Sunday 28 March 2021

अजित पवारांचा संजय राऊतांवर निशाणा

 बारामती--मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपांनंतर अनिल देशमुख वादात आडकले आहेत. यावरुन विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडत आहेत. यातच, शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही देशमुखांवर 'रोखठोक'मधून टीका केली. यानंतर आता संजय राऊतांच्या टीकेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

अजित पवार यांनी आज बारामतीत कोरोना परिस्थितीची आढावा बैठक घेतली. त्यानंतर विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात पत्रकारांशी बोलत असताना म्हणाले की, 'महाविकास आघाडी सरकार हे तीन पक्षांचे आहे. तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे शिवसेनेत कुणाला मंत्रिपद द्यायचे याचा निर्णय उद्धव ठाकरे घेत असतात. काँग्रेसमध्ये सुद्धा कुणाला मंत्रिपद द्यायचे याचा अधिकार हा सोनिया गांधी यांना आहे आणि राष्ट्रवादीमध्ये 1999 पासून मधली 5 वर्षे वगळता सरकारमध्ये काम करतोय. पवार साहेबांना 50 वर्षांचा राजकीय अनुभव आहे. त्यामुळे कुणाला मंत्रिपद द्यायचे, कुणाला कोणता विभाग द्यायचा, हे राष्ट्रवादीमध्ये तेच ठरवतात. इतरांनी वक्तव्य केले तर समजू शकतो. पण महाविकास आघाडीमध्ये असताना मान्यवरांनी एकमेकांना अडचणीत आणण्याचे वक्तव्य करू नये. कुणी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये, अशी टीका अजित पवारांनी राऊतांवर केली.

काय म्हणाले होते संजय राऊत ?

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून लिहिले की, अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे शरद पवारांनी गृहमंत्री पदाची माळ अनिल देशमुखांच्या गळ्यात टाकली. या पदाची एक प्रतिष्ठा व रुबाब आहे. दिवंगत आर. आर. पाटील यांच्या गृहमंत्री म्हणून कार्यपद्धतीची तुलना आजही केली जाते. संशयास्पद व्यक्तीच्या कोंडाळ्यात राहून गृहमंत्री पदावरील कोणत्याही व्यक्तीस काम करता येत नाही. पोलिस खाते आधीच बदनाम, त्यात अशा गोष्टींमुळे संशय वाढतो, असे मत राऊतांनी व्यक्त केले होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...