेले व कापणीला आलेल्या धानाचे मोठे नुकसान झाले आहे. तातडीने धान खरेदी केंद्र सुरू न झाल्यास हातात असलेले धान गमावण्याची वेळ शेतकर्‍यांवर येणार असल्याचे चित्र दिसत आहे.

भाऊ, आमदार कोण ? टेंशन वाढले






       

कार्यकर्ते तणावातः  उत्कंठा शिगेला पोचली
मतगणना एकूण 22 फेऱ्यात होणार
मतमोजणी सकाळी आठपासून


देवरी,दि.24- गेल्या 21 तारखेला पार पडलेल्या मतदानाची गणना ही आज सकाळी 8 वाजेपासून स्थानिक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत होणार आहे. संपूर्ण गणना ही एकूण 22 फेऱ्यात होणार आहे. यासाठी निवडणुक यंत्रणा सज्ज झाली आहे. गणनास्थळी होणाऱ्या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिस प्रशासनाने सुद्धा आपली कंबर कसली आहे. दरम्यान, आपला भावी आमदार कोण? या प्रश्नाला घेऊन मतदार संघात पहाटेपासून चर्चा गरम झाली आहे.
66- आमगाव विधानसभेच्या निवडणुकीसाठी गेल्या 21 तारखेला मतदान घेण्यात आले. यावेळी संपूर्ण मतदार संघात  1 लाख 82 हजार 36 मतदारांनी आपला हक्क बजवला असून मतदानाची सरासरी 60.30 टक्के एवढी राहिली. प्रत्यक्ष मतमोजणीला आज गुरुवारी (दि.24) सकाळी 8 वाजेपासून स्थानिक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सुरवात होणार आहे. ही गणना एकूण 22 फेऱ्यात होणार असून त्यासाठी 14 गणकटेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणुकीचा अंतिम निकाल दुपारी 12 वाजेपर्यंत अपेक्षित आहे. 
या निवडणुकीच्या निकालाला घेऊन उमेदवारांसह कार्यकर्ते आणि मतदार सुद्धा चांगलेच तणावात असल्याचे चित्र आहे. सकाऴपासून भाऊ, आपला आमदार कोण होणार? असा प्रश्न मतदार दिसेल त्याला विचारताना दिसत आहेत. निकालाची उत्कंठा अत्यंत शिगेला पोचली असून कार्यकर्ते चांगलेच तणावात आहे. परिणामी, दिवाळी सारख्या सणाला हा निकाल येत असल्याने विजेत्याचे फटाके वाजणार तर निराशा हाती आलेल्यांची दिवाळी सुध्दा यावर्षी काहीशी अंधारणार असल्याचे चित्र आहे.
या निवडणुकीत एकूण 9 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. प्रत्येक उमेदवार आणि त्याचे समर्थक आपल्या विजयाचे दावे करीत असले तरीही भाजपचे विद्यमान आमदार संजय पुराम आणि कॉंग्रेस आघाडीचे सहसराम कोरोटे यांच्यात थेट सामना होणार आहे. कॉंग्रेसचे बंडखोर माजी आमदार रामरतन राऊत हे कॉंग्रेस पक्षाला किती प्रमाणात अडचणीत आणणार, हेही या निकालावरून स्पष्ट होईल. गेल्या 2014 च्या तुलनेत मतदानाची टक्केवारी घसरली असली तरी  एकूण 6 हजार 371 मतांची वाढ झाली आहे. टक्केवारीत झालेली घट आणि वाढलेल्या मतदानाचा निकालावर परिणाम होण्याची शक्यता असून उमेदवाराच्या विजयात या घटकांचा मोठा वाटा राहणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

