Wednesday, 8 May 2019

लाखनीतील कुणबी समाज सर्व जातीय सामूहिक विवाह सोहळ्यात १७ जोडपी विवाहबद्ध

लाखनी,दि.07ः- सामूहिक विवाह हे खऱ्या अर्थाने चळवळ म्हणून उदयास आले पाहिजेत. कुणबी समाजाने गेली २५ वर्ष अतिशय उत्तमरित्या विवाह सोहळ्याचे आयोजन करुन समाजात नवा आदर्श स्थापित केल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार प्रफुल पटेल यांनी केले. ते श्री संत तुकाराम बहुउद्देशीय सेवाभावी संस्था लाखनी व कुणबी समाज सेवा मंडळाच्या वतीने(दि.७आज अक्षय तृतीयाच्यापर्वावर आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात बोलत होते.
समर्थ विद्यालयाच्या मैदानावर आयोजित सामूहिक विवाह सोहळ्याचे हे २६ वे वर्ष होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार प्रफुलभाई पटेल,खासदार मधुकर कुकडे, आमदार डॉ. परिणय फुके, आमदार बाळाभाऊ काशिवार, माजी आमदार सेवकभाऊ वाघाये, माजी शिक्षण राज्यमंत्री नानाभाऊ पंचबुद्धे, माजी आमदार दादासाहेब शेंडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, भंडाराचे नगराध्यक्ष सुनील मेंढे, लाखनीच्या नगराध्यक्षा ज्योती निखाडे, लाखनी पं.स. सभापती खुशाल गिदमारे, अर्बन बँकेचे अध्यक्ष महेश जैन,सामाजिक कार्यकर्त्या डॉ. विजया नंदुरकर, रामलाल चौधरी, जि.प. भंडाराच्या माजी अध्यक्षा सौ. भाग्यश्री गिल्लोरकर, सौ. सरोजताई वाघाये, नीमाचे जिल्हाध्यक्ष डॉ. चंद्रकांत निंबार्ते, जि.प.सदस्य नरेश डहारे,निलकंठ कायते, पोलीस निरीक्षक हेमंत खराबे, दिलीप कातोरे, माजी सभापती अशोक चोले, डॉ. अजय तुमसरे, मजूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष रमेश खराबे, आल्हाद भांडारकर, कृ.उ.बा.स.लाखनीचे सभापती शिवराम गिरेपुंजे, घनशाम खेडीकर, नगरपंचायत सदस्य, गीता तीतिरमारे, संयोजक रामकृष्ण वाढई, अशोक चेटुले या मान्यवरांसह समाजाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
अतिथिंच्या हस्ते वर वधूंच्या पालकांचे स्वागत करुन नववधूंना संसारोपयोगी साहित्य भेट देण्यात आले. आमदार बाळाभाऊ काशिवार यांच्यावतीने सर्व जोडप्यांना शिलाई मशीन व माजी आमदार सेवकभाऊ वाघाये यांच्यातर्फे गॅसशेगडी भेटस्वरुपात देण्यात आले.संस्थेच्यावतीने वर वधूंना विवाह प्रमाणपत्र देण्यात आले.संचालन कुणबी समाज युवा समिती लाखनीचे सहसचिव प्रशांत वाघाये यांनी तर प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष जयकृष्ण फेंडरकर यांनी केले.आभार मंडळाचे उपाध्यक्ष उमराव आठोडे यांनी मानले.यशस्वितेसाठी कार्यक्रम संयोजक रामकृष्ण वाढई, अशोक चेटुले, सचिव रामदास सार्वे, पदाधिकारी गंगाधर लुटे, माधवराव भोयर, मंगेशजी कानतोडे, भोजराम डहाके, मधुजी मोहतुरे, रमेशजी झलके, रमेश रोटके, परसराम फेंडरकर, प्रमोद शेंडे, उद्धव भूते, तामेश्वर सेलोकर, श्याम झलके, पांडुरंग सिंगणजुड़े, अशोक अतकरी, अर्चना ढेंगे, अल्का खराबे, युवा समितीचे अध्यक्ष उमेश सिंगनजुडे, सचिव बालूभाऊ फसाटे, संजय वनवे, ओमप्रकाश शेंडे, रशेष फटे, मोहन बोंद्रे, नितेश टिचकुले, कैलास लुटे, मंगेश धांडे, मोहन रेहपाडे, मनोज इश्वरकर, सोमेश्वर धांडे, दुर्गेश चोले, नकुल वैद्य तसेच महिला समिती अध्यक्ष आशा वनवे, सदस्या हर्षदा कमाने, दुर्गा अतकारी, मीनाक्षी सिनगंजुड़े, उमा टिचकुले, स्मिता सिंगणजुडे, सारिका रेहपाड़े, शैला सार्वे, अलका खटके, वर्षा वैद्य, गीता तितिरमारे, उर्मिला आगाशे, अंजना पिंपळशेंडे, शालु उरकुडे, व अखिल विश्व गायत्री परिवार लाखनी शाखा, बंसी डेयरी लाखनी, अ.भा.प्रा.शिक्षक संघ शाखा लाखनी आणि उपस्थित सर्व समाजबांधवांनी परिश्रम घेतले.

