Wednesday 28 December 2016

मुदतीनंतर जुन्या नोटा बाळगल्यास होणार दंड

नवी दिल्ली - चलनातून रद्द करण्यात आलेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बॅंकेत भरण्याची मुदत संपण्यास दोन दिवस शिल्लक असताना मुदतीनंतर जुन्या नोटा बाळगणाऱ्यांना दंडांची तरतूद करणाऱ्या वटहुकूमास कॅबिनेटने मान्यता दिली आहे.
एखाद्या व्यक्तीकडे मुदतीनंतर पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा आढळून आल्यास दहा हजार रुपये किंवा जेवढ्या जुन्या नोटा सापडल्या आहेत त्याच्या दहापट दंड यापैकी जी रक्कम अधिक असेल तेवढा दंड करण्यात येणार आहे. याशिवाय 1 जानेवारीपासून 31 मार्चदरम्यान जुन्या नोटा जमा करताना चुकीची माहिती दिल्याचे आढळून आल्यास पाच हजार रुपये किंवा जमा करण्यात आलेल्या रकमेच्या पाचपट रक्कम यापैकी जी रक्कम अधिक असेल तेवढा दंड आकारण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत या वटहुकूमास मान्यता देण्यात आली आहे. मात्र या वटहुकूमाची अंमलबजावणी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा जमा करण्यास देण्यात आलेल्या मुदतीनंतर सुरू होणार की 31 मार्चनंतर होणार याबाबत स्पष्टता नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
हा वटहुकूम राष्ट्रपतींकडे पाठविल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. शिवाय, 31 मार्च 2017 नंतर जुन्या नोटा बाळगणाऱ्यांना चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षेची तरतूद असलेला प्रस्तावही कॅबिनेटसमोर आहे. मात्र, हा प्रस्ताव अद्याप मान्य करण्यात आलेला नाही.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...