Monday 30 April 2018

‘कॅशलेस’व्यवहारावर १०० रुपयांपर्यंत सूट !

नवी दिल्ली,दि.30- कॅशलेश व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना आता एमआरपीवर 100 रुपयापर्यंत सूट मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याशिवाय डिजीटल व्यवहार करणाऱ्यांना कॅशबॅक दिली जाणार आहे. यासाठी सरकार जीएसटी परिषदेद्वारे तयारी करत असल्याची माहीती आहे.


ग्राहकांना डिजिटल व्यवहारांकडे आकर्षित करण्यासाठी अलीकडेच पंतप्रधान कार्यालयात महत्त्वाची बैठक झाली. त्यामध्ये तीन पद्धतीने प्रोत्साहन देण्याबाबत चर्चा झाली.

प्राप्तिकर, व्यवसाय करासारख्या प्रत्यक्ष कराचा भरणा करणाऱयांनाही सवलत देण्याबाबत बैठकीत विचार करण्यात आला आहे. वस्तू किंवा सेवा खरेदी करताना डिजिटल पद्धतीने (भीम अ‍ॅप, मोबाईल वॉलेट, नेट बँकिंग किंवा कार्डद्वारे) पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना १०० रुपयांपर्यंत सवलत देण्यावर एकमत झाले. तसेच अधिकाधिक विक्रेत्यांना डिजिटल पेमेंटच्या कक्षेत आणण्यासाठी त्यांनाही विशेष प्रोत्साहन देण्याचा केंद्र सरकार विचार करीत आहे. त्याअंतर्गत विक्रेत्यांना एकूण वार्षिक उलाढालीवर ठराविक रक्कम ‘कॅशबॅक’ स्वरुपात परत मिळणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव सरकारकडून लवकरच जीएसटी परिषदेसमोर ठेवला जाणार आहे.

Sunday 29 April 2018

डॉ.आंबेडकर - मोदी ब्राह्मण तर श्रीकृष्ण ओबीसी: भाजपा नेत्याची मुक्ताफळे


Brahmins learned PM Modi is one as was BR Ambedkar Gujarat Speaker | डॉ.आंबेडकर व मोदी ब्राह्मण, श्रीकृष्ण ओबीसी; भाजपा नेत्याची मुक्ताफळे
अहमदाबाद,दि.29: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वादग्रस्त वक्तव्य न करण्याचा इशाऱ्या भाजपच्या वाचाळवीर नेत्यांनी ठेंगा दाखवला आहे. गुजरातमधील विधानसभेचे अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांनी गांधीनगरमध्ये आयोजित ब्राह्मण व्यापार परिषदेत नुकतेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राह्मण असल्याचे म्हटले आहेत. एवढेच नाही तर श्रीकृष्ण ओबीसी होता, संदीपन ऋषींनी त्यांना देव केले.  चंद्रगुप्त मौर्य, श्रीराम आणि श्रीकृष्णाच्या यशात ब्राह्मणांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. चंद्रगुप्त मौर्याच्या काळात चाणक्यही राजा होऊ शकला असता. मात्र, चाणक्याला सत्तेची हाव नव्हती. ब्राह्मणांनी नेहमीच संपूर्ण समाजाचा विचार केला, असे त्रिवेदी यांनी म्हटले. त्रिवेदींनी हे विधान केले त्यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री विजय रुपानी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल हेदेखील उपस्थित होते. परिणामी, त्रिवेदींच्या वक्तव्याची दखल भाजप घेणार का, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार आणि आमदारांनी ऊठसूठ कोणत्याही विषयावर तोंड उघडून माध्यमांना मसाला पुरविण्याचे आणि परिणामी पक्षाला व सरकारला नाहक वाईटपणा आणण्याचे प्रकार बंद करावेत, असा इशारावजा सल्ला दिला होता. मात्र, मोदींच्या या सल्ल्याला भाजपच्या नेत्यांनी केराची टोपली दाखवली आहे. 

नाना पटोलेंना सहदेण्यासाठी भाजपचे राजकुमार बडोले हेच ठरु शकतात पर्याय?

पटोलेंसाठी काँग्रेसकडून दबाव,राकाँत फुंडे,शिवणकर तर भाजपात पटले,बोपचेत चुरस
काँग्रेसमध्ये नाना पटोलें प्रबळ उमेदवार, राष्ट्रवादीत सुनिल फुंडे,विजय शिवणकर,मधुकर कुकडे
भाजपात डाॅ.परिणय फुके,डाॅ.खुशाल बोपचे,हेमंत पटले,शिशुपाल पटले व एड विरेंद्र जायस्वाल रिंगणात

गोंदिया,दि.27(खेमेंद्र कटरे) – नाना पटोले यांच्या खासदारीकीच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक अखेर गुरुवारी जाहीर झाली. २८ मे रोजी मतदान आणि ३१ मे रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीची घोषणा होताच दोन्ही जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.निवडणुकीची घोषणा होताच  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शेतकरी विरोधी व ओबीसी विरोधी सरकार असल्याची तोफ डागून खासदारकीचा राजीनामा देणारे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदासंघाचे माजी खासदार नाना पटोले यांनाच कॉंग्रेसने उमेदवारी द्यावी यासाठी दबावगट तयार केला गेला आहे.त्यातच हा मतदारसंघ सध्याच्या घडीला राष्ट्रवादीकडे आहे.जर या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून हा मतदारसंघ काँग्रेसने हिसकावला तर भविष्यात खासदार प्रफुल पटेल यांचे राजकारण संपल्यातच जमा राहणार आहे.त्यामुळे पटेल हा मतदारसंघ काँगेसला सहजासहजी मिळू देणार नाही.त्यामुळेच की काय आज शुक्रवारला प्रफुल पटेल यांनी नागपूरात येऊन राष्ट्रवादीच्या दोन्ही जिल्ह्यातील बैठक घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली.

