Sunday 25 December 2016

...अन्‌ तो क्षणात झाला लखपती!

नागपूर - नोटांबदीची चर्चा सर्वत्र सुरू असताना साधारण व्यक्‍तीच्या खात्यात बॅंकेने एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल २५ लाख रुपये जमा केले. त्यामुळे ती व्यक्‍ती क्षणार्धात लखपती झाली. त्याने लगेच कर्ज फेडले. काही नवीन वस्तू खरेदी केल्या. तसेच काही पैसे मुलांना दिले. मात्र, हा घोळ झाला कसा? याबाबत अनेक शंका-कुशंका व्यक्‍त केल्या जात आहेत. मात्र, अशातच त्या व्यक्‍तीवर सदर पोलिसांनी बॅंकेच्या अधिकाऱ्याच्या संगनमताने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची आज दिवसभर शहरात चर्चा होती. 
राम फकीर अंबोरे (रा. चिखली, बुलडाणा), मुलगा स्वप्नील राम अंबोरे आणि मुलगी रंजना मारोती भगत (रा. अहमदनगर, गुजरात) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. चंद्रकांत मुरलीधर रोठे (५०) असे शाखा व्यवस्थापक फिर्यादीचे नाव आहे. ते सदर पाटनी चौकातील दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बॅंक लिमिटेडमध्ये कार्यरत आहेत. या प्रकरणी सदर पोलिसांनी योग्य कागदोपत्री चौकशी न करता थेट बुलडाणा चिखली येथील व्यक्तीवर गुन्हा दाखल केला. अंबोरे यांच्या खात्यावर बॅंकेने कुठलीही चौकशी न करता थेट इतकी मोठी रक्कम त्या साधारण व्यक्तीच्या खात्यात जमा कशी केली? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. तर संबंधित राम अंबोरे हे नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. त्याची एक सोसायटी आहे. अंबोरे यांनी खात्यात जमा झालेल्या रकमेपैकी काही रक्‍कम आपल्या मुलाच्या व मुलीच्या खात्यात वळती केली. वडिलांनीच रक्कम वळती केल्याने त्यांनी त्या रकमेचा परस्पर वापर केला. हा घोळ बॅंकेतीलच कुण्या कर्मचाऱ्याने केला का? हा पेच अद्याप कायम आहे. या प्रकरणी सदर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सावंत यांनी आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
पोलिसांची संशयास्पद भूमिका
राम अंबोरे यांच्या खात्यात पैसे आल्यानंतर त्यांना सेवानिवृत्तीची रक्‍कम मिळाल्याचा आनंद झाला. त्यांनी मुलगा आणि मुलीच्या खात्यात पैसे टाकले. मात्र, सदर पोलिसांनी त्यांच्या मुलासह गुजरातला राहणाऱ्या विवाहित मुलीवर गुन्हा दाखल केल्याने उलटसुलट चर्चेला पेव फुटले आहे. जेव्हा की, या दोघांनीही कागदोपत्री अशी कुठलीच फसवणूक केली नाही. तसेच त्यांच्या मुलीचा आणि मुलाचा या प्रकरणी कुठलाही प्रत्यक्ष संबंध नसल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...