Monday, 6 March 2017

देवरी नगरपंचायत होणार हागणदारी मुक्त

देवरी- देवरी नगरपंचायतीने शहर हागणदारी मुक्त करण्याच्या उद्देशाने  6 गुडमार्निंग पथकांची निर्मिती करण्यात आली अाहे. 1 मार्चपासून शहरात उघड्यावर बसणाऱ्यांचे गुवाबपुष्प देवून त्यांना शौचालयाचे बांधकाम करण्यास प्रोत्साहीत केले जात आहे.
मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे यांनी  यासाठी पुढाकार घेतला अाहे. या पथकात उपाध्यक्ष ओमप्रकाश रामटेके, बांधकाम सभापती आफताब शेख, अर्थ व नियोजन सभापती रितेश अग्रवाल, नगरसेवक प्रवीण दहिकर, नगरसेविका भूमिता बागडे यांचा समावेश आहे. नगर पंचायतीकडून मिळालेले वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम केल्यानंतर उघड्यावर शौचास बसल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येईल, अशी तंबी उघड्यावर जाणाऱ्यांना दिली जात आहे.  स्वच्छ भारत मोहीेमेत ज्यांनी अजूनपर्यंत शौचलय बांधकामाकरिता अर्ज केला नाही, अशा लोकांना नगर पंचायत कार्यालयात बोलावून त्यांचा अर्ज भरून घेत अनुदानाचा पहिला हप्ता देऊन 15 दिवसात त्यांनी शौचालयाचे बांधकाम करून उघड्यावर जाणे बंद करावे, अशी सूचना देण्यात येत आहे. उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना यापुढे  कोणतेही दाखले देण्यात येणार नाही. 
2011 च्या जनगणनेनुसार शहरात एकूण 721 कुटुंबांना वैयक्तिक शौचालय देण्याचे उद्देश असून त्यापैकी 650 लाभार्थ्यांना पहिला हप्ता तर 550 लाभार्थ्यांना दुसर्या हप्त्याचे वाटप करण्यात आले आहे.
यात एकूण 400 शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले असून 250 शौचालयाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. 21 मार्च 2017 रोजी देवरी शहर संपूर्ण हागणदारी मुक्त गोषित करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे यांनी दिली आहे.