भाजपला नाना पटोलेंना सह देण्यासाठी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व गोंदियाचे पालकमंत्री इंजि.राजकुमार बडोले हे सुध्दा एक चांगले सक्षम उमेदवार ठरू शकतात.त्यांनी सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून जनतेसाठी केलेले कार्य आणि त्यांच्या कार्यकाळात भाजपला मिळालेले नगरपंचायत व जि.प.निवडणुकीतील यशाचा विचार पक्षाने नक्की करायला काहीही हरकत नाही.सोबतच जर आर्थिक मजबूत उमेदवार म्हणून भाजप माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांचा नावाचा विचार पक्षाने करायला काहीही हरकत नाही.ज्या पध्दतीने गोंदिया विधानसभा मतदारसंघात भाजपला त्यांनी जिवंत केले आहे.त्यांच्या का्र्यकुशलतेमुळे नगरपरिषदेत आलेली सत्ता आणि ग्रामीण भागात ग्रामपंचायतीवर भाजपचे आलेले वर्चंस्वासोबतच दोन्ही मतदारसंघात असलेली त्यांची ओळख व संबध भाजपला लाभदायक ठरू शकते अशा चर्चां सुरु झाल्या असून भाजपने या दोन उमेदावरापैकी एकालाही पटोले निवडणुक लढत असतील तर रिंगणात उतरविल्यास पोटनिवडणुक लक्षवेधणारी ठरु शकते यात शंका नाही.राष्ट्रवादीने हा मतदारसंघ सोडला नाही तर काँग्रेसचे नाना पटोलेंना आघाडी धर्म म्हणून राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करावाच लागणार आहे.राष्ट्रवादीकडून भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांचे नाव आघाडीवर आहे.फुंडे जर उमेदवार राहिल्यास नाना पटोलेसह काँग्रेसचे नेते त्यांना तनमनाने सहकार्य करु शकतात.त्यातच पटोलें व फुंडेची मैत्री कुणापासूनही लपून राहिलेली नाही.सहकार क्षेत्रात सुनील फुंडे यांचे वजन आहे. जिल्हा मध्यतर्वी बँकेचे ते बर्‍याच वर्षांपासून अध्यक्ष आहेत. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात सहकार महर्षी म्हणून ते ओळखले जातात. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या पहिल्या फळीतील ते आहेत. गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय शिवनकर व माजी आमदार मधुकर कुकडे यांचीही दावेदारी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आहे.फुंडे एैवजी गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय शिवणकर यांनाही उमेदवारी मिळाली तर भाजपचे काही नाराज हे शिवणकरांना अप्रत्यक्ष मदत करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भाजपसाठी ही निवडणुक प्रतिष्ठेची असून भाजपने ईच्छुकांच्या जेव्हा मुलाखती नागपूरच्या विभागीय कार्यालयात घेतल्या.त्यावेळी सर्वच इच्छुक उमेदवांरानी पक्ष जो उमेदवार देईल त्यासाठी काम करु मात्र आमच्याकडे पैसा नाही,पक्षाने निवडणुकीचा खर्च करावा अशी अट घातल्याने भाजपनेही खर्च करण्याचे नियोजन केल्याची चर्चा आहे.वास्तविक 2019 च्या निवडणुका लक्षात घेऊनच उमेदवार देण्यात येणार आहे.2019 च्या निवडणुकीसाठी भाजपने कुणबी चेहरा म्हणून आमदार डाॅ.परिणय फुके व भंडारा नगराध्यक्ष सुनिल मेंढे यांच्यावर फोकस करुन ठेवले असले तरी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा भंडारा जिल्ह्यात दर दोनदिवसांनी होणारा दौरा भविष्यातील निवडणुकात महत्वाचा ठरणार आहे. या पोटनिवडणुकीत कुणबी चेहरा म्हणून आमदार परिणय फुके पहिली पंसती आहे,जर फुके यांनी नकार दिला तर भाजप पोवार समाजातील उमेदवार रिंगणात उतरवेल.माजी खासदार डाॅ.खुशाल बोपचे,माजी खासदार शिशुपाल पटले व माजी आमदार व भाजप गोंदिया जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांची नावे सध्या आघाडीवर आहेत.त्यातच भाजप ओबीसी आघाडीचे एड विरेंद्र जायस्वाल यांनीही उमेदवारी मागितली आहे.त्यांनी वकीलीपेसापासून दोन्ही जिल्ह्यात बहुसंख्येने असलेल्या कलार जातीला प्राधान्य मिळेल असेही भाजपकडे म्हटल्याची माहीती समोर आली आहे.भाजपने जायस्वाल यांना उमेदवारी नाकारल्यास ते एैनवेळेवर जो निर्णय घेतील त्यात भाजपला मात्र काहीप्रमाणात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण विद्यमान एकाही आमदाराने होकार दिलेला नाही.त्यामुळे पक्ष विचार करतांना बोपचे यांना जर उमेदवारी दिली तर 2019 चे ते प्रबळ दावेदार असतील त्यावेळी त्यांना नाकारणे धोकादायक ठरू शकते हे अंतर्गत कारण पुढे करुन त्यांच्याएैवजी माजी आमदार हेमंत पटले यांचा नावाचा विचार करुन त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करेल अशी शक्यता आहे.पटले जर पोटनिवडणुकीत निवडूनही आले तर 2019 मध्ये ते प्रबळ दावेदारी न करता अल्पकालावधीतील खासदार म्हणून समाधानी राहू शकतात हा पक्षाचा विचार आहे.त्यातच शिशुपाल पटले हे सुध्दा रिंगणात असले तरी सध्या त्यांच्यानावावर पाहिजे तसा प्रतिसाद नसल्याची सुत्रांची माहिती आहे.काँग्रेसने जर पटोलेंना उमेदवारी जाहिर केली तर भाजप त्यांच्याविरोधात बोपचेंना उमेदवारी देऊन रिंगणात उतरवून ओबीसीसांठी लढणार्या दोन्ही नेत्यांना एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनविण्याचा डाव भाजपची मातृसंघटना खेळण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
शिवसेनेकडून भंडार्‍याचे जिल्हाध्यक्ष इंजि. राजेंद्र पटले यांची उमेदवारी पक्की समजली जात आहे.राजेंद्र पटले यांनी सातत्याने शेतकरी मुद्यावर आक्रमक भूमिका ठेवत आंदोलन सुरुच ठेवले आहे.शिवसेनेकडे त्यांच्याशिवाय दुसरा मतदारही सध्यातरी दिसून येत नाही.गोंदियाचे शिवसेना जिल्हाध्यक्ष मुकेश शिवहरे यांनी लोकसभेएैवजी विधानसभामतदारसंघावर नजर ठेवली आहे.या मतदारसंघात भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात कुणबी, पोवार, तेली, एससी, लोधी व कलार समाज प्रमुख घटक आहेत.जातीय राजकारणात पोवार व कुणबी हे एकमेकांचे राजकीय शत्रुच असल्यासारखे वागत असल्याने हे दोन्ही एकत्र येण्याची शक्यता कमी आहे.

राज्यातील सर्व कृषिपंपांना 2025 पर्यंत सौरऊर्जा – चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई,दि.29 – येत्या 2025 पर्यंत राज्यातील सुमारे 45 लाख कृषिपंपांना टप्प्याटप्प्याने सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्याचे राज्य शासनाचे नियोजन आहे. त्यामुळे कृषिपंपांना दिवसा तसेच पुरेशी व स्वस्त वीज मिळावी, ही शेतकऱ्यांची मुख्य मागणी पूर्ण होईल, सोबतच क्रॉस सबसिडी कमी झाल्याने प्रामुख्याने औद्योगिक व वाणिज्यिक वीजदरसुद्धा कमी होतील, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.ते म्हणाले, कृषिपंपांसोबतच राज्यातील नळयोजना व उपसा जलसिंचन योजना संपूर्णपणे सौरऊर्जेवर आणण्याची अंमलबजावणी सुरू आहे. गावांमधील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांचे 7.5 एचपीपर्यंतचे पंप लवकरच सौरपंपांनी बदलण्याचे काम हाती घेण्यात येत आहे. राज्यात 14 हजार 400 मेगावॉटचे अपांरपरिक ऊर्जानिर्मिती करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे. येत्या डिसेंबर 2019 पर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मोठ्या संस्थांनी सौरऊर्जा प्रकल्प उभारावेत. ही वीज शासन खरेदी करेल. सोबतच केंद्र सरकारच्या “एनर्जी एफिशिअन्सी सर्व्हिसेस लिमिटेड’ कंपनीसोबत (ईईएसएल) 200 मेगावॉट क्षमतेचे सौर प्रकल्प उभारण्याचे करार झाले आहेत. ऊर्जा संवर्धन व व्यवस्थापन क्षेत्रात सहभागी स्पर्धकांनी आजपर्यंत सुमारे 3928 कोटी रुपयांचे ऊर्जाबचत साध्य केली आहे, अशी माहिती त्यांनी या वेळी दिली.

छेडखानीला कंटाळून युवतीची आत्महत्या

साकोली,दि.29ः-दोन युवकांच्या छेडखानीला कंटाळून एका युवतीने स्वत:ला पेटवून आत्महत्या केली. ही घटना २५ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास साकोली येथील सिव्हील वॉर्डात घडली. रश्मी महेंद्र साखरे (२५) रा. सिव्हील वॉर्ड, असे मृतक युवतीचे नाव आहे.
आशिष नंदेश्‍वर व युवराज शहारे रा. साकोली अशी आरोपींची नावे आहेत. आशिष याने विधी शाखेचे (एलएलबी) शिक्षण पूर्ण केले असून तो स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासोबतच स्पर्धा परीक्षेचे वर्ग घेत होता. त्याचे साकोलीतीच एक हॉटेल आहे. तर रश्मी ही बीएससी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी होती. बुद्ध विहाराजवळील लायब्ररीमध्ये आशिष व रश्मी हे अभ्यास करण्यासाठी जात असत. काही दिवसांपुर्वी आरोपी आशिष याने रश्मीला आंघोळ करताना बघितले होते. त्यानंतर तो तिला अश्लिल शब्दात बोलून तुझा खून करतो, असे म्हणत होता. तसेच आशिषच्या हॉटेलमध्ये काम करणारा युवराज शहारे यानेसुद्धा तिची छेड काढली होती. त्यानंतर दोन्ही आरोपी रश्मीला अधुनमधून त्रास देत होते. या त्रासाला कंटाळून २५ एप्रिल रोजी रश्मीने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. गंभीररित्या जळालेल्या रश्मीला आधी साकोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात व त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
याप्रकरणी साकोली पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३0६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक वर्मा करीत आहेत. घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार आहेत. यातील युवराज शहारे हा मुळचा गोरेगाव तालुक्यातील तेढा येथील रहिवासी असून तिथेसुद्धा युवतींची छेड काढत होता. दरम्यान, माझ्या मुलीच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या दोन्ही आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करावी, अशी मागणी रश्मीच्या आईवडिलांनी पत्रकार परिषदेत केली.

