Thursday, 10 October 2019

शेतकऱ्यांना मारून उद्योगपतींना संरक्षण देणारे धनदांडग्यांचे सरकार-शरद पवार

वर्धा,दि.10 – विद्यमान केंद्र व राज्य सरकार हे शेतकरी व कामगार विरोधी असून उद्योगपतींची करोडो रुपयांची कर्ज माफ करून शेतकऱ्यांना मात्र देशोधडीला लावीत आहे, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांनी गुरुवारी येथे केला. हिंगणघाट विधानसभा मतदार क्षेत्राचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार राजू तिमांडे यांच्या निवडणूक प्रचारार्थ गोकुलधाम मैदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते, यावेळी मंचावर आमदार प्रकाश गजभिये,जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, माजी आमदार वसंत बोन्डे, किशोर माथनकर,दिवाकर गमे, संतोषराव तिमांडे, काँग्रेचे माधव घुसे, पंढरी कापसे, श्रावण ढगे, राजेंद्र डागा, सुरेखा ठाकरे, वर्षा निकम, यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना खा. पवार म्हणाले या देशातील 70 टक्के लोक हे शेती करतात त्यांचा विचार न करता केवळ मुठभर उद्योगपतींच्या भल्यासाठी हे सरकार काम करीत आहे , आज मुंबईसारख्या महानगरातील गिरणी उद्योग बंद करून त्याठिकाणी चाळीस मजली इमारती उभ्या होत आहे, हेच षडयंत्र हिंगणघाट सारख्या शहरातही राबविण्यात येणार आहे, राज्यातील शेती अर्थव्यवस्था उध्वस्त झालेली असून औद्योगिकरणही पूर्णत: बंद पडलेल्या अवस्थेत आहे,आज बेरोजगारांच्या हाताला काम नाही, येणारी तरुणपिढी ही कामाअभावी भरकटली जाणार आहे, विकासाच्या नावावर सर्वत्र अनागोंदी कारभार सुरू आहे, सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम शासनाचे आहे परंतु आज सरकार नावाची यंत्रणा ही उद्योगपतींची वेठबिगार झाली आहे, देशात जिथे जिथे भाजपचे राज्य आहे त्याठिकाणी गुन्हेगारी वाढली आहे, स्त्रियांवरील अत्याचारात वाढ झाली आहे, हे चित्र अतिशय विदारक आहे आज देशात मुख्यमंत्र्यांचे शहर असलेले नागपूर शहर हे गुन्हेगारीत नंबर एक वर आहे एवढी मोठी बेइज्जती या राज्याची आजवर कधीच झाली नव्हती, परंतु विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या नाकर्तेपणामुळे आज विदर्भात नागपूर शहरात गुन्हेगारी चे साम्राज्य वाढत आहे राज्य तुमच्या हातात दिले परंतु संपूर्ण महाराष्ट्रातील एकाही गावाचा रस्ता ठीक नाही सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य आहे, आज खड्डे युक्त महाराष्ट्राची ओळख होत आहे, ही स्थिती बदलण्याची आज गरज आहे, लोकांचे आर्थिक जीवनमान सुधरवायचा आहे त्यासाठी कारखानदारी नव्याने सुरू करून शेतीला पुनर्जीवित करण्याची गरज आहे, तरच तरुण पिढीचे भविष्य उज्वल होईल आज महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या परंतु त्याविषयी कोणती उपाययोजना करायला सरकारला वेळ नाही, केवळ आपल्या विरोधकांना संपविण्यासाठी त्यांच्यावर खोट्या केसेस टाकून गुन्हे नोंदवण्याचे काम हे सरकार करीत आहे, मी कोणत्याही राज्य भूविकास बँकेचा सभासद किंवा संचालक नसतानाही माझ्यावर खोटा गुन्हा नोंदविला, ही दडपशाही आहे परंतु या दडपशाहीला मी भीक घालणार नाही, सत्तेचा गैरवापर राज्यकर्त्यांकडून सुरू आहे महिला बेरोजगार युवक कामगार शेतकरी कोणीही या राज्यात सुरक्षित नाही,विद्यमान शासन शिवछत्रपतींचे नाव घेतात पण महिलांची सुरक्षितता करू शकत नाही, छत्रपतींनी आदर्श कारभाराने सर्व समाजाला एक आदर्श राज्य व्यवस्था दिली, त्याचे उल्लंघन हे सरकार करीत आहे,यांना धडा शिकविण्याची हीच खरी वेळ आहे, यासाठी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार तिमांडे यांना विजयी करून सर्वसामान्य जनतेचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी आघाडीला पुन्हा एकदा सत्तेवर बसवा, असे आवाहन खासदार पवार यांनी केले. सभेचे संचालन राजेश शेंडे यांनी केले . प्रास्ताविक शेषकुमार येरलेकर यांनी केले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...