Monday 24 February 2020

कर्जमुक्ती योजनेची जिल्हयात अंमलबजावणी सुरु;जिल्हयात 35 हजार 325 पात्र लाभार्थी

सिल्ली -शहापूर येथे आधार प्रमाणिकरणास प्रारंभ
भंडारा,दि.24:- राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहिर करुन त्याची आज पासून अंमलबजावणी सुरु झाली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी योजनेची पहिली यादी जाहिर केली आहे. या नुसार भंडारा जिल्हयातील सिल्ली व शहापूर येथे प्रायोगिक तत्वावर कर्जमुक्तीचे आधार प्रमाणिकरण सुरु झाले असून या दोन्ही ठिकाणी 240  सभासद आहेत. आज कर्जमुक्तीचे आधार प्रमाणिकरण पावती वितरित करुन योजनेचा शुभारंभ झाला असून उर्वरित सभासदांची यादी 28 फेब्रुवारी रोजी प्रसिध्द केली जाणार आहे. जिल्हयात 35 हजार 325 लाभार्थी कर्जमुक्तीसाठी पात्र आहेत.
ग्रामपंचायत कार्यालय येथील आपले सरकार सेवा केंद्र, शहापूर येथे जिल्हा उपनिबंधक मनोज देशकर, भंडारा जिल्हा सहकारी सरव्यवस्थापक संजय बरडे व सहाय्यक उपनिबंधक विलास देशपांडे   यांनी सभासदांना कर्जमुक्ती योजनेची आधार प्रमाणिकरण पावती वितरित केली. जिल्हा सहकारी बँकेच्या शहापूर शाखेस उपनिबंधक मनोज देशकर यांनी भेट देवून कर्जमुक्तीच्या कामाचा आढावा घेतला.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत भंडारा जिल्हयातील ज्या शेतकऱ्यांकडे 1 मार्च 2015 ते 31 मार्च 2019 पर्यंत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त कर्ज खात्यात अल्पमुदत पीक कर्जाची 30  सप्टेंबर 2019 रोजी मुद्दल व व्याजासह थकीत असलेली व परतफेड न झालेली रक्कम 2 लाखापर्यंत आहे. अशा शेतकऱ्यांचे अल्प, अत्यल्प, भूधारक या प्रमाणे जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता त्यांच्या कर्ज खात्यात 2 लाखापर्यंत कर्ज मुक्तीचा लाभ या योजनेत देण्यात येणार आहे. जिल्हयातील सर्व राष्ट्रीयकृत बँकेने त्यांच्याकडील 10,110 व भंडारा सहकारी बँकेने 25,215 पात्र लाभार्थ्यांची माहिती शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड केली आहे.
प्रायोगिक तत्वावर शासनाने जिल्हयातील भंडारा तालुक्यातील शहापूर व सिल्ली या दोन गावांमध्ये राष्ट्रीयकृत बँक व ग्रामीण बँक तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिध्द केली आहे. सदर यादी शहापूर व सिल्ली गावांमधील सेतुकेंद्र, ग्रामपंचायत कार्यालय, विविध सेवा सहकारी सोसायटी तसेच संबंधित बँकेच्या शाखेत लावण्यात आली आहे. पात्र शेतकरी सभासदांनी सदरहू यादीत आपले नाव असल्यास संबंधित आपले सेवा केंद्र , सिएससी केंद्र  तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेच्या आधार प्रमाणिकरण केंद्रावर आपले बँक पासबुक व आधारकार्ड घेवून आधार क्रमांक प्रमाणिकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मनोज देशकर यांनी केले आहे.

कर्जमुक्तीचा आनंद मोठा
माझ्यावर सोसायटीचे 1 लाख 54 हजार 671 रुपये कर्ज होते. महाराष्ट्र शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत कर्जमुक्ती दिली.  योजनेची प्रक्रिया सुलभ व जलद होती. कार्यालयात चकरा माराव्या लागल्या नाहीत. आज कर्जमुक्तीची आधार प्रमाणिकरण पावती प्राप्त झाली आहे.  ही अतिशय समाधानाची बाब असून कर्जमुक्त झाल्याचा आनंद मोठा आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा  मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला आहे.
– कमलाबाई रुपचंद हजारे,शहापूर

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...