देवरी,दि.24 - जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे विद्युत बील हे ग्रामपंचायतींनी भरावे, अशी मागणी करणारे निवेदन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या देवरी शाखेने स्थानिक पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रमणी मोडक यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, राज्यात सध्या कोविड-19 ने थैमान घातले असल्याने ग्रामीण भागात प्राथमिक शाळांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले होते. या कक्षामध्ये बाहेरून येणाऱ्या ग्रामस्थांना ठेवण्यात आले होते. त्यामुळे शाळेमध्ये विजेचा वापर मोठ्या प्रमाणावर झाला. परिणामी, शाळेच्या विद्यूत बीलाचा आकडा वाढला. हे बील शाळांना मिळणाऱ्या अपुऱ्या अनुदानामुळे शालेय प्रशासनाला भरणे शक्य नाही. यामुळे सदप विद्युत बिलाचा भरणा ग्राम पंचायतीला मिळणाऱ्या 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून भरण्याच्या सूचना संबंधित ग्रामपंचायतीच्या प्रशासनाला करण्याची मागणी संघाच्या वतीने करण्यात आली आहे. हे विद्युत बिल वेळेच्या आत भरणा न केल्यास शालेय प्रशासनाला ऑनलाइन कामे करण्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. संघाच्या या मागणीला गटविकास अधिकारी मोडक यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे प्रसिध्दी पत्रकांत म्हटले आहे.
निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात संघाचे तालुका नेते एस एच गभणे, रमेश ऊइके, सत्यवान गजभिये, आदेश धारगावे,जीवन आकरे, निकेश सुखदेवे, जितेंद्र कोहाडकर,लोकेश मेश्राम, मनोज गेडाम,मंगल सयाम, मोरेश सुर्यवंशी, ओमप्रकाश ढवळे,राजेश रामटेके आदींचा समावेश होता.
No comments:
Post a Comment