आमदार पुराम यांचे स्वप्न भंगले
देवरी,दि.24 -गेल्या 21 तारखेला घेण्यात आलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आमगाव मतदार संघात काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीने विजयाचा झेंडा रोवला. यामुळे भाजपचे विद्यमान आमदार संजय पुराम यांचा दुसऱ्यांदा आमदार होण्याचे स्वप्न भंगले. काँग्रेसचे उमेदवार सहसराम कोरोटे यांनी पुराम यांचा 7 हजार 420 मतांनी धुव्वा उडविला.
स्थानिक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये पार पडलेल्या आमगाव विधानसभा मतदार संघाच्या मतमोजणीला संथपणे सुरवात झाली होती. दरम्यान, 18 फेरी मध्ये ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने मतमोजणी सुमारे अडीच तास खोळंबली होती. यामुळे येथील अंतिम निकाल रात्री सव्वा सातच्या सुमारास आला.यावेळी त्या बुथवरील मतगणना व्हीव्हीपॅटची मोजणी करून पूर्ण करण्यात आले.
या मतगणनेत काँग्रेसचे सहसराम कोरोटे यांना 88 हजार 265 मते मिळाली. यामध्ये 587 पोस्टल मतदानाचा समावेश आहे. त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी भाजपचे विद्यमान आमदार संजय पुराम यांना 80 हजार 745 (502 पोस्टल) मते मिळाली. काँग्रेसचे बंडखोर रामरतन राऊत यांची या निवडणुकीत पूर्ण हवा निघाल्याचे स्पष्ट झाले. त्यांना केवळ3 हजार 546मतांवर समाधान मानावे लागले. बहुजन वंचित आघाडीचे सुभाष रामराम यांना 3 हजार 359, बहुजन समाज पक्षाचे अमर पंधरे यांना 3 हजार 165, उमेशकुमार सरोटे यांना 964, ईश्वरदास कोल्हारे यांना 566, ऊर्मिलाबाई टेकाम यांना 400, निकेश गावळ यांना 1 हजार 281 मते मिळाली. यावेळी नोटाने कमाल करीत चक्क 1 हजार 884 मते मिळवली. निवडणुक निर्णय अधिकारी रवींद्र राठोड यांनी कॉंग्रेसचे सहसराम कोरोटे हे 7 हजार 420 मतांनी विजयी झाल्याचे जाहीर केले
No comments:
Post a Comment