Wednesday 23 October 2019

फटाके विक्रेत्यांनी नियमाचे पालन करावे

  • निवासी इमारतीत फटाके विक्रीसाठवणुकीस मनाई
गोंदिया, दि. २3 : संयुक्त मुख्य विस्फोटक यांच्या निर्देशानुसार फटाक्यांच्या दुकानांचे शेड हे आग प्रतिबंधक व पूर्णतः बंद असणे आवश्यक असून शेडमध्ये कोणताही अनोळखी व्यक्ती प्रवेश करणार नाहीअशी व्यवस्था दुकानदारांनी करावी. फटाक्यांच्या दोन दुकानातील अंतर हे कमीत कमी तीन मिटर व प्रोटेक्ट वर्कपासून ५० मीटर अंतरावर असणे आवश्यक आहे. फटाक्यांच्या दुकानांची प्रवेशद्वारे, तोंडे एकमेकांकडे नसतील याची दक्षता घ्यावी. दुकानामधील लाईटची व्यवस्था दुकानांच्या भिंतीवर सुरक्षितपणे केलेली असावी.
फटाक्यांची डिजिटल अॅडोटाईसची फलके दुकानांच्या ५० मीटर अंतरावर असावीत. एका फटाक्याच्या दुकानामध्ये जास्तीत जास्त १०० किलोग्रॅम फायर वर्क्स तथा ५०० किलोग्रॅम चायनीजक्रेकरस्पार्कलर्स स्फोटके ठेवली जातीलयाची दक्षता घ्यावी. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार फटाका विक्रीची दुकाने खुल्या जागेमध्येपटांगणामध्ये असणे आवश्यक आहे. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास कमीत कमी नुकसान होईल. तसेच सार्वजनिक ठिकाणीनिवासी इमारतीमध्येगर्दीच्या ठिकाणी फटाका विक्री आणि साठवणूक करण्यास मनाई करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार फटाक्यांच्या दुकानामध्ये केवळ ग्रीन क्रेकर विकली जातील. नागरिकांनी दिवाळीच्या कालावधीमध्ये रात्री ८ ते १० वाजता दरम्यानच फटाके फोडावेतअसे आवाहनही वाशिमचे जिल्हा दंडाधिकारी यांनी केले आहे.
बेकायदेशीर विस्फोटक साठवणूक केल्यास होणार कारवाई
दिवाळी सणानिमित्त बेकायदेशीररित्या विस्फोटकांची साठवणूक व विक्री करण्यास आळा घालण्यासाठी वाशिम जिल्ह्यात अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आपल्या या अधिकार क्षेत्रातील उपविभाग, तालुके, नगरपालिका, ग्रामीण भागामाथिल ग्रामपंचायती ठरवतील अशा खुल्या जागेमध्ये, पटांगणामध्ये फटाक्यांची दुकाने लावली जातील, तर सार्वजनिक ठिकाणी, निवासी इमारतींमध्ये, गर्दीच्या ठिकाणी फटाक्यांची विक्री व साठवणूक केली जाणार नाही, याची दक्षता घेवून अशा लावल्या जाणाऱ्या फटाक्यांच्या दुकानांची व अवैध फटाका दुकानांची तपासणी करण्याची, जे परवानाधारक अटी व शर्तींचे पालन करणार नाहीत, अशा दोषी फटाका परवाना धारकांवर विस्फोटक नियम २००८ च्या नियम १२७ अन्वये तत्काळ कार्यवाही करण्याचे काम हे अधिकारी करणार आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी यांचे कार्यक्षेत्र संपूर्ण जिल्हा राहणार असून उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी हे त्यांचा उपविभाग, तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी हे संबंधित तालुका व नायब तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी हे संबंधित क्षेत्रामध्ये कार्यवाही करणार आहेत.

साप्ताहिक बेरारटाईम्स- 23 ते 29 ऑक्टोबर 2019





Monday 21 October 2019

सितेपारातील ८० टक्के ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

आमगाव,दि.21 – आमगाव-देवरी विधानसभा मतदारसंघातर्गंत येत असलेल्या आमगाव तालुक्यातील सितेपार ग्रामस्थांनी गेल्या पाच वर्षात विद्यमान आमदारांने गावाचा विकासाकडे कानाडोळा केल्याने ग्रामस्थांनी मतदानावरच बहिष्कार घातला.
२ हजार ५०० च्या जवळपास लोकसंख्या असलेल्या या गावातील ग्रामस्थांनी आधीच प्रशासनाला निवडणुकीवर बहिष्कार घालणार असल्याचे निवेदन दिले होते.त्यानंतर प्रशासनाने सुध्दा ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला,परंतु त्या प्रयत्नाला अपयश आले असून ८० टक्के ग्रामस्थांनी बहिष्कार कायम ठेवला.गावात प्राथमिक आरोग्य केंद्र,पिण्याचा पाण्याची सोय तसेच गावातील अंतर्गत रोड, रस्त्याची दुरवस्था झालेली असून या समस्या सोडविण्यात लोकप्रतिनिधी अपयशी ठरल्याचे ग्रामस्थांचे म्हणने आहे.एकीकडे ८० टक्के ग्रामस्थांनी बहिष्कार टाकलेला असतांनाच गावातील काही मतदांरानी मात्र मतदानाचा हक्क बजावला.

निवडणूक पथकातील नियुक्त कर्मचारी बापू गावडे यांचा दुर्देवी मृत्यू

बेस कॅम्पवर फीट येवून पडल्याने डोक्याला लागला होता मार
गडचिरोली,दि.21 :   बापू पांडू गावडे (प्राथमिक शिक्षक) वय 45 वर्षे राहणार दोड्डी टोला, एटापल्ली  हे बेस कॅम्पवर काल दिनांक 20 ऑक्टोबर रोजी फिट येऊन खाली कोसळले व त्यानंतर त्यांना एटापल्ली येथे रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यानंतर प्राथमिक उपचार करून त्‍यांच्या कुटुंबाच्या उपस्थितीत त्यांना काल दिनांक 20 ऑक्‍टोबर रोजी चंद्रपूर येथे 2.00 वाजता पुढील उपचारासाठी भरती केले. आज दिनांक 21 रोजी पहाटे 1. 30 मिनिटांनी त्यांचे चंद्रपूर येथे दवाखान्यात निधन झाले. बेस कॅम्पवरून प्रवास करण्याआधीच फिट येऊन खाली पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला मार लागला व त्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
गडचिरोली जिल्हयातील 69-अहेरी अंतर्गत येणा-या 83 क्रमांकाच्या पुरसलगोंदी या मतदान केंद्रासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. बेस कॅम्पवरून मतदान केंद्रावर जाण्याआधीच त्यांना फीट आल्यामुळे ते खाली कोसळले. यावेळी त्यांच्या डोक्याला मार लागला. त्यांना तातडीने उपचारासाठी वाहनाने काल सकाळी 9.00 वा. एटापल्ली येथे उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर पुढिल उपचारासाठी त्यांना अहेरी येथे कुटुंबाच्या उपस्थितीमध्ये उपजिल्हा रूग्णालयात हालविण्यात आले. तेथून त्यांना चंद्रपूर येथील दवाखन्यात काल दि.20 ऑक्टोंबर रोजी दुपारी 2.00 वाजता दाखल करण्यात आले. त्याठिकाणी दि.21 ऑक्टोबर रोजी पहाटे 1.30 वा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे कळाले. चौकशीनंतर फीट्स येण्याचा त्रास असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. मृत्यू पावलेल्या बापू गावडे यांच्या कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान रक्कम रुपये पंधरा लक्ष वितरित करणेबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्याकडे पाठवला आहे.

