Friday 30 December 2016

ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब विखे-पाटील यांचे निधन

अहमदनगर, दि. 30 - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांचे आज संध्याकाळी निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. आज संध्याकाळी प्रवरानगर येथील राहत्या घरी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे ते वडील होते.
विखे-पाटील यांनी अहमदनगर, कोपरगाव लोकसभा मतदारसंघांचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच त्यांनी रालोआ सरकारमध्ये केंद्रीय मंत्री म्हणूनही काम पाहिले होते. 

मी उंदीरच शोधत होतो- मोदींचा विरोधकांना चिमटा

नवी दिल्ली : "डोंगर पोखरून उंदीर काढला, असे नोटाबंदीबद्दल काही लोक म्हणाले. परंतु मी उंदीरच शोधत होतो, कारण उंदीर सगळंच चोरत आणि खात राहतो," असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचे जोरदार समर्थन केले. 
डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी नवी दिल्लीत डिजीधन मेळाव्यामध्ये ‘भिम’ हे अॅप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सादर करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या अॅपद्वारे आर्थिक व्यवहार करण्यासाठी इंटरनेटची गरज भासणार नाही. 
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना हे अॅप समर्पित असल्याचंही मोदींनी सांगितलं. त्यांच्या भिमराव नावापासूनच या अॅपचं नामकरण केलं असल्याची माहिती मोदींनी दिली.
काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी नोटाबंदीच्या निर्णयावरून 'डोंगर पोखरून उंदीर काढला' अशी टीका केली होती. त्यावरून मोदी यांनी त्यांचा उल्लेख न करता प्रत्युत्तर दिले. 
ते म्हणाले, "काही लोक म्हणतात, हे काहीतरी नवीन आणलंय मोदींनी. काहीतरी गडबड आहे. मग मोठे लोक हळूच म्हणतात हे कसे होणार, मोबाईल कुठे आहेत? भिम या अॅपच्या माध्यमातून देशाला 2017 साठी उत्कृष्ट भेट देत आहे."
या अॅपमुळे अंगठा लावून पेमेंट करता येईल. हे अॅप म्हणजे गरिबांच्या घरातील आर्थिक महासत्ता असेल. अशिक्षितांना एकेकाळी अंगठे बहाद्दर म्हणून हिणवलं जायचं, परंतु काळ बदलला असून, तुमचा अंगठाच आता तुमची ओळख बनला. तीच तुमची बँक असेल, असे मोदी म्हणाले.
कॅशलेसला प्रोत्साहनाबद्दल मोदींनी माध्यमांचे आभार मानले. योजना आखण्यात व उपक्रम राबविण्यात माध्यमांची मदत झाली असे ते म्हणाले. 

अखिलेश, रामगोपाल यांची समाजवादीतून हकालपट्टी

लखनऊ : उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुका कोणत्याही दिवशी जाहीर होण्याची शक्‍यता असताना, सत्ताधारी समाजवादी पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर उभा आहे. पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी त्यांचा मुलगा व राज्याचा मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना, तसेच पक्षाचे सरचिटणीस रामगोपाल यादव यांची आज (शुक्रवार) पक्षातून हकालपट्टी केली. 
अखिलेश गटातर्फे त्याचे काका खासदार रामगोपाल यादव यांनी पक्षाध्यक्ष पदावरून मुलायमसिंग यांना काढून टाकण्यासाठी पक्ष कार्यकारिणीची बैठक रविवारी बोलावली होती. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मुलायमसिंह यादव यांनी रामगोपाल यादवांना पक्षातून काढून टाकल्याचे जाहीर केले. दोन्ही गटातील वाद विकोपाला गेला असून, त्यामुळे पक्षात फूट पडण्याचे जवळपास निश्‍चित होऊ लागले आहे. याचा फायदा त्यांचे प्रबळ विरोधी पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांना होईल. 
मुलायमसिंह यादव यांनी पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर, अखिलेश यांनी उमेदवारांची स्वतंत्र 235 नावांची यादी जाहीर केली. त्यावरून मुख्यमंत्र्यांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस दिली. मुलायमसिंह यांनी शनिवारी पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री गटाचे असलेले पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस रामगोपाल यादव यांनी रविवारी पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक बोलावली. त्याचे उत्तर देताना मुलायमसिंह यादव यांनी दोघांनाही पक्षातून काढून टाकले. अखिलेश यांनीही शनिवारी त्यांच्या समर्थकांची बैठक बोलावली आहे. समाजवादी पक्षाची उत्तरप्रदेशात चांगली ताकद असल्याने, या पक्षातील वादाचा फायदा कोणाला होणार हा औत्सुक्‍याचा आणि चर्चेचा विषय ठरणार आहे. 

Wednesday 28 December 2016

त्र्यंबकेश्वरमधील पुरोहितांकडे आढळले कोट्यवधीचे घबाड

नाशिक, दि. 28 -  त्र्यंबकेश्वर येथील दोन पुरोहितांकडे कोट्यवधीचे घबाड सापडले आहे. प्राप्तिकर विभागाने केलेल्या तपासात दोन पुरोहितांकडून तब्बल दोन कोटी रुपयांची रोकड आणि साडेचार किलो सोने जप्त करण्यात आले आहे.  
प्राप्तिकर विभागाकडून कालपासूनच संबंधितांची कसून चौकशी सुरू होती. जवळपास 30 तास चाललेल्या चौकशीनंतर प्राप्तिकर विभागाने हे घबाड हस्तगत केले आहे. तसेच या पुरोहितांच्या नावावर मोठ्या प्रमाणावर जमीन आणि अन्य मालमत्ता असल्याचेही समोर आले आहे.  
शनिवारपासून सदर कारवाई केली जात असली तरी त्याबाबत गोपनीयता बाळगली गेली होती़ मंगळवारी ही बाब प्रामुख्याने उघडकीस आल्यावर इतरांनी घरातील रोकड इतरत्र हलवण्यास सुरुवात केल्याचे दिसून आले. चौकशी पथकाकडून अनेक पुरोहितांची बँक खाती तपासली जात असल्याचे वृत्त असून, नोटाबंदीनंतर कुणाच्या खात्यात किती रक्कम जमा झाली आहे, याचा तपास सुरू आहे. 

हजारो ओबीसींनी घेतली धम्मदीक्षा

नागपूर - शतकानुशतकांची वैचारिक गुलामगिरी झुगारत हजारो ओबीसी बांधवांनी रविवारी पवित्र दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्‍टोबर १९५६ रोजी लाखो अनुयायांसह याच दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. ६० वर्षांपूर्वीच्या या ऐतिहासिक स्मृतींना रविवारच्या धम्मदीक्षा सोहळ्यानिमित्त उजाळा मिळाला. 
सत्यशोधक ओबीसी परिषदेचे अध्यक्ष संदीप हनुमंतराव उपरे, त्यांच्या आई कमलताई यांच्या नेतृत्वात धर्मांतरणाचा निर्धार करून हजारो ओबीसी बांधव संविधान चौकात दाखल झाले. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीने दीक्षाभूमीवर पोहोचले. दीक्षाभूमीवर मनुस्मृती दहनदिनी आयोजित या सोहळ्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सदानंद फुलझेले प्रामुख्याने उपस्थित होते. दुपारी भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी सर्वांना त्रिशरण पंचशील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या प्रतिज्ञा दिल्या. त्रिशरण पंचशील आणि २२ प्रतिज्ञा ग्रहण करून हजारो ओबीसी बांधवांनी बौद्ध धम्म स्वीकारला. भदंत ससाई यांच्या नेतृत्वातील धम्मदीक्षा सोहळ्याप्रसंगी भदंत नागघोष, भदंत धम्मसारथी, भदंत नागवंश आणि भदंत धम्मबोधी उपस्थित होते. ओबीसी बांधवांनी घेतलेली धम्मदीक्षा मन्वंतराची नांदी ठरावी. 
धर्मांतरणाशिवाय ओबीसी बांधवांचे उत्थान अशक्‍य असल्याचा ओबीसी नेते हनुमंतराव उपरे यांचा विश्‍वास होता. काही वर्षांपूर्वी त्यांनी ओबीसी बांधव मोठ्यासंख्येने बौद्ध धम्माचा स्वीकार करतील, असे जाहीर केले होते.
तेव्हापासूनच ओबीसी समाजात त्यांनी जनजागृतीही सुरू केली. ‘चलो बुद्ध की ओर’ या अभियानाला तळागळातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यांचे निधन झाल्याने अभियानावर काहीसा परिणाम झाला. उपरे कुटुंबीय हनुमंतराव उपरे यांचा संकल्प सिद्ध करण्यासाठी प्रयत्नरत झाले. होते त्याचे फलित म्हणून धर्मांतरण सोहळ्यात हजारो ओबीसी बांधवांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धम्माचा स्वीकार केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नम्रतेने शरण गेले तीच बुद्धमूर्ती या कार्यक्रमासाठीही वापरण्यात आली. धम्मदीक्षा घेणाऱ्यांमध्ये सर्वच वयोगटातील अनुयायांचा समावेश होता. 
यावेळी सदानंद फुलझेले, संदीप उपरे यांनी विचार मांडले. उपरे म्हणाले, ओबीसी बांधव मुळात नागवंशी म्हणजे बौद्धच होते. म्हणजेच आज आम्ही मूळ धम्मात परतलो. आंबेडकरी समाजाची प्रगती केवळ आरक्षणामुळे नव्हे तर धम्मामुळे झाली आहे. त्यामुळेच  आम्हीही बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन अन्य ओबीसी समाजासाठी एक वाट मोकळी करून दिली. आज वडिलांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. यापुढेही चलो बुद्ध की ओर अभियान सुरू राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 
संचालन हरिश्‍चंद्र सुखदेवे यांनी केले तर प्रा. रमेश राठोड यांनी आभार मानले. दीक्षा घेणाऱ्या ओबीसी बांधवांचे आंबेडकरी विचारवंत व दलित पॅंथरचे संस्थापक राजा ढाले, पीरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे, डॉ. भाऊ लोखंडे, रूपाताई कुलकर्णी, जैमिनी कडू, बीआरएसपीचे किशोर गजभिये, बार्टीचे राजेश ढाबरे, बसपाचे उत्तम शेवडे, दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे आदींनी स्वागत केले.