जातनिहाय जनगणना होणे आवश्यक-गोरे

गडचिरोली,दि.29 : ओबीसींची जातनिहाय जनगणना भारतीय संविधानानुसार आजतागायत झालेली नाही. शासनाच्या वतीने सन २०११ मध्ये जनगणना करण्यात आली. मात्र ही जनगणना जातनिहाय असल्याचे अद्यापही जाहीर करण्यात आले नाही. त्यामुळे ओबीसींवर सातत्याने अन्याय होत आहे. जातनिहाय जनगणना करून ती जाहीर केल्यास ओबीसी प्रवर्गातील विविध पोटजातीत विभागलेल्या सर्व कुटुंबांचा आर्थिक स्तर तंतोतंत कळणार आहे. जातनिहाय जनगणनेतून ओबीसींचे बहुतांश प्रश्न सुटतील, असे मत ओबीसी शोषित संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर गोरे यांनी मांडले. पत्रकार परिषदेला सुनीता काळे, माया गोरे, प्रा. देवानंद कामडी, दादाजी चापले, सुरेश भांडेकर, गोवर्धन चव्हाण, प्राचार्य खुशाल वाघरे, अरूण मुनघाटे, रमेश भुरसे आदी उपस्थित होते.
भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटनेच्या वतीने ११ एप्रिलपासून समताभूमी फुलेवाडा येथून संविधानिक न्याययात्रा काढण्यात आली असून ही यात्रा २८ एप्रिलला शनिवारी गडचिरोलीत पोहोचली. यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संविधानिक न्याययात्रेतून महाराष्ट्रातील समस्त ओबीसींना आपल्या अधिकार व हक्काप्रती जागृत करण्याचे काम केले जात आहे, असे प्रा. गोरे यांनी यावेळी सांगितले. सदर संविधानिक न्याययात्रा संपूर्ण महाराष्ट्रात निघणार आहे. सदर यात्रा गडचिरोलीत शनिवारी पोहोचल्याचा हा १८ वा दिवस आहे. विविध सात संघटनांनी एकत्र येऊन ही यात्रा काढली आहे, असे प्रा. रमेश पिसे यांनी सांगितले. याप्रसंगी प्रा. शेषराव येलेकर यांनी सदर संविधानिक न्याययात्रेतून शासनावर दबाव टाकण्याचे काम सुरू आहे. सर्वांची जातनिहाय जनगणना करून ती जाहीर करण्यात यावी, जेणेकरून खऱ्या मागासवर्गीयांना शासकीय सवलतीचा लाभ देणे सुलभ होईल.
११ मे रोजी चैत्यभूमी दादर मुंबई येथे या न्याययात्रेचा ५० हजार लोकांच्या उपस्थितीत समारोप होईल, असे पदाधिकाºयांनी सांगितले.

वर्षभरात आता चारच ग्रामसभा, ग्रामसेवकांना दिलासा

गोंदिया,दि.29 : वारंवार होणाऱ्या ग्राम सभांना चाप लावत आता ग्रामविकास विभागाने त्या संबंधीचे वेळापत्रकच आखून दिले आहे. त्यामुळे सतत ग्रामसभा घेण्याचेच काम करावे लागणाºया हजारो ग्रामसेवकांना दिलासा मिळाला आहे.त्यातच इतर विभागांना एखाद्या विषयावर ग्रामसभा घ्यावयाचे असल्यास आधी ग्रामविकास विभागाकडून परवानगी घ्यावी असेही म्हटले आहे.
ग्राम पंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार वर्षातून चारवेळा ग्रामसभा घेणे अपेक्षित आहे. मात्र, राज्य शासनाच्या इतर प्रशासकीय विभागाकडून राबविण्यात येणाºया महत्त्वाच्या योजना किंवा फ्लॅगशिप कार्यक्रमांच्या अनुषंगाने ग्रामसभा घेण्याबाबतचे आदेश आयत्यावेळी किंवा अल्पसूचनेवर जिल्हा परिषदांना देण्यात येतात. त्यामुळे वर्षभरात होणाºया ग्रामसभांची संख्या वाढत आहे. सतत ग्रामसभा घेतल्याने ग्रामस्थांचा त्यांना अल्प प्रतिसाद मिळतो व त्यांच्या आयोजनाचा हेतूही साध्य होत नाही. तसेच ग्रामसभेतील विषयसुचीवर सुयोग्य चर्चा न होता काही विपरित घटना घडत असल्याचे निदर्शनास आल्यावर ग्रामविकास विभागाने नवा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार, वित्तीय वर्षातील चारपैकी पहिली ग्रामसभा ही वित्तीय वर्षातील पहिल्या दोन महिन्यांतच झाली पाहिजे आणि दुसरी सभा दरवर्षी नोव्हेंबरमध्येच घ्यावी लागेल. या शिवाय, आॅगस्टमध्ये एक आणि २६ जानेवारी रोजी दुसरी अशा बैठका घ्याव्यात. केंद्र वा राज्य सरकारच्या फ्लॅगशिप योजनांची माहिती या चार ग्रामसभांमध्ये द्यावी लागणार आहे. शासनाच्या ज्या विभागांना ग्रामसभेत योजनांची माहिती द्यावयाची आहे त्या विषयी त्यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना आगाऊ कळवावे लागणार आहे. या चार व्यतिरिक्त एखादी ग्रामसभा कोणत्याही शासकीय विभागास आयोजित करावयाची असेल तर त्यांना ग्रामविकास विभागाकडे तसा प्रस्ताव द्यावा लागेल.

देवरी-आमगाव रोड वर अपघातांचे वाधते प्रमाण


Saturday 28 April 2018

राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे- जिल्हाधिकारी काळे

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर
गोंदिया,दि.२८ : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यादृष्टीने भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर २८ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींची बैठक घेवून निवडणूकीसंदर्भात माहिती दिली, त्यावेळी श्री.काळे बोलत होते. यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
श्री.काळे पुढे म्हणाले, भारत निवडणूक आयोगाने भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. यासंबंधिची अधिसूचना जारी करण्यात आली असून आचारसंहितेची माहिती सुध्दा निवडणूक आयोगाने दिली आहे. बैठकीला उपजिल्हाधिकारी (सामान्य) शुभांगी आंधळे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, नायब तहसिलदार (निवडणूक) राजश्री मलेवार, तसेच जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस व बहुजन समाज पार्टीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

शहरातील पेट्रोलपंप चालकांचा बंदचा इशारा

गोंदिया,दि. २८ः-शहरातील टिबीटोली परिसरातील बिसेन पेट्रोलपंपावर लूटमार व कर्मचाèयाला मारहाण केल्याप्रकरणी तातडीने कारवाई न झाल्यास  शहरातील पेट्रोल पंप चालकांनी बंद ठेवण्याचा इशारा गोंदिया जिल्हा पेट्रोल पंप डिलर्स असोसिएशनने निवेदनातून संबंधित प्रशासनाला दिला आहे.
गेल्या काही काळात शहरातील पेट्रोल पंपावरील कर्मचाèयांना शिवीगाळ, मारहाणीच्या घटनेत वाढ झाली आहे. त्यामुळे पेट्रोलपंपावरील कर्मचारी व पेट्रोलपंप चालकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. त्यातच २८ एप्रिल रोजी टीबीटोला येथील बिसेन पेट्रोल पंपावर लूटमार व कर्मचाèयाला मारहाणीची घटना घडली. या घटनेच्या निषेधार्थ व पेट्रोलपंपावर सुरक्षा पुरवून अशा असामाजिक तत्वांना आळा न घातल्यास त्वरीत  कारवाई न गोंदिया जिल्हा पेट्रोल पंप डिलर्स असोसिएशनने शहरातील सर्व पेट्रोलपं बंद करण्याचा इशारा दिला आहे. सदर मागणीचे निवेदन गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, रामनगरचे पोलीस निरीक्षक यांना याबाबतचे निवेदन २८ एप्रिल रोजी देण्यात आले. यावेळी गोंदिया जिल्हा पेट्रोल पंप डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रविण बोपचे, अमरqसह, गोंदिया शिवसेना तालुका प्रमुख अमरसिंह आदी उपस्थित होते.

एसआरपीएफच्या पोलिस उपनिरीक्षकाची गोळी झाडून आत्महत्या

गडचिरोली,२८  पोलिस मुख्यालयानजीक असलेल्या राज्य राखीव पोलिस दलाच्या लघु मुख्यालयात  कार्यरत पोलिस उपनिरीक्षकाने स्वतःवर बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना आज २८ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.
राजेंद्र इंगळे (५३)  असे आत्महत्या करणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. इंगळे हे एसआरपीएफच्या गट क्रमांक ४ मध्ये कार्यरत होते, अशी माहिती प्राप्त झाली आहे. नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याबाबत माहिती मिळू शकली नाही. घटनेचा तपास गडचिरोली शहर पोलिस करीत आहेत.

