Wednesday 21 December 2016

पंतप्रधानांच्या व्यासपीठावर उद्धव ठाकरे

मुंबई - भाजप आणि शिवसेनेतील मानापमान नाट्य टाळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यासपीठावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना स्थान मिळण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.
फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यानंतर गेल्या दोन वर्षांत शिवसेना-भाजपमध्ये अनेकदा खटके उडाले आहेत. सत्तेत असूनही शिवसेना सातत्याने भाजपला टोमणे मारत असल्याने भाजपनेही शिवसेनेला अपमानस्पद वागणूक देण्याची संधी सोडली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळी मुंबई दौऱ्यावर आले होते तेव्हा उद्धव ठाकरे यांना कार्यक्रमाला निमंत्रण न देता शिवसेनेला भाजपने डिवचले होते. आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी (ता.24) करण्यात येणार आहे. भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर गिरगाव चौपाटीवर जाहीर सभा होणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीचे रणशिंग याच कार्यक्रमांच्या माध्यमातून फुंकण्यात येणार असल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
या कार्यक्रमावर पक्षाचीच छाप असेल याची खबरदारी भाजपने घेतली आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रित करण्यात येईल किंवा नाही, याची चर्चा सुरू आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा आहे. या संदर्भात त्यांनी अनेकदा प्रतिक्रियादेखील दिली आहे. शिवस्मारकाच्या भूमिपूजनासारख्या कार्यक्रमाला ठाकरे यांना डावलणे योग्य नसल्याची मुख्यमंत्र्यांची भूमिका असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ठाकरे यांचा यथोचित गौरव करण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले. या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधानांच्या कार्यक्रमात ठाकरे यांना योग्य स्थान देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...