दिल्लीच्या नायब राज्यपालपदी अनिल बैजल

नवी दिल्ली(वृत्तसंस्था): दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांचा राजीनामा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज (बुधवार) स्वीकारला. जंग यांच्या जागी दिल्लीचे नायब राज्यपाल म्हणून माजी प्रशासकीय अधिकारी अनिल बैजल यांची नियुक्ती करण्यात आल्याचे वृत्त 'इंडिया टुडे' या वाहिनीने दिले आहे. 
आपल्या पदाचा दीड वर्षांचा कार्यकाळ शिल्लक असतानाच जंग यांनी 22 डिसेंबर रोजी राजीनामा दिला होता. यानंतर पुन्हा शिक्षण क्षेत्राकडे वळण्याचा त्यांचा मानस आहे. मात्र, राजीनामा दिल्यानंतर केंद्र सरकारने त्यांना आणखी काही दिवस थांबण्याचा सल्ला दिला होता. 
1969 च्या बॅचमधील 'आयएएस' अधिकारी असलेले बैजल 2006 मध्ये केंद्रीय नगरविकास मंत्रालयाचे सचिव म्हणून निवृत्त झाले. 'जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण अभियान' (जेएनएनयूआरएम) या मोहीमेची संकल्पना आणि अंमलबजावणीत बैजल यांचा मोलाचा वाटा होता. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते गृह मंत्रालयाचे सचिवही होते. तसेच, दिल्ली विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. 'विवेकानंद इंटरनॅशनल फाऊंडेशन' या 'थिंक-टॅंक'चेही ते सदस्य होते. यापूर्वी जम्मू-काश्‍मीरचे राज्यपाल एन. एन. व्होरा यांच्या जागी बैजल यांची नियुक्ती होणार, अशी चर्चा होती. 

मुदतीनंतर जुन्या नोटा बाळगल्यास होणार दंड

नवी दिल्ली - चलनातून रद्द करण्यात आलेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बॅंकेत भरण्याची मुदत संपण्यास दोन दिवस शिल्लक असताना मुदतीनंतर जुन्या नोटा बाळगणाऱ्यांना दंडांची तरतूद करणाऱ्या वटहुकूमास कॅबिनेटने मान्यता दिली आहे.
एखाद्या व्यक्तीकडे मुदतीनंतर पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा आढळून आल्यास दहा हजार रुपये किंवा जेवढ्या जुन्या नोटा सापडल्या आहेत त्याच्या दहापट दंड यापैकी जी रक्कम अधिक असेल तेवढा दंड करण्यात येणार आहे. याशिवाय 1 जानेवारीपासून 31 मार्चदरम्यान जुन्या नोटा जमा करताना चुकीची माहिती दिल्याचे आढळून आल्यास पाच हजार रुपये किंवा जमा करण्यात आलेल्या रकमेच्या पाचपट रक्कम यापैकी जी रक्कम अधिक असेल तेवढा दंड आकारण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत या वटहुकूमास मान्यता देण्यात आली आहे. मात्र या वटहुकूमाची अंमलबजावणी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा जमा करण्यास देण्यात आलेल्या मुदतीनंतर सुरू होणार की 31 मार्चनंतर होणार याबाबत स्पष्टता नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
हा वटहुकूम राष्ट्रपतींकडे पाठविल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. शिवाय, 31 मार्च 2017 नंतर जुन्या नोटा बाळगणाऱ्यांना चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षेची तरतूद असलेला प्रस्तावही कॅबिनेटसमोर आहे. मात्र, हा प्रस्ताव अद्याप मान्य करण्यात आलेला नाही.

..मग नोटा फेकून द्यायच्या का? - मायावती

लखनऊ- बहुजन समाज पक्षाच्या खात्यावर जमा करण्यात आलेले पैसे नियमानुसारच जमा केलेले आहेत. पक्ष कार्यकर्ते मोठ्या रकमेच्या नोटा आणतात, त्यांच्या नोटा आम्ही बँकेत जमा केल्या. नोटाबंदी झाल्यानंतर नोटा फेकून द्यायच्या का, असा सवाल पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी केला.
नोटाबंदी झाल्यानंतर बसपने बँकेत 104 कोटी रुपये जमा केले आहेत. तसेच त्यांच्या भावाच्या खात्यावर सुमारे 1 कोटी 34 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. याबाबत मायावतींनी पत्रकार परिषद घेऊन वरील स्पष्टीकरण दिले.
मायावती म्हणाल्या, "आमचे कार्यकर्ते हे देशभरातून अनेक दूरच्या ठिकाणांहून येत असतात. ते येताना मोठ्या रकमेच्या नोटा घेऊन येतात. नियमानुसारच आम्ही सर्व पैसे जमा केले आहेत.
भाजपसह इतर पक्षांनीही मोठ्या रकमा बँकेत जमा केल्या आहेत. मात्र, आमच्या पक्षाच्या खात्यांवर भाजपाच्या इशाऱ्यावरून कारवाई करण्यात आहे, असा आरोप मायावती यांनी केला.
 

हळदीमुळे वाढते मेंदूची क्षमता

नवीदिल्ली (वृत्तसंस्था)- हळदीच्या औषधी गुणांचा आपल्या पूर्वजांनी या पूर्वीच शोध लावला आहे. आता हळदीमध्ये मेंदूची स्व त:हून बरे होण्याची क्षमता वाढविण्याचा गुण असल्याचे एका संशोधनातून सिद्ध झाले आहे.
जर्मनीतील इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्स अँड मेडिसीनमधील संशोधकांचा हा निष्कर्ष "स्टेम सेल रिसर्च अँड थेरपी' या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. संशोधकांनी हळदीमध्ये आढळणाऱ्या"टर्मेरोन' या घटकाचा अभ्यास केला. इंजेक्‍शच्या माध्यमातून हा घटक उंदरांच्या शरीरात सोडण्यात आला. उंदरांच्या मेंदूचे स्कॅनिंग केले असता त्यांच्या मेंदूतील पेशींच्या विकासासाठी आवश्‍यक असलेला भाग अधिक सक्रिय झालेला दिसला.
त्याचप्रमाणे, उंदरांच्या मज्जातंतूंच्या स्टेम सेल्सना टर्मेरोनच्या द्रावणात बुडविल्यावर
या पेशींमध्ये मेंदूतील कुठल्याही प्रकारच्या पेशी बदलण्याची क्षमता आल्याचे संशोधकांच्या लक्षात आले. हळदीवरच्या या गुणकारी संशोधनामुळे अल्झायमर आणि मेंदूच्या इतर
विकारांवर औषध बनविण्यात मदत होऊ शकते, असे संशोधकांचे म्हणणे आहे.
उंदरांवर केलेल्या संशोधनातून हे निष्कर्ष काढले असून, मनुष्याच्या मेंदूवर हळदीच्या होणाऱ्या परिणामाबाबत अधिक संशोधनाची गरजही संशोधकांनी व्यक्त केली आहे. संशोधक मारिया एडेल रुजर म्हणाले,""मानवासह इतर विकसित प्राण्यांमध्ये मेंदूतील बिघाड दुरुस्त करण्याची क्षमता नसते. मात्र मासे व इतर छोट्या प्राण्यांमध्ये ही क्षमता तुलनेने अधिक असते. या संशोधनामुळे मानवामध्येही ही क्षमता विकसित होण्याची आशा निर्माण झाली आहे.''

BERARTIMES_ Dec28,2016-JAN03,2017





Monday 26 December 2016

बँकेत पैसे भरण्यासाठी, काढण्यासाठी भजियावालाने वापरले 700 जणांना

सूरत, दि. 26 - नोटाबंदीच्या निर्णयानंतर आपला काळा पैसा दडवण्यासाठी अनेकांनी वेगवेगळी शक्कल लढवली. सूरतमधल्या किशोल भजियावाला या फायनान्सरने आपला काळा पैसा वाचवण्यासाठी तब्बल 700 जणांचा रक्कम डिपॉझिट करण्यासाठी आणि पुन्हा तेच पैसे काढण्यासाठी वापर केल्याचे समोर आले आहे. 
 
भजियावालाची एकूण मालमत्ता 400 कोटींची असून, आयकर खात्याने त्याच्याकडून 10.45 कोटी बेहिशोबी रक्कम जप्त केली आहे. भजियावालाची 27 बँक खाती असून त्यातील 20 बेनामी खाती आहेत. या वीस खात्यांमधून मोठया प्रमाणावर रक्कमेची अफरातफरी करण्यात आली. 
 
भजियावलाने किती रक्कम जमा केली आणि किती काढली ते अजून स्पष्ट झाले नसल्याचे आयकर खात्यातील सूत्रांनी सांगितले. आयकर खात्याने त्याच्याकडून नव्या नोटांमध्ये 1 कोटी 45 लाख 50 हजार 800 रुपयांची रक्कम जप्त केली. 
 
12, 13 आणि 14 नोव्हेंबर रोजी भजियावालाने विविध बँक खात्यांमध्ये 1 लाख, 2 लाख आणि 4 लाखाची रक्कम जमा केली. जुन्या नोटा नव्यामध्ये बदलण्यासाठी 212 जणांचा वापर केला. यामध्ये किशोर भजियावालाला बँकेच्या अधिका-यांनीही मदत केली. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या 1.45 कोटींच्या नव्या नोटांप्रकरणी चौकशी सुरु आहे. 

जैनकलार समाजाचे स्नेहसंमेलन २९ जानेवारीला


देवरी- जैनकलार समाजाचे स्नेहसंमेलन येत्या २९ जानेवारी रोजी गोंदिया येथे आयोजित करण्यात येणार आहे. काल रविवारी (ता.२५) रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
स्थानिक qपडकेपार रोड स्थित जैनकलार समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी समाज कार्यकारिणीचे अध्यक्ष तेजराम मोरघडे हे होते. यावेळी कार्यकारिणीचे सचिव सुखराम खोब्रागडे, शालिकराम लिचडे, अशोक इटानकर, सुखराम हरडे, अनिल खोब्रागडे, अशोक लिचडे, रोशन दहिकर,चंद्रशेखर लिचडे,राजू पेशने, मनोज किरणापुरे, चालचंद भांडारकर, व्ही.व्ही सोनवाने,पंकज सोनवाने, बिना सोनवाने, हर्षा आष्टीकर, चेतना रामटेककर, ज्योती किरणापुरे, वर्षा तिडके,प्राजक्ता रणदिवे आदी मान्यवर उपस्थित होते.
 या सभेत समाजाविकासासंबधी मुद्यांवर चर्चा करण्यात आली. सभेत येत्या २९ जानेवारी रोजी वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्याचे ठरविण्यात आले. यामध्ये महिला मेळावा,नृत्यस्पर्धा,मेहंदी स्पर्धा तसेच १०वी व १२वीत उत्तीर्ण विद्याथ्र्यांचा सत्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला. या शिवाय सुरू असलेल्या सभासद नोंदणी अभियानाची गती वाढविण्यावर सुद्धा भर देण्यात आला.

Sunday 25 December 2016

सबरीमाला मंदिरात चेंगराचेंगरीत 20 भाविक जखमी

केरळ, दि. 25 - सबरीमाला मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाल्यानं चेंगराचेंगरी झाली आहे. या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 20 जण जखमी झाल्याची माहिती पथनामथिट्टाचे जिल्हाधिकारी आर. गिरिजा यांनी दिली आहे. तर 4 जण अत्यवस्थ आहेत, असं वृत्त पीटीआयनं दिलं आहे. सबरीमालातल्या भगवान अयप्पाच्या डोंगरावरील मंदिरात ही चेंगराचेंगरी झाल्याची माहिती मिळते आहे.
सबरीमालात आज भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. त्यामुळे पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव सबरीमाला मंदिरातील काही मार्ग बॅरिकेड्स लावून बंद केले होते. मात्र भाविकांनी बॅरिकेड्सवरून उड्या मारून सबरीमाला मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 20 भाविक जखमी झाले आहेत. 