Saturday, 4 March 2017

मकरधोकडा आश्रमशाळेसह भौतिकसुविधा नाकारणाऱ्या आश्रमशाळा रडारवर

मकरधोकडा शाळेची मान्यता काढण्याची कारवाई
देवरी- खासगी आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांवरील अन्यायात सतत होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध काल शुक्रवारी देवरी येथे आदिवासी समाजातील सर्व संघटनांनी हजारोंच्या संख्येत आदिवासी प्रकल्प कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन केले. या मोर्च्याला सामोरे जाताना आदिवासी विभागाच्या अप्पर आयुक्त डॉ. माधवी खोडे यांनी देवरी तालुक्यातील मकरधोकडा आश्रमशाळेसह आज भेट दिलेल्या एका आश्रमशाळेची मान्यता कायमस्वरुपी रद्द करण्याचा प्रस्ताव तयार केल्याचे जाहीर केले.
स्थानिक आंतरराष्ट्रीय माझीसरकार मैदानातून दुपारी 12 वाजेच्या सुमारास निघालेल्या या मोर्च्याचे नेतृत्व आदिवासी समाजातील विद्यार्थिनींनी केले. हा मोर्चा खासगी आश्रमशाळा प्रशासन व राज्य सरकार विरोधात घोषणा देत चिचगड रोड चौकात येताच राणी विरांगणा यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. यानंतर हा मोर्चा आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या दिशेने घोषणा देत निघाला. प्रकल्प कार्यालयासमोर काहीकाळ निदर्शन करून या मोर्च्याचे जिल्हा परिषद मैदानात सभेत रुपांतर करण्यात आले. यावेळी माजी आमदार रामरतन राऊत, आमदार संजय पुराम यांनी सुद्धा मोर्चेकऱ्यांची भेट घेऊन आपण समाजहितासाठी बांधील असल्याचा संदेश त्यांनी उपस्थित समाजबांधवांना दिला. मोर्चेकऱ्यांनी आदिवासी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सभास्थळी येऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारावे, अशी भूमिका घेतली होती. परंतु, सभास्थळी एकही अधिकारी न फिरकल्याने शेवटी देवरीचे ठाणेदार राजेश तटकरे यांनी अत्यंत उत्तमरीत्या शिष्टाई करून मोर्चेकऱ्यांची अधिकाऱ्यांशी बोलणी करण्यात मोलाची भूमिका बजावली. आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अडेल धोरणामुळे सदर मोर्चा हा सायंकाळी सहापर्यंत चालला.
अप्पर आयुक्त डॉ. माधवी खोडे यांनी शिष्टमंडळाशी प्रकल्प कार्यालयात चर्चा करून आज भेट दिलेल्या एका आश्रमशाळेसह तालुक्यातील मकरधोकडा आश्रमशाळेची मान्यता कायमस्वरुपी काढण्यासाठी प्रस्ताव तयार केल्याचे सांगितले. याशिवाय ज्या आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना भौतिकसुविधा पुरविल्या जात नसतील, अशा शाळांची चौकशी करून त्यांची सुद्धा मान्यता काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या आहारात वाढ करण्याचे आश्वासनही त्यांनी मोर्चेकऱ्यांना दिले. याशिवाय पुढील सत्रापासून आदिवासी वसतिगृहात राहणाऱ्यांचा निःशुल्क विमा काढणे, नामांकित आश्रमशाळासंबंधी नवीन नियमावली तयार करणे, महिला वसतिगृहात महिला कर्मचाऱ्यांची व आरोग्यसेविकेच्या नियुक्तीसाठी प्रस्ताव सादर करणे, बुटीबोरी आणि मकरधोकडा आश्रमशाळेतील पिडीत मुलींनी दत्तक घेणे, अत्याचारीत मुली व त्यांच्या पालकांचा संपूर्ण न्यायालयीन खर्च आदिवासी विभागाकडून करण्याची तरतूद करणे, भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती झाल्यास पालकांचा आर्थिक खर्च विभाग उचलण्याविषयी प्रस्ताव, आश्रमशाळेत होणाऱ्या अत्याचार प्रकरणातील दोषींना जलद शिक्षा व्हावी यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करणे, मकरधोकडा शाळेतील रेकार्डवर खाडाखोड करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणे, किरसान मिशन स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर फेरविचार करणे आदी गंभीर विषयांवर दखल घेऊन जे शासकीय स्तरावरील मुद्दे आहेत, त्याविषयी राज्य सरकारला प्रस्ताव सादर करण्याचे आश्वासन डॉ. खोडे यांनी मोर्च्याला सामोरे जाताना उपस्थितांना दिले.
या मोर्च्याचे वेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता. यावेळ दंगा नियंत्रण पथक आणि जलद कृती दलाच्या जवानांना सुद्धा पाचारण करण्यात आले होते. मोर्च्यातील कायदा व सुवस्था हाताळण्यात ठाणेदार राजेश तटकरे यांनी मोलाची भूमिका बजावली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. 

ज्येष्ठ विचारवंत डॉ. कृष्णा किरवले यांची कोल्हापुरात हत्या

कोल्हापूर-: आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत अशी ओळख असलेले डॉ. कृष्णा किरवले यांची आज शुक्रवारी कोल्हापुरातील राजेंद्रनगर येथील त्यांच्या राहत्या घरी हत्या झाली.
डॉ. कृष्णा किरवले कोल्हापुरातील राजेंद्रनगर परिसरात असलेल्या म्हाडा कॉलनीत राहत होते. कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर पुन्हा एका विचारवंताची हत्या झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. 
घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून या प्रकरणाचा तपास करत आहेत. हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक माहितीनुसार आर्थिक देवघेवीसारख्या व्यक्तीगत कारणातून हे कृत्य झाल्याचा संशय आहे.
डॉ. कृष्णा किरवले शिवाजी विद्यापिठातील मराठी विभागाचे माजी विभाग प्रमुख होते. डॉ. किरवले यांनी आपल्या लिखाणातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार देशभरात पोचवले होते.

