Wednesday 14 December 2016

अधिवेशनासाठी ३५ सुरक्षारक्षकांच्या नावे ४७ लाख खर्च!

नागपूर विधिमंडळाच्या सुरक्षेसाठी राज्यभरातून पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात असताना, सार्वजनिक बांधकाम विभागाने ३५ सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी तब्बल ४६,८७,३२० रुपयांच्या निविदा काढल्या आहेत. बांधकाम विभागाने हा खटाटोप कशासाठी केला, असा प्रश्न निर्माण झाला असून, याची एसीबी किंवा स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी झाली, तर यातून मोठा गैरव्यवहार बाहेर येण्याची शक्यता आहे.
विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी बांधकाम विभागाने एकूण सात निविदा काढल्या आहेत. या निविदांचा तपशील आणि त्यावर होणारा खर्च पाहिला, तर कोणालाही आश्चर्याचा धक्का बसेल. उदा. नवे-जुने हैदराबाद हाउसला सुरक्षा रक्षक देण्यासाठी ५,४६,९६० रुपये, देवगिरीच्या २२ ते ३० नंबरच्या सुरक्षेसाठी ५,८८,३०० रुपये, सीएच टू नागभवन सुरक्षा रक्षकासाठी ६,६७,८००, नागभवन येथील १ ते १६ च्या सुरक्षेसाठी ६,८६,९८० रुपये, रविभवनच्या समोरील सुरक्षेसाठी ७,२५,०४० रुपये, रविभवन परिसराच्या मागील सुरक्षेसाठी ७,२५,०४० रुपये आणि नागपूरमधील १६० घरांच्या वार्षिक सुरक्षेसाठी ७,४७,३०० रुपये अशा सात निविदांचा ४६,८७,३२० रुपये खर्च दाखविण्यात आला आहे. शिवाय, रविभवन येथे नवीन फर्निचर उपलब्ध करणे आणि पुरवठा करणे, यासाठी २४,९८,७०६ रुपये, मुख्य सचिवांच्या बंगल्यासाठी व्हॅक्यूम क्लिनिंग, सोफासेट पुरवणे, अधिवेशन काळात फर्निचर पुरवणे यासाठी ४,११,८४० रुपये असा खर्च केला गेला आहे. या निविदा काढताना त्या वार्षिक तत्त्वावर आहेत की अधिवेशन काळासाठी आहेत हे कळू नये किंवा कोणी शब्दछल केला तर सोयीनुसार उत्तरे देण्याची सोयही यात ठेवली गेली आहे.
बांधकाम विभाग क्रमांक एकचे कार्यकारी अभियंता संजय इंदूरकर यांना विचारले असता त्यांनी ३५ सुरक्षा रक्षकांसाठी या निविदा आहेत, असे सांगितले. मात्र आमदार निवास, नागभवन येथे सुरक्षा पुरवण्याचे वर्षभराचे कंत्राट वेगळे आहे ना? असे विचारले असता ते पण आहे आणि हे पण आहे, असे उत्तर त्यांनी दिले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...