नोटाबंदीचा फटका बिस्कीट उद्योगाला

  • मुंबई, दि. 25 - नोटाबंदीच्या निर्णयामुळे बिस्किटांच्या व्यवसायाच्या वाढीलाही फटका बसला. ही वाढ १.५ टक्क्यांनी खाली आली असल्याचे प्रसिद्ध उत्पादक पार्ले प्रोडक्ट्सने म्हटले आहे. २०१६मध्ये या व्यवसायाची वाढ गेल्या दोन महिन्यांत (नोटाबंदीच्या निर्णयानंतर) ५ टक्क्यांची होती. मान्सूननंतर बिस्किटांच्या खपाला वेग आला होता. परंतु नोटाबंदीनंतर तो मंदावला, असे पार्ले प्रोडक्ट्स कॅटागिरीचे प्रमुख मयांक शाह यांनी सांगितले.
    नोटाबंदीच्या निर्णयामुळे ग्राहकांतून मागणी कमी झाली आणि व्यापारात भांडवलाचे फिरणे घटल्याची माहिती समोर आली आहे. आर्थिक व्यवहारांमध्ये पुरेशा संख्येत नव्या चलनी नोटा येत नाहीत तोपर्यंत अशीच परिस्थिती राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  


आजपासून 100 दिवस लकी ड्रॉ योजना सुरू - मोदी

नवी दिल्ली, दि. 25 - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशवासियांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देत मन की बात कार्यक्रमाची सुरूवात केली. 'मन की बात'चा हा 27 वा तर या वर्षातील शेवटचा भाग होता. देशात खळबळ माजवणा-या नोटाबंदीच्या निर्णयानंतर मोदींची ही दुसरी 'मन की बात' होती.
यावेळी पंतप्रधान मोदींनी, कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी ख्रिसमसच्या निमित्ताने दोन नव्या योजनांना सुरूवात होत असल्याची माहिती दिली. कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी लकी ग्राहक योजना व व्यापाऱ्यांसाठी डिजी धन योजना सुरू करण्यात आली आहे.
लकी ग्राहक योजनेअंतर्गत पुढील 100 दिवस रोज 15 हजार लोकांना एक-एक हजारांचं बक्षीस देण्यात येईल. डिजीटल ट्रान्झेक्शन करणा-यांना हे बक्षीस दिलं जाईल आणि लकी ड्रॉ द्वारे विजेते शोधले जातील. पहिला ड्रॉ 25 डिसेंबर म्हणजे आज निघणार आहे. याशिवाय आठवड्यात एक मोठा लकी ड्रॉ काढण्यात येणार असून याद्वारे लाखो रूपयांचं बक्षीस देण्यात येणार आहे. तर, तीन महिन्यानंतर म्हणजे 14 एप्रील रोजी बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मदिनी बंपर लकी ड्रॉ काढण्यात येईल आणि हे बक्षिस कोटींमध्ये असेल. 50 रूपयांपासून 3 हजारापर्यंत खरेदी करणारेच या लकी ड्रॉचा हिस्सा असणार आहेत.
याशिवाय व्यापा-यांसाठी डिजी धन व्यापार योजना सुरू करण्यात आली आहे. कॅशलेस माध्यमातून सामानाची विक्री करणा-या व्यापा-यांना या योजनेद्वारे बक्षीस दिले जातील.
मन की बातमध्ये बोलताना पंतप्रधानांनी अनेक विषयांना हात घातला. भ्रष्टाचाराविरोधातला हा पूर्ण विराम नव्हे, तर भ्रष्टाचाराविरोधातील लढाईची सुरुवात आहे असं ते म्हणाले.  गेल्या काही दिवसांपासून कॅशलेस व्यवहार 200 ते 300 टक्क्यांनी वाढला असल्याचं मोदींनी सांगितलं.आसाम सरकारकडून डिजिटल पेमेंटसाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचंही मोदींनी कौतुक केलं. टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध मिळवलेल्या विजयाचंही मोदींनी कौतुक केलं, तर 15 वर्षानंतर ज्युनियर हॉकी वर्ल्ड कपचे विजेतेपद मिळवणाऱ्या भारतीय संघाचा अभिमान वाटतो असं मोदी म्हणाले. 

आता चेक बाऊन्स झाल्यास होणार कठोर शिक्षा?

नवी दिल्ली, दि. 25 - नोटाबंदीनंतर कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार लवकरच चेक बाऊन्स होण्याच्या कायद्यामध्ये मोठे बदल करण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार चेक बाऊन्सप्रकरणी कठोर कायदा अंमलात आणू शकते.
व्यापा-यांच्या एका संघटनेद्वारे सरकारला अशा प्रकारचा सल्ला देण्यात आला आहे. बजेट तयार होण्यापूर्वी अर्थ मंत्रालयाच्या मोठ्या अधिका-यांच्या भेटी ही संघटना घेत असल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
चेक बाऊन्स होण्याच्या घटनांमुळे अनेक व्यापारी ग्राहकांकडून चेक घेण्यास काचकुच करतात. त्यामुळे चेक बाऊन्सप्रकरणी कठोर कायदा तयार करण्यात यावा अशी या व्यापा-यांची मागणी आहे.
चेक बाऊन्सप्रकरणी संबंधित व्यक्तीला एका महिन्याच्या आत तुरुंगात पाठवावे, अशी सूचना संघटनेने केल्याचं वृत्त आहे. संबंधिताला तुरुंगात पाठवण्याच्या शिक्षेसाठी सरकार तयार आहे की नाही हे नक्की नसले तरी या प्रकरणी कायदा कठोर करण्याबाबत सरकार विचार करू शकते.

30 डिसेंबरनंतरही पैसे काढण्याची मर्यादा कायम

नवी दिल्ली, दि. 25 - 8 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला आणि देशभरात एकच गोंधळ उडाला. त्यानंतर 50 दिवसांत सर्वकाही ठीक होईल, असं आश्वासन केंद्राकडून देण्यात आलं. मात्र अजूनही बँकांबाहेरच्या रांगा काही कमी होण्याचं नाव घेत नाहीत. बँक आणि एटीएमच्या बाहेर आजही लोक रांगेत उभे दिसत आहेत. बँक आणि एटीएममधून पैसे काढण्याच्या असलेल्या मर्यादेमुळे लोकांना वारंवार रांगेत ताटकळत राहावं लागतं आहे. आतापर्यंत 30 डिसेंबरपर्यंत सर्व परिस्थिती पूर्वपदावर येईल, असं केंद्र सरकारकडून सांगण्यात येत होतं.
मात्र रोख रकमेचा तुटवडा अजूनही कायम असून, 30 डिसेंबरनंतरही बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा कायम राहणार आहे. त्यामुळे 30 डिसेंबरनंतरही तुमची एटीएम आणि बँकेच्या लांबच लांब रांगेतून सुटका होण्याची शक्यता धूसर आहे. खरं तर आरबीआयला मागणीनुसार नोटा छापण्यात अडथळे येत आहेत, असं वृत्त बिझनेस स्टॅडर्डनं दिलं आहे.
नोटांचे छापखाने सतत सुरू असले तरी आरबीआय बाजारातील चलनाची कमतरता भरू शकत नाही. रोख रकमेच्या तुटवड्यामुळे बँकांनी आरबीआय आणि केंद्र सरकारला रोख रक्कम काढण्याची मर्यादा कायम ठेवण्याची विनंती केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, जोपर्यंत मुबलक प्रमाणात नवे चलन बाजारात उपलब्ध होत नाही, तोपर्यंत बँक किंवा एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा कायम ठेवावी, अशी मागणी बँकांनी आरबीआयकडे केली आहे. जर रोख रक्कम काढण्याची मर्यादा संपुष्टात आणली, तर परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता बँकांनी व्यक्त केली आहे. आतापर्यंत बाजारात 7 लाख कोटी रुपयांचं नवं चलन बाजारात आलं आहे.

...अन्‌ तो क्षणात झाला लखपती!

नागपूर - नोटांबदीची चर्चा सर्वत्र सुरू असताना साधारण व्यक्‍तीच्या खात्यात बॅंकेने एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल २५ लाख रुपये जमा केले. त्यामुळे ती व्यक्‍ती क्षणार्धात लखपती झाली. त्याने लगेच कर्ज फेडले. काही नवीन वस्तू खरेदी केल्या. तसेच काही पैसे मुलांना दिले. मात्र, हा घोळ झाला कसा? याबाबत अनेक शंका-कुशंका व्यक्‍त केल्या जात आहेत. मात्र, अशातच त्या व्यक्‍तीवर सदर पोलिसांनी बॅंकेच्या अधिकाऱ्याच्या संगनमताने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची आज दिवसभर शहरात चर्चा होती. 
राम फकीर अंबोरे (रा. चिखली, बुलडाणा), मुलगा स्वप्नील राम अंबोरे आणि मुलगी रंजना मारोती भगत (रा. अहमदनगर, गुजरात) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. चंद्रकांत मुरलीधर रोठे (५०) असे शाखा व्यवस्थापक फिर्यादीचे नाव आहे. ते सदर पाटनी चौकातील दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बॅंक लिमिटेडमध्ये कार्यरत आहेत. या प्रकरणी सदर पोलिसांनी योग्य कागदोपत्री चौकशी न करता थेट बुलडाणा चिखली येथील व्यक्तीवर गुन्हा दाखल केला. अंबोरे यांच्या खात्यावर बॅंकेने कुठलीही चौकशी न करता थेट इतकी मोठी रक्कम त्या साधारण व्यक्तीच्या खात्यात जमा कशी केली? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. तर संबंधित राम अंबोरे हे नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. त्याची एक सोसायटी आहे. अंबोरे यांनी खात्यात जमा झालेल्या रकमेपैकी काही रक्‍कम आपल्या मुलाच्या व मुलीच्या खात्यात वळती केली. वडिलांनीच रक्कम वळती केल्याने त्यांनी त्या रकमेचा परस्पर वापर केला. हा घोळ बॅंकेतीलच कुण्या कर्मचाऱ्याने केला का? हा पेच अद्याप कायम आहे. या प्रकरणी सदर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सावंत यांनी आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
पोलिसांची संशयास्पद भूमिका
राम अंबोरे यांच्या खात्यात पैसे आल्यानंतर त्यांना सेवानिवृत्तीची रक्‍कम मिळाल्याचा आनंद झाला. त्यांनी मुलगा आणि मुलीच्या खात्यात पैसे टाकले. मात्र, सदर पोलिसांनी त्यांच्या मुलासह गुजरातला राहणाऱ्या विवाहित मुलीवर गुन्हा दाखल केल्याने उलटसुलट चर्चेला पेव फुटले आहे. जेव्हा की, या दोघांनीही कागदोपत्री अशी कुठलीच फसवणूक केली नाही. तसेच त्यांच्या मुलीचा आणि मुलाचा या प्रकरणी कुठलाही प्रत्यक्ष संबंध नसल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे.