उमेदवारांचे भाग्य झाले मशिनबंद

66- आमगाव मतदार संघात सरासरी 70 टक्के मतदान
काही ठिकाणी मतदान यंत्रातील बिघाडामुळे मतदानाला उशिर
एकूण मतदान प्रक्रिया शांततेत

देवरी,दि.21- आज झालेल्या 66 आमगाव विधानसभा मतदार संघात भावी आमदारकीचे स्वप्न रंगविणाऱ्या उमेदवारांचे भाग्य सायंकाळी तीन वाजेनंतर मशिनबंद झाले आहे. या मतदार संघात सरासरी 70 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाल्याचे वृत्त हाती येत आहे. दरम्यान काही तुरळक ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाल्याने प्रत्यक्ष मतदानाला उशीरा सुरवात झाल्याचे वृत्त आहे. एकंदर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्याने निर्वाचन आयोगाच्या यंत्रणेने सुटकेचा श्वास घेतला.
सविस्तर असे की, आज 66 आमगाव विधान सभा मतदार संघात मतदान प्रक्रियेला सकाळी सात वाजता 310 मतदान केंद्रावर सुरवात झाली होती. काही ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड आल्याने प्रत्यक्ष मतदानाला उशीरा सुरवात करण्यात आली. मात्र, अल्पावधीतच या त्रुट्या दूर करण्यात मतदान यंत्रणेला यश आले. या मतदार संघात एकूण नऊ उमेदवार रिंगणात असून कॉंग्रेस आघाडीचे सहसराम कोरेटे आणि भाजपचे संजय पुराम यांच्यात थेट लढत असल्याचे मतदार संघात फेरफटका मारला असता दिसून आले. या रंगतीमध्ये माजी आमदार आणि कॉंग्रेसचे बंडखोर रामरतन राऊत यांनी कॉग्रेसपुढे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न कितपत यशस्वी होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.  आज सायंकाळ पर्यंत पूर्ण करण्यात आलेल्या प्रक्रियेत या मतदारसंघात सरासऱी 70 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाल्याचे वृत्त आहे. प्रत्यक्षात हा आकडा वाढण्याची शक्यता निवडणुक अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मतदानाला सुरवात झाल्यापासूनच अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगाच्या रांगा दिसून आल्या. मात्र, सकाळी 10 वाजे नंतर मतदान केंद्रांवर मतदारांनी तोबा गर्दी करीत लोकशाहीवर आपला विश्वास कायम असल्याचे जगाला दाखवून दिले. हा मतदार संघ अतिसंवेदनशील भागात मोडत असल्याने येथे सायंकाळी 3 वाजेनंतर मतदान बंद करण्यात आले. सुरक्षा यंत्रणांनी अत्यंत चोख बंदोबस्त लावल्याने कोणताही अनुचित प्रकार या मतदार संघात घडला नाही.

शहरी भागात झालेले मतदान

देवरीतील एकूण 10 केंद्रावर 11हजार 529 मतदारांपैकी 5853 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. याची टक्केवारी 50.76 राहिली. आमगाव शहरात एकूण 8 मतदान केंद्रावर 9 हजार 514 मतदारांपैकी 5590 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावत 58.75 एवढी टक्केवारी गाठली. चिचगडमधील 2 केंद्रावर 1 हजार 279 मतदारांनी आपला हक्क बजावत 68.23 टक्केवारी गाठली. ककोडी यथे  1 हजार 285 प्रत्यक्ष मतदान झाल्याने तिथे मतदानाची टक्केवारी 65.60 एवढी राहिली.

पावसाच्या वातावरणात मतदानाला सुरवात,यंत्रात बिघाडाचे वृत्त



दि.21ः- विधानसभेच्या निवडणुकीत सुमारे ९ कोटी मतदार ३,२३७ उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा फैसला करणार आहेत. राज्यात एकूण 8,98,39,600 मतदार असून यामध्ये 4,68,75,750 पुरुष, 4,28,43,635 महिला, 3,96,000 दिव्यांग, 1,17,581 सर्व्हिस मतदार आणि 2,634- तृतीयपंथी मतदार आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पाडावी, यासाठी आयोगाने केंद्रीय, तसेच राज्य राखीव दलाची मदत घेतली असून, राज्य पोलीस दलातील सुमारे ४० हजार कर्मचारी आणि अधिकारी बंदोबस्तावर असतील. मतदान केंद्राचा परिसर आणि स्ट्राँगरूमच्या बाहेर चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अचानक उद्भवलेला प्रसंग निस्तारण्यासाठी रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स तयार ठेवण्यात आला आहे. मतदान केंद्राच्या परिसरात ड्रोन उडविण्यास बंदी घालण्यात आली आहे, तसेच केंद्राच्या आतमध्ये मोबाइल नेण्यास मनाई करण्यात आली आहे.दरम्यान राज्यात सकाळपासूनच काही ठिकाणी रिमझिम पावसाला सुरवात झाली असून या पावसातच मतदारांनी मतदानासाठी रांगा लावण्यास सुरवात केली आहे.गोंदिया जिल्ह्यातील आमगाव मतदारसंघात मुल्ला येथील मतदान केंद्र 221 व 222 मध्ये तब्बल 22 मिनिटे मतदान थांबले होते.अकोला जिल्ह्यातील काही मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये थोडी गडबड झाल्याचे वृत्त आहे.

