Saturday, 8 September 2018

बनावट विदेशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त

भंडारा,दि.0८ः- शहरातील आंबेडकर वॉर्डात सुरू असलेल्या बनावट विदेशी दारूच्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकून बनावट दारूसाठा व चारचाकी वाहन असा ३ लाख २९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक गस्तीवर असताना कारधा येथे एका संशयास्पद व्हॅनची (क्र . एमएच १६ बिएच १९९४) झडती घेतली असता, त्याठिकाणी बनावट विदेशी दारुच्या ३५0 बाटल्या आढळून आल्या. या दारुसाठय़ाबाबत आरोपींना विचारणा केली असता त्यांनी आंबेडकर वॉर्डातील एका घरातून आणल्याचे सांगितले. उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने तात्काळ आंबेडकर वॉर्डातील त्या घरावर छापा टाकला. त्यावेळी प्रशांत दुर्गाप्रसाद मानवटकर (२८) रा. शुक्र वारी, भंडारा, चेतन सुरेश चकोले (२८) रा. शुक्र वारी, भंडारा, गोपाल धनबहादूर ठाकूर रा. आंबेडकर वॉर्ड, गोलू उर्फ सरीन विनोद गोस्वामी (२४) रा. शहीद वॉर्ड, भंडारा, कैलास गोपीचंद मोहरकर (३0) रा.आंबेडकर वॉर्ड भंडारा हे पाच जण बनावट विदेशी दारू तयार करताना आढळून आले.
आरोपींच्या ताब्यातून ओमनी व्हॅन, एक दुचाकी, दारूच्या ९८५ बनावट बाटल्या, मध्यप्रदेशातील सिल्वर जेट व्हिस्कीच्या ४ बाटल्या, २ हजार झाकणे, कॉक, बुच आणि ५५0 बनावट लेबल, स्पिरीटच्या वासाचे केमिकल आणि दारु तयार करण्याचे अन्य साहित्य असा ३ लाख २९ हजार ७२0 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पाचही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्याच्या कलमान्वये गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील दोन आरोपी फरार आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त अश्‍विनी जोशी, संचालक सुनील चौहाण, उपआयुक्त उषा वर्मा, भंडाराचे अधीक्षक शशीकांत गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक तानाजी कदम, दुय्यम निरीक्षक पांडुरंग घरटे, सुषमा कुंभारे, रोहीनी बनकर, सहाय्यक दुय्यम निरीक्षक अरविंद कोटांगले, नरेश उईनवार, अंबूले, संजय कोवे, हेमंत कांबळे, जयघोष जनबंधू, स्वप्नील लांबट, विनायक हरिनखेडे, नरेंद्र कांबळे, सविता गिर्‍हेपुंजे, मंगेश ढेंगे, विष्णू नागरे आदींनी केली

दिग्विजय दिन व गुणवंतांचा सत्कार

लाखनी, दि. ०७ : राष्ट्रीय शिक्षण संस्था तथा विवेकानंद सार्वजनिक वाचनालय लाखनी यांच्या संयुक्त विद्यमाने दिग्विजय दिन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
 स्वामी विवेकानंद यांच्या विश्वधर्म सभेतील ऐतिहासिक दिनाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त 11 सप्टेंबर रोजी दिग्विजय दिन साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त लाखनी येथील स्वागत सभागृहात दुपारी 4 वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.प्रतिभा राजहंस राहणार असून उद्घाटन गडचिरोली येथील प्रसिद्ध व्याख्याते पद्मश्री डॉ.राणी बंग करतील. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष आल्हाद भांडारकर, वाचनालयाचे अध्यक्ष छबीलाल रहांगडाले, कार्यवाह अजिंक्य भांडारकर यांनी केले आहे.

Friday, 7 September 2018

ग्रा.प. ओवारा येथे पोषण अभियान कार्यक्रम साजरा


 देवरी: 07(सुजित टेटे) एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत सप्टेंबर महिना हा राष्ट्रीय पोषण  महिना म्हणून साजरा करण्यात येत आहे.  त्या अनुषगाने आज ग्राम पंचायत ओवारा येथे ग्राम सभेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर ग्रामसभे मध्ये गावातील लोकांना आमंत्रित करून मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये सरपंच हिरामण टेकाम, उपसरपंच कमल येरने, मार्गदर्शक म्हणून सचिव  सुभाष तागडे , तं. मु. स. अध्यक्ष देवेंद्र डोये तसेच अंगणवाडी सेविका, आशा सेविका आणि सर्व सदस्य उपस्थित होते.
सदर कार्यक्रम ठरल्याप्रमाणे उत्तमरित्या राबविण्यात आला.मुलांचे वजन तसेच वयक्तिक स्वच्छतेची जनजागृती करण्यात आली तसेच शपथ घेण्यात आली.सदर कार्यक्रमात सर्व पदाधिकारी आणि गावकर्यांनी सहकार्य केला.