रशियाच्या विमानाला अपघात; 92 ठार

मॉस्को : रशियाहून 92 प्रवाशांना घेऊन सीरियाच्या दिशेने निघालेले विमान कोसळल्याने झालेल्या अपघातात विमानातील कर्मचाऱ्यांसह सर्व प्रवासी ठार झाल्याची माहिती रशियातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
टीयू-154 हे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे विमान 83 प्रवासी आणि आठ विमान कर्मचाऱ्यांना घेऊन सीरियाच्या दिशेने निघाले  होते. विमानाने उड्डाणानंतर अवघ्या 20 मिनिटांनी विमानाचा नियंत्रणकक्षाशी संपर्क तुटला. विमानाचे अवशेष आणि प्रवाशांचे सामान काळ्या समुद्रात सापडले आहेत. त्यामुळे हे विमान काळ्या समुद्रात कोसळल्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत असून विमानातील सर्व प्रवासी ठार झाले आहेत. प्राथमिक तपासानुसार हे विमान रशियातील सोच्चीपर्यंत पोचले होते. मात्र त्यानंतर त्यात काही तांत्रिक अडचण किंवा विमान चालकाच्या काही चुकीमुळे हा अपघात झाला असण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे.
हे नागरी विमान नव्हते; तर सिरीयन बंडखोराविरुद्ध कारवाई करत असलेल्या लष्करातील जवानांच्या मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी संगीत क्षेत्रातील कलाकार या विमानातून प्रवास करत होते. याशिवाय विमानात लष्करातील काही जवान आणि अधिकारीही होते.

Saturday 24 December 2016

30 डिसेंबरनंतर भ्रष्टाचा-यांसाठी 'बुरे दिन' - पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबई, दि. 24 - 50 दिवसानंतर प्रामाणिक माणसांचा त्रास कमी होईल आणि भ्रष्ट, अप्रामाणिक लोकांचा त्रास वाढायला सुरुवात होईल असे महत्वपूर्ण विधान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वांद्रे-कुर्ला संकुलातील सभेत केले. काळा पैसा सफेद करणा-यांनी बँकांची मदत घेतली तिथेच खरी सुरुवात झाली. त्यांनी स्वत: बरोबर बँक कर्मचा-यांनाही गोत्यात आणले. भ्रष्टाचार करणा-यांना सोडणार नाही, त्यांचे काही चालणार नाही, सरकार बदलले आहे त्यांनी लक्षात घ्यावे असे मोदी यांनी सांगितले.
 
शिवस्मारकाच्या जलपूजन आणि भूमिपूजनानंतर वांद्रे-कुर्ला संकुलात विविध विकास प्रकल्पांचे पंतप्रधानांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी छत्रपती शिवरायांचा जीवनपट प्रेरणादायी असल्याचे सांगितले. देशातील जनता भ्रष्टाचार, काळापैसा सहन करणार नाही, तुम्हाला मोदींची, कायद्याची भिती वाटत नसली तरी चालेल पण तुम्हाला 125 कोटी जनतेचा धाक वाटलाच पाहिजे असे मोदी म्हणाले. हे सरकार भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. 

नक्षलवाद्यांनी केली 80 वाहनांची राखरांगोळी

एटापल्ली (जि. गडचिरोली) - सुरजागड पहाडावरून लोह खनिजाची वाहतूक करणाऱ्या 80 वाहनांची नक्षलवाद्यांनी जाळून राखरांगोळी केल्याची घटना शुक्रवारी (ता. 23) सकाळी दहाच्या दरम्यान घडली. या वाहनांमध्ये ट्रक, पोकलॅंड, जेसीबीचा समावेश असून 40 पेक्षा अधिक मजूरांनी नक्षलवाद्यांनी अमाणूस मारहाण करून जखमी केले, तर दोन वाहनचालकांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. 
सुरजागड पहाडावरील लोह खनिज उत्खननाचा परवाना लॉयड मेटल्स कंपनीसह अन्य कंपन्यांनाही मिळाला आहे. यंदाच्या उन्हाळ्यात या कंपन्यांनी उत्खननास प्रारंभ केला. परंतु, स्थानिक आदिवासी व नक्षलवाद्यांनी विरोध केल्यानंतर काही काळासाठी हे काम बंद झाले होते. दिवाळीत पुन्हा उत्खनन करून त्याची वाहतूक सुरू झाली. दरम्यान, स्थानिक आदिवासींच्या विविध संघटनांनी पुन्हा ग्रामसभा घेऊन उत्खननास तीव्र विरोध दर्शविला. गेल्या महिन्यात नक्षलबंदमध्ये माओवाद्यांनी पत्रके टाकून काम बंद करण्याचे फर्मान सोडले होते. मजुरांनाही कामावर येण्यास बंदी घातली होती; परंतु यानंतरही काम सुरू होते. 
शुक्रवारी पहाटे शेकडो नक्षलवाद्यांनी लोह खनिज उत्खनन सुरू असलेल्या ठिकाणी धाबा बोलत वाहनचालक व मजुरांना एका ठिकाणी गोळा करून त्यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर त्या सर्वांना ओलिस ठेवून आपला मोर्चा वाहनांकडे वळविला. ही वाहने नक्षलवाद्यांनी पेटवून दिल्याने कंपनीचे चार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सुमारे पाच तास नक्षलवाद्यांचा हैदोस सुरू होता. या वेळी दीडशेच्या वर मजूर पहाडाच्या वरच्या बाजूला होते; हा प्रकार बघून त्यांनी पळ काढल्याने ते बचावले. 
मारहाणीत जखमी झालेल्या मजुरांत नक्षलवाद्यांची प्रचंड दहशत असून त्यांनी स्वतःवर उपचार करून घेण्यास नकार दर्शविला आहे. 

Friday 23 December 2016

आदिवासी विद्यार्थी संघाची आदिवासी प्रकल्प कार्यालयावर धडक


बुटीबोरी येथील नामांकित शाळेत झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात निदर्शन 

कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी बेले यांचे निलंबन

आदिवासी विकास आयुक्त येत्या बुधवारी देवरीत


देवरी- नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी येथील होलीक्रॉस कान्व्हेंटमधील विद्यार्थ्यांचे लैंगिक अत्याचार प्रकरणी आज देवरी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर स्थानिक शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना प्रशासनाला जाब विचारण्यासाठी धडक दिली. या मोर्च्याचे आयोजन आदिवासी विद्यार्थी संघाच्या वतीने करण्यात आले होते. दरम्यान, प्रकल्प कार्यालयातील कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी बेले यांचेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून आयुक्त, आदिवासी विकास विभाग नाशिक हे येत्या बुधवारी देवरीच्या भेटीवर येत आहेत. उल्लेखनीय म्हणजे होलीक्रॉस ही शाळा शासनाने बंद केल्याने देवरी प्रकल्प कार्यालयामार्फत पाठविण्यात आलेल्या ६५ विद्यार्थ्यांना बोरगाव येथील शासकीय आश्रमशाळेत आणण्यात आले आहे.
सविस्तर असे की, आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याच्या उद्देशाने आदिवासी विभागामार्फत नामांकित शाळेत प्रवेश दिला जातो. या उपक्रमांतर्गत नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी येथील होलीक्रॉस इंग्लिश मीडियम हायस्कूल येथे आदिवासी विकास विभागामार्फत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला गेला. या शाळेत देवरीच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून ५७ मुले आणि ८ मुलींना प्रवेश दिल्या गेला. गेल्या काही दिवसापूर्वी या शाळेत विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे या शाळेची चौकशी करून त्या शाळेची मान्यता काढण्यात आली. देवरी कार्यालयामार्फत पाठविण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना काल रात्री बोरगाव येथील शासकीय आश्रम शाळेत आणण्यात आले. मात्र, या विद्यार्थ्यांच्या पालकांना याविषयी कोणतीही पूर्वसूचना दिली नसल्याने त्यांच्यात भीतीचे वातावरण आहे.
दरम्यान, या प्रकरणात सहायक आदिवासी विकास आयुक्त, शिक्षण विस्तार अधिकारी आणि कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केल्याने त्यांचेवर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या मागणीला घेऊन विद्यार्थी संघाने देवरीच्या प्रकल्प कार्यालयावर मोर्चा आणला. परंतु, प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी हे कार्यालयात अनुपस्थित असल्याने मोर्चेकरी विद्यार्थ्यांनी गोंधळ घालत जोपर्यंत या तिन्ही अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार नाही, तो पर्यंत जागा सोडणार नसल्याची भूमिका घेतली. परिणामी, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी व्ही. बी. बेले यांना आज तत्काळ निलंबित करण्यात आले. तरीही आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांचे समाधान न झाल्याने नाशिक येथील आदिवासी विकास आयुक्त हे येत्या बुधवारी (ता.२८) देवरीच्या भेटीवर येत असून आदिवासी संघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे पत्र प्रकल्प अधिकारी देवरी यांनी आंदोलन कर्त्यांना दिले.

कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी बेले अखेर निलंबित

नागपूरच्या होलीक्रॉस शाळेत शिकत असलेली देवरीचा ऋतिक यशवंत धुर्वे हा विद्यार्थी आजारी होता. अनेक विद्यार्थ्यांना नामांकित शाळेत अशी वागणूक दिला जात असल्याचे वास्तव या निमित्ताने पुढे आले आहे.
आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेत अप्पर आयुक्तांनी देवरीच्या प्रकल्प कार्यालयातील कनिष्ठ शिक्षण विस्तार व्ही.बी. बेले यांना आज तत्काळ निलंबित केले. श्री. बेले यांना बुटीबोरी येथील होलीक्रास या शाळेवर पालक सचिव म्हणून नेमण्यात आले होते. त्यांनी आपल्या कर्तव्यात कसून केल्याने त्यांना लैंगिक अत्याचार प्रकरणात त्यांचेवर ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आले. निलंबन काळात बेले यांचे स्थानांतरण भंडारा येथील प्रकल्प कार्यालयात करण्यात आले आहे.

