
सत्यशोधक ओबीसी परिषदेचे अध्यक्ष संदीप हनुमंतराव उपरे, त्यांच्या आई कमलताई यांच्या नेतृत्वात धर्मांतरणाचा निर्धार करून हजारो ओबीसी बांधव संविधान चौकात दाखल झाले. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीने दीक्षाभूमीवर पोहोचले. दीक्षाभूमीवर मनुस्मृती दहनदिनी आयोजित या सोहळ्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सदानंद फुलझेले प्रामुख्याने उपस्थित होते. दुपारी भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी सर्वांना त्रिशरण पंचशील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या प्रतिज्ञा दिल्या. त्रिशरण पंचशील आणि २२ प्रतिज्ञा ग्रहण करून हजारो ओबीसी बांधवांनी बौद्ध धम्म स्वीकारला. भदंत ससाई यांच्या नेतृत्वातील धम्मदीक्षा सोहळ्याप्रसंगी भदंत नागघोष, भदंत धम्मसारथी, भदंत नागवंश आणि भदंत धम्मबोधी उपस्थित होते. ओबीसी बांधवांनी घेतलेली धम्मदीक्षा मन्वंतराची नांदी ठरावी.
धर्मांतरणाशिवाय ओबीसी बांधवांचे उत्थान अशक्य असल्याचा ओबीसी नेते हनुमंतराव उपरे यांचा विश्वास होता. काही वर्षांपूर्वी त्यांनी ओबीसी बांधव मोठ्यासंख्येने बौद्ध धम्माचा स्वीकार करतील, असे जाहीर केले होते.
तेव्हापासूनच ओबीसी समाजात त्यांनी जनजागृतीही सुरू केली. ‘चलो बुद्ध की ओर’ या अभियानाला तळागळातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यांचे निधन झाल्याने अभियानावर काहीसा परिणाम झाला. उपरे कुटुंबीय हनुमंतराव उपरे यांचा संकल्प सिद्ध करण्यासाठी प्रयत्नरत झाले. होते त्याचे फलित म्हणून धर्मांतरण सोहळ्यात हजारो ओबीसी बांधवांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धम्माचा स्वीकार केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नम्रतेने शरण गेले तीच बुद्धमूर्ती या कार्यक्रमासाठीही वापरण्यात आली. धम्मदीक्षा घेणाऱ्यांमध्ये सर्वच वयोगटातील अनुयायांचा समावेश होता.
यावेळी सदानंद फुलझेले, संदीप उपरे यांनी विचार मांडले. उपरे म्हणाले, ओबीसी बांधव मुळात नागवंशी म्हणजे बौद्धच होते. म्हणजेच आज आम्ही मूळ धम्मात परतलो. आंबेडकरी समाजाची प्रगती केवळ आरक्षणामुळे नव्हे तर धम्मामुळे झाली आहे. त्यामुळेच आम्हीही बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन अन्य ओबीसी समाजासाठी एक वाट मोकळी करून दिली. आज वडिलांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. यापुढेही चलो बुद्ध की ओर अभियान सुरू राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
संचालन हरिश्चंद्र सुखदेवे यांनी केले तर प्रा. रमेश राठोड यांनी आभार मानले. दीक्षा घेणाऱ्या ओबीसी बांधवांचे आंबेडकरी विचारवंत व दलित पॅंथरचे संस्थापक राजा ढाले, पीरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे, डॉ. भाऊ लोखंडे, रूपाताई कुलकर्णी, जैमिनी कडू, बीआरएसपीचे किशोर गजभिये, बार्टीचे राजेश ढाबरे, बसपाचे उत्तम शेवडे, दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे आदींनी स्वागत केले.
No comments:
Post a Comment