Monday 21 October 2019

उमेदवारांचे भाग्य झाले मशिनबंद

66- आमगाव मतदार संघात सरासरी 70 टक्के मतदान
काही ठिकाणी मतदान यंत्रातील बिघाडामुळे मतदानाला उशिर
एकूण मतदान प्रक्रिया शांततेत

देवरी,दि.21- आज झालेल्या 66 आमगाव विधानसभा मतदार संघात भावी आमदारकीचे स्वप्न रंगविणाऱ्या उमेदवारांचे भाग्य सायंकाळी तीन वाजेनंतर मशिनबंद झाले आहे. या मतदार संघात सरासरी 70 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाल्याचे वृत्त हाती येत आहे. दरम्यान काही तुरळक ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाल्याने प्रत्यक्ष मतदानाला उशीरा सुरवात झाल्याचे वृत्त आहे. एकंदर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्याने निर्वाचन आयोगाच्या यंत्रणेने सुटकेचा श्वास घेतला.
सविस्तर असे की, आज 66 आमगाव विधान सभा मतदार संघात मतदान प्रक्रियेला सकाळी सात वाजता 310 मतदान केंद्रावर सुरवात झाली होती. काही ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड आल्याने प्रत्यक्ष मतदानाला उशीरा सुरवात करण्यात आली. मात्र, अल्पावधीतच या त्रुट्या दूर करण्यात मतदान यंत्रणेला यश आले. या मतदार संघात एकूण नऊ उमेदवार रिंगणात असून कॉंग्रेस आघाडीचे सहसराम कोरेटे आणि भाजपचे संजय पुराम यांच्यात थेट लढत असल्याचे मतदार संघात फेरफटका मारला असता दिसून आले. या रंगतीमध्ये माजी आमदार आणि कॉंग्रेसचे बंडखोर रामरतन राऊत यांनी कॉग्रेसपुढे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न कितपत यशस्वी होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.  आज सायंकाळ पर्यंत पूर्ण करण्यात आलेल्या प्रक्रियेत या मतदारसंघात सरासऱी 70 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाल्याचे वृत्त आहे. प्रत्यक्षात हा आकडा वाढण्याची शक्यता निवडणुक अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मतदानाला सुरवात झाल्यापासूनच अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगाच्या रांगा दिसून आल्या. मात्र, सकाळी 10 वाजे नंतर मतदान केंद्रांवर मतदारांनी तोबा गर्दी करीत लोकशाहीवर आपला विश्वास कायम असल्याचे जगाला दाखवून दिले. हा मतदार संघ अतिसंवेदनशील भागात मोडत असल्याने येथे सायंकाळी 3 वाजेनंतर मतदान बंद करण्यात आले. सुरक्षा यंत्रणांनी अत्यंत चोख बंदोबस्त लावल्याने कोणताही अनुचित प्रकार या मतदार संघात घडला नाही.

शहरी भागात झालेले मतदान

देवरीतील एकूण 10 केंद्रावर 11हजार 529 मतदारांपैकी 5853 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. याची टक्केवारी 50.76 राहिली. आमगाव शहरात एकूण 8 मतदान केंद्रावर 9 हजार 514 मतदारांपैकी 5590 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावत 58.75 एवढी टक्केवारी गाठली. चिचगडमधील 2 केंद्रावर 1 हजार 279 मतदारांनी आपला हक्क बजावत 68.23 टक्केवारी गाठली. ककोडी यथे  1 हजार 285 प्रत्यक्ष मतदान झाल्याने तिथे मतदानाची टक्केवारी 65.60 एवढी राहिली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...