Sunday, 18 April 2021

जुगार खेळणाऱ्या 11 आरोपींकडून चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत

 देवरी पोलिसांची धडक कार्यवाही


देवरी,दि.18- देवरी पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या मरामजोब आणि शेडेपार परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर धडक कार्यवाही करीत एकूण 11 अरोपींसह 4 लाख 8 हजार 560 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात देवरी पोलिसांना यश आले आहे. या दोन्ही कारवाया काल शनिवारी सायंकाळी 7 ते 9 वाजेदरम्यान करण्यात आल्या. या दोन्ही गुन्ह्यातील आरोपींवर मुंबई जुगारबंदी कायद्यानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

 सविस्तर असे की, देवरी तालुक्यातील शेडेपार शेतशिवार आणि मरामजोब नजिकच्या झुडपी जंगलात काही इसम जुगार खेळत असल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळाली. या मिळालेल्या माहितीवरून, अप्पर पोलिस अधीक्षक यांचे नेतृत्वातील एका पथकाने सुमारे साडेसातच्या सुमारास शेडपार नजिक शेतशिवारात सुरू असलेल्या जुगार अड्यावर धाड टाकून चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या. यामध्ये उमेश शाहू, कवलदीपसिंग भाटिया, अविनाश ढवळे, आणि रोशन बागवा यांचा समावेश आहे. या आरोपींकडून 2 मोबाईल सह एकूण 43 हजार910 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. 

दुसरी कार्यवाही ही मरोमजोब परिसरातील झुडपी जंगलात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर करण्यात आली. यामध्ये एकूण 11 आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले असून त्यांचेकडून 7 मोबाईल, 5 मोटारसायकलींसह 3 लाख 64 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या दोन्ही गुन्ह्यातील आरोपींवर देवरी पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. देवरी पोलिसांनी केलेल्या या कारवायांबद्दल परिसरातील नागरिक पोलिसांचे कौतूक करीत असून अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...