Tuesday 20 December 2016

टेनेसिन 117 वे मूलद्रव्य : IUPAC चे शिक्कामोर्तब

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) : सहा वर्षांपूर्वी शोध लागलेल्या आवर्तसारणीतील अतिजड अशा 117 व्या मूलद्रव्याचे 'टेनेसिन' असे नामकरण करण्यात आले आहे. नव्याने शोध लागलेल्या मूलद्रव्यांच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब करणाऱ्या इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड ऍप्लाइड केमिस्ट्री (आययूपीएसी) या संस्थेने तब्बल एका वर्षाच्या पाठपुराव्यानंतर 'टेनेसिन' या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.
'टेनेसिन'चा शोध एप्रिल 2010 मध्ये लागला होता. हे अतिजड मूलद्रव्य असून, नैसर्गिकरीत्या ते आढळत नाही. विशिष्ट समस्थानक असलेल्या किरणोत्सारी मूलद्रव्याचा तशाच प्रकारच्या समस्थानक असलेल्या मूलद्रव्यावर प्रभाव पडल्यास संश्‍लेषण होते. त्यामुळे या दुर्मिळ घटनेत दोघांचे केंद्रके एकत्र येऊन अतिजड मूलद्रव्य तयार होते. 'टेनेसिन'च्या प्रकरणी, आवर्तसारणीतील मूलद्रव्य 117 तयार होण्यास बर्केलियम- 249 हे किरणोत्साराचे लक्ष्य असावे लागते.
या मूलद्रव्याच्या निर्मितीसाठी आणि त्याचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी टेनेसी या अमेरिकेतील राज्याचा सिंहाचा वाटा असल्याने मूलद्रव्याला या राज्याच्या नावावरूनच "टेनेसिन' हे नाव देण्यात आले आहे. हे हॅलोजन प्रकारातील मूलद्रव्य असल्याने टेनेसी शब्दाच्या अखेरीस जोड देऊन टेनेसिन हे नाव तयार झाले आहे. आवर्तसारणीत "टीएस' या नावाने ते दर्शविले जाणार आहे.
...असे तयार केले 'टेनेसिन'
एक वर्षापासून या प्रकरणी सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान, अमेरिकच्या ऊर्जा मंत्रालयाच्या राष्ट्रीय प्रयोगशाळेने 22 मिलिग्रॅम बर्केलियम निर्माण करून ते रशियामध्ये पाठविले. रशियामधील संशोधन संस्थेमध्ये प्रक्रिया करून 117 वे मूलद्रव्य तयार करण्यात आले. तब्बल सहा महिने कॅल्शिअम-48 चा त्याच्यावर अविरत मारा केल्यानंतर कॅल्शिअम आणि बर्केलियमचे केंद्रके होऊन 117 व्या मूलद्रव्याचे सहा अणू तयार झाल्याचे शास्त्रज्ञांना दिसून आले. आवर्तसारणीमध्ये नोंद नसलेलेही मूलद्रव्य असू शकतात, या चिकीत्सक वृत्तीतून जगभरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या संशोधनाचाच हा परिणाम असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...