Tuesday, 7 May 2019

लग्नातील आहेराचे पैसे दिले पाणी फाऊंडेशनच्या श्रमदानासाठी

जळगांव जामोद,दि.04ः- तालुक्यातील पळशी सुपो हे महत्वाचे गाव धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.या गावातील पाच (05) लोकांनी पाणी फोउंडेशनचे प्रशिक्षण घेतले आणि गावात येऊन स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून कामाला सुरुवात केली.गावात काहीच सहभाग मिळत नव्हता पण या लोकांनी मागे वळून न बघताआपले काम सतत चालूच ठेवले.आज ना उद्या कुणीतरी श्रमदान करायला येईल.पण त्यांची निराशा झाली आणि त्यांनी एके दिवस ठरवले की आता नारळ फोडून काम बंद करूया. आणि तसे त्यांनी गावातील लोकांना दाखवण्यासाठी केले.पण स्वतः मात्र काम सुरू ठेवले.त्यातच योगायोग म्हणजे गेल्या आठवड्यात “स्नेहालय” मार्फत ईश्वर चिठ्ठी द्वारे निवड झाली आणि गावात पुन्हा नवचैतन्य आले.लोकांचा सहभाग वाढला आहे.त्यातच गावात  “अभिजित संतोष राठी”* या मुलाचे लग्न होते. त्यांनी ठरवले की आपले सुद्धा या पाण्याच्या कामासाठी काहीतरी योगदान हवे.फुल ना फुलांची पाकळी म्हणून त्यांच्या लग्नात जो आहेर येईल त्याचा पूर्ण पैसा हा पाणी वॉटर कप मध्ये जे मशीन काम करीत आहे,त्या मशीनला लागणाऱ्या डिझेलसाठी देण्याचे ठरवले. आणि तब्बल 15000 रुपये त्यांनी पाणी फोउंडेशनच्या प्रशिक्षणार्थीकडे सुपूर्द केले.गावातील लोकामध्येच नव्हे तर पाणी फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यामध्ये सुध्दा नवचैतन्य आले आहे.