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघासाठी आज मतदान; 154 उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत होणार बंद. मध्यरात्रीपासून सोलापूर शहर व परिसरात जोरदार पाऊस; आताही जोरदार पाऊस सुरूच आहे. सोलापूर शहरातील 36 अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.काल रात्रभर आणि आणि पहाटेपासून सोलापूर आणि परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे मतदानावर पाणी फिरतो की काय अशी स्थिती असली तरी लोकांमध्ये उत्साह आहे. सुरुवातीच्या काळात थोड्या संथगतीने मतदान प्रक्रिया सुरू होत असल्याचे चित्र आहे अनेक मतदान केंद्रावर बुथ एजंटचा पोहोचले नाहीत. त्यामुळे मतदान प्रक्रिया काही मिनिटे उशिरा सुरू झाली.
नाशिक : नाशिक मध्य मतदार संघात मतदानाला सुरुवात होत असतानाच काठे गल्ली येथील अटल बिहारी वाजपेयी मतदान केंद्रावरील भाग क्रमांक 157 च्या खोली क्रमांक 2 मधील मतदान यंत्राच्या बिघाडामुळे विलंब. यंत्र बदलून मतदान सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.शहरासह जिल्ह्यात मतदानाला उत्साहात प्रारंभ, सकाळी पावणे सात वाजे पासूनच मतदार केंद्रांवर हजर होते.
राज्यमंत्री अतुल सावे यांनी औरंगाबादमध्ये सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क.
> नागपूरमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले मतदान.
> बारामती : माजी उपमुख्यमंत्री यांनी सपत्नीक काडेवाडीत बजावला मतदानाचा हक्क.
> साताऱ्यात उदयनराजे भोसले यांनी बजावला मतदानाचा हक्क.
> विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी चितेगावमध्ये केले मतदान.

Sunday 20 October 2019

मतदान करणाऱ्या व्यक्तींना बीएसएनएल कडून नि:शुल्क ४-जी सिम




भंडारा,दि. 20 :- निवडणूक आयोगामार्फत विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीची घोषणा झाली असून 21 ऑक्टोबर 2019 रोजी भंडारा जिल्हयामध्ये सर्व मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणूकीमध्ये जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदान जनजागृती मोठया प्रमाणात करण्यात आली आहे. यामध्ये आता भारत संचार निगम लिमिटेड यांनी मतदारांनी मतदानाची टक्केवारीवाढविण्यासाठी बीएसएनएल कडून नि:शुल्क जी सिमचे वाटप करण्यात येणार आहे.
मतदारांनी शाईचे बोट दाखविणे अनिवार्य असून सोबत  आधारकार्ड  एक फोटो  दिले असता ४-जी सिम कार्ड नि:शुल्क मिळतील. त्यासाठी नगर परिषद कॉम्पलेक्स रु.नं. 54, मुसिलम लाइब्ररी चौक,  भंडारा, एसबीआय बँक के पास मेनरोड साकोली, जयस्तंभ  चौक गुरुनानक गेट जवळ गोंदिया व लाखांदूर सीएससी येथे संपर्क साधावा. ही योजना 21 ते 31  ऑक्टोबर 2019 पर्यंत सुरु राहील, असे भारत दुरसंचार निगम भंडाराचे उपमहाप्रबंधक यांनी कळविले आहे.

मतदानाच्या दिवशी जिल्हयातील सर्व आठवडी बाजार बंद

भंडारा,दि. 20 :- निवडणूक आयोगामार्फत विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीची घोषणा झाली असून 21 ऑक्टोबर 2019 रोजी भंडारा जिल्हयामध्ये सर्व मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्हयात बाजाराचे दिवशी नागरिकांची गर्दी होवून मतदान  प्रक्रियेत अडथडा निर्माण होवू नये याकरीता जिल्हयातील सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांना दिले आहेत. उद्या बंद ठेवून अन्य दिवशी, आपल्या सुविधेनूसार आठवडी बाजार भरविता येणार आहे.
सर्व नोंदणीकृत मतदारांनी त्यांच्या मतदानाचा हक्क  बजावावा या करीता निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सर्व मतदारांना विविध प्रकारचे कार्यक्रम व उपक्रम राबवून आवाहन करण्यात आले असून मतदाराचा सहभाग वाढावा याकरीता प्रशासनातर्फे प्रयत्न सुरु आहेत. आज 20 ऑक्टोबर  रोजी जिल्हयातील सर्व मतदान केंद्रांवर नियुक्त मतदान पथक सर्व निवडणूक साहित्यासह रवाना झाले असून 21 ऑक्टोबर  रोजी निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे निर्भय व निरपेक्ष वातावरणामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडावी याकरीता कलम 37 लागू करण्यात आली आहे.
स्थानिक आठवडी बाजाराच्या निमित्याने मतदान केंद्राच्या परिसरात मोठया प्रमाणात लोकांची गर्दी होणार असून त्यांच्या फायदा समाजकंटक कायदा व सुव्यवस्था बाधीत करण्याचा हेतू ठेवण्यासाठी या लोकांडून होण्याचा संभव नाकारता येत नाही आणि अंमलात असलेली निवडणूक आचार संहिता भंग करण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
21 ऑक्टोबर रोजी जिल्हयातील विधानसभा मतदार संघासाठी होणारे मतदान हे निर्भय, निरपेक्ष वातावरणात पार पडावे आणि कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती शाबूत रहावी याकरीता 21 ऑक्टोबर 2019 रोजी जिल्हयात भरणारे सर्व ठिकाणाचे आठवडी बाजार बंद ठेवून दुसऱ्या दिवशी किंवा सोयीच्या इतर दिवशी  बाजार भरविण्याची कार्यवाहीबाबतचे आदेश जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीप चंद्रन  यांनी  निर्गमित केले आहे.

