Sunday 11 December 2016

तमिळनाडूत आणखी 24 कोटींच्या नोटा जप्त

वाळू उत्खनन समूहावरील कारवाई सुरूच, जप्त केलेला ऐवज 166 कोटींवर
चेन्नई : तमिळनाडूतील वाळू उत्खनन समूहावरील छाप्यात प्राप्तिकर विभागाने शनिवारी 24 कोटी रुपयांच्या नव्या नोटा जप्त केल्या. कालपर्यंत टाकलेल्या छाप्यांमध्ये रोकड व सोने असा 142 कोटी रुपयांपेक्षा अधिक ऐवज जप्त करण्यात आला होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा वेल्लोर येथून मोटारीतून जप्त केल्या. मोटारीच्या चालकाची चौकशी सुरू आहे. आज जप्त केलेल्या नोटांमुळे एकूण 166 कोटी रुपयांचा ऐवज आतापर्यंत जप्त झाला आहे. प्राप्तिकर विभागाने समूहाच्या चेन्नईतील मालमत्तांवर मारलेल्या छाप्यात मागील दोन दिवसांत 96.89 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा, 10 कोटी रुपयांच्या नव्या नोटा आणि 127 किलो सोने असा 142 कोटी रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. देशात नोटाबंदीनंतर सर्वांत मोठ्या प्रमाणात नव्या नोटा या कारवाईत जप्त करण्यात आल्या आहेत.
तमिळनाडूमधील वाळू उत्खनन करणाऱ्या समूहाच्या आठ मालमत्तांवर छापे टाकून हा ऐवज जप्त केला आहे. संपूर्ण तमिळनाडूत या समूहाचे वाळूचे उत्खनन करण्याचे परवाने आहेत. समूहाच्या मालकीच्या सहा निवासस्थानांवर आणि दोन कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. या समूहाच्या कार्यालयांची तपासणी सुरू आहे. सरकारी कंत्राटदार एस. रेड्डी याने जप्त केलेला सर्व ऐवज आपल्या मालकीचा असल्याचा दावा केला आहे. त्याची आणि अन्य काही जणांची प्राप्तिकर विभागाकडून चौकशी सुरू आहे. छाप्यात मिळालेल्या कागदपत्रांची तपासणीही प्राप्तिकर विभागाकडून सुरू आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...