Sunday 25 December 2016

आजपासून 100 दिवस लकी ड्रॉ योजना सुरू - मोदी

नवी दिल्ली, दि. 25 - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशवासियांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देत मन की बात कार्यक्रमाची सुरूवात केली. 'मन की बात'चा हा 27 वा तर या वर्षातील शेवटचा भाग होता. देशात खळबळ माजवणा-या नोटाबंदीच्या निर्णयानंतर मोदींची ही दुसरी 'मन की बात' होती.
यावेळी पंतप्रधान मोदींनी, कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी ख्रिसमसच्या निमित्ताने दोन नव्या योजनांना सुरूवात होत असल्याची माहिती दिली. कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी लकी ग्राहक योजना व व्यापाऱ्यांसाठी डिजी धन योजना सुरू करण्यात आली आहे.
लकी ग्राहक योजनेअंतर्गत पुढील 100 दिवस रोज 15 हजार लोकांना एक-एक हजारांचं बक्षीस देण्यात येईल. डिजीटल ट्रान्झेक्शन करणा-यांना हे बक्षीस दिलं जाईल आणि लकी ड्रॉ द्वारे विजेते शोधले जातील. पहिला ड्रॉ 25 डिसेंबर म्हणजे आज निघणार आहे. याशिवाय आठवड्यात एक मोठा लकी ड्रॉ काढण्यात येणार असून याद्वारे लाखो रूपयांचं बक्षीस देण्यात येणार आहे. तर, तीन महिन्यानंतर म्हणजे 14 एप्रील रोजी बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मदिनी बंपर लकी ड्रॉ काढण्यात येईल आणि हे बक्षिस कोटींमध्ये असेल. 50 रूपयांपासून 3 हजारापर्यंत खरेदी करणारेच या लकी ड्रॉचा हिस्सा असणार आहेत.
याशिवाय व्यापा-यांसाठी डिजी धन व्यापार योजना सुरू करण्यात आली आहे. कॅशलेस माध्यमातून सामानाची विक्री करणा-या व्यापा-यांना या योजनेद्वारे बक्षीस दिले जातील.
मन की बातमध्ये बोलताना पंतप्रधानांनी अनेक विषयांना हात घातला. भ्रष्टाचाराविरोधातला हा पूर्ण विराम नव्हे, तर भ्रष्टाचाराविरोधातील लढाईची सुरुवात आहे असं ते म्हणाले.  गेल्या काही दिवसांपासून कॅशलेस व्यवहार 200 ते 300 टक्क्यांनी वाढला असल्याचं मोदींनी सांगितलं.आसाम सरकारकडून डिजिटल पेमेंटसाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचंही मोदींनी कौतुक केलं. टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध मिळवलेल्या विजयाचंही मोदींनी कौतुक केलं, तर 15 वर्षानंतर ज्युनियर हॉकी वर्ल्ड कपचे विजेतेपद मिळवणाऱ्या भारतीय संघाचा अभिमान वाटतो असं मोदी म्हणाले. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...