Thursday, 2 March 2017

बॅंक व्यवहार महागले

काही बॅंकांकडून भरमसाट व्यवहार शुल्क आकारणीस सुरवात 
नवी दिल्ली, ता. 1 (पीटीआय) : "कॅशलेस' व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी बॅंकिंग व्यवहारांवर अधिकाधिक शुल्क आकारणीचा निर्णय बॅंकांनी घेतला आहे. खासगी क्षेत्रातील एचडीएफसी, आयसीआयसीआय, ऍक्‍सिस या बॅंकांनी मार्चपासून व्यवहार शुल्कात भरमसाट वाढ केली असून ग्राहकांना प्रत्येक पाचव्या व्यवहारांपासून 5 ते 150 रुपयांचे शुल्क आणि इतर अधिभाराचा भुर्दंड सोसावा लागेल. 
बॅंक व्यवहारांवरील शुल्क आकारणीने नोटाबंदीतून सावरणाऱ्या सर्वसामान्यांच्या अडचणी वाढण्याची शक्‍यता आहे. यामुळे बचत आणि वेतन खाते असलेल्या ग्राहकांना "डिजिटल' व्यवहारांचा स्वीकार करावा लागणार आहे. "डिजिटल' आणि "कॅशलेस' व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने बॅंक व्यवहार शुल्क नियंत्रणमुक्त केले आहेत. त्यानुसार एचडीएफसी, आयसीआयसीआय, ऍक्‍सिस आदी बॅंकांनी कमाल 150 रुपयांचे व्यवहार शुल्क लागू केले आहे. 
महिनाभरापूर्वी बॅंकेने शुल्कासंबधी ग्राहकांना सूतोवाच केले होते. त्यानुसार 1 मार्चपासून शुल्क आकारणी लागू केल्याचे एचडीएफसी बॅंकेच्या अधिकाऱ्याने सांगितले. ग्राहकांना शाखांमधून चार बॅंक व्यवहार (पैसे जमा करणे आणि काढणे) मोफत करता येतील. मूळ शाखेमध्ये दोन लाखांपर्यंत व्यवहार विनाशुल्क करता येतील. मात्र, त्यानंतर प्रत्येक व्यवहारांवर 150 रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाणार आहेत. बॅंकेने व्यवहार शुल्कात 50 टक्‍क्‍यांची वाढ केली आहे. मात्र, एटीएममधून पाच मोफत व्यवहार कायम असल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. यापूर्वी बॅंकेकडून सहाव्या व्यवहारावर 100 रुपये शुल्क आकारले जात होते. दरम्यान, एचडीएफसीमध्ये खाते नसलेल्या ग्राहकाला या पुढे बॅंक खातेदारांकडून 25 हजारांहून अधिक रक्कम पाठवता येणार नाही. 
आयसीआयसीआय बॅंकेनेही ग्राहकाला मूळ शाखेतून चार व्यवहार करण्यास मुभा दिली आहे. मात्र, त्यानंतर प्रत्येक व्यवहारावर 150 रुपये कर भरावा लागेल, असे बॅंकेने म्हटले आहे. ऍक्‍सिस बॅंकेनेही वेतन खाते असलेल्या ग्राहकांना स्थानिक शाखेत 10 रोख व्यवहार किंवा 10 लाख रुपये आणि बचत खातेधारकांसाठी 10 रोख व्यवहार आणि 25 लाख रुपये अशी मोफत व्यवहारांसाठी मर्यादा ठेवली आहे. 10 व्यवहारांपुढील प्रत्येक व्यवहारावर 150 रुपयांचे शुल्क आकारले जाणार आहे. 
"एसबीआय'ने मोफत व्यवहार घटवले 
"एसबीआय'च्या ग्राहकांच्या दरमहा मोफत व्यवहारांना कात्री लावली आहे. एप्रिलपासून "एसबीआय'च्या बचत खातेधारकांना महिन्याला केवळ तीनच रोख व्यवहार मोफत करता येतील. त्या पुढील प्रत्येक व्यवहारावर 50 रुपयांचे शुल्क आकारले जाणार असल्याचे बॅंकेने म्हटले आहे. मात्र, यातून ज्येष्ठ नागरिकांना आणि लहान मुलांना वगळण्यात आले आहे. 
बॅंकांचे दरमहा विनाशुल्क व्यवहार 
एचडीएफसी, आयसीआयसीआय, ऍक्‍सिस : 4 
स्टेट बॅंक ऑफ इंडिया : 3 

