Friday 7 February 2020

एक शून्य शून्य...! ‘सोडला तोल अन् आयुष्य केले मातीमोल...’


सुरेश भदाडे

उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले
ठाणेदार कमलेश बच्छाव
देवरी,दि.07- कोणीतरी म्हटले आहे, ‘पुत्र असावा असा, ज्याचा त्रिलोकी वाजे डंका’. असे स्वप्न अर्थातच प्रत्येक बाप बघत असणार. पण हेच का विपरीत घडले तर. कल्पना करा त्या मात्यापित्यांची, ज्यांनी आपल्या उभ्या आयुष्याची होळी करून आपल्या काळजाच्या तुकड्याला घडविले. काय अवस्था असणार त्या मातेची, जिच्यावर अशी वेळ तिच्या पोटच्या गोळ्याने आणली. समाजातील प्रत्येक बालकाने, युवकाने वा कोणत्याही माणसाने दुसऱ्याचा नाही तर स्वतःच्या कुटुंबाचा आत्मसन्मान हा राखलाच पाहिजे. आपणच आपल्या समाजाचे रक्षक आहोत, ही बाब समजू शकलो तर आपला समाज पर्यायाने देश हा आदर्शरूपाने आपण जगापुढे आणू शकतो.
गोंदिया जिल्ह्यातील देवरी म्हणजे शहरवजा गावच. या गावाला सध्यातरी शहरी हवा लागली नाही.सर्व काही सुरळीत असताना अचानक गेल्या 1 जून रोजी एक समाजमन हेलावून टाकणारी घटना घडली.या घटनेने देवरीसह संपूर्ण जिल्हा ढवळून निघाला. स्वतःला सुशिक्षित, सबसे तेज पत्रकार म्हणवून घेणारा रमेश (नाव बदलले) याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची वार्ता वाऱ्यासारखी शहरात पसरली. नेमक्या रमेशच्या वाढदिवसालाच तो गजाआड गेला.घटना जाणून घेण्यासाठी प्रत्येकाने पोलिस ठाण्याच्या दिशेने धूम ठोकली. सत्ताधारी असो की विरोधक अशा नेत्यांच्या पुढेपुढे करणाऱ्या रमेशला पोलिसांनी बेड्या का ठोकल्या, हे जाणून घेण्याची उत्कंठा प्रत्येकाच्या मनात होती. 
त्याचे झाले असे की, आरोपी रमेश हा नागपूरच्या एका दैनिकासह एका युट्यूबचॅनेलसाठी काम करीत होता. त्याच्या घराशेजारी एक पाच वर्षीय चिमुकली आपल्या काकांकडे पाहुणचाराला आली होती. ती सकाळी सवगंड्यासह खेळण्यात मग्न होती. रमेशलाही ती परिचयाची झाली होती.तिला खेळताना बघून रमेशच्या मनातील हैवान जागा झाला. त्या निरागस बाळाला चॉकलेटचे आमिष दिले. तीही काका म्हणत रमेशच्या घरी गेली. घरीही कोणीही नव्हते. रमेशचा तोल गेला आणि त्याने ती कोवळी कळी अमानुषपणे कुस्करून टाकली. ते बाळ कसेबसे स्वतःच्या घरी गेले. प्रकरण आईच्या चटकन लक्षात आले. त्या माऊलीने क्षणाचाही विलंब न लावता पोलिस स्टेशन गाठले. आपल्या फिर्यादीत त्या माऊलीने रमेशचे नाव सांगितले. क्षणभर पोलिसही थबकले. पण त्या चिमुकलीची अवस्था बघून ठाणेदार कमलेश बच्छाव हे लगेच अ‍ॅक्शन मोडवर आले. पोलिसांनी तत्काळ मुलीची वैद्यकीय तपासणी करून घेतली.तो पर्यंत रमेशला याची कुणकूण लागली होती.तोही आपल्या बचावासाठी प्रयत्न करू लागला. मात्र, पोलिसांनी तो दबा धरून बसलेल्या घराच्या दारावर लाथ हाणली आणि त्या नराधमाला फरफटत घरातून काढून पोलिस लॉकअपमध्ये टाकले. माजलेल्या रमेशच्या चेहऱ्यावर कोणतेही पश्चात्तापाची चिन्हे नव्हती. तो मी नव्हेच आणि आपल्या पत्रकारितेच्या तोऱ्यात तो वावरत होता.ठाणेदार बच्छाव यांनी चार दिवसात प्राथमिक तपास करून प्रकरण पोलिस उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांच्या स्वाधीन केले.पुढे सर्व सोपस्कार पूर्ण करून अवघ्या 25 दिवसात हे प्रकरण गोंदियाच्या विशेष न्यायालयात दाखल केले. दरम्यान, पोलिसांनी आपल्या तपासात कोणतीही हयगय करून नये, यासाठी सर्व समाज रस्त्यावर आला. कधी नव्हे एवढ्या संख्येने महिला आणि युवती प्रथमच रस्त्यावर उतरल्या. पोलिसांनी महिला आंदोलनाला गांभीर्याने घेत आपले कर्तव्य बजावले.
गोंदियाच्या विशेष न्यायालयात रमेशवर बाल लैंगिक शोषण प्रतिबंध कायदा आणि बलात्काराच्या आरोपाखाली घटल्याची सुनावणी सुरू झाली. रमेशची बाजू नागपूर येथील एका नामांकित वकिलाने लढविली. तरीही पोलिसांनी आपली बाजू भक्कमपणे मांडल्याने केवळ सात महिन्यात मा.न्यायालयाने रमेशला दोषी ठरविले.रमेशला 7 फेब्रुवारी 2020 ला 21 वर्षाच्या कारावासाची शिक्षा, 75 हजाराचा दंड आणि दंड न भरल्यास 3 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली. आता पर्यंत मग्रुरीत वावरणारा रमेश ढसाढसा रडू लागला होता. पोटचा गोळा असा नालायक निघाल्याने पालकांवर सुद्धा नामुष्की ओढवली. ज्यांनी इतरांपुढे कधीही हात पसरले नाही, त्यांचेवर आपल्या पोटच्या गोळ्याला वाचविण्यासाठी अनन्य जहरी टीका सहन तर करावी लागली. मात्र, त्या गरीब मात्यापित्यांवर आपले घरदार विकण्याची पाळी आल्याची चर्चा सुद्धा आहे. रमेश हा अविवाहित एकुलता एक मुलगा. तो पहिल्या दिवसापासून तुरुंगात आहे. तो केव्हा परतेल, हे सांगणे आतातरी शक्य नाही. तो शिक्षा पूर्ण करून आलाही तरी त्याच्या आयुष्याची राखरांगोळी अखेर एका अविचारी घटनेने झाली. रमेश एकुलता एक असल्याने त्याचा परिवार संपल्यात जमा झाला. ‘रमेशनी सोडला तोल अन् आयुष्य केले मातीमोल’, असे म्हणण्याची दुर्दैवी वेळ त्याच्या कधीकाळच्या मित्रांवर आली.

1 comment:

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...