आमदार संजय पुराम यांनी आंदोलन कर्त्यांची भेट घेतली

Thursday 22 December 2016

जिल्हा प्रशासन बेजबाबदार! न.प. ला निधी देण्याचा पीडित कुटुंबाचा शासनाला सल्ला

 

गोंदिया :-  स्थानिक मुख्य बाजारपेठेतील बिंदल थाट-बाट या हॉटेल ला काल लागलेल्या आगीत होरपडून ७ लोकांचा मृत्यू झाला. या घटनेतील ११ जणांना सुखरूप वाचविण्यात यश आले आहे. दरम्यान, मृतांच्या कुटूंबियांनी या घटनेला जिल्हा प्रशासन हेच जवाबदार असल्याचा आरोप केला. या अग्निकांडात गोंदियातील अजमेरा कुटूंबातील विवाह समारंभासाठी आलेल्या दोन जावयाचा जळून मृत्यू झाला असून अजमेरा कुटूंबियांनी गोंदिया अग्निशामक विभागाकडे बचाव कार्य करण्यासाठी पुरेशी साधन सामुग्री नसल्याचे सांगत रोष व्यक्त केला आहे. दरम्यान, मृतांच्या कुटुंंबीयांना शासनाचे देऊ केलेली मदतनिधी ही नगर परिषदेतील अग्निशमन यंत्रणा सक्षम करण्यास देण्याचा सल्ला पीडित कुटंबांनी शासनाला दिला.  
गोंदिया जिल्हा हा महाराष्ट्राच्या टोकावर असून या जिल्ह्याला तीन राज्याच्या सीमा लागून आहेत. या ठिकाणी नेहमीच अस्थायी प्रवाशांची रेलचेल असते. शहराच्या मुख्य बाजार पेठेतून रेल्वे मार्ग जात असल्याने याठिकाणी अनेक व्यवसायिकांनी हाटेल आणि लाजिग रेस्टारेंट थाटले आहे. मात्र कालच्या घटनेमुळे अनेक हाटेल मालक आणि लाज मालकांचे आणि सोबतच अधिकाऱ्याचे पितळ उघडे पडल. शहरातील बहुतांश हाटेल हे गल्ली कोपऱ्यात असल्याने आणि पुरेशी जागा उपल्बध नसताना फायर सुरक्षेच्या दृष्टीने परिपूर्ण नसल्याचे स्वतः अग्निशामक अधिकरी सांगत आहेत. हाॅटेल बिंदल थाट या ठिकाणी एकच एक्झिट दार असल्याचे निष्पन झाले आहे. त्यामुळे बचाव कार्य कार्यात मोठा अडथळा आला.   
 गोंदियाचे उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार,  शहरातील २-३ हाटेल आणि लाज रेस्टारेंट वगळता इत्तर कुठल्याही हाटेल व्यावसायिकाना हाटेल आणि लाज चालविण्याची परवानगी नसल्याचे सांगितले . गोंदिया शहरात जवळपास ५० च्या वर लहान मोठे हाॅटेल आणि लाॅज आहेत. या व्यवसायिकांचे अधिकाऱ्याशी साटे लोटे तर नाही ना असा प्रश्न गोंदियाकरांनी शासनाला विचारला आहे .
ही आग वीझविण्यासाठी अजमेरा कुटूंबियांनी गोंदिया शहर पोलिसांना आणि अग्निशामक विभागाला फोन केल्यानंतर फायर ब्रिगेड गाडी आर्धा तास उशिरा आल्याने आणि हाटेल च्या २०० मीटर अंतरावर शहर पोलिश ठाणे असूनही पोलिस वेळेवर न आल्याने मोठी जिवीत हानी झाली. त्यातही गोंदिया अग्निशामक विभागाकडे बचाव कार्य करण्यासाठी पुरेशी साधन सामुग्री उपलब्ध असती तर आज आगीत होरपळून जळत असलेल्या लोकांना वाचविता आला असता. मुख्यमंत्री साहाय्य निधीतून मृतांच्या कुटूंबीयांना आर्थिक मदत करण्यापेक्षा गोंदिया नगर परिषदेच्या अग्निशामक विभागांना मदत करून आग नियंत्रण साहित्य खरेदी करण्याचा सल्ला अजमेरा कुटूंबियांनी सरकारला दिला आहे.

आरक्षणासाठी एकवटले ओबीसी!

अकोला, दि. 22 - लोकसंख्या ५२ टक्के असलेल्या इतर मागासवर्गीयांना (ओबीसी ) ५० टक्के आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी एकत्र आलेल्या ओबीसी समाजबांधवांनी गुरुवारी महामोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
सन १९३१ च्या जनगणनेनुसार ५२ टक्के लोकसंख्या असलेल्या ह्यओबीसींह्णना केवळ २७ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. तामिळनाडूमध्ये ओबीसींना ५० टक्के जागा आहेत. त्या धर्तीवर देशात ओबीसींना ५० टक्के आरक्षण देण्याची अंमलबजावणी करण्यात यावी आणि २०११ नुसार ओबीसींची जनगणना जाहीर करण्यात यावी यासह एकूण १८ मागण्यांसाठी ओबीसी समाज जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला.
गुरुवारी दुपारी १ वाजता अकोला क्रिकेट क्लब मैदानावरुन काढण्यात आलेला ओबीसी महामोर्चा टॉवर चौक, बसस्थानक, गांधी मार्ग, पंचायत समितीसमोरुन मार्गक्रमण करित जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकला. त्यानंतर आठ युवती आणि पाच युवकांच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना सादर करण्यात आले. त्यामध्ये पंतप्रधानांना सादर करावयाचे निवेदन युवतींच्यावतीने तर मुख्यमंत्र्यांना सादर करावयाचे निवेदन युवकांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सादर करण्यात आले. या महामोर्चात जिल्ह्यातील ओबीसी प्रवर्गातील विविध जातींमधील समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

धावत्या गाडीला आग

नागपूर : नागपुरातून प्रवासी घेऊन सिवनी बसस्थानकावर पोहोचल्यानंतर जबलपूरला रवाना झालेल्या नंदन ट्रॅव्हल्सची बस मुख्यालयापासून १८ किलोमीटर दूर राहीवाडा गाव येथे दुपारी २.१५ वाजता पोहोचताच या बसने अचानक पेट घेतला. बसला आग लागल्यामुळे प्रवासी घाबरले.
बसच्या चालक आणि वाहकाने तातडीने बसमधील ४० ते ५० प्रवाशांना सुखरूप बसच्या बाहेर काढून त्यांना दुसऱ्या बसने पाठविले. बस क्रमांक एम. पी. ४१, पी-०९१० मध्ये आग लागल्याचे पाहून तेथील गावकऱ्यांनी याची सूचना पोलिसांना दिली. बसवर पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही वेळानंतर आग विझली. परंतु काही वेळाने आग पुन्हा वाढली. पाहता पाहता आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली.
अग्निशमन विभागाच्या वाहनांनी आगीवर नियंत्रण मिळविले. प्राथमिक तपासात बसच्या मागील टायरला लागून असलेल्या ड्रम प्लेट आणि ब्रेक शूचे घर्षण झाल्यामुळे बसमध्ये आग लागल्याची माहिती आहे.
बंडोल पोलीस पुढील तपास करीत आहेत.

डिजिटल फिजिटल करून रोजीरोटीचे प्रश्‍न सुटत नाहीत - उद्धव ठाकरे

मुंबई, दि. 22 - पंतप्रधान मोदी यांनी ‘नोटाबंदी’ जाहीर करताच त्यांचे कौतुक करणार्‍यांत श्रीमान चंद्राबाबू आघाडीवर होते, पण महिनाभरातच त्यांच्या संयमाचा बांध तुटला व त्यांनी सांगितले की, ‘‘सगळाच गोंधळ दिसतोय.’’ शिवसेना हे सर्व आधीपासून परखडपणे सांगण्याचा प्रयत्न करीत होती. तेव्हा ‘सरकारमध्ये राहून सरकारी धोरणांविरुद्ध का बोलता?’ असे विचारणार्‍यांना चंद्राबाबू यांनी उशिरा का होईना, पण उत्तर दिले आहे. ‘नोटाबंदी’चा सगळ्यात मोठा वकील उलटला आहे. कारण शेवटी सत्य त्यांना समजले आहे असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलले आहेत. 
 आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे कालपर्यंत ‘नोटाबंदी’चे समर्थन बर्‍यापैकी करीत होते. मात्र आता त्यांनी याप्रश्‍नी मूग गिळून केलेली ‘तोंडबंदी’ झिडकारली आहे व नोटाबंदी सपशेल अपयशी ठरल्याचे जाहीर केले आहे. चंद्राबाबूंना उशिरा का होईना, पण सत्य समजल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे की इतका मोठा नेता भूलथापांना बळी पडून मृगजळामागे पळत राहिला याबद्दल आश्‍चर्य व्यक्त करावे? असा टोला उद्धव ठाकरेंनी मारला आहे.
 मोदी यांच्याआधी आंध्र राज्य संपूर्ण ‘डिजिटल’ करण्याचे काम चंद्राबाबू यांनी करून दाखवले, पण त्या डिजिटल राज्याने चंद्राबाबूंचा दारुण पराभव करून त्यांना राजकीय वनवासातच पाठविले. कारण फक्त डिजिटल फिजिटल करून लोकांच्या रोजीरोटीचे प्रश्‍न सुटत नाहीत असं सांगत उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारच्या डिजीटल कॅम्पेनवरच टीका केली आहे.

...अखेर दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांचा राजीनामा

नवी दिल्ली- 18 महिन्याचा कालावधी शिल्लक असताना दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी त्यांचा राजीनामा अखेर केंद्राला सोपविला आहे. 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुन्हा शिक्षण क्षेत्राकडे वळण्याचा नजीब जंग यांचा विचार आहे. केंद्र सरकारने अद्याप हा राजीनामा मंजूर केलेला नाही.दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी यांच्याशी जंग यांचे सातत्याने खटके उडाले. केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सातत्याने जंग यांना टीकेचे लक्ष्य केले होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून जंग राजीनामा देण्याचा विचार करत होते, असेही सूत्रांनी सांगितले. राजीनामा देताना जंग यांनी कोणतेही कारण नमूद केलेले नाही. 65 वर्षीय नजीब जंग हे निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. तसेच, जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाचे ते उपकुलगुरुही होते. 2013 च्या जुलैमध्ये त्यांनी दिल्लीचे नायब राज्यपालपद स्वीकारले होते.
केजरीवाल सरकार दिल्लीत सत्तेत आल्यानंतर जंग यांच्याशी त्यांचे सातत्याने खटके उडाले होते. 'केंद्र सरकारचे हस्तक' अशा शब्दांत केजरीवाल यांनी जंग यांच्यावर टीकाही होती.
कॉंग्रेसचे नेते संदीप दीक्षित म्हणाले, "कुणाशीही विनाकारण भांडण करण्याचा जंग यांचा स्वभाव नाही. दिल्ली सरकारनेच सातत्याने वाद निर्माण केला.'' 'इतरांप्रमाणेच आम्हालाही या निर्णयाचा धक्का बसला आहे. अखेर राज्य सरकारशी असलेला वाद संपुष्टात आला आहे. त्यांच्या भविष्यातील कारकिर्दीविषयी आमच्या शुभेच्छा!' अशी प्रतिक्रिया 'आप'चे नेते कुमार विश्‍वास यांनी व्यक्त केली.

