Saturday 17 April 2021

कोविड रुग्णालयातील खाटांची क्षमता वाढवा -ना. विजय वडेट्टीवार

 


  गोंदिया, दि.17 : जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत असून उपचारासाठी खाटांची संख्या कमी पडत आहे. ही बाब लक्षात घेवून कोविड रुग्णालयातील खाटांची क्षमता वाढविण्याच्या सूचना आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिल्या.

         17 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात कोविड उपाययोजना संदर्भात आढावा बैठकीत बेड उपलब्धता, आरोग्य सुविधा, कोविड केअर सेंटर, लस उपलब्धता, रेमडेसिव्हर, ऑक्सीजन उपलब्धता व रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधेबाबत आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार सहेषराम कोरोटे, जिल्हाधिकारी दिपक कुमार मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिपकुमार डांगे, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

         मंत्री विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले, रुग्णालयातील बेडची क्षमता वाढविण्यात भर देण्यात यावा तसेच ज्या रुग्णालयामध्ये मनुष्यबळाची कमतरता आहे त्या ठिकाणी खाजगी हॉस्पीटल व डॉक्टर्सची मदत घेण्यात यावी. खाजगी हॉस्पीटलमध्ये बेडच्या उपलब्धतेबाबत विशेष लक्ष देण्यात यावे. जिल्ह्यात RTPCR Antigen टेस्टींग वाढविण्यात याव्यात. ऑक्सीजनचा पुरवठा वाढविण्यात यावा. ऑक्सीजनच्या पुरवठ्यासाठी राजनांदगाव जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. रेमडेसिव्हर इंजेक्शनचा पुरवठा वाढविण्यात आला असून लवकरच उपलब्ध होणार आहे. खाजगी व शासकीय रुग्णालयातील कोरोना रुग्णांची माहिती सांकेतिक स्थळावर (डॅशबोर्डवर) प्रसिध्द करण्यात यावी. पोलीस यंत्रणेने संचारबंदीमध्ये पोलीस बंदोबस्त चोख ठेवावा. कोरोना उपाययोजनेवर जिल्हा नियोजन समितीमधून 30 टक्के निधी खर्च करण्यात यावा. कोरोना उपाययोजनेबाबत आपण निधीची मागणी करा, निधी कमी पडू देणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.

         सभेला निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, नगरपरिषचे मुख्याधिकारी करण चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.नरेश तिरपुडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरिश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन कापसे, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते व जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे उपस्थित होते.


 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...