शेडेपारच्या जि.प. शाळेत स्वयंशासनदिन उत्साहात


देवरी,दि.07 - तालुक्यातील शेडेपार येथील जिल्हा परिषद शाळेत गेल्या बुधवारी शिक्षक दिनाचे औचित्य साधून स्वयंशासन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
शाळेत मुख्याध्यापक घनश्याम देसाई यांचे मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची रुपरेषा आखण्यात आली होती. संपूर्ण शालेय  दिवस विद्यार्थ्यांनी स्वतःचे शासन केले. यामध्ये विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांपासून तर शिक्षक, कर्मचारी यांची भूमिका पार पाडली. शाळेचे प्रशासन कसे चालविले जाते, याचे प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांनी घेतले.
या उपक्रमास शिक्षक ए.व्ही मेश्राम, एम के चव्हाण आणि ए.बी. नंदागवळी यांनी सहकार्य केले

गोंदिया पोलीस दलाचे 8 शिपाई निलबिंत,अधिक्षकांची कारवाई




गोंदिया,दि.07ः- गोंदिया जिल्हा पोलीस दलातील  8 पोलीस शिपायांना आपल्या कर्तव्यात कसुर केल्याप्रकरणी तसेच अवैध जुगारव्यवसायाला सरंक्षण दिल्याच्या कारणावरुन पोलीस अधिक्षक हरिष बैजल यांनी निलबिंत केल्याची माहिती सुत्रांनी दिली.या निलबिंत पोलीस शिपायामध्ये गोंदिया शहर पोलीस ठाण्याचे 4,रामनगर पोलीस ठाण्याचे 4 शिपायांच्या समावेश असल्याचेही वृत्त आहे.या सर्व निलबिंत पोलीस शिपायांची नावे लवकरच देणार.

कोसबी आश्रमशाळेतील विनयभंग प्रकरणातील आरोपींची संख्या पोचली तीनवर


गोंदिया,दि.7- देवरी तालुक्यातील कोसबी येथील बिरसामुंडा आश्रमशाळेमध्ये घडलेल्या विनयभंग प्रकरणामध्ये आरोपींची संख्या तीनवर पोचल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
सविस्तर असे की, काल गुरूवारी काही महिला कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने देवरी तालुक्यातील कोसबी आश्रमशाळेतील विनयभंगाचा प्रकार उजेडात आला होता. या प्रकरणी देवरीच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने चौकशी करून चिचगड पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी चिचगडचे ठाणेदार गांगुर्डे यांनी तपास करून त्या नराधम शिक्षकाला कालच अटक करून गुन्ह्याची नोंद केली होती. या प्रकरणी अधिक चौकशी केल्यावर पोलिसांसमोर पुन्हा दोन आरोपींची नावे समोर आली आहे. 
सदर शाळेत यापूर्वी सुद्धा असे प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये कमालीचा संताप आहे. अशा कर्मचाऱ्यांना संस्थाप्रमुखांचे सरंक्षण प्राप्त असल्याने या शाळेत या घटना नवीन नसल्याचे बोलले जात आहे.
अटकेत असलेल्या आरोपीचे नाव सुनील मारोतराव कांबळे (वय 45) असे असून इतर आरोपींमध्ये दीपक श्रीपत कांबळे (वय 32) आणि भोजराज मोदेकर (वय28) यांचा समावेश आहे.

Thursday, 6 September 2018

कोसबी आश्रमशाळेच्या शिक्षकावर विनयभंगाचा आरोप

गोंदिया,दि.६- देवरी तालुक्यातील कोसबी येथील बिरसामुंडा आदिवासी आश्रमशाळेतील एका शिक्षकाने दोन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा संतापदायक प्रकार समोर आला आहे. उल्लेखनीय म्हणजे या शिक्षकाने गेल्यावर्षीसुद्धा असा प्रकार केल्याचा आरोप आहे.
सविस्तर वृत्त असे की, देवरी तालुक्यातील कोसबी येथे साकोलीच्या सर्वांगीण शिक्षण संस्थेद्वारा बिरसामुंडा आश्रमशाळा चालविली जाते. या आश्रमशाळेत ५वी चे १० वी पर्यंत शिक्षणाची सोय असून येथील वसतिगृहात ५४ मुली आणि १८ मुले निवासी असल्याची माहिती आहे. .या शाळेतील एका माध्यमिक शिक्षकाद्वारे इयत्ता ९ वी व १०वी मध्ये शिकणाऱ्या दोन मुलींचा विनयभंग करण्याचा संतापदायक प्रकार गेल्या काही महिन्यापासून सुरू आहे. या प्रकाराला या पीडित मुलींनी नेहमी विरोध करत या प्रकाराची माहिती शालेय प्रशासनाला दिल्याचे त्या पीडित विद्यार्थिनींचे म्हणणे आहे. हा प्रकार काही महिलांना माहीत झाल्याने त्यांनी आज (दि. ६) हे प्रकरण देवरीच्या प्रकल्प अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले. त्यामुळे प्रकल्प अधिकारी यांनी सहायक प्रकल्प अधिकारी आणि विस्तार अधिकाऱ्याला चौकशीसाठी बोरगाव येथे सुरू असलेल्या क्रीडास्थळी पाठविले. या अधिकाऱ्यांनी सदर पिडीतांचे बयाण नोंदविल्यानंतर या आरोपी शिक्षकाविरुद्ध चिचगड पोलिसांत तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी पीडित वा त्यांचे पालक आल्याशिवाय आम्ही तक्रार नोंदविणार नाही, असे म्हटल्याचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला सांगितले. असे असले तरी चिचगड पोलिसांनी बोरगाव येथे जाऊन त्या विद्यार्थिनींचे बयाण नोंदविले. उशिरा रात्री पर्यंत गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही सुरू होती.
दरम्यान, गेल्या वर्षीसुद्धा याच शिक्षकाविरुद्ध विनयभंगाचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी आदिवासी विकास मंत्रालयाकडून चौकशीचे पत्र दि.१६ जून २०१७ रोजी आदिवासी आयुक्तालयाला दिले होते. मात्र, पुढे या कार्यवाहीचे काय झाले, याबाबत विचारले असता प्रकल्प अधिकाऱ्यांनी आपल्या कानावर हात ठेवले. दरम्यान, सदर शिक्षकाला प्रथमदर्शनी आरोपी मानून प्रकल्प अधिकाऱ्यांनी संस्थेला निलंबित करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले आहे.

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...