नामवंत महाविद्यालयांच्या दादागिरीवर बसणार चाप

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या नामवंत महाविद्यालयांच्या दादागिरीवर आता चाप बसणार आहे. विद्यापीठाने पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे ठरविले असल्याने एकाच महाविद्यालयात होणारी गर्दी आता यापुढे ओसरलेली दिसून येणार आहे. दुसरीकडे यामुळे डोनेशनच्या नावावर होणारी विद्यार्थ्यांची लूटही थांबणार असून प्रवेशात पारदर्शकता येणार आहे.
विद्यापीठाचा व्याप बराच मोठा आहे. दरवर्षी 70 हजारांहून विद्यार्थी पदवी तर 15 हजार विद्यार्थी पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात. विद्यापीठाची प्रवेशप्रक्रिया ही बारावीचा निकाल लागल्यावर बीएसस्सी, बीकॉम आणि कला शाखेसहित इतर शाखांत प्रवेशास सुरुवात होते. विद्यापीठातील तिन्ही शाखांचे हे ऑफलाइन होतात. यातही विज्ञान आणि वाणिज्य शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक असल्याने प्रवेश लवकरच संपत होते. यामुळे विद्यापीठांकडे अतिरिक्त जागांची मागणीही वाढत होती. मात्र, दुसरीकडे बऱ्याच महाविद्यालयांमध्ये या शाखेच्या जागा रिक्त असल्याचे चित्र होते. याचाच फायदा घेत, नामवंत महाविद्यालयांकडून मोठ्या प्रमाणावर "डोनेशन' घेऊन विद्यार्थ्यांची लूटमार केली जाते. त्यामुळे आता प्रवेशात पारदर्शकता आणण्याच्या हेतूने पदवी व पदव्युत्तर विविध अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया सुटसुटीत करण्यासाठी विद्यापीठाने पुढील शैक्षणिक सत्रापासून संपूर्ण प्रवेशप्रक्रिया केंद्रीय पद्धतीने करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. या निर्णयाने प्रवेशासाठीच्या भटकंतीपासून विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. तसेच यामध्ये विद्यार्थ्यांना अधिक "चॉइस' देण्यात येणार असल्याने हव्या त्या महाविद्यालयात प्रवेश करताना अडचणी येणार नाहीत.

कोळसा व्यापाऱ्यावर "आयकर'चा छापा

नागपूर - आयकर विभागाच्या पथकाने रामदासपेठ व्हीआयपी रोड येथील कोळसा व्यापारी राजेंद्र अग्रवाल यांच्या घरी छापा टाकला. हा छापा मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घातला. या कारवाईमुळे व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे. राजेंद्र अग्रवाल कोळसा व्यापारी असून त्यांचा अनेक ठिकाणी व्यवसाय आहे.
दरम्यान, आयकर विभागाने बेहिशेबी संपत्तीसंदर्भात व्यावसायिकांवर नजर रोखली आहे. आयकर विभागाच्या पथकाने मंगळवारी मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास तीन वाहनांनी येऊन स्पंदन हॉस्पिटलजवळील अग्रवाल यांच्या बंगल्यात छापा घातला. चौकीदाराला दार उघडण्यास सांगितले. सोबत पोलिस पथक होते. यानंतर त्यांनी अग्रवाल यांना आतील दरवाजा उघडण्यास सांगितला असता त्यांनी आतून कोणताच प्रतिसाद दिला नाही. उलट मोबाईलद्वारे आपल्या नातेवाईक व मित्रमंडळींना याची माहिती दिली. ते लगेच बंगल्यासमोर येऊन धडकले. आयकर विभागाने त्यांच्या नातेवाइकांना दरवाजा उघडण्याच्या सूचना द्यावी, अशी विनंती केली असता त्यांच्या मित्रांनी वाद घातला. तोतया अधिकारी समजून जवळपास एक ते दीड तास त्यांना बाहेर रोखून धरले. दरम्यान, आयकरच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना अधिक पोलिस बळ बोलाविण्याच्या सूचना केल्यानंतर सीताबर्डी, धंतोली व अन्य ठिकाणचे पोलिस पथक, गस्तीपथक यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. आयकर विभागाचा आक्रमक पवित्रा लक्षात घेता अग्रवाल यांच्या मित्रांनी त्यांना दार उघडण्याची विनंती केली. यानंतर अग्रवाल यांनी आतील दरवाजा उघडून पथकास बंगल्यात प्रवेश दिला. आयकर विभागाच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने बंगल्याची झाडाझडती घेतली. रात्री उशिरापर्यंत बंगल्याची झाडाझडती सुरू होती. या कारवाईत नेमके काय हाती लागले, याचा मात्र तपशील मिळू शकला नाही.

'नीट परीक्षा' आता मराठीतही होणार

नवी दिल्ली : वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी राष्ट्रीय पातळीवरील प्रवेश परीक्षा "नीट' (नॅशनल इलिजिबिलिटी कम एंटरन्स टेस्ट) नव्या शैक्षणिक वर्षापासून मराठीसह आठ भारतीय भाषांमध्ये घेतली जाईल. नीट प्रवेश परीक्षेबाबत राज्य सरकारांमध्ये झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
याअंतर्गत हिंदी आणि इंग्रजीसोबतच गुजराती, मराठी, बंगाली, असमीया, तेलुगू आणि तमीळ या भाषांमधून विद्यार्थ्यांना ही महत्त्वाची प्रवेश परीक्षा देता येईल. या परीक्षेत उत्तीर्ण होणारे विद्यार्थी, त्यांचे भाषा माध्यम कुठलेही असले तरी पात्रता निकषांनुसार राज्य सरकारांच्या अखत्यारीतील वैद्यकीय शैक्षणिक संस्थांसोबतच अखिल भारतीय पातळीवरील कोटा आणि इतर कोट्यासाठी देखील ते पात्र ठरतील. वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी देशभरात एकच प्रवेश परीक्षा असावी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर लागू झालेल्या "नीट'मुळे देशभरात एकच गदारोळ झाला होता.
परीक्षेच्या माध्यमामुळे प्रादेशिक पातळीवरील विद्यार्थ्यांवर अन्याय होणार असल्याचा मुद्दा संसदेमध्येही "नीट'वरून उपस्थित झाला होता. त्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी मे महिन्यात अठरा राज्ये आणि केंद्रशासीत प्रदेशांचे आरोग्य मंत्री आणि आरोग्य सचिवांची बैठक घेतली होती. केंद्र आणि राज्यांमध्ये झालेल्या सहमतीनंतर आठ भारतीय भाषांमधून प्रवेश परीक्षेला परवानगी देण्याचा निर्णय झाला असल्याचे आरोग्य मंत्रालयातर्फे कळविण्यात आले आहे.

दम असेल तर अटक करून दाखवा : ममता बॅनर्जी

कालाघाट : नोटाबंदीच्या निर्णयावर टीका करताना पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी थेट केंद्र सरकारला आव्हान दिले. दम असेल तर मला अटक करून दाखवा, असे सांगताना नोटाबंदीविरोधातील आमचा आवाज कुणीही दाबू शकत नाही, असे सांगत केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले.
"नोटाबंदीमागे मोठा गैरव्यवहार आहे. यामागे नक्की काय वाटाघाटी झाल्या आहेत, याची माहिती सर्वांना व्हायला हवी. त्यामुळे नोटाबंदीच्या गैरव्यवहारावर आम्ही हजार वेळा बोलणार, असे ममता यांनी एका जाहीर सभेत सांगितले. केंद्र सरकारला उद्देशून बोलताना त्या म्हणाल्या, तुम्ही आमच्या अधिकाऱ्यांना हात लावाल, तर आम्ही तुम्हालाही सोडणार नाही, असेही त्या म्हणाल्या.
नोटाबंदीच्या निर्णयाविरोधातील लढाई लोकांच्या पाठबळावर आम्ही जिंकून दाखवू. जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत याविरोधात आवाज उठवत राहीन, असेही बॅनर्जी यांनी या वेळी सांगितले.
केंद्र सरकारच्या प्राप्तिकर विभागाने नुकतेच तमिळनाडूचे प्रधान सचिव पी. राममोहन राव यांच्या घरी छापा टाकला होता. याबद्दल बोलताना बॅनर्जी यांनी ही कारवाई अनैतिक असून, सूडबुद्धीने केलेली असल्याचे या वेळी सांगितले.
केंद्र सरकार साधूचा आव आणत आहे
केंद्र सरकारच्या ढोंगी कारभारावर ममता बॅनर्जी यांनी थेट टीका केली. केंद्रातील नेते साधू असल्याचा आव आणत असून, इतरांना चोर ठरविण्याचे कारस्थान सुरू असल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.

Wednesday 21 December 2016

...ही तर 'रिव्हर्स बँक ऑफ इंडिया'!

नवी दिल्ली- "रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नोटा बदलण्याचा निर्णय जाहीर केल्यापासून मागील 43 दिवसांमध्ये आतापर्यंत 126 वेळा नियम बदलले आहेत. RBI ही आता 'रिव्हर्स बँक ऑफ इंडिया' बनली आहे," अशी टीका काँग्रेसचे संपर्क प्रमुख आमदार रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे. 
सुरजेवाला म्हणाले, "8 नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या सूचनेचे उल्लंघन करीत त्यांनीच 17 डिसेंबरला सांगितले की, तुम्ही तुमच्या खात्यात 30 डिसेंबरपर्यंत पाच हजारांपेक्षा जास्त रक्कम भरू शकणार नाही. आता ते म्हणत आहेत की हा नियम KYC खातेधारकांना लागू होणार नाही. त्यांनी KYC आणि इतर अशी दोन प्रकारची खाती का निर्माण केली? म्हणजे ज्या गरीब लोकांना त्यांची खाती आधार कार्ड किंवा पॅनकार्डला संलग्न करणे शक्य झाले नाही त्यांना आता त्यांच्या कमाईचे पैसे भरता येणार नाहीत."
'हा मोदी सरकारचा दररोज कसला दुतोंडीपणा सुरू आहे? ते स्वतःच संभ्रमात आहेत. आणि त्यांच्या संभ्रमित आदेशांनी आणखी गोंधळ ते निर्माण करीत आहेत,' असे सुरजेवाला म्हणाले. 
तसेच, सुरजेवाला यांनी ट्विटरच्या माध्यमातून मोदी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, "दररोज 'हेडलाईन मॅनेजमेंट' करणे हा मोदी सरकारचा नियमित काम आहे. जर उद्योगांच्या मालकांना रोख किंवा चेकने वेतन देण्याची मुभा आहे, तर रोजगार कायद्यात दुरुस्ती करणे व्यर्थ आहे."
मोदी सरकारकडे चलनाचा प्रचंड तुटवडा असल्याचे यावरून दिसून येते. त्याची कबुली देण्याऐवजी सरकारने दैनंदिन रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांना बँकेच्या रांगांमध्ये उभे राहण्यास भाग पाडले आहे, असे त्यांनी सांगितले. 

'सहारा'कडून मोदींनी घेतले 40 कोटी- राहुल गांधी

मेहसाणा- पंतप्रधान होण्याआधी गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी सहारा समूहाकडून 40 कोटी रुपये घेतले, असा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.
आज (बुधवार) गुजरातच्या मेहसाणा येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर घणाघाती टीका केली. सहाराकडून मोदी यांना सहा महिन्यांच्या कालावधीत नऊवेळा पैसे देण्यात आले, असे त्यांनी सांगितले. 
'गुजरातचे मुख्यमंञी असताना मोदींना सहारा समूहाकडून 2013-14 मध्ये 9 वेळा पैसे मिळाले. प्राप्तिकर विभागाने 2014 मध्ये सहारा समूह आणि आदित्य बिर्ला समूहावर छापे टाकले. त्यावेळी यासंबंधीची कागदपत्रे त्यांना मिळाली. त्यामध्ये ऑक्टोबर 2013 ते फेब्रुवारी 2014 दरम्यान अनेक बड्या राजकीय नेत्यांशी अशा प्रकारचे व्यवहार झाल्याची माहिती असल्याचे' राहुल गांधींनी सांगितले.
पंतप्रधानांच्या वैयक्तिक भ्रष्टाचाराची माहिती आमच्याकडे आहे. मी संसदेत बोललो तर भूकंप होईल त्यामुळे मला संसदेत बोलू दिले जात नाही, असा आरोप राहुल गांधींनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केला होता. तेव्हापासून याबाबत चर्चा होती.
दरम्यान, त्या कागदपत्रांवर आधारित सहारा-बिर्ला समूहांच्या अशा व्यवहारांची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबरमध्ये फेटाळून लावली होती. ती कागदपत्रे मूल्यहीन (झिरो मटेरियल) हवाला पेपर्स असून त्यात स्पष्टता नसल्याचे सांगत न्यायाधीश जे.एस. खेहार आणि अरुण मिश्रा यांच्या खंडपीठाने ती फेटाळली होती. 