पोलीस भरती घोटाळा प्रकरणी आणखी तिघांना अटक

नांदेड,दि.28- नांदेड जिल्हा पोलीस भरती घोटाळा प्रकरणी नांदेड पोलिसांनी आणखी तिघांना अटक केली आहे. न्यायालयाने या तिघांना ४ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. व पूर्वी अटक झालेल्या बारा जणांना सात दिवसाची पोलीस कोठडी आधीच मिळाली आहे दरम्यान, या भरती घोटाळ्याचा तपास आता सहायक पोलीस अधीक्षक विशाल खांबे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.नांदेड पोलीस भरतीत पोलीस शिपाई पदासाठी एप्रिल महिन्यात झालेल्या लेखी परिक्षेत १३ विद्यार्थ्यांना ९० पेक्षा जास्त गुण मिळाल्याने पोलिसांना याचा संशय आला.यातील बारा आरोपींना यापूर्वी अटक करण्यात आली होती. या सर्वांना ३ मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
शुक्रवारी रात्री पोलिसांनी या तपासाची चक्रे वेगाने फिरवत कृष्णा जाधव (रा.सावरखेड भोई ता.देऊळगाव राजा), हनुमान भिसाडे (रा.रिसोड जि.वाशिम) आणि नांदेड जिल्ह्यातील बहाद्दरपूरा ता. कंधार येथील रहिवाशी रामदास भालेराव या तिघांना अटक केली. शनिवारी या तिघांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना ४ मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता सदरचा तपास सहायक पोलीस अधीक्षक विशाल खांबे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

तलाव खोलीकरणाच्या कामावर मजुराचा मृत्यू

गोंदिया,दि.28ः-दवनीवाडा पोलिस ठाण्यांतर्गत लोहारा येथे वन विभागाच्या जागेवरील जुन्या तलावाचे खोलीकरणाचे काम महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनांतर्गत सुरू करण्यात आले. उन्हात काम करत असलेल्या ५९ वर्षीय मजुराची अचानक प्रकृती खालावल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना काल (दि.२६) दुपारी ११.३0 वाजता सुमारास घडली. अंगदलाल हगरु नागपुरे (५९) रा. लोहारा असे मृत मजुराचे नाव आहे. मजुराच्या अचानक झालेल्या मृत्यूला घेऊन ग्रामस्थांनी अडचणीत आलेल्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी केली आहे.
तालुक्यातील लोहारा येथे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रस्ता बांधकाम व तलाव खोलीकरणाचे काम सुरू करण्यात आले. यातच मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या रस्ता बांधकाम पूर्ण झाल्यानंतर (ता.२६) पुन्हा वन विभागाच्या जागेवर असलेल्या जुन्या तलावाचे खोलीकरणाचे काम सुरू करण्यात आले. यात ९२ मजूर काम करीत होते. दुपारी ११.३0 वाजता सुमारास अंगदलाल हगरु नागपुरे (५९) रा. लोहारा हा काम करत असताना बेशुद्ध होवून खाली पडला. त्याला उपचाराकरीता अत्यवस्थेत गोंदिया येथील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आल. दरम्यान, डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले. रोहय़ोच्या कामावर अचानक झालेल्या मृत्यूला घेवून लोहारावासीयांनी आर्थिक मदतीची मागणी केली आहे. या घटनेची नोंद गोंदिया शहर ठाण्यात करण्यात आली आहे.

त्या चकमकीतील ५ नक्षलांचे मृतदेह अद्यापही घरच्यांनी स्विकारले नाही

गडचिरोली,दि.28 : गडचिरोली जिल्ह्यातील ऐतिहासिक चकमक म्हणजे भामरागड तालुक्यातील ताडगाव (कसनसूर) हि चकमक संपूर्ण देशात गाजली होती. तसेच जिमलगट्टा उपविभागातील नैनेर परिसरात सुद्धा ६ नक्षलांना पोलिसदलाने ठार केला या दोन चकमकीत एकुण ३९ नक्षलांना कंठस्थान मिळाले होते. तसेच यामध्ये महाराष्ट्र, छत्तीसगड येथील नक्षलांचा समावेश होता. १८ नक्षलांची ओढक पटली असून १३ नक्षलांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना सोपवण्यात आले. मात्र ५ नक्षलांच्या कुटुंबाचे अद्यापही थांगपत्ता लागलेला नाही.
तसेच या ५ मृतदेहामध्ये सुमन कुळयेटी रा. पडतनपल्ली ता. भामरागड जि.गडचिरोली, शांताबाई उर्फ मंगली पदा रा.गंगलूर जि. बिजापूर (छ.ग.), तिरुपती उर्फ धर्मु पुंगाटी रा. केहकापहारी ता. भामरागड जि. गडचिरोली, राजू उर्फ नरेश कुटके वेलादी रा.जिजगाव ता. भामरागड जि. गडचिरोली, क्रांती पश्चिम बस्तर परिसर (छ.ग.) असे या नक्षल मृतकाचे नाव असून हे मृतदेह ग्रामीण रुग्णालय गडचिरोली येथे ठेवण्यात आलेला आहे. तसेच अद्यापही या ५ नक्षलांचे नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला नसल्याने पोलीस अधिक्षकांनी नक्षलांच्या कुटुंबियांना आव्हान केले आहे कि, या नक्षलांच्या नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालय किंवा पोलीस अधिक्षक कार्यालय गडचिरोली येथे संपर्क करून हे मृतदेह ताब्यात घ्यावे. तसेच इतर ठार झालेल्या नक्षल मृतदेहची ओढक असेल तर संपर्क करावा.

Friday 27 April 2018

ब्लॉसमच्या रिव्यानीने जगाला सोडून जातांना दिला अवयव दानाचा संदेश

रिव्यानीचा  शालेय कार्यक्रमातील फोटो 
चिमुकलीच्या अवयव दानाचा निर्णय घेऊन समाजाला एक नवीन संदेश
देवरी- २७ एप्रिल ( सुजित टेटे ) ब्लॉसम पब्लिक स्कूल देवरी येथे केजी-२ वर्गामध्ये शिकत असलेल्या रिव्यानी (५ वर्षे )राधेश्याम रहांगडाले हि मुलगी शालेय परीक्षा संपल्यावर आपल्या  कुटुंबासोबत उन्हाळी सुट्ट्या आनंदाने घालवत होती. मामासोबत दुचाकी वरून प्रवास  करत असतांना एक मद्यधुंद व्यक्तीने समोरा समोर दुचाकीला धडक दिली असता या मुलीचा १९ एप्रिल ला दुर्दैवी अपघात झाला. या अपघातात तिच्या डोक्याला जबर दुखापत झाली आणि तिला नागपूर येथे हलविण्यात आले. चिमुकली रिव्यानी ७ दिवसापासून मृत्यूशी झुंज देत असतांना आज तिला मृत घोषित करण्यात आले. तिचे बाबा पोलीस विभागात कार्यरत असून आई गृहिणी आहे . सदर बातमी देवरी येथे पसरताच सर्वीकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
जाताजाता मुलीच्या अवयव दाना मुळे कुणाला तरी जग बघता येणार या दूरदृष्टीने आई वडील आणि समस्त कुटुंबाने तिचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला असून तिचे ५ अवयव - हृदय , डोळे , लिव्हर ,किडनी इत्यादी अवयव आज नागपूर येथे दान करण्यात आल्याची माहिती वडील राधेश्याम रहांगडाले यांनी दिली. चिमुकली जग सोडून गेली पालकांना  दुःखाचे डोंगर असतांना देखील सदर अवयव दानाचा निर्णय घेऊन समाजाला एक नवीन संदेश या चिमुकलीने आणि कुटुंबाने दिलेला आहे.    
शाळेत अत्यंत हुशार आणि सदा हसमुख  रिव्यानी नर्सरी वर्ग पासून देवरी येथील ब्लॉसम शाळेत शिक्षण घेत होती. विशेष म्हणजे या वर्षी पार पडलेल्या वार्षिक स्नेहसंमेलन मध्ये तिने सर्वांना अवयव दानाचा संदेश दिलेला होता. सर्व पालक वर्ग, विध्यार्थी , शिक्षक , मुख्याध्यापक आणि शालेय व्यवस्थापनांनी आपापल्या स्तरावरून श्रद्धांजली वाहली. 
रिव्यानी चे अंतिम संस्कार दिनांक -२८/०४/२०१८ ला त्यांचे मूळ गाव भजीयापार ( आमगाव रेल्वे क्रॉसिंग) येथे पार पडणार आहे. 

