Saturday 5 October 2019

तीनही आमदारांना भाजपचा धक्का,दोघांची बंडखोरी




भंडारा,दि.05ः- विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील भाजपच्या तीनही आमदारांची उमेदवारी निश्‍चित मानली जात असताना भाजपने या सर्वांना जोरदार धक्का दिला आहे. पक्षाने तीनही आमदारांची तिकीट कापून नव्यांना संधी दिली आहे.त्यातच दोन आमदारांनी भाजप उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी केली आहे.तीनही आमदारांचा पत्ता कट करण्यात नागपूरच्या हातांचा मोठा समावेश असल्याची चर्चा जिल्ह्यात असून नागपूरी नेत्यांना डोक्यावर घेतल्याचे परिणाम आता जिल्ह्यातील नेत्यांचा खात्मा करुन होत असल्याचे बोलले जात आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तिनही आमदारांना पुन्हा तिकीट मिळणार काय? यावर चर्चा रंगल्या होत्या. तेव्हापासूनच विद्यमान आमदारांमध्ये धडकी भरण्यास सुरूवात झाली होती. दरम्यान, भाजपमध्ये उमेदवारी मागणार्‍यांची गर्दी वाढल्याने आमदारांच्या डोकेदुखीत आणखीणच भर पडली होती. त्यामुळेच जिल्ह्यातील तिनही उमेदवारांची नावे अंतिम क्षणापर्यंत जाहीर करण्यात आली नव्हती. युतीमध्ये भंडारा विधानसभेची जागा पहिल्यांच रिपाइं आठवले गटाला मिळाली असली तरी याठिकाणी भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी अरविंद भालाधरे यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे अन्य इच्छुकांमध्ये काही प्रमाणात नाराजीचे वातावरण आहे.आमदार रामचंद्र अवसरे यांनीही याठिकाणी बंडखोरी करीत उमेदवारी दाखल केली आहे.
साकोली येथेही मोठे नाट्य रंगले. विद्यमान आमदार बाळा काशिवार यांची उमेदवारी कापून पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांना दिल्याने काशिवार सर्मथकांनी मोठा गदारोळ केला. त्यामुळे बाळा काशिवार यांनी भाजप आणि अपक्ष असे दोन्ही नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री डॉ. फुके हेसुद्धा उपस्थित होते. दरम्यान, रात्री उशिरा साकोली विधानसभेतून डॉ. फुके यांचे नाव अधिकृत जाहीर झाले. त्यानंतर डॉ. फुके शुक्रवारी बाळा काशिवार यांच्या उपस्थितीत नामनिर्देशनपत्रदाखल केले असले तरी बाळा काशीवार यांच्या चेहर्यावर नाराजीचा सुर स्पष्ट दिसून येत होता.
तुमसर येथे भाजपने अखेरच्या क्षणापर्यंत उमेदवारी ताणून धरली होती. आ. चरण वाघमारे की इंजि. प्रदीप पडोळे, याबाबत खल सुरू असताना ऐनवेळी इंजि. प्रदिप पडोळे यांचे नाव जाहीर झाल्याने आ. वाघमारे यांनी बंडाळी करीत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे.सत्ताधारी भाजपने जिल्ह्यातील पक्षाच्या तिनही आमदारांची तिकीट कापून नव्यांना संधी दिली आहे. त्यामुळे या निवडणुकीचे चित्र कसे राहील, हे पाहणे औत्सुकत्याचे ठरणार आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...