आमगाव विधानसभा मतदार संघात पोलिंग पथक रवानगीस विलंब



ऐनवेळी वरूण राजाने केली निवडणूक यंत्रणेची फसगत
गाड्या चिखलात रुतल्याने विलंब


देवरी,दि.20- उद्या होऊ घातलेल्या आमगाव विधानसभा मतदार संघातील मतदानासाठी पोलिंग पथक रवानगी आज पासून सुरू झाली असताना अचानक बरसलेल्या वरून राजाने निवडणुक यंत्रणेची चांगलीच फसगत केल्याची प्रचिती देवरी येथे बघावयास आली. अचानक उद्धभवलेल्या या घटनेने निवडणुक यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आले.
सविस्तर असे की, उद्या 66 आमगाव विधानसभेसाठी मतदान होऊ घातले आहे. यासाठी  देवरीच्या निवडणुक निर्णय अधिकारी यांनी स्थानिक औद्यागिक प्रशिक्षण केंद्रात कक्ष स्थापन केले आहे. याठिकाणावरून सर्व निवडणुक प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. उद्या होणाऱ्या मतदानासाठी आज या मतदारसंघातील 310 मतदान केद्रावर पोलिग पथक रवाना करण्याचे असल्याने सर्व कर्मचारी आणि वाहन येथे एकत्रित करण्यात आले. मात्र. ऐनवेळी पावसाच्या धारा कोसळल्याने येथे चिखल झाला. या चिखलात वाहने अडकल्याने निवडणुक यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आले. ऐनवेळी हायड्रा सारखी मशिनरी बोलावून चिखलात रुतलेल्या बसेस काढून पोलिंग पथक रवाना करण्याची कसरत सुरू होती. वृत्त विहीपर्यंत केवळ दोनतील पथक रवाना करण्याची माहिती संबधितांकडून मिळाली. यामुळे पोलिंग पथक आपल्या गंतव्यस्थानी पोचण्यास उशिर होत आहे. परिणामी, केंद्रावर पोचल्यानंतर होणाऱ्या त्रासापोटी पोलिंग पथकातील कर्मचारी नाराजी व्यक्त करीत असल्याचे दिसून आले. 

Saturday 19 October 2019

पटोले मारहाण प्रकरणः साकोलीत जाहीर निषेध सभा



सोशियल मिडीयावर प्रचार वायरल


साकोली,दि.19- काल रात्री भाजप उमेदवारासह काही गुंडांनी कॉग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्या पुतण्यांसह कार्यकर्त्यांनी पैसे वाटप करताना अडविले म्हणून जबर मारहाण केल्याची घटना घडली होती. या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी सभेचे आयोजन आज शनिवारी साकोली येथे करण्यात आले.
ही सभा स्थानिक पंचशील वार्डातील दुर्गा मंदिर परिसरात घेण्यात आली. या सभेत श्री पटोले यांच्या पुतण्या आणि काही कार्यकर्त्यांना डॉ. फुके यांनी आपल्या गुंडासह मारहाण करून गंभीर जखमी केल्याचा आरोप केला. यावेळी बोलताना नाना पटोले यांनी साकोली विधानसभेच्या कोणत्याही निवडणुकीमध्ये यापूर्वी असा प्रकार कधीही झाला नसल्याचा उल्लेख करीत देशपातळीवर ओळख निर्माण झालेल्या या मतदार संघाचे नाव अर्थात येथील मतदरांना भाजपविचारसरणीच्या उमेदवाराने बदनाम केल्याची गंभीर टीका केली. यावेळी बोलताना थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा या प्रकरणात हात असल्याचा आऱोप करीत त्यांच्या संभाषणाच्या ऑडिओ क्लिपची मागणी केली आहे.
यानंतर या सभेचे रुपांतर आंदोलनात झाले. यावेळी पालकमंत्री आणि मारहाणीचा आरोप असलेले डॉ. फुके यांच्या अटकेच्या मागणीला घेऊन आंदोनल करण्यात आले. यावेळी हजारोच्या संख्येने पटोले समर्थकांनी पोलिस स्टेशनवर जाऊन आपला रोष प्रगट केला. 
दरम्यान दोन्ही बाजूंनी दावेप्रतिदावे करणाऱ्या चित्रफिती सोशियल मिडीयावर वायरल केल्या जात आहेत. एका विडीओ मध्ये खुद्ध पालकमंत्री यांनी नाना पटोले याचेवर बनावट प्रकरणाच त्यांचे बंधू नितीन फुके यांना अटकवल्याचा आणि मारहाण केल्याचा आरोप करीत आहेत. तर दुसरीकडे नाना पटोले गटाने ज्याला पैसे वाटताना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले तो त्या विडीओमध्ये भूगावदेवी ता. नरखेड येथील प्रवीण लोहिया असल्याचे सांगत आहे. तो शेतकऱ्यांचे पैसे वाटप करण्यासाठी आल्याचे त्या विडीओत सांगत आहे. यावरून या प्रकरणात काहीतरी काळेबेरे असल्याची चर्चा साकोली मतदार संघात आहे. यानिमित्ताने या मतदारसंघात गुंडगिरीच्या बळावर काही लोक निवडणुक जिंकण्यासाठी असले प्रकार करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे  आहे. यापूर्वी असले प्रकार या भागात झाले नसल्याने भविष्यात असे प्रकार कोणी करण्यासाठी धजावणार नाही, याची काळजी मतदारांनी घेतली पाहिजे, असेही या सोशियल मिडीयाच्या माध्यमातून आवाहन करण्यात येत आहे.






