Friday 30 December 2016

अखिलेश, रामगोपाल यांची समाजवादीतून हकालपट्टी

लखनऊ : उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुका कोणत्याही दिवशी जाहीर होण्याची शक्‍यता असताना, सत्ताधारी समाजवादी पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर उभा आहे. पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी त्यांचा मुलगा व राज्याचा मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना, तसेच पक्षाचे सरचिटणीस रामगोपाल यादव यांची आज (शुक्रवार) पक्षातून हकालपट्टी केली. 
अखिलेश गटातर्फे त्याचे काका खासदार रामगोपाल यादव यांनी पक्षाध्यक्ष पदावरून मुलायमसिंग यांना काढून टाकण्यासाठी पक्ष कार्यकारिणीची बैठक रविवारी बोलावली होती. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मुलायमसिंह यादव यांनी रामगोपाल यादवांना पक्षातून काढून टाकल्याचे जाहीर केले. दोन्ही गटातील वाद विकोपाला गेला असून, त्यामुळे पक्षात फूट पडण्याचे जवळपास निश्‍चित होऊ लागले आहे. याचा फायदा त्यांचे प्रबळ विरोधी पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांना होईल. 
मुलायमसिंह यादव यांनी पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर, अखिलेश यांनी उमेदवारांची स्वतंत्र 235 नावांची यादी जाहीर केली. त्यावरून मुख्यमंत्र्यांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस दिली. मुलायमसिंह यांनी शनिवारी पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री गटाचे असलेले पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस रामगोपाल यादव यांनी रविवारी पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक बोलावली. त्याचे उत्तर देताना मुलायमसिंह यादव यांनी दोघांनाही पक्षातून काढून टाकले. अखिलेश यांनीही शनिवारी त्यांच्या समर्थकांची बैठक बोलावली आहे. समाजवादी पक्षाची उत्तरप्रदेशात चांगली ताकद असल्याने, या पक्षातील वादाचा फायदा कोणाला होणार हा औत्सुक्‍याचा आणि चर्चेचा विषय ठरणार आहे. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...