Friday 25 October 2019

भाजपला शहरी भागातही धोबीपछाड


देवरी नगरात जबरदस्त फटका

देवरी,दि.25 - 66-आमगाव विधानसभा मतदार संघातील भाजपचा गड असलेल्या शहरी मतदारांमध्ये सुद्धा यावेळी कमालीची नाराजी दिसून आली आहे. यातही सर्वाधिक विकासकामे झालेल्या देवरी नगरामध्येच भाजपचे उमेदवार संजय पुराम यांना जबरदस्त फटका बसला. परिणामी, कार्यकर्त्यांचा अतिउत्साह भाजपला नडल्याची चर्चा या मतदारसंघात निकाल घोषित झाल्यापासून सुरू झाल्या आहेत. 
काल गुरुवारी (दि24) देवरीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आमगाव विधानसभेतील मतगणना पूर्ण करण्यात आली. काँग्रेसचे सहसराम कोरोटे आणि भाजपचे विद्यमान आमदार संजय पुराम यांच्यात अत्यंत चुरशीची लढत झाली. यावेळी भाजपचा गड असलेल्या आमगाव तालुक्याला भेदण्यात सहसराम कोरोटे यांना यश आले. याशिवाय सालेकसा आणि काँग्रेसचा परंपरागत मतदार असलेला देवरी तालुक्यातही या निवडणुकीत भाजपला डोके वर काढता आले नाही. उल्लेखनीय म्हणजे देवरीच्या विकासासाठी प्रचंड मेहनत घेऊनही आमदार संजय पुराम यांना येथे मतांची आघाडी घेता आली नाही. सालेकसा तालुक्यात सुद्धा भाजप काँग्रेसच्या तुलनेत मागे राहिला. एकंदर या निवडणुकीच्या निकालाकडे बघितल्यास सामना तुल्यबळ झाल्याचे दिसून आले.यावेळी संघ आणि भाजपचा गड असलेल्या आमगाव तालुक्यातून काँग्रेसला अवघ्या 14 मतांची आघाडी मिळाली असून आमगाव शहरात श्री कोरोटे हे 57 मतांनी आघाडीवर होते. सालेकसा तालुक्याचा विचार केला तर भाजप येथे 505 मतांनी पिछाडीवर राहिली. सालेकसा नगरात सुद्धा कोरोटे हे  180 मतांनी आघाडीवर होते. देवरी तालुक्यात काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत भाजपवर 6 हजार 816 मतांची दमदार आघाडी घेतली. एकट्या देवरी शहराचा विचार केला तरी श्री. पुराम हे कोरेटींपेक्षा 483 मतांनी पिछाडीवर होते. या निवडणुकीची विशेषता म्हणजे श्री. कोरोटे यांनी आपल्या विजयासाठी गेल्या पाच वर्षापासून प्रचंड जनसंपर्क वाढविला तर याउलट श्री. पुराम यांच्या कार्यकर्त्यांचा अतिउत्साह त्यांच्या अंगलट आल्याची चर्चा मतदार संघात आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...