Tuesday 13 December 2016

जानकर विरोधी पक्षांच्या रडारवर

नागपूर : देसाईगंज (जि. गडचिरोली) नगरपालिका निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला धमकावल्या प्रकरणी अडचणीत सापडलेले दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्ष आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. जानकर यांच्या राजीनाम्याची मागणी करून अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात सरकारची कोंडी करण्याची रणनीती विरोधकांकडून आखली जात आहे. 
नोटाबंदी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरुन पहिल्या आठवड्यात सरकारला जेरीस आणणाऱ्या विरोधी पक्षाला जानकर यांचा मुद्दा हाती लागला आहे. कॉंगेस उमेदवाराचा अर्ज बाद करून आपल्या उमेदवाराला कपबशी हे चिन्ह द्यावे यासाठी जानकर यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला धमकावल्याची व्हिडिओ क्‍लिप व्हायरल झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने या प्रकरणाची गंभीर दाखल घेत जानकर यांना सुरवातीला नोटीस बजावली आणि त्यानंतर देसाईगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना एका कॅबिनेट मंत्र्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याने विरोधी पक्ष जानकर यांच्या राजीनाम्याची मागणी उचलून धरण्याची शक्‍यता आहे.
नागपूर हिवाळी अधिवेशनात तुलनेने मागास असलेल्या विदर्भ आणि मराठवाड्याच्या प्रश्नावर जास्त चर्चा होते. मात्र गेल्या आठवड्यात पाचपैकी तीन दिवसात जेमतेम कामकाजाला मिळाले. या तीन दिवसात नोटाबंदी, मराठा, मुस्लिम, धनगर, कोळी आरक्षण आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचा (अट्रोसिटी) दुरुपयोग या मुद्द्यांवर चर्चा झाली. येत्या डिसेंबरला हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजणार आहे. त्यामुळे चालू आठवडा हा अधिवेशनाचा शेवटचा आठवडा आहे. परिणामी या आठवड्यात विदर्भ-मराठवाड्याच्या प्रश्नावर चर्चा अपेक्षित आहे. मुख्यमंत्री पदासह महत्त्वाची खाती विदर्भाला मिळूनही गेल्या दोन वर्षात विदर्भाच्या विकासात फारशी भर पडली नसल्याची टीका विरोधी पक्षाकडून होण्याची शक्‍यता आहे. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...