Thursday, 24 October 2019

भाऊ, आमदार कोण ? टेंशन वाढले






       

कार्यकर्ते तणावातः  उत्कंठा शिगेला पोचली
मतगणना एकूण 22 फेऱ्यात होणार
मतमोजणी सकाळी आठपासून


देवरी,दि.24- गेल्या 21 तारखेला पार पडलेल्या मतदानाची गणना ही आज सकाळी 8 वाजेपासून स्थानिक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत होणार आहे. संपूर्ण गणना ही एकूण 22 फेऱ्यात होणार आहे. यासाठी निवडणुक यंत्रणा सज्ज झाली आहे. गणनास्थळी होणाऱ्या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिस प्रशासनाने सुद्धा आपली कंबर कसली आहे. दरम्यान, आपला भावी आमदार कोण? या प्रश्नाला घेऊन मतदार संघात पहाटेपासून चर्चा गरम झाली आहे.
66- आमगाव विधानसभेच्या निवडणुकीसाठी गेल्या 21 तारखेला मतदान घेण्यात आले. यावेळी संपूर्ण मतदार संघात  1 लाख 82 हजार 36 मतदारांनी आपला हक्क बजवला असून मतदानाची सरासरी 60.30 टक्के एवढी राहिली. प्रत्यक्ष मतमोजणीला आज गुरुवारी (दि.24) सकाळी 8 वाजेपासून स्थानिक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सुरवात होणार आहे. ही गणना एकूण 22 फेऱ्यात होणार असून त्यासाठी 14 गणकटेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणुकीचा अंतिम निकाल दुपारी 12 वाजेपर्यंत अपेक्षित आहे. 
या निवडणुकीच्या निकालाला घेऊन उमेदवारांसह कार्यकर्ते आणि मतदार सुद्धा चांगलेच तणावात असल्याचे चित्र आहे. सकाऴपासून भाऊ, आपला आमदार कोण होणार? असा प्रश्न मतदार दिसेल त्याला विचारताना दिसत आहेत. निकालाची उत्कंठा अत्यंत शिगेला पोचली असून कार्यकर्ते चांगलेच तणावात आहे. परिणामी, दिवाळी सारख्या सणाला हा निकाल येत असल्याने विजेत्याचे फटाके वाजणार तर निराशा हाती आलेल्यांची दिवाळी सुध्दा यावर्षी काहीशी अंधारणार असल्याचे चित्र आहे.
या निवडणुकीत एकूण 9 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. प्रत्येक उमेदवार आणि त्याचे समर्थक आपल्या विजयाचे दावे करीत असले तरीही भाजपचे विद्यमान आमदार संजय पुराम आणि कॉंग्रेस आघाडीचे सहसराम कोरोटे यांच्यात थेट सामना होणार आहे. कॉंग्रेसचे बंडखोर माजी आमदार रामरतन राऊत हे कॉंग्रेस पक्षाला किती प्रमाणात अडचणीत आणणार, हेही या निकालावरून स्पष्ट होईल. गेल्या 2014 च्या तुलनेत मतदानाची टक्केवारी घसरली असली तरी  एकूण 6 हजार 371 मतांची वाढ झाली आहे. टक्केवारीत झालेली घट आणि वाढलेल्या मतदानाचा निकालावर परिणाम होण्याची शक्यता असून उमेदवाराच्या विजयात या घटकांचा मोठा वाटा राहणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...