Thursday 26 April 2018

भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक २८ मे रोजी

गोंदिया,दि.२६- केंद्रिय निवडणुक आयोगाने आज भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसह देशातील ३ लोकसभेच्या पोटनिवडणुका व १० विधानसभा जागाची पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहिर केला असून २८ मे रोजी मतदान व ३१ मे रोजी मतमोजणी होणार आहे.३ मे पासून १० मे पर्यंत निवडणुक अर्ज दाखल करण्यात येणार आहे १४ मे रोजी  उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.२८ मे सोमवारला मतदान तर ३१ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

Wednesday 25 April 2018

सरकारच्या बहुजन नीतीविरोधात परिवर्तन यात्रा आज गोंदियात

गोंदिया,दि.25 : मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे यांनी कोेरेगाव भीमा दंगल घडवून आणल्यानंतरही सरकार त्यांना पाठीशी घालत आहे. दंगलीची न्यायालयीन चौकशी होण्यापूर्वी भिडेला क्लीन चिट देण्यात आली. दंगलीचा सूत्रधार भिडेला अटक करून, भिडे-एकबोटेला फाशी द्यावी, तसेच सरकारच्या बहुजन नीतीविरोधात वामन मेश्राम यांच्या नेतृत्वात २४ एप्रिल ते ३ जून दरम्यान परिवर्तन यात्रा काढण्यात आली आहे. संविधान चौकातून शिरोमणी अकाली दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष सिमरनजितसिंग मान यांच्या उपस्थितीत परिवर्तन यात्रेला सुरुवात झाली.ही यात्रा आज गोंदिया जिल्ह्यात दाखल झाली आहे.
ही यात्रा महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यामध्ये ३६७ तालुक्यात जाणार आहे. पुणे येथे ३ जून रोजी यात्रेचे समापन होणार आहे. परिवर्तन यात्रेत बहुजन क्रांती मोर्चा बरोबरच आॅल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड, शिरोमणी अकाली दल, सेंगल अभियान, राष्ट्रीय लिंगायत मोर्चा, संभाजी ब्रिगेड, राष्ट्रीय नाभिक महासंघ, सत्यशोधक मूलनिवासी वारकरी संघ, आॅल इंडिया जैन-ओबीसी आॅर्गनायझेशन, राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ, जमियत ए उल्मा हिंद आदी संघटनेचा सहभाग आहे. परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाचा अ‍ॅट्रॉसिटीच्या विरोधात आलेला निर्णय, न्यायपालिकेतील जातीय पूर्वग्रह, शेतकरी, कष्टकरी, मजूर, विद्यार्थी, महिला, अल्पसंख्यांक यांच्यावरचे अन्याय, ईव्हीएममधील भ्रष्टाचार आदी विषयावर जनजागृती करण्यात येणार आहे. या मोर्चात लिंगायत मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोरणेश्वर स्वामी अप्पा, प्रसिद्ध इतिहासकार प्रा. मा.म. देशमुख, आदिवासीचे राष्ट्रीय नेते सालखन मुरमु, खिश्चन धर्मगुरू डॉ. बिशप प्रदीप कांबळे, बी.एस. हस्ते, प्रा. वंदना बेंझमिन, प्रा. सुषमा भड, हाफिज अशरफ , प्रा. विलास खरात, रमेश पिसे, मौलाना शोऐब, हाफिज शमशुद्दीन, डॉ. आसिफुजमा खान आदी सहभागी झाले आहेत.

साप्ताहिक बेरार टाईम्सच्या ताज्या अंकासाठी क्लिक करा https://berartimes.blogspot.in/2018/04/berartimes25apr-01may2018.html





प्रधानमंत्री राष्ट्रीय सुरक्षा मिशन माहिती संकलन मोहिम १५ एप्रिल ते २१ मे ३० एप्रिलला ग्रामसभा

गोंदिया,दि.२४ : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री राष्ट्रीय सुरक्षा मिशन योजनेअंतर्गत राष्ट्रीय आरोग्य संरक्षण मिशन जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. लाभार्थी यादीमध्ये समाविष्ट असलेल्या प्रत्येक कुटूंबाला प्रतिवर्षी ५ लाख रुपये आरोग्य विमा संरक्षण दिले जाणार आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण लाभार्थी पडताळणी व अतिरिक्त माहिती संकलन मोहिम १५ एप्रिल ते २१ मे २०१८ या कालावधीत जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. अतिरिक्त माहिती संकलन मोहिमेमध्ये लाभार्थ्याचा मोबाईल क्रमांक, शिधापत्रिका क्रमांक व कुटंबाच्या सद्यस्थितीमधील बदल याबाबत माहिती घेणे आवश्यक आहे. ३० एप्रिल रोजी ग्रामसभेत याद्यांचे वाचन करुन अतिरिक्त माहिती संकलन करण्यात येणार आहे. ग्रामसभेत उपस्थित न राहणाऱ्या कुटूंबाची माहिती संकलीत करण्यासाठी प्रत्येक तालुक्याला ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका, आशा सेविका यांची पथके तयार करण्यात आली आहे. संकलीत केलेली माहिती ७ मे २०१८ नंतर वेबसाईटवर अपलोड केली जाणार आहे.
तरी सर्व नागरिकांनी ३० एप्रिल रोजी ग्रामसभेला उपस्थित राहून माहिती संकलीत करण्यास सहकार्य करावे. ग्रामसभेला येतांना स्वत:चा मोबाईल क्रमांक, शिधापत्रिका सोबत आणणे आवश्यक आहे. त्यामुळे अधिकाधिक कुटूंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ सुरक्षा मिशन योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेमधील पात्र लाभार्थ्यांना भारतातील कोणत्याही अंगिकृत रुग्णालयात शस्त्रक्रिया व उपचाराच्या माध्यमातून लाभ मिळणार आहे. असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे यांनी कळविले आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण रस्ते विकासासाठी पाऊणे सात कोटीचा निधी


Image result for rural roads

३०५४ आणि ५०५४ अंतर्गत होणार ३२ रस्ते बांधकाम

सुरेश भदाडे

गोंदिया,२४- गोंदिया जिल्ह्यातील आठ तालुक्यातील ३२ रस्त्यांच्या बांधकामासाठी जिल्हा नियोजन मंडळाने ३०५४ आणि ५०५४ या शीर्षाखाली २०१७-१८ या वर्षात सहा कोटी ७५ लाख रुपये एवढा निधी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला वर्ग केला आहे. सर्वाधिक निधी हा देवरी तालुकाच्या वाट्याला आला असून आमगाव तालुक्याला ३३ लाखाचा निधी प्राप्त झाला आहे.
 सन २०१७-१८ या वर्षात जिल्हा नियोजन मंडळाने गोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यातील एकूण ३२ ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी ३०५४ आणि ५०५४ या शीर्षाखाली ६ कोटी ७५ लाखाचा निधी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे वर्ग केला आहे. परिणामी, ग्रामीण रस्त्यांचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होणार आहे. या कामाची यादी नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंजूर करण्यात आली आहे. या अंतर्गत गोंदिया तालुक्यातील ३ रस्ते, तिरोडा येथील ३ रस्ते, गोरेगाव येथील २ रस्ते, सडक अर्जूनी येथील ४, मोरगाव अर्जूनी येथील ५ रस्ते, देवरी येथील ९ रस्ते, सालेकसा येथील ३ रस्ते आणि आमगाव तालुक्यातील ३ रस्ते कामांचा समावेश आहे. 
जिल्ह्यातील तालुका निहाय कामाचा तपशील पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे हे निधी दर्शवितात