जि प प्रा शाळा ओवारा येथे अनोखा वाढदिवस साजरा

देवरी/ ओवारा 19:
जि प प्रा शाळा ओवारा येथे वाढदिवसा निमित्त पहिल्या वर्गात शिकत असलेल्या दिव्यांजना वसंत नाईक या विद्यार्थिनींचे वाढदिवस सर्व विद्यार्थ्यांना पेन वाटप करून तसेच आई वडील नसलेल्या वर्ग 5वी तिल प्रिया या विद्यार्थिनीला 1 वर्षासाठी दत्तक घेऊन शैक्षणिक साहित्या सह 200 रु दिले आणि इतर शैक्षणिक बाबी साठी मदत करण्याचे ठरविले. दिव्यांजनाचे वडील याच शाळेत शिक्षक असून यावेळी वृक्षारोपण देखील करण्यात आले. दिव्यांजनाचे लिहिलेल्या पत्राचे वाचन मुख्याध्यापक भागवत भोयर यांनी केले.या वेळी लेक वाचवा लेक शिकवा हा संदेश देण्यात आला.

Friday 18 October 2019

डोगंरगाव(डेपो)येथील संशयीत इसमाच्या घरुन २१ जिवंत डिटोनेर जप्त


गोंदिया,दि.१८ः-देवरी पोलीस ठाणेंतर्गतं येत असलेल्या डोंगरगाव(डेपो)येथील एका इसमाच्या घराच्या झडतीमध्ये २१ जिवंत डिटोनेर आढळून आले असून निवडणुक काळात नक्षल्यांच्या घातपात करण्याचा डाव पोलिसांच्या या कारवाईमुळे उधळून लावण्यात आला आहे.अतिरिक्त पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात गुप्त माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले,देवरीचे ठाणेदार कमलेश बच्छाव यांच्यासह पोलिस उपनिरिक्षक,पोलिस शिपाई यांच्या पथकाने नवेगावबांध येथील पोउपनिरिक्षक विचेवार व हवालदार काटंगे यांना व पथकास मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई १७ आक्टोंबरला करण्यात आली.याप्रकरणात डोंगरगाव(डेपो)येथील संशयीत इसमाच्या घराची झळती घेण्यात आल्यानंतर जिवंत काळतूस आढळून आले असून अधिक तपास सुरु करम्यात आला आहे.यासंदर्भात देवरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर इसमास ताब्यात घेण्यात आले आहे.पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी करीत आहेत.

राज्य उत्पादन शुल्क व पोलिस विभागाचा पुढाकार;299 गुन्हे दाखल व 44 लाखाचा मुद्देमाल जप्त

गोंदिया, दि. 18 : येत्या 21 ऑक्टोबर रोजी  होणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी जिल्हयातील चारही विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. 21 सप्टेंबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला त्यादिवसापासूनच जिल्हयातील चारही  विधानसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या आदर्श आचारसंहितेची जिल्हयात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलिस विभागाची विविध पथके गठित करण्यात आली असून विविध ठिकाणी कार्यवाही करण्यात येत आहे.
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग  व पोलिस विभागाने केलेल्या संयुक्त कारवाईत आतापर्यंत अवैध मद्य वाहतुकीच्या प्रकरणात  एकुण 299  गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या संपूर्ण कारवाईमध्ये एकुण 33 हजार 905.64 लिटर अवैध दारु असा एकुण 44.16 लाखाच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  3 मद्य विक्रेत्यांची तात्पुरत्या स्वरुपात परवाने  निलंबीत करण्यात आले आहेत.
विविध हालचालीवर नजर ठेवण्यासाठी अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघासाठी 4,  तिरोडा विधानसभा मतदारसंघासाठी 3, गोंदिया विधानसभा मतदारसंघासाठी 3 आणि आमगाव विधानसभा मतदारसंघासाठी 4 अशी एकुण 14 स्थिर सर्वेक्षण पथके कार्यरत असुन विविध कारवाईमध्ये या पथकामार्फत एकुण 13 लाख 29 हजार 530 रोख रक्कम  जप्त करण्यात आली आहे.

Thursday 17 October 2019

ओवारा धरणात युवकाचा बुडून मृत्यू

देवरी: 17
धरणाचे पाणी रस्त्यावर आले असून तिथून वाट काढत असतांना , मोटार सायकल धूत असतांना, पोहण्याचा मोहापायी युवकाने उडी घेतली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. महेंद्र हेमराज लांजेवार असे मृत युवकाचे नाव असून तो जांभळी येथील राहवासी असल्याचे प्रत्येक्षदर्शी सांगीतले.
युवकाचा मृतदेहाचा शोध वृत्त लिहीत पर्यंत सुरु होता.

