Saturday 11 March 2017

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा भ्याड हल्ला, 11 जवान शहीद



वृत्तसंस्था रायपूर/सुकमा, दि. 11 – छत्तीसगडमधील सुकमा येथे नक्षलवाद्यांनी शनिवारी सकाळी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकडीवर (सीआरपीएफ) भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात 11 जवान शहीद झाले आहेत. तर 5 जवान जखमी झाले. सुकमा जिल्ह्यातील भेज्जी परिसरातील ही घटना आहे.शनिवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास नक्षलवाद्यांनी सीआरपीएफ तुकडीवर गोळीबार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय राखीव पोलीस दलाची तुकडी सराव करत असताना नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्ल्याच्या बातमीला मुख्यमंत्री रमन सिंग यांनी देखील दुजोरा दिला आहे.
माओवाद्यांचा प्रभाव असलेल्या सुकमा जिल्हयातील भेज्जीच्या जंगलात सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास कोटाचेरू नावाच्या खेड्याजवळ ही घटना घडली. भेज्जी पोलिस ठाण्याच्या हद्दीत हे जंगल आहे. जंगलात जाणारा रस्ता सुरू करण्यासाठी CRPF च्या 219 बटालियनचे गस्त पथक गेले असताना जवानांच्या ताफ्यावर नक्षलवाद्यांनी हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले.
सहायक उपनिरीक्षक हिरालाल जांगडे, आरक्षक नरेंद्रकुमार सिंह, मंगेश पांडे, रामपालसिंह यादव, गोरखनाथ, नंदकुमार अतरम, सतीशचंद्र वर्मा, के. शंकर, वी.आर. मंदे, जगजितसिंह आणि सुरेश अशी हुतात्मा झालेल्या जवानांची नावे आहेत. जखमी जवानांमध्ये जगदीश प्रसाद निसोडे, जयदेव परमाणिक, मो. सलीम यांचा समावेश आहे. चौथ्या जखमी जवानाच्या नावाची अद्याप खात्री झाली नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “सुकमामधील CRPF जवानांच्या मृत्यूने दुःख झाले. हुतात्म्यांना आदरांजली व त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी.””सुकमातील परिस्थितीविषयी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्याशी मी बोललो. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते सुकमा येथे जाणार आहेत,” असे मोदी यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...