Monday 10 February 2020

पोपटांची तस्करी करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद

देवरी,दि.10- राष्ट्रीय महामार्ग क्र 53 वरील शिरपूरनजिक रायपूरकडून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या चारचाकी वाहनात पोपटांची तस्करी करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीला जेरबंद करण्यात देवरी पोलिसांना यश आले आहे.
सविस्तर असे की, काल रविवारी (दि.09) रात्री 11 वाजेच्या सुमारास ठाणेदार कमलेश बच्छाव यांचे नेतृत्वात गस्तीवर असलेल्या देवरी पोलिसांच्या चमूने रायपूरकडून नागपूरच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या टाटा इंडिका (क्र. सीजी04- एचसी 0208 ला संशय आल्याने तपासणीसाठी रोखले. वाहनात गोणपाटामध्ये पॅकिंग केलेले ताराच्या पाच पिंजऱ्याविषयी वाहनचालक मोहम्मद असलम शेख फरीद (वय 35) राहणार न्यू राजेंद्रनगर रायपूर याला विचारणा केली असता त्याने स्थानिक आदिवासी लोकांकडून अवैधरीत्या पोपटांची खरेदी करून जादा भावाने नागपूरच्या बाजारात विक्री करीत असल्याची कबूली दिली. जप्त केलेल्या पाच पिजऱ्यातून 209 पोपट आढळून आले. हे पोपट 200 - 500 रुपये दराने विक्री करीत असल्याची माहीती आरोपींनी दिली. या कामात त्याला मदत करणारा मोहम्मद जाबीर मोहम्मद महेबूब राहणार संजयनगर रायपूर यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
पशूपक्ष्यांची वाहतुक करून तस्करी करणे गैरकायदेशीर असल्याने पोलिसांनी आरोपींसह मुद्देमाल आणि वाहन जप्त करून देवरीच्या वनविभागातील अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले. उल्लेखनीय म्हणजे अशा प्रकारची बेकायदेशीर पशूपक्ष्यांची तस्करी ही मोठी नवीन बाब नाही. वनविभागाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. पोलिसांच्या या कार्यवाहीमध्ये ठाणेदार बच्छाव यांचेसह हवालदार कावळे , राऊत, नायक उईके आणि बोहरे यांचा समावेश होता.






No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...