गोंदिया
१)पांढराबोडी ते कुडवा रतनारा (३५लाख), गोंदिया qपडकेपार (२८.८४ लाख), फुलचूरटोला ते बोरगाव तालुका सीमा रस्ता (२३.५७ लाख)
गोरेगाव 
सटवा पिपरटोला रस्सा (४४.५७ लाख), तांडा दवडीपार सोनी रस्ता (१६.४५ लाख)
तिरोडा 
नवीन बसस्टॉप ते मलपूरी रस्ता ( २५ लाख), मुंडीपार कवलेवाडा रस्ता (२१.२२लाख), खैरलांजी चांदोरी बिहीरीया रस्ता (१७.०७)
सडक अर्जूनी 
परसोडी डोंगरगाव चांगोटोला रस्ता (१५ लाख), तिडका जोडरस्ता मजबुतीकरण (२० लाख), घोटबोरी पोचमार्ग (२१.३९),  परसोडी घाटबोरी(ते) मरारटोली कोदामेढी तिडका सावंगी रस्ता (२०.८२)
अर्जूनीमोर मुंगली चान्ना कोडका रस्ता (२० लाख), गुढरी सिरेगावबांध रस्ता (२१.४१), सोमलपूर सिरेगाव रस्ता (२०.००). इसापूर माहुरकुडा पांढरवाणी जोडरस्ता (२२.६८),अर्जूनी मोर निलज महागाव अरूणनगर इंदोरा रस्ता (२४.४२)
देवरी 
चिचगड देवलगाव रस्ता (१६.५०) आमगावदेवरी ते पाऊळदौना रस्ता (२१.००), मेहताखेडा खोडेबेदर (२०.५०) मुल्ला हेटीटोला चारभाटा (१६.००), प्रमुख जिल्हा मार्ग २५ ते लभानधारणी रस्ता (१९.२४), सुकळी गोपीतलाव पिपरखारी (२०.००), बोरगाव- गोटाबोडी फुटाणा (२४.१६), चिचगड सुकळी मगरडोह (२५.००), बोरगाव- गोटाबोडी फुटाणा (१४.४२)
आमगाव 
इर्री ते करंजी रस्ता (१६.४७), गुदमा सितेपार रस्ता (१६.४७), गिरोला बोदलबोडी पदमपूर रस्ता (१२.१७)
सालेकसा
हलबीटोला सिताटोला ग्रा.मा.८४ (१८.२२), टोयागोंदी चांदसुरज रस्ता (२३.००),नवाटोला कोसमतर्रा गोर्रे ते आमगाव खुर्द रस्ता (१५.२२)

Tuesday 24 April 2018

मुख्यमंत्री पाणी पुरवठा योजनेचे दवडीपार येथे भूमिपूजन

गोरेगाव,दि.24: मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद गोंदियाच्यावतीने दवडीपार येथे नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष हमीद अल्ताफ अकबर अली, पंचायत समिती सभापती माधुरी टेंभरे, उपसभापती लीना बोपचे,माजी शिक्षण सभापती पी.जी.कटरे, पं.स.सदस्य राणी रहांगडाले, सरपंच दमयंता कटरे, उपसरपंच सविता डोनेकर,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष हि.द.कटरे,माजी प.स.सदस्य साहेबलाल कटरे,मालिकराम कटरे,पुनेश्वर राऊत,राध्येश्याम सोनवाने,उपविभागीय अभियंता वाघमारे,जनगजी पटले,नुतनलाल कटरे,रमेश कटरे,संतोष डोनेकर,सेवा सहकारी संस्था अध्यक्ष देवचंद बिसेन आदी गावकरी उपस्थित होते.

५० हजारांची लाच स्वीकारताना गडचिरोली एसडीओ कार्यालयाचा लिपीक एसीबीच्या जाळ्यात


गडचिरोली, दि.24: गिट्टीची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कुठलीही कारवाई न करण्यासाठी संबंधित ट्रकच्या मालकाकडून ५० हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कनिष्ठ लिपिक साईनाथ नागोराव हमांद(३२) यास रंगेहाथ पकडून अटक केली.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्ता हा नागपूर येथील रहिवासी असून, त्याचा बिल्डिंग मटेरियलचा व्यवसाय आहे. त्याचे स्वत:चे १० ट्रक असून, त्याद्वारे तो गिट्टी, रेती व गौण खनिजाची वाहतूक करीत असतो. २१ एप्रिल २०१८ रोजी त्याच्याकडील ५ ट्रकमध्ये प्रत्येकी १५.५ टन गिट्टी भरुन पहाटे १ वाजता तो उमरेड तालुक्यातील पाचगाव येथील सरगम स्टोन प्लँट येथून गडचिरोली जिल्ह्यातील गोविंदपूर येथील इंगवले पाटील यांच्या हॉटमिक्स प्लांटकरिता रवाना झाले. त्यानंतर कनिष्ठ लिपिक साईनाथ हमांद याने ३ ट्रक अडवून रॉयल्टीची वेळ १५ मिनिटांपूर्वीच संपल्याचे सांगून ट्रक ताब्यात घेतले.  तसेच चालकाकडील परवाना आपल्याकडे ठेवला व कोणतीही कारवार्ई न करता ट्रक सोडून दिले. त्यानंतर ट्रक मालकाने साईनाथ हमांद याच्याशी संपर्क साधला असता ट्रकवर कोणतीही कायदेशिर कारवाई न करता सोडून दिल्याचा मोबदला म्हणून व रॉयल्टीचे दस्तऐवज परत करण्याकरिता प्रत्येक ट्रकमागे ३० हजार याप्रमाणे ९० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती तो ५० हजार रुपये स्वीकारण्यास तयार झाला.
मात्र, लाच देण्याची तक्रारकर्त्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार एसीबीच्या अधिकाऱ्यांनी काल सापळा रचून आरोपी साईनाथ हमांद यास तक्रारकर्त्याकडून ५० हजार रुपयांची लाच पंचांसमक्ष स्वीकारताना रंगेहाथ पकडून अटक केली. एसीबीने हमांद याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७,१३(१)(ड) व १३(२) अन्वये  गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.एसीबीचे पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस निरीक्षक कविता ईसारकर, पोलिस निरीक्षक गणेश कदम, हवालदार अशोक बैस, अमोल फिस्के, श्री.कळंबे, राजेश तिवारी यांनी ही कारवाई केली.

नक्षलवाद्यांना पुन्हा एक हादरा;दुसऱ्या चकमकीत 6 नक्षलवादी ठार




गडचिरोली,दि.24ः जिल्ह्यात ४८ तासांत झालेल्या दुसऱ्या चकमकीत सोमवारच्या सायकांळी सहा नक्षल्यांना ठार मारण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. मृतकांमध्ये जहाल नक्षली आणि नक्षल्यांच्या विभागीय समितीचा सदस्य नंदूचा समावेश असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. अहेरी तालुक्यातील राजाराम खांजा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पत्तीगावच्या जंगलात सोमवारी सायंकाळच्या सुमारास ही चकमक झाली.
पत्तीगावच्या जंगलात कसनसूर-बोरियाच्या चकमकीतून बचावलेले काही माओवादी असल्याची माहिती अतिरीक्त पोलिस अधीक्षक राजा आणि हरी बालाजी यांना मिळाली होती. तातडीने या दोन्ही अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात सी-६० कमांडोचे पथक या भागात पोहचले. शोध मोहीम राबवित असतानाच दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. जवानांनीही प्रत्युत्तर दिल्याने चकमक उडाली. गोळीबार थांबल्यानंतर घटनास्थळाचा शोध घेण्यात आला असता सहा नक्षल्यांचे मृतदेह सापडले. रात्री उशिरा या नक्षल्यांचे मृतदेह अहेरीच्या प्राणहिता मुख्यालयात आणण्यात आले. बोरियाच्या जंगलातील चकमकीनंतर नक्षलवादी बॅकफूटवर गेल्याची चर्चा होत असतानाच पुन्हा सहा ठार झाल्याने चळवळीला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, सोमवारी बोरियाच्या जंगलातील चकमकीत ठार झालेल्या १६पैकी १२माओवाद्यांची ओळख पटविण्यात आली. इतर चार माओवाद्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू होते.

भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणुक याचिकेवरील सुनावनी राखून ठेवली



नवी दिल्ली/गोंदिया,दि.२३-भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेकरीता पोटनिवडणुक घेण्यात येऊ नये याकरीता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती.ती याचिका फेटाळल्यानंतर याचिकाकत्र्याने सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली.त्या याचिकेवर आज २३ एप्रिल रोजी सुनावनी अपेक्षित होती.दरम्यान न्यायाधिशांनी ती याचिका पुढच्या सुनावनीपर्यंत राखून ठेवली आहे. याचिका क्रमांक ९९६८-२०१८ ही प्रमोद गुडदे नामक युवकाने भारत निवडणुक आयोगाविरुध्द दाखल केली आहे.त्या याचिकेवर आज सोमवारला मुख्य न्यायाधिश दिपक मिश्रा यांनी नेमलेल्या  न्यायाधिश ए.एम.खानविलकर व न्यायाधिश डी.वाय.चंद्रचुड यांच्या बेंचसमोर सुनावनी होणार होती. सुनावनीकरीता याचिकाकर्ता गुडदेच्यावतीने एड.विकास सिंग,एड.अनघा देसाई,एड.मेहमूद उमर फारुखी,एड.सत्यजित देसाई बाजू मांडणार होते.दरम्यान दुपारी १२ वाजेच्या सुमारास जेव्हा याचिका सुनावनीकरीता आली तेव्हा याचिकाकत्र्याचे मुख्य वकील हे दुसèया एका प्रकरणात व्यस्त राहिल्याने ४ वाजेची वेळ मागण्यात आली.त्यानंतर ४ वाजेच्या सुमारास जेव्हा सुनावनी करण्यात आली तेव्हा मात्र न्यायाधिश महोदयांनी याचिका राखून ठेवत त्यावर नंतर निर्णय देण्याचे ठरविल्याने आज या याचिकेवर निर्णय होऊ शकला नाही.यावरुन याचिकाकत्र्याचे वकील हे कुठल्याही परिस्थितीत वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न करीत पोटनिवडणुक टाळण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचेच दिसून येते.या याचिकेमागे सत्ताधारी राजकीय पक्षाचाच हात असल्याचे मात्र जवळजवळ निश्चित झाले आहे.जे वकील याप्रकरणात सुप्रिम कोर्टात याचिकाकर्त्याची बाजू मांडत आहेत,ते वकिल नामाकिंत असून त्यांची फिसही तेवढीच महत्वाची आहे.