Monday, 6 May 2019

रामपायली परिसरात रानगव्याचा मृत्यू


गोंदिया,दि.06ः- नागझिरा- नवेगाव काॅरीडोर मधील जांभळी – शशिकरण पहाडी परिसरातील रामपायली  भागात कम्पार्टेमेंट नंबर ५०९ मध्ये एप्रिलमध्ये १ गवा मृतावस्थेत आढळल्यानंतर परत काल रविवारला(दि.५) रामपायली परिसरात १ गवा उष्णघातामुळे मृतावस्थेत आढळून आल्याने गव्यांच्या मृत्यूंची श्रृंखला सुरु होण्याची भिती सेवा संस्थेचे अध्यक्ष सावन बहेकार यांनी बेरार टाईम्सकडे व्यक्त केली आहे.गेल्या वर्षी २०१८ मधे एप्रिल ते मे महिन्यामध्ये जवळपास ८ -९ गवे मृतावस्थेत मिळाली होती.रानगव्यांच्या लागोपाठ होणार्या मृत्यूचे कारण काय असू शकते हे अद्यापही स्प्ष्ट झालेले नाही.तर उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याच्या शोधात वन्यप्राण्यांची भटकंती होत असल्याने आणि जंगलात गुरेचराईचे प्रमाण वाढल्याने अन्न व चाऱ्यासाठी स्पर्धा वाढू लागल्याचेही बहेकार यांचे म्हणने आहे.त्यातच्या  जांभळी – शेंडा – शशिकरण हा जंगलभाग नागझिरा नवेगाव काॅरीडोर मध्ये असला तरी  बहुतांश जंगल हे FDCM कडे आहे. एफडीसीएमद्वारे व्यवस्थापनाच्या नावावर होत असलेली जंगल कटाई व त्यामुळे सर्वत्र जंगलभर झालेली मानवी ढळवाढवळ वन्यप्राण्यांना धोकादायक ठरु लागल्याचे समोर येऊ लागले आहे.

ज्या भागात रानगव्याच्या मृत्यू झालेला आहे,त्या भागात  वाघ , बिबट, अस्वल, रानगवा,रानकुत्री,भेकळ,चितळ,सांभर,चांदी अस्वल असे अनेक महत्त्वाचे वन्यजिव ह्या परिसरात आहेत, त्यामुळे हे जंगलभाग अत्यंत महत्त्वाचे आहे.रामपायली परिसरात मृतावस्थेत आढळलेल्या रानगव्यांच्या निरिक्षणानंतर अतिउष्माघाताने  व वेळेवर पाणी मिळत नसल्याने त्यांचा मृत्यू होत असल्याचे बहेकार यांनी म्हटले आहे.

समाजकल्याणच्या इमारतीवरून पडून विद्यार्थीनी गंभीर


आत्महत्येचा प्रयत्न की अजून काही, पोलिसांचा तपास
गोंदिया,दि.६ : ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती कमजोर आहे, जे महाग पुस्तके खरेदी करू शकत नाही, अशांकरिता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागच्या परिसरात असलेल्या समाजकल्याण विभागाच्या इमारतीच्या पहिल्या माळ्यावर ग्रंथालय तयार करण्यात आले आहे. या ग्रंथालयात दररोज ४ ते ५०० विद्यार्थी आभ्यास करण्याकरिता येतात. आज(ता.६) सकाळी आठ वाजताच्या सुमारास सर्व विद्यार्थी अभ्यासात मग्न असताना इमारतीवरून काहीतरी पडल्याचा आवाज झाला. बघण्याकरिता अभ्यास करत असलेले विद्यार्था छतावर गेले असता इमारतीच्या मागच्या बाजूला रक्त बंबाळ अवस्थेत एक विद्यार्थिनी बेशुद्धावस्थेत पडून असल्याचे दिसून आले. याची माहिती सुरक्षा रक्षकांना देण्यात आली. तसेच पर्यवेक्षक श्रीमती तिडके यांना देण्यात आली. जखमी अवस्थेत असलेल्या विद्यार्थिनीचे नाव सरोज शंकरलाल बघेले(१६ रा. फुलचूर) असल्याची माहिती मिळाली. तिला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. जखमी विद्यार्थिनी वर्षभरापासून जिल्हा ग्रंथालयाच्या अभ्यासिकेत जात आहे. आज ती सकाळी ७ वाजता घरून निघाली होती. ती कसल्याही मानसीक तणावाखाली नव्हती असे, सरोजच्या आईने सांगीतले.
अवयव दान करण्याचे आवाहन
गंभीररित्या जखमी असलेल्या विद्यार्थिनीच्या हातावर डोनेट माय बॉडी ऑर्गन्स अर्थात मरणोपरांत माझे अवयव दान करा, असे लिहिले आहे. त्यामुळे तिने तणावातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असावा असा प्राथमिकरित्या अंदाज बांधण्यात येत आहे. तिच्या हातावर लिहून तिला खाली ढकलले असावे, अशीही चर्चा आहे.

