Monday 24 February 2020

दंडबैठकांच्या वेदनेने विव्हळल्या विद्यार्थिनी!

चंद्रपूर,जि.24ः- जिल्ह्यात अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील मुलींना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून राज्य शासनाचे समाज कल्याण विभाग कोट्यवधी रुपये खर्च करते. त्यातीलच चिमूर येथील शासकीय अनुसूचित जाती मुलींची निवासी शाळा असून, शाळेतील दहावीच्या ३६ विद्यार्थिनींना शाळेच्या मुख्याध्यापिकेने दोनशे उठबैठका मारण्याची शिक्षा सुनावल्यामुळे शाळेतील विद्यार्थिनींच्या पायावर सूजन व दुखण्याचा त्रास झाल्याने सहा विद्यार्थिनींना शुक्रवारी महाशिवरात्रीच्या दिवशी चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दोन-तीन तासांचे औषधोपचार करून सुट्टी देण्यात आली. मात्र, शाळेतील मुख्याध्यापिकेकडून हा घृणास्पद प्रकार घडल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून, शैक्षणिक क्षेत्रात खळबळ माजली आहे.
चिमूर येथे शासकीय अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची निवासी शाळा असून, इयत्ता ६ ते १0 वीपर्यंत अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील मुलींना या निवासी शाळेत शिकविले जाते. गुरुवारी शाळेतील ३६ विद्यार्थिनींना शाळेच्या मुख्यधापकाकडून २00 उठबैठका मारण्याची शिक्षा गुरुवारी सुनावली. त्यामुळे विद्यार्थिनींच्या पायावर सूजन व दुखण्याचा त्रास सुरू झाला. यात सुबोधी सर्वज्ञान घुटके (१६), संगिनी प्रज्ञाशील गेडाम (१६), साक्षी देविदास मालके (१६), सुप्रिया कणीला सुखदेवे (१६), सानिया प्रभू खोब्रागडे (१६), नंदिनी अशोक रामटेके (१६) या सहा विद्यार्थिनींच्या पायावर सूजन व दुखण्याचा जास्त त्रास झाल्याने महाशिवरात्रीच्या दिवशी चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दुपारी ११वाजून ५0 मिनिटांनी उपचारासाठी भर्ती करण्यात आले. त्यात तेथील डॉक्टरांनी इंजेक्शन व औषध उपचार करून दोन-तीन तासांनी सुट्टी देण्यात आली.
एकीकडे शासन शिक्षणासाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत असून, शासनाच्या शासकीय अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींच्या शाळेतील मुख्याधापक, शिक्षक कर्मचारी यांच्याकडून विद्यार्थिनींना अशी गंभीर इजा पोहोचेपर्यंत शिक्षा देणे येणार्‍या काही दिवसांत दहावीच्या परीक्षेवर विपरीत परिणाम पडण्याची शक्यता आहे. तसेच मुलींच्या मनावर आघात करणारी घटना असून, या गंभीर व घृणास्पद प्रकाराची चौकशी करून यातील दोषींवर कार्यवाही करण्यात यावी, अशी पालकांच्या तीव्र भावना आहे.
आरोप खोटे -मुख्याध्यापिका
दहावीच्या विद्यार्थिनींची परीक्षा होती. त्याचदरम्यान प्रार्थनेची वेळ झाली. त्यावेळी विद्यार्थिनी हुल्लड करीत होत्या. त्यांनी राष्ट्रीय कर्तव्याचे उल्लंघन केले. त्यामुळे त्यांना शिक्षा देण्यात आली. कर्तव्याची जाण व्हावी, हाच मुख्य उद्देश होता. दंडबैठका मारायला लावल्या. पण, दोनशे बैठका मारायला लावल्या नाहीत. माझ्यावर केलेले आरोप खोटे आहेत, असे मुख्याध्यापिका दुशिला मेश्रामने सांगितले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...