सावली नजीक एसटीबसला अपघात

देवरी,दि.24- गोंदियावरून प्रवासी घेऊन देवरीकडे निघालेल्या एसटी बसला सावली-डोंगरगाव नजीक अपघात आज सकाळी साडेआठच्या सुमारास झाल्याचे वृत्त आहे. या अपघातात 4-5 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान, कासवगतीने या मार्गाचे बांधकाम सुरू असून संकेत दर्शक फलकाअभावी होणाऱ्या अपघातांच्या संख्येत भर पडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
सविस्तर असे की, गोंदिया येथून सुमारे 40 प्रवासी घेऊन देवरीकडे निघालेल्या गोंदिया आगाराच्या बसला (क्र. एमएच 06 एस 8852 सावली डोंगरगाव दरम्यान असलेल्या वळणावर आज सकाळी साडेआठच्या सुमारास अपघात झाला. बसचालकाने रस्ता बांधकाम सुरू असताना आणि समोर वळण असताना आपल्या वाहनाचा वेग कमी केला नसल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. बस वळणावर अनियंत्रित झाल्याने बस नवनिर्मीत रस्त्याच्या कडेला शेतात घुसली. यामुळे या बसमधील 4 ते 5 प्रवासी किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात येते.
उल्लेखनीय म्हणजे आमगाव-देवरी या महामार्गावरील हरदोली ते देवरी दरम्यान नवीन रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. अनेक ठिकाणी वेळेवर सांकेतांक दर्शक फलक सुद्धा कंत्राटदार कंपनी लावत नसल्याची नागरिकांची ओरड आहे. दरम्यान, सदर रस्त्याचे बांधकाम अत्यंत कासवगतीने सुरू असून देवरी हरदोली दरम्यान संपूर्ण रस्ता खोदल्याने पावसाळ्यापूर्वी तो तयार झाला नाही तर अनेक संकटांना नागरिक आणि वाहनचालकांना सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Thursday 19 April 2018

महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्राचे आमदार-खासदार आघाडीवर, एडिआरचा रिपोर्ट



गोंदिया,दि.१९ :- देशभरात महिलांच्या विरोधात गुन्हेगारीच्या प्रकरणांमध्ये 48 खासदार आणि आमदार आरोपी आहेत. त्यात 45 आमदार आणि 3 खासदार आहेत. ही माहिती असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआए) आणि नॅशनल इलेक्शन वॉचच्या रिपोर्टमध्ये समोर आली आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक 12 आमदार-खासदारांविरोधात महिलांच्या विरोधात गुन्हेगारी प्रकरणे दाखल आहेत. पक्षाचा विचार करता भाजपचे सर्वाधिक 12 नेते आहेत. त्यानंतर शिवसेना (7) आणि नंतर टीएमसी (6) चा क्रमांक लागतो. काँग्रेसच्या 4 आमदार आणि खासदारांच्या विरोधात अशी प्रकरणे आहेत.
1580 आमदार-खासदारांविरोधात गुन्हेगारी प्रकरणे
– एडीआर आणि नॅशनल इलेक्शन वॉचने 4896 विद्यमान खासदार आणि आमदारांच्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रांपैकी जवळपास 4845 प्रतिज्ञापत्रांचा अभ्यास करून ही माहिती मिळवली. – रिपोर्टनुसार 4845 आमदार, खासदारांपैकी 1580 विरोधीत गुन्हेगारी प्रकरणे दाखल आहेत. त्यापैकी 48 जणांवरील प्रकरणे महिलांशी संबंधित गुन्हेगारी खटले आहेत.

कोणत्या राज्यात किती खासदार/आमदारांवर महिला विरोधी गुन्हे
राज्यखासदार/आमदार
महाराष्ट्र12
पश्चिम बंगाल11
आंध्रप्रदेश05
ओडिशा05
झारखंड03
उत्तराखंड03
बिहार02
तमिळनाडू02
गुजरात01
कर्नाटक01
मध्य प्रदेश01
उत्तर प्रदेश01
केरळ01
एकूण48
कोणत्या पक्षाच्या किती आमदार-खासदारांविरोधात महिलांशी संबंधित गुन्हेगारी प्रकरणे
पक्षआमदार/खासदार
भाजप12
शिवसेना07
टीएमसी06
टीडीपी05
काँग्रेस04
बीजेडी04
अपक्ष03
जेएमएम02
आरजेडी02
डीएमके02
माकप01
एकूण48
5 वर्षात कोणत्या पक्षाने अशा किती उमेदवारांना तिकिट दिले.
पक्षआमदार/खासदार
भाजप47
बसप35
काँग्रेस24
शिवसेना22
सपा17
टीएमसी12
माकप12
माकप10
आप2
अपक्ष118
इतर148
एकूण447

…आता शेतकऱ्यांना मिळणार 50 क्विंटल धानाचे बोनस



सरकारने बेरारटाईम्सच्या बातमीची दखल घेतली

दुसऱ्याच दिवशी काढला सुधारित जीआर

 गोंदिया ,दि.19–नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये  धान उत्पादक शेतकऱ्यांना 200 रुपये बोनस देण्याची घोषणा कृषीमंत्र्यांनी केली होती. मात्र, काल 18 एप्रिल रोजी अन्न  नागरी पुरवठा  व ग्राहक संरक्षण विभागाचे उपसचिव सतिश तुपे यांनी काढलेल्या जीआरप्रमाणे परत शेतकऱ्यांवर अन्याय करण्यात आला होता. या प्रकरणाला एकमेव साप्ताहिक बेरारटाईम्सने शेतकऱ्यांच्या हितासाठी उचलून धरले. परिणामी, या वृत्ताची दखल आज शासन पातळीवरून घेण्यात आली असून आता शेतकऱ्यांना  200 रुपये बोनस प्रती क्विंटल 5 नव्हे तर 50 क्विंटल धानासाठी  मिळणार आहे., दरम्यान, राष्ट्रवादीचे जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी साप्ताहिक बेरारटाईम्सचे विशेष आभार मानले.
धानाला प्रती क्विंटल दोनशे रुपये बोनस देण्याची घोषणा राज्य सरकारने नागपुरात हिवाळी अधिवेशानादरम्यान केली होती. ही मर्यादा ५० क्विंटलपर्यंत असेल, असेही कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले होते.परंतु,काल 18 एप्रिल रोजी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण विभागाचे उपसचिव सतिश सुपे यांनी काढलेल्या शासन परिपत्रकात धान उत्पादक शेतकऱ्यांची घोर कुचंबना करण्यात आल्याचे उघड झाले होते. या शासन परिपत्रकात प्रती शेतकरी फक्त 5 क्विंटल धानाची मर्यादा पाळून 200 रुपये प्रति क्विंटल बोनस देण्यात येणार असल्याचा उल्लेख होता.  आधीच डिसेंबरमध्ये घोषणा झालेल्या बोनसचे शासन परिपत्रक काढायला सरकारला  4 महिने लागले. शासन निर्णयाआधीच गोंदिया-भंडारा जिल्ह्यात सत्ताधारी भाजपने मोठमोठे होर्डींग लावून दिवाळी साजरी केली होती.
या निर्णयामुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची भावना शेतकऱ्यांची झाली होती. परिणामी, हा विषय साप्ताहिक बेरारटाईम्स या एकमेव माध्यमाने उचलून धरला. या वृत्ताची दखल घेत सरकारने आज तातडीने नवीन सुधारित शासन परिपत्रक काढले. या नवीन निर्णयाप्रमाणे 2017-18 या हंगामातील धानाला प्रती क्विंटल 200 रुपये प्रमाणे 50 क्विंटलपर्यंत बोनस देण्याचे जाहीर केले आहे. या प्रोत्साहनपर राशीकरीता  100 कोटीच्या अतिरिक्त खर्चाच शासनाने मंजूरी दिली आहे.