Wednesday 16 October 2019

ओबीसींच्या हक्कासाठी लढणार कोण?

मतदानापूर्वी ओबीसी समाजाने विचार करण्याची गरज

सुरेश भदाडे/बेरारटाईम्स
गोंदिया- आपल्या देशाचा कारभार ज्या संविधानावर चालतो, तो संविधान हा न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्त्वावर आधारित आहे. हे संविधान स्वातंत्र्यानंतर लागू करण्यात आले. स्वातंत्र्योत्तर काळात या चारही तत्त्वांची पूर्तता करण्यात आपले पुढारी खरंच यशस्वी झाले काय? यावर देशात बऱ्याच वेळा चिंतन झाले, होत आहेत आणि भविष्यात सुद्धा होत राहतील. परंतु, एक गोष्ट प्रकर्षाने आजही जाणवते ती ही की, या देशातील संख्येने हत्तीसारखा असलेला ओबीसी समाज हा खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य उपभोगतो आहे की कोणाच्या आधिपत्याखाली आपले जीवन कुंठित जगत आहे, याचा विचार त्या समाजातील नेतृत्वाने करण्याची खरी गरज आहे. स्वातंत्र्यानंतर अनेक सार्वत्रिक निवडणुका झाल्या. परंतुु, घटनेने दिलेले अधिकार आणि हक्क हे या समाजाला मिळाले का? किंबहुना ते अधिकार आणि हक्क कोणते? याची जाणीव तरी त्या समाजाला होऊ दिली काय? हा खरा प्रश्न आहे.
घटनाकारांनी या देशात समता आणि बंधुता नांदावी याची उत्तम तजवीज केली. त्यामुळे भारतासारख्या मोठ्या प्रजासत्ताक देशाला एक उत्तम संविधान मिळाल्याचे आज जगाने सुद्धा मान्य केले आहे. या संविधानामध्ये या देशातील मागास, शोषित आणि पीडित समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न घटनाकारांनी केला. तसे संरक्षण त्या समाजाला दिल्या गेले. ज्या समाजाला उत्तम नेतृत्व मिळाले, तो समाज आज प्रगती करताना दिसत आहे. त्याउलट ज्या समाजाने दुसऱ्याची मानसिक, सामाजिक, बौद्धिक आणि आर्थिक गुलामगिरी मान्य केली तो समाज आजही वास्तववादापासून खूप लांब आहे. परिणामी, मानसिक आणि बौद्धिक गुलामगिरीच्या आहारी गेल्याने या समाजाचे उच्चभ्रू मंडळी आजही शोषण करीत आहे. मात्र, हा समाज अद्यापही निंद्रेत असल्याने आपल्या हक्कासाठी लढायला तयार होताना दिसत नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे या समाजात नेतृत्वच विकसित होऊ न देण्यासाठी या समाजाला जातीपाती, धर्माधर्मात, कर्मकांडात आणि बनावट राष्ट्रवादामध्ये शतकानुशतके अडकवून ठेवण्याचे यशस्वी षडयंत्र रचले जातात. कालपरत्वे या षडयंत्रांमध्ये बदल केले जात असल्याने ओबीसी समाजाचा बुद्धिभेद करण्यात हे उच्चभ्रू नेहमी यशस्वी होत असतात. दुसरीकडे या महाकाय समाजात नेतृत्व तयार होण्याचे प्रयत्न केले गेले तर एकतर ते जन्माला येण्यापूर्वीच गाडले जाते किंवा विकसित होत असलेल्या नेतृत्वाला एका विशिष्ट पद्धतीने कोठेतरी अडकवून बदनाम करून संपविले जाते. याची अनेक उदाहरणे अलीकडे सुद्धा बघायला मिळतात. अगदी महात्मा फुले, संत तुकारामांपासून तर आजचे लालू यादव, गोपीनाथ मुंडे,छगन भुजबळ असोत वा एकनाथराव खडसे, चंद्रशेखर बावनकुळे अशी बरीच मोठी यादी देता येईल. देशाचा विचार केला तर महाराष्ट्र हे एक पुरोगामी राज्य आहे. या राज्याला संतांची परंपरा आहे. या संत परंपरेला सुद्धा जातीयवाद्यांनी सोडले नाही. परिणामी, ज्या ज्या जातीत संत झाले त्या संतांच्या जातीतील लोकांना सुद्धा त्या संतांचे संदेश आजही कळू दिले नाही. त्याउलट, सनातनवाद्यांचे पूर्वज वा संत हे आपल्या घरात शिरू देण्यात या हत्तीसारख्या समाजाने अधिक धन्यता मानली. दुसऱ्याच्या आहारी गेल्याने ओबीसी समाजाची जी अधोगती झाली, ती तो समाज सुद्धा मान्य करायला तयार होत नाही, एवढी प्रचंड मानसिक गुलामगिरी या समाजावर थोपली गेली आहे. घटना निर्मिती करते वेळी घटनाकारांनी मागास समाजाच्या उत्थानासाठी घटनेतील 340,341 आणि 342 कलमांन्वये विशेष तरतुदी केल्या. यातील 341 आणि 342 कलमांची अंमलबजावणी काही प्रमाणात झाली. या दोन्ही कलमांचा