विनाअनुदानित सिलिंडर 86 रुपयांनी महागले

नवी दिल्ली: खुल्या बाजारात स्वयंपाकाचे सिलिंडर 86 रुपयांनी महागले आहे. जागतिक स्तरावर "एलपीजी'चे दर वाढल्यामुळे सिलिंडरचेही दर वाढवावे लागत असल्याचे सरकारने म्हटले आहे. मात्र, सिलिंडरच्या अनुदानित किमतींवर या दरवाढीचा परिणाम होणार नसल्याचाही निर्वाळा सरकारने दिला आहे.
अनुदानित सिलिंडर घेणाऱ्या ग्राहकांना कोणत्याही प्रकारे या दरवाढीची झळ बसणार नाही. दिल्लीमध्ये ही सवलत घेणाऱ्या ग्राहकांसाठी एक मार्चनंतर नव्या सिलिंडरचे दर 737 रुपये असतील. त्यांच्या बॅंक खात्यामध्ये 303 रुपये अंशदानाची रक्कम जमा केली जाईल. ग्राहकांना केवळ 434 रुपयेच द्यावे लागतील, असे केंद्रीय पेटोलियम मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

प्रवाशांनी वर्धेत रोखली विदर्भ एक्सप्रेस


वर्धा- रेल्वे प्रशासनाच्या जाचाला कंटाळून वर्धा येथे रेल्वे प्रवाशांनी अखेर विदर्भ एक्सप्रेस रोखून धरली. मासिक पासधारकांनवर होत असलेल्या कारवाईचा निषेध करीत प्रवाशांना बसण्याची सोय करण्याची मागणीचा येथे उद्रेक बघावयास मिळाला.
सविस्तर असे की, गेल्या महिनाभरापासून रेल्वेचे कर्मचारी हे मासिकपास धारकांविरुद्ध आरक्षित डब्यात बसल्यावरून दंडाची कारवाई करीत होते. ही कारवाई करीत असताना अनेकदा रेल्वे कर्मचारी हे प्रवाशांना अपमानास्पद वागणून देत असल्याच्या तक्रारीत सातत्याने वाढ होत होती. बडनेरा,धामणगाव,पुलंगाव,वर्धा येथून हजारो लोक करतात दररोज रेल्वेच्या मासिक पासने प्रवाश करीत असतात. आज या सर्व प्रवाश्यांनी सामान्य बोगीतून प्रवास करण्यासाठी वर्धेच्या स्थानकात गर्दी केली. मात्र. वर्धा स्थानकावर विदर्भ एक्सप्रेस पोचताच आधीच सामान्य बोगी हाऊस फुल्ल होती. त्यामुळे त्या डब्यात पाय ठेवायलासुद्धा जागा नव्हती. यामुळे सर्व प्रवाश्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे डब्यात बसण्याची सोय करून देण्याची मागणी केली. या मागणीमुळे रेल्वे अधिकाऱ्यांची पाचावर धारण बसली. प्रशासनाची हतबलता बघून अखेर प्रवाश्यांनी विदर्भ एक्सप्रेसच्या इंजिनसमोर उभे राहत रेल्वे रोखून धरली. वृत्त लिहीपर्यंत सुमारे 40 मिनिटे गाडी वर्धा येथे  थांबून होती.

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...