Wednesday, 1 May 2019

नागपूर जिल्हा परिषद आरक्षण सोडत : प्रस्थापितांना धक्का


नागपूर,दि.01 :निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २०१६ आणि २०१८ मध्ये जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत काढण्यात आली होती. आता पुन्हा तिसऱ्यांदा निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मंगळवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. यात अपवाद वगळता प्रस्थापितांचे मतदारसंघ आरक्षणात बाद झाल्याने त्यांना धक्का बसला आहे. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल व उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे यांच्या उपस्थितीत बचत भवन येथे आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पाडली. शाळकरी मुलाच्या हाताने चिठ्ठ्या काढण्यात आल्या. जिल्हा परिषदेसोबतच पंचायत समित्यांचे आरक्षणही तालुकास्तरावर काढण्यात आले.लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच कोराडी व खापरखेडा दोन नगर परिषदांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीला न्यायालयात आव्हान दिले जाईल. निवडणुका पुन्हा लांबणीवर पडतील, अशी जि.प.मध्ये उलटसुलट चर्चा आहे


तिसऱ्यांदा झालेल्या सोडतीचा फटका वित्त व शिक्षण सभापती उकेश चव्हाण, सभापती दीपक गेडाम, आशा गायकवाड, सत्तापक्षनेते जयकुमार देशमुख, विरोधी पक्षनेते मनोहर कुंभारे, ज्येष्ठ सदस्य जयकुमार वर्मा, शिवकुमार यादव, रूपराव शिंगणे यांच्यासह जिल्हा परिषदेतील मातब्बरांना बसला आहे. कुठे महिलांसाठी तर कुठे अनुसूचित जाती वा जमातीसाठी सर्कल आरक्षित झाल्याने निवडणुकीतून बाद होण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्ष निशा सावरकर व माजी अध्यक्ष संध्या गोतमारे, माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले आदींचे मतदारसंघ पूर्वीप्रमाणेच सेफ राहिले. तर विद्यमान उपाध्यक्ष शरद डोणेकर यांच्या सर्कलमधील कन्हान नगरपरिषद झाली आहे. एक गाव जि.प.मध्ये कायम राहिल्याने त्यांचे सदस्यत्व कायम होते. त्यांना निवडणुकसाठी नवीन सर्कल शोधावे लागणार आहे. प्रस्थापितांचे मागील सोडतीतच सर्कल आरक्षित झाले होते. मात्र तिसºया सोडतीत दिलासा मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती. काटोल तालुक्यातील मेटपांजरा मागील सोडतीत सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव झाले होते. यामुळे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले अडचणीत आले होते. मात्र नवीन सोडतीत त्यांचे सर्कलचा सर्वसाधारण गटात समावेश करण्यात आला. मनोहर कुंभारे यांचे तेलकामठी सर्कल अनुसूचित जमाती महिलासाठी राखीव झाले आहे.उकेश चव्हाण व शिवकुमार यादव यांचे टेकाडी सर्कल अनुसूचित जाती महिलासाठी राखीव झाल्याने दोघांनाही दुसरे सर्कल शोधावे लागणार आहे. जि.प.अध्यक्ष निशा सावरकर यांचे धानला सर्कल सर्वसाधारण गटासाठी आरक्षित झाले. तर लगतचे तारसा सर्कल सर्वसाधारण महिलासाठी राखीव निघल्याने सावरकर यांना पुन्हा लढण्याची संधी आहे.
येरखेडा सर्कल सर्वसाधारण गटासाठी खुले झाल्याने जि.प.चे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांना इच्छा असल्यास लढण्याची संधी प्राप्त झाली आहे. हिंगणा तालुक्यातील रायपूर सर्कल सर्वसