Saturday 17 December 2016

वेगळ्या विदर्भावरून विरोधकांचा सभात्याग

नागपूर -  वेगळ्या विदर्भाचे आश्‍वासन देऊन जनतेकडून मते लाटली. आता वेगळ्या विदर्भाबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करीत विरोधकांनी विधानसभेत सभात्याग केला. वेगळ्या विदर्भाबाबत सत्ताधाऱ्यांनी जनतेची फसवणूक केली, असा आरोपही विरोधकांनी केला.
सत्ताधाऱ्यांच्या प्रस्तावाला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर दिल्यानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर सरकारवर जोरदार हल्ला केला. निवडणुकीपूर्वी वेगळ्या विदर्भाची भाषा केली होती. सरकारमध्ये येताच भाषा बदलली, वेगळ्या विदर्भावर आता चर्चा करायला लागले. विदर्भाबाबत धोरण काय? असा प्रश्‍न विखे पाटील यांनी उपस्थित केला. विदर्भाच्या निर्मितीबाबत सरकारची भूमिका काय आहे, याबाबत खुलासा होण्याची गरज आहे. वेगळ्या विदर्भाबाबत भूमिका स्पष्ट करण्याऐवजी चर्चा केली जात आहे. निवडणुकीत केवळ मते घेण्यासाठीच वेगळ्या विदर्भाचे आश्‍वासन दिले होते काय? सरकार लोकांना फसवित आहे, असा आरोप त्यांनी केला. वेगळ्या विदर्भाचा प्रस्ताव आणण्याची गरज आहे. परंतु, येथे फक्त चर्चा होत असून या चर्चेदरम्यान, मुख्यमंत्री, अर्थमंत्री, आदिवासीमंत्री गैरहजर आहेत. कुठे नेऊन ठेवला विदर्भ माझा, असे आता जनता विचारत आहे. विदर्भाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट नाही, असे नमूद करीत विरोधकांनी एकत्र येऊन सरकारचा निषेध नोंदविला. या वेळी सर्वच सदस्यांनी विधानसभाध्यक्षांच्या आसनापुढे एकत्र येऊन घोषणाबाजी केली. आम्ही या सरकारचा निषेध नोंदवित असून सभात्याग करीत असल्याचे सांगून विरोधी बाकावरील सर्व सदस्य बाहेर पडले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...