Friday 21 February 2020

अवैध वाहतुक करताना 46 जनावरे पकडली




देवरी पोलिसांची कार्यवाही

देवरी,दि.21- लगतच्या छत्तीसगड राज्यातून नागपूरच्या दिशेने जनावरांची अवैध वाहतूक करणारे दोन ट्रक आज सकाळी देवरी पोलिसांनी नाकाबंदी करून जप्त केले. देवरी पोलिसांनी केलेल्या या कार्यवाहीमध्ये एकूण 46 जनावरांसह 18 लाखाच्या मुद्देमालासह दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावर पकडलेल्या वाहनातील चालक व वाहक वाहन सोडून जंगलाच्या दिशेने फरारी होण्यात यशस्वी झाले. देवरी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.


पोलिसांना खबऱ्याच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार, नजिकच्या छत्तीसगड राज्यातून जनावरे अवैधरीत्या कतलीसाठी जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर गोंदियाची जिल्हा पोलिस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली देवरीचे नवनियुक्त ठाणेदार अजित कदम यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने नाकाबंदी केली. या नाकाबंदी दरम्यान आज राष्ट्रीय महामार्गावरी पितांबरटोला गेटनजिक सकाळी वाहन तपासणीसाठी आयशर कंपनीचे वाहन क्र. एमएच35 एजे 1245 याला रोखले असता सदर चालकाने आपल्या ताब्यातील वाहन पळवून नेण्याचा प्रयत्न केला. त्या वाहनाचा पाठलाग करून पोलिसांनी खुर्शिपारनजीक अडविले. मात्र, अंधाराचा फायदा घेत त्यावाहनाचे चालक व वाहक आपले वाहने तेथेच सोडून जंगलाच्या दिशेने पळ काढला. या वाहनाची तपासणी केली असता त्यात 1 हेला आणि 19 म्हशी एकूण किंमत 4 लाख दाटीवाटीने कोणत्याही वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय वाहतूक करताना आढळून आले. या प्रकरणी पोलिस नायक मिताराम बोहरे यांच्या तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
दुसऱ्या घटनेत ठाणेदार अजित कदम यांचे नेतृत्वात स्थानिक परसटोला गेटजवळ सकाळी सहाच्या दरम्यान चिचगडकडून देवरीच्या दिशेने येणारा एमएच 18 एए 9747 या ट्रकची तपासणी केली असता यामध्ये 78 हजार रुपये किमतीचे 16 गोवंश अवैधरीत्या वाहतुक करताना आढळून आले. या प्रकरणी पोलिस नायक वसंता देसाई यांच्या तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद करून आरोपी मोहम्मद ईर्शाद अय्युब अंसारी (वय30) आणि मोहम्मद फसल मोहम्मद अक्रम अंसारी (वय 27) दोन्ही राहणार नागपूर यांना अटक केली. या प्रकरणी देवरी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून तपास पोलिस हवालदार अर्जून कावळे यांचेकडे सोपविला आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...