लाभ हा एकूण लोकसंख्येच्या केवळ 22 टक्के लोकांना मिळणार असल्याने तत्कालीन राज्यकर्त्यांनी सुद्धा विरोध केला नाही. उलट या समाजाकडून सहानुभूती मिळवत त्यांच्या गठ्ठा मतांचा लाभ या राज्यकर्त्यांनी लाटला. पण जेव्हा ओबीसींचा मुद्दा समोर आला, तेव्हा त्यांच्या संख्येचे प्रमाण मोठे असल्याने त्यांना आपापसांत संघटित होण्यापासून रोखण्याचे काम झाले. दुर्दैवाने याच समाजातील काही तथाकथित सत्तापिपासू लोकांना हाताशी धरून राज्यकर्त्यांनी या ओबीसी समाजाला आपापसांत लढवून मुख्य उद्देशापासून दूर ठेवले. त्याचवेळी सत्ता कधीतरी आपले सिंहासन बदलेल, याची पूर्ण जाण असलेल्या सतानतवाद्यांनी नेमका त्याच गोष्टीचा फायदा गेली 70 वर्षे उचलला. एससी आणि एसटी समाजामुळे ओबीसींचे कसे नुकसान होते, हे पटवून देण्यात तत्कालीन विरोधक (सत्ताधाèयांचे चुलत भाऊ) यशस्वी झाले. परिणामी, एकाला कंटाळलेले दुसऱ्याच्या आहारी गेले. देशाचे सत्ताकारण त्यांच्याच घरात कायम ठेवण्यात उच्चभ्रू समजणारी मंडळी यशस्वी झाली.
घटनेतील 340 कलमाची अंमलबजावणी करण्यात अनेक अडथळे निर्माण करण्यात आले. न्यायसंस्थेने सुद्धा संख्या निश्चितीकरण न झाल्याने आपली असमर्थता व्यक्त केली. सरकारने ओबीसींची गणती करता येत नसल्याचेे हास्यास्पद कारण पुढे केले. जे काही आयोग स्वातंत्र्यानंतर स्थापन केल्या गेले, त्यांच्या शिफारशी बासनात गुंडाळल्या गेल्या. भारतात दर 10 वर्षांनी जनगणना होते. यामध्ये धार्मिक गणना जिचा विकासासाठी काहीही संबंध नाही, ती मात्र हमखास केली जाते. एससी-एसटीची गणना होते. एवढेच नाही, तर अगदी कोंबड्या-बकऱ्यांची गणती होते. मात्र, ओबीसींची गणती केली जात नाही. याचे कारण ओबीसी समाजाने आता तरी समजून घेतले पाहिजे. ओबीसी समाजाला त्यांच्या प्रगतीपासून रोखण्याचे षडयंत्र आतातरी ओबीसींना ओळखले पाहिजे. केवळ 2-3 टक्के लोकांच्या हितासाठी एवढ्या मोठ्या समाजाचा बळी आणखी कितीकाळ देणार, याचा कोणीतरी विचार केला पाहिजे. यासाठी ओबीसी समाजाने आता पुढे येण्याची खरी गरज आहे. आधीच या समाजाला अत्यंत कमी वाटा मिळत असताना पुन्हा इतरांना त्यांच्या वाट्यात भागीदार केले जाते. उदाहरण द्यायचे झाल्यास ओबीसी समाज हा स्वातंत्र्यप्राप्ती काळापासून आपल्या हक्कासाठी अंत्यत थंडपद्धतीने लढा देत असताना आणि संख्येने हत्तीसारखा असताना त्यांच्या मागण्यांवर सातत्याने दुर्लक्ष केले जाते. तर दुसरीकडे संख्येने अल्प असताना आणि त्यांनी फारसा लढा न देता वा कोणताही मागणी न करता सुद्धा त्या समाजाला आयते आणि तेही त्यांच्या संख्येच्या कितीतरी पट अधिक दिले जाते. मात्र, या देशातील संख्येने सर्वाधिक असताना आणि श्रमजीवी असताना त्यांचे हक्क साफ नाकारले जातात, हे विदारक सत्य आहे.
यासाठी आपल्या समाजातून नेतृत्व तयार व्हायला पाहिजे. यासाठी नेत्यांनी नव्हे तर समाजाने आता पुढाकार घेण्याची गरज आहे. कारण प्रस्थापित पक्षांनी दिलेले नेतृत्व समाजाच्या हक्कासाठी लढण्यात कुचकामी ठरते. काहींनी तसे प्रयत्न केलेच, तर त्यांना नियोजनबद्ध पद्धतीने संपविले जाते. तसा इतिहास किमान देशात आणि राज्यातील ओबीसी समाजाने बघितला आहेच. उल्लेखनीय म्हणजे ओबीसी नेतृत्व संपविण्यासाठी आपल्याच ओबीसी बांधवांना पुढे करून आपल्या समाजाच्या पाठीत खंजीर खूपसण्याचे कारस्थान फार पूर्वीपासून या देशात चालत आले आहे. या साऱ्या प्रकाराला निवडणुकीच्या माध्यमातून उत्तर देणे शक्य आहे. आपल्या मतांची ताकद ही आपल्या समाजाच्या हितासाठी वापरली तरच ओबीसी समाजाचे हित जपणे शक्य आहे. अन्यथा आपल्या समाजाला सनातनवाद्यांची गुलामगिरी करण्याला सध्यातरी पर्याय दिसत नाही.

16 ते 22 आॅक्टोंबर 2019 साप्ताहिक बेरार टाईम्स ईअंक आपल्या साठी berartimes.com





देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...