Wednesday 18 April 2018

18 ते 24 एप्रिल साप्ताहिक बेरार टाईम्सचा अंक वाचण्यासाठी क्लिक करा..............





आदिवासी विद्यार्थ्यांचा 'डीबीटी' विरोध



 आदिवासींना शिक्षणापासून वंचित करण्याचे षडयंत्र राज्यव्यापी तालाठोको आंदोलनाचा इशारा आदिवासी विद्यार्थ्यांचा एकवेळ जेवण त्याग


देवरी, दि.१७- आदिवासी वसतिगृहात विद्यार्थ्यांसाठी असलेली भोजन व्यवस्था बंद करून त्याऐवजी आहारभत्ता हा विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे आदिवासी विद्यार्थी कमालीचे संतापले असून विद्यार्थ्यांना उपासी ठेवून त्यांना शिक्षणापासून वंचित करण्याचा कुटिल डाव शासन खेळत असल्याचा आरोप आदिवासी विद्यार्थी संघटनांनी सरकारवर केला आहे. या विरोधात विद्यार्थ्यांनी राज्यव्यापी आंदोलन पुकारले असून तालाठोको आंदोलनासह वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी एकवेळचे जेवण त्याग आंदोलन सुरू केले आहे.
सर्वच शासकीय लाभ आता सरकारने थेट अनुदान हस्तांतरण अर्थात डीबीटी माध्यमातून लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे धोरण स्वीकारले आहे. यामुळे भ्रष्टाचारास आळा बसेल, असा सरकारचा समज आहे. परिणामी, विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क, शिष्यवृत्त्या, गणवेशशुल्क आदी डीबीटीच्या माध्यमातून विद्याथ्र्यांना दिले जाते. असे असले तरी शासन विद्यार्थ्यांना त्यांचे अनुदान वेळेवर आणि पूर्णपणे देण्यास आतापर्यंत तरी अपयशी ठरले आहे. असे असताना आता आदिवासी विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात असलेली भोजन व्यवस्था पूर्णपणे बंद करून भोजनभत्त्याची रक्कम त्यांच्या बॅक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आदिवासी विद्यार्थी कमालीचे धास्तावलेले आहेत. शासन कोणतेही अनुदान पूर्ण स्वरूपात आणि वेळेवर देत असल्याची अनेक उदाहरणे असताना आता भोजन भत्ता आणि निवास भत्ता जर डीबीटीच्या माध्यमातून देण्याचे ठरविले असले तरी ते वेळेवर मिळणे अशक्य असल्याने गरीब आदिवासी विद्यार्थी भत्ता मिळेपर्यंत उपासी राहणार काय? असा प्रश्न राज्य सरकारला केला आहे. भत्ता मिळेपर्यंत त्याच्या भोजनाची व निवासाची व्यवस्था सदर विद्यार्थी कसे करणार, असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.
आदिवासी विद्यार्थी संघटनांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, हा निर्णय सरकारने कलुषित भावनेतून घेतला असल्याचा आरोप केला आहे. आदिवासी विद्यार्थ्यांचे जेवण बंद केले तर ते शिक्षण सोडून पळ काढतील आणि त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्कापासून रोखता येणे शक्य आहे, असे गृहीत धरून शासनाने हा निर्णय घेतला असल्याचेही संघटनांचे म्हणणे आहे. या निर्णयाविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा संघटनेद्वारा शासनाला दिला आहे. या निर्णयाला विरोध करण्यासाठी आदिवासी वसतिगृहात असलेल्या विद्यार्थ्यांना एक वेळचे जेवण त्याग करण्याचा निर्णय घेतला असून असून सदर आंदोलन कालपासून सुरू असल्याची माहिती दिली.

Monday 16 April 2018

डॉ.आंबेडकरांचे मोठेपण जगालाही मान्य- जिल्हाधिकारी काळे

सामाजिक समता सप्ताहाचा समारोप
' आंतरजातीय विवाहीत जोडप्यांचा सत्कार'
गोंदिया,दि.१५ : आपण जन्म कुठे आणि कुणाच्या घरी घ्यावा हे आपल्या हाती नाही. जन्माला येणारा प्रत्येक व्यक्ती हा सुख-दु:ख, फायदे-तोटे घेवून येतो. जन्म कुठे घेतला याचा काळ कधीच संपुन गेला आहे. त्याकाळी डॉ.आंबेडकरांनी स्वकर्तृत्वाने जगाला बरेच काही दिले आहे. म्हणून ते महामानव ठरले. त्यांचे मोठेपण भारतानेच नाही तर संपुर्ण जगाने मान्य केले आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.
१४ एप्रिल रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने सामाजिक समता सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन जिल्हाधिकारी काळे बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलींद रामटेके, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सविता बेदरकर यांची उपस्थिती होती.
श्री.काळे पुढे म्हणाले, डॉ.आंबेडकरांच्या जीवनकार्यावर बोलण्यापेक्षा त्यांच्या कार्यातून आपण काय अंगिकारु शकतो याकडे लक्ष्य देवून त्यादृष्टीने प्रयत्न केले तर त्यांच्या जयंतीदिनी खऱ्या अर्थाने त्यांना अभिवादन केल्यासारखे होईल. डॉ.आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना करुन राजकारणात प्रत्यक्ष सहभाग घेतला. त्यांनी वर्तमानपत्रे काढली, सामाजिक चळवळी उभारल्या. त्यांची राजकीय चळवळ त्या काळातील नेत्यांनी मान्य केली होती. त्यांनी त्यांच्या पक्षाचे राजकीय धोरण ठरवून जाहिरनामा सुध्दा काढला होता. जे कुटूंब लोकसंख्या वाढीवर नियंत्रण आणेल त्यांना मदत करण्याची तर जे कुटूंब लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवणार नाही अशांना शिक्षेची तरतूद त्यांनी केल्याचे श्री.काळे यांनी सांगितले.
डॉ.भूजबळ म्हणाले, महात्मा फुले व डॉ.आंबेडकरांच्या जयंतीच्या माध्यमातून समतेचा संदेश सर्वदूरपर्यंत देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. भारतीय राज्यघटना ही डॉ.आंबेडकरांच्या प्रचंड अभ्यासातून निर्माण झाली आहे. आज जो एकसंघ भारत दिसतो आहे त्याचा स्त्रोत भारतीय राज्यघटना आहे. डॉ.आंबेडकरांच्या समृध्द अनुभवातून राज्यघटना तयार झाली आहे. डॉ.आंबेडकरांचे विचार आणखी सामर्थ्यशाली कसे होतील यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे. देशातील विविध जातीधर्माला आचार-विचाराचे स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेने दिले आहे. डॉ.आंबेडकरांनी गौतम बुध्द, संत कबीर आणि महात्मा फुले यांना आपले गुरु मानले. त्यांनी सुध्दा समतेचा संदेश दिला. समतेच्या संदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी डॉ.आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून केल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ.बेदरकर म्हणाल्या, जे लोक गरीब, निरक्षर आहेत त्यांनादेखील मताचा अधिकार मिळाला पाहिजे यासाठी डॉ.आंबेडकर आग्रही होते. जे शिक्षीत आणि श्रीमंत आहे त्यांनाच केवळ मताचा अधिकार मिळाला तर गरीब समाजाची काय अवस्था झाली असती हा विचार न केलेलाच बरा. डॉ.आंबेडकर हे सामाजिक समतेचे प्रतिक आहे. त्यांनी सुरुवातीला आणि शेवटीही देशाचाच विचार केला. देशाअंतर्गत सर्वप्रथम कुटूंब नियोजनाचा विचार डॉ.आंबेडकरांनी मांडला. महिलांच्या हिताचा विचार करुन डॉ.आंबेडकरांनी हिंदू कोडबिलाची निर्मिती केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी श्री.खडसे यांनीही डॉ.आंबेडकरांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते १० आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांचा धनादेश, शाल व श्रीफळ देवून, सामाजिक समता सप्ताहानिमीत्त रक्तदान करणाऱ्या व्यक्तींचा, वरिष्ठ लिपीक श्री.खोटेले यांची पदोन्नती व उत्कृष्ट कार्याबद्दल, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला विद्यार्थी, विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक सहायक आयुक्त मंगेश वानखेडे यांनी केले. संचालन प्रदिप ढवळे यांनी केले तर आभार जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलींद रामटेके यांनी मानले.

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...