अजमेरा कूटुबिंयावर शोककळा; आगीत दोन जावयांचा मूत्यु

गोंदिया,दि.21- गोंदियाच्या बिंदल प्लाझा या हॉटेलमध्ये आगीला प्रतिबंध घालण्यासाठी नियमानुसार कोणत्याही उपाययोजना नसल्यामुळे ही आग भडकत गेली.ती आग काही वेळातच पसरली आणि हॉटेल बिंदलच्या खोल्यापर्यंत पोहोचली.रेस्टारेंटमधील गॅस हंडे व एसीमधील गॅस चेंबरमुळे आगीचा भडका उडाला. त्यामुळे काही वेळातच संपूर्ण हॉटेलला आगीने आपल्या विळख्यात घेतले.या आगीत ध्वस्त झालेल्या हाॅटेलमध्ये पहाटेच्यावेळी साखरझोपेत असलेले गोंदियातील पंकज साडी सेंटरचे संचालक चिनू अजमेरा यांच्या दोन जावयांची मात्र प्राणज्योत मालवल्याने या कूटुंबावर शोककळा पसरली.
अजमेरा कुटुंबात आज बुधवारी सायंकाळी 4 वाजता आयोजित विवाह समारंभात त्यांचे इंदोर येथील रविंद्र जैन आणि महू (मध्य प्रदेश ) येथील सुरेंद्र सोनी हे दोन जावई सहभागी होण्यासाठी आले होते.त्यांच्या राहण्याची व्यवस्था या हाॅटेलमध्ये होती.हा विवाहसोहळा सुध्दा एकदम साध्या पध्दतीने साजरा होणार होता.त्यासाठी अजमेरा कुटुबियांनी कुठलाही अधिकचा असा साजसज्जा केलेला नव्हता.छत्तीसगड निवासी दुर्ग येथील मुलीकडील मंडळी ही देवरी येथे येणार होती.हा लग्नसोहळा देवरी येथे पार पडणार होता.त्यासाठी गोंदियातून सकाळी 6 वाजता लग्नाचे वर्हाड रवाना होणार होते,परंतु लग्नसोहळ्याच्या उत्साहावरच विरजण पडले.या घटनेमुळे देवरी येथे होणारा विवाह सोहळा रद्द करण्यात आला असून पालकमंत्री राजकुमार बडोले,खासदार नाना पटोले,माजी आमदार राजेंद्र जैन,जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे,पोलिस अधिक्षक दिलीप पाटील भुजबळ यांच्यासह गणमान्य नागरिकांनी अजमेरा कुटुबिंयाची भेट घेऊन सांत्वना दिली.
पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी या घटनेप्रती शोकसवेंदना व्यक्त करीत घटनेतील मृतांच्या कूटुबिंयाना मुख्यमंत्री सहाय्यता मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयाची मदत जाहीर केली.

हॉटेल बिंदलला लागलेल्या आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू

  • अजमेरा कुटुंबाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी आलेल्या दोन जावयांचाही मृत्यू
  • महिंद्रा एड महिंद्रा कंपनी नागपूरच्या दोघांचा मृत्यू
खमेंद्र कटरे  



गोंदिया,२१- स्थानिक मुख्य बाजारपेठेतील बिंदल प्लाझा हे हॉटेल आज बुधवारी पहाटे ४च्या सुमारास आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची  घटना घडली. या भीषण आगीत ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला.
 मृतांत मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील व्यक्तींचा समावेश आहे. गोंदिया येथील पंकज साडी सेंटरचे संचालक चिनू अजमेरा यांच्याकडील लग्न सोहळ्यात सामील होण्यासाठी पाहुणे म्हणून आलेल्या व्यक्ती हे बिंदल प्लाझा या हॉटेलमध्ये रात्री मुक्कामी होते. या आगीत मृत झालेल्यांमध्ये मध्यप्रदेशातील महू येथील सुरेंद्र हिरालाल सोनी व इंदोर येथील रवींद्र जैन हे अजमेरा कुटुंबीयांचे जावई होते. सांगलीचे अभिजित पाटील, नागपूरचे प्रवेश शरद देशकर व प्रेम संतोष साबू, वरोराचे आदित्य पुहडे यांचा मृतात समावेश आहे. अद्यापही एका मृताचे नाव कळू शकले नाही.
पहाटे चार वाजेच्या सुमारास ही आग लागली. या आगीत हॉटेलचे ४ मजले जळून खाक झाले. तब्बल चार तासानंतर हॉटेलबाहेरील आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या १५ गाड्यांना यश आले असले तरी जीवित हानी  मात्र थांबवता आली नाही. या हॉटेल प्लाझामध्ये गेल्या अनेक वर्षापासून ‘झी‘ महासेल नावाने दुकान सुरू होती. या दुकानाला शॉर्टसर्किटने आधी आग लागल्याचे बोलले जात आहे. या दुकानात झोपलेले सात जण आग लागल्याचे लक्षात येताच बाहेर पळाल्याने बचावले. विशेष म्हणजे महासेल फक्त काही दिवसापुरता असतो. परंतु, हा महासेल गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असताना सुद्धा कामगार आयुक्त कार्यालय व नगरपरिषद यांचे दुर्लक्ष होते. ज्या हॉटेलला आग लागली त्या हॉटेलचे वरचे बांधकाम सुद्धा अनधिकृत असल्याचे सांगण्यात येते. आगीचे ठिकाण हे शहरातील गर्दीच्या परिसरात आहे. रात्रीच्या वेळी आग लागल्याने मोठा अनर्थ टळला. शहराच्या मध्यभागी असलेल्या हे हॉटेल आणि लॉज तयार करण्याकरिता कसलीही प्रकारची परवानगी घेण्यात आली नसल्याचे समोर येत आहे. गेल्या कित्येक वर्षापासून हे हॉटेल, झी महासेल अधिकाèयांच्या आशीर्वादाने बिनदिक्कतपणे सुरू होते. अशी अनेक जीवघेणे ठिकाण शहरात असल्याची शंका नागरिक व्यक्त करित आहेत. 

मुख्य रस्त्यावरील व्यापाऱ्यांच्या अतिक्रमणामुळे मृतांची संख्या वाढली 

बालाघाट, लांजी भंडारा, तुमसर, गोंदिया, तिरोडा व अदानी पावरप्लांट येथील अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी अथक प्रयत्न केले. हे प्रयत्न करीत असताना अग्नीशमन दलाच्या चालकाला मात्र गांधी चौक ते गोरेलाल चौक व नेहरू चौक मार्गावर व्यापारी व काही लोक प्रतिनिधींनी शासकीय जागेवर अतिक्रमण करून वाढविलेल्या आपल्या प्रतिष्ठान व खासगी इमारतींमुळे वाहने घटनास्थळांपर्यंत जाण्यास मोठा अडथळा निर्माण होत होता. आगीची तीव्रता कमी करण्यासाठी अग्निशमन दलाच्या कर्मचाèयांच्या प्रयत्नात मुख्यरस्त्यावरील अतिक्रमणे सुद्धा अडसर ठरत होती. प्रशासनाने वेळीच या अतिक्रमणांची दखल घेतली असती तर या घटनेतील मृतांचा आकडा हा खूप कमी करता आला असता.

बंद रेस्टारेंटमध्ये होता सिलिंडरचा मोठा साठा

बिंदल प्लाझा येथे असलेला थाटमाट रेस्टारेंट गेल्या दीड महिन्यापासून बंद होता. या बंद हॉटेलमध्ये १० ते १५ व्यावसायिक सिqलडर भरले होते. या सिqलडरच्या स्फोटामुळे आगीने उग्ररूप धारण केले. दीड महिन्यापासून हे रेस्टारेंट बंद असताना एवढा मोठा सिqलडरचा स्टॉक तिथे कसा होता, हाही प्रश्न उपस्थित येथे अनुत्तरित आहे. सिqलडरच्या या साठ्यामुळे गॅस एजंसी आणि जिल्हा पुरवठा विभाग  हे सुद्धा संशयाच्या भोवèयात आहेत. अग्निशमन दलाच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल बिंदल प्लाझाच्या वरच्या माळ्यावर असलेल्या एका खोलीत तीस ते पस्तीस सिqलडर होते.

शिवसेनेचे दुर्गेश रहांगडालेंनी केले मदतकार्य

हॉटेल बिंदल प्लाझाला लागलेली आग व त्यात अडकलेल्या नागरिकांना वाचविण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत होते, त्यावेळी घटनास्थळी अनेक मान्यवर लोकप्रतिनिधी उपस्थित होते. पण या घटनेचे गांभीर्य ओळखून आणखी जीवित हानी होऊ नये म्हणून शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार दुर्गेश रहांगडाले व त्यांच्या सहकार्याने आपल्या जिवावर खेळून त्या हॉटेलमध्ये प्रवेश केला व आग आटोक्यात येऊन मृतदेह बाहेर काढेपर्यंत त्यांना मदतकार्य केले.
हॉटेल बिंदलचा कर्मचारी राजाराम येळे याने हॉटेलला आग लागल्याचे बघताच आपला जीव वाचविण्यासाठी तिसèया माळ्यावरून उडी मारली. यात त्याच्या डोक्याला व हातापायाला जबर जखम झाली. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी नागपूरला नेत असताना डव्वा गावाजवळ येळे यांचा मृत्यू झाला. 

भाजपच्या वरिष्ठ नेत्याचे आहे हॉटेल बिंदल

हॉटेल बिंदल हे भाजपचे वरिष्ठ नेते व जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष  डॉ. राधेश्याम (बबली) अग्रवाल यांच्या मालकीचे आहे. गोंदियाचे आमदार गोपालदास अग्रवाल यांचे ते चुलत भाऊ आहेत. 
हॉटेल बिंदलच्या बांधकामासंदर्भातील सर्व कागजपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. किती माळे अनधिकृत आहेत, काय कागदपत्रे नगरपालीकेकडे सादर करण्यात आली आहे. त्यानुसार संबंधितावर कार्यवाही करण्यात येईल, असे गोंदिया नगर परिषदेचे मुख्याधिकारी चंदन पाटील यांनी सांगितले.
गोरेलाल चौक येथे घडलेल्या प्रकरणाबद्दल पोलिस विभाग स्वतंत्र चौकशी करणार असून या घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून आकस्मित घटना म्हणून या प्रकरणाची आधी नोंद करण्यात येणार आहे. या सर्व घटनेची माहिती वरिष्ठ पातळीवर देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी दिली. या घटनेत ११ जणांना वाचविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

भाजपचा सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न

नवी दिल्ली - चंडीगड महापालिकेत तब्बल 20 वर्षांनंतर जोरदार पुनरागमन करून सत्ता मिळविलेल्या भाजपने "जनतेच्या परीक्षेत नोटाबंदी पास झाली' अशी भावना व्यक्त केली आहे. पंजाबसह आगामी पाच राज्यांतील निवडणुकांतही चंडीगडच्या निकालाची पुनरावृती होईल, असा आशावाद भाजपने व्यक्त केला असून, हा सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रकार असल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.
चंडीगडच्या निवडणुकीत कॉंग्रेसला धूळ चारल्यामुळे भाजपचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. भाजपने 26 पैकी तब्बल 20 जागा जिंकल्या आहेत. या निकालांच्या पार्श्‍वभूमीवर आपकडे वळू पाहणारे भाजपचे माजी खासदार नवज्योतसिंग सिद्धू यांना लवकरात लवकर आपल्या कळपात ओढण्याची घाई कॉंग्रेसने चालवली आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी या विजयाचे वर्णन नोटाबंदीला मिळालेला जनमताचा कौल, असे केले आहे. ते म्हणाले, की नोटाबंदीनंतर जेथे जेथे निवडणुका झाल्या तेथे भाजपला मिळालेला विजय नोटाबंदीला मिळालेला कौलच आहे.
पक्षनेते श्रीकांत शर्मा यांनी सांगितले, की चंडीगडमध्ये आपने निवडणूक लढविली नाही. त्यामुळे भाजपचा विजय सुकर झाला, असे म्हणणे चुकीचे आहे. कॉंग्रेसच्या सात दशकाच्या भ्रष्ट राजवटीला कंटाळलेल्या जनतेने त्या पक्षाला चंडीगडमध्ये पुन्हा जागा दाखवून दिली आहे. मोदी सरकारचा कारभार देशवासीयांनी मान्य केल्याचे हे निदर्शक आहे. पंजाब व उत्तर प्रदेशासह ज्या पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत, तेथेही हाच कल कायम राहील. कॉंग्रेसला लोक आजही नाकारत आहेत हे या पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी लक्षात घ्यावे व मोदींवर निरर्गल विधाने करणे थांबवावे.
दरम्यान, भाजपच्या चंडीगड निकालांच्या विश्‍लेषणाबाबत जाणकारांनी दुमत नोंदवले आहे. ज्येष्ठ विश्‍लेषक फराज हमद यांच्या मते चंडीगड हा मतदारसंघ भारताचे प्रतिनिधित्व करतच नाही; तो इंडियाच्या अल्प भागाचे प्रतीनिधित्व करतो जेथे उच्च मध्यमवर्गीय नावाच्या भाजपच्या पारंपरिक मतपेढीचा भरणा आहे. चंडीगडचा निकाल हे नोटाबंदीला मिळालेली पावती असेल तर महाराष्ट्रातील पालिकांचे ताजे निकाल काय सांगतात. तेथे भाजपची पीछेहाट कशी झाली, याचेही उत्तर भाजपच्या नेतृत्वाने द्यावे. चंडीगडचा कल पाच राज्ये तर सोडाच; पण पंजाबात जरी कायम राहिला तरी खुद्द भाजपसाठी तो मोठा चमत्कार ठरेल, असेही मत अहमद यांनी व्यक्त केले.

'अम्मा'च्या निधनाने 597 जणांचा मृत्यू

चेन्नई (वृत्तसंस्था): माजी मुख्यमंत्री जे जयललिता यांच्या निधनामुळे तमिळनाडूत आतापर्यंत 597 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आज एआयएडीएमके यांनी दिली.
पक्षाने दिलेल्या निवेदनात 127 नागरिकांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 597 वर पोचल्याचे म्हटले आहे. मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी तीन लाख रुपये देण्याची घोषणा तमिळनाडू सरकारने केली आहे.
'अम्मा'च्या निधनाने शोक अनावर न झाल्याने या नागरिकांचा मृत्यू झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. हे नागरिक चेन्नई, तिरुनेलवेली, मदुराई, रामनाथपुरमसह राज्यातील अनेक शहरांतील रहिवासी होत.

व्होडाफोन फोर-जी सुपरनेट महाराष्ट्रात

नागपूर - भारतातील आघाडीची दूरसंचार सेवा पुरवठादार कंपनी व्होडाफोन इंडियाने मंगळवारी (ता. 20) व्होडाफोन सुपरनेट 4-जी सेवा महाराष्ट्रात सुरू करत असल्याची घोषणा केली.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नागपूर येथे या सेवेचे उद्‌घाटन झाले. महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये मार्च 2017 पर्यंत व्होडाफोन सुपरनेट 4-जी सेवा सुरू होईल. अतिशय कार्यक्षम अशा 2100 मेगाहर्टझ तरंगपट्ट्यावर असलेल्या या अद्ययावत संपर्कजाळ्यामुळे व्होडाफोन 4-जी ग्राहकांना वाय-फाय आणि डोंगलसह विविध स्मार्ट उपकरणांमध्ये मोबाईलद्वारे वेगवान इंटरनेट सेवा मिळू शकेल. आघाडीच्या स्मार्टफोन उत्पादकांच्या 4-जी सज्ज मोबाईल फोनवर संपूर्ण देशभरात व्होडाफोन 4-जी सेवा मिळू शकणार आहे. व्होडाफोन 4-जीमुळे मोबाईल इंटरनेट वापरण्याचा अनुभव अधिक समृद्ध होईल. ग्राहकांना व्हिडिओ, संगीत अधिक सुलभपणे डाउनलोड वा अपलोड करता येईल, तसेच व्हिडिओ संवादही सुविहितपणे करता येऊन, आवडीच्या ऍप्सना अधिक सहजगत्या कनेक्‍ट करता येईल. ग्राहकांना उत्तम दर्जाचे हाय डेफिनेशन व्हिडिओ स्ट्रीमिंग, मोबाईल गेमिंग आणि दोन्ही बाजूंकडून व्हिडिओ कॉलिंग हा अनुभवही घेता येईल.

पंतप्रधानांच्या व्यासपीठावर उद्धव ठाकरे

मुंबई - भाजप आणि शिवसेनेतील मानापमान नाट्य टाळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यासपीठावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना स्थान मिळण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.
फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यानंतर गेल्या दोन वर्षांत शिवसेना-भाजपमध्ये अनेकदा खटके उडाले आहेत. सत्तेत असूनही शिवसेना सातत्याने भाजपला टोमणे मारत असल्याने भाजपनेही शिवसेनेला अपमानस्पद वागणूक देण्याची संधी सोडली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळी मुंबई दौऱ्यावर आले होते तेव्हा उद्धव ठाकरे यांना कार्यक्रमाला निमंत्रण न देता शिवसेनेला भाजपने डिवचले होते. आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी (ता.24) करण्यात येणार आहे. भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर गिरगाव चौपाटीवर जाहीर सभा होणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीचे रणशिंग याच कार्यक्रमांच्या माध्यमातून फुंकण्यात येणार असल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
या कार्यक्रमावर पक्षाचीच छाप असेल याची खबरदारी भाजपने घेतली आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रित करण्यात येईल किंवा नाही, याची चर्चा सुरू आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा आहे. या संदर्भात त्यांनी अनेकदा प्रतिक्रियादेखील दिली आहे. शिवस्मारकाच्या भूमिपूजनासारख्या कार्यक्रमाला ठाकरे यांना डावलणे योग्य नसल्याची मुख्यमंत्र्यांची भूमिका असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ठाकरे यांचा यथोचित गौरव करण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले. या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधानांच्या कार्यक्रमात ठाकरे यांना योग्य स्थान देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.

BERARTIMES_ DEC.2016, 21-27





Tuesday 20 December 2016

टेनेसिन 117 वे मूलद्रव्य : IUPAC चे शिक्कामोर्तब

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) : सहा वर्षांपूर्वी शोध लागलेल्या आवर्तसारणीतील अतिजड अशा 117 व्या मूलद्रव्याचे 'टेनेसिन' असे नामकरण करण्यात आले आहे. नव्याने शोध लागलेल्या मूलद्रव्यांच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब करणाऱ्या इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड ऍप्लाइड केमिस्ट्री (आययूपीएसी) या संस्थेने तब्बल एका वर्षाच्या पाठपुराव्यानंतर 'टेनेसिन' या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.
'टेनेसिन'चा शोध एप्रिल 2010 मध्ये लागला होता. हे अतिजड मूलद्रव्य असून, नैसर्गिकरीत्या ते आढळत नाही. विशिष्ट समस्थानक असलेल्या किरणोत्सारी मूलद्रव्याचा तशाच प्रकारच्या समस्थानक असलेल्या मूलद्रव्यावर प्रभाव पडल्यास संश्‍लेषण होते. त्यामुळे या दुर्मिळ घटनेत दोघांचे केंद्रके एकत्र येऊन अतिजड मूलद्रव्य तयार होते. 'टेनेसिन'च्या प्रकरणी, आवर्तसारणीतील मूलद्रव्य 117 तयार होण्यास बर्केलियम- 249 हे किरणोत्साराचे लक्ष्य असावे लागते.
या मूलद्रव्याच्या निर्मितीसाठी आणि त्याचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी टेनेसी या अमेरिकेतील राज्याचा सिंहाचा वाटा असल्याने मूलद्रव्याला या राज्याच्या नावावरूनच "टेनेसिन' हे नाव देण्यात आले आहे. हे हॅलोजन प्रकारातील मूलद्रव्य असल्याने टेनेसी शब्दाच्या अखेरीस जोड देऊन टेनेसिन हे नाव तयार झाले आहे. आवर्तसारणीत "टीएस' या नावाने ते दर्शविले जाणार आहे.
...असे तयार केले 'टेनेसिन'
एक वर्षापासून या प्रकरणी सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान, अमेरिकच्या ऊर्जा मंत्रालयाच्या राष्ट्रीय प्रयोगशाळेने 22 मिलिग्रॅम बर्केलियम निर्माण करून ते रशियामध्ये पाठविले. रशियामधील संशोधन संस्थेमध्ये प्रक्रिया करून 117 वे मूलद्रव्य तयार करण्यात आले. तब्बल सहा महिने कॅल्शिअम-48 चा त्याच्यावर अविरत मारा केल्यानंतर कॅल्शिअम आणि बर्केलियमचे केंद्रके होऊन 117 व्या मूलद्रव्याचे सहा अणू तयार झाल्याचे शास्त्रज्ञांना दिसून आले. आवर्तसारणीमध्ये नोंद नसलेलेही मूलद्रव्य असू शकतात, या चिकीत्सक वृत्तीतून जगभरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या संशोधनाचाच हा परिणाम असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...