Wednesday, 28 December 2016

दिल्लीच्या नायब राज्यपालपदी अनिल बैजल

नवी दिल्ली(वृत्तसंस्था): दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांचा राजीनामा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज (बुधवार) स्वीकारला. जंग यांच्या जागी दिल्लीचे नायब राज्यपाल म्हणून माजी प्रशासकीय अधिकारी अनिल बैजल यांची नियुक्ती करण्यात आल्याचे वृत्त 'इंडिया टुडे' या वाहिनीने दिले आहे. 
आपल्या पदाचा दीड वर्षांचा कार्यकाळ शिल्लक असतानाच जंग यांनी 22 डिसेंबर रोजी राजीनामा दिला होता. यानंतर पुन्हा शिक्षण क्षेत्राकडे वळण्याचा त्यांचा मानस आहे. मात्र, राजीनामा दिल्यानंतर केंद्र सरकारने त्यांना आणखी काही दिवस थांबण्याचा सल्ला दिला होता. 
1969 च्या बॅचमधील 'आयएएस' अधिकारी असलेले बैजल 2006 मध्ये केंद्रीय नगरविकास मंत्रालयाचे सचिव म्हणून निवृत्त झाले. 'जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण अभियान' (जेएनएनयूआरएम) या मोहीमेची संकल्पना आणि अंमलबजावणीत बैजल यांचा मोलाचा वाटा होता. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते गृह मंत्रालयाचे सचिवही होते. तसेच, दिल्ली विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. 'विवेकानंद इंटरनॅशनल फाऊंडेशन' या 'थिंक-टॅंक'चेही ते सदस्य होते. यापूर्वी जम्मू-काश्‍मीरचे राज्यपाल एन. एन. व्होरा यांच्या जागी बैजल यांची नियुक्ती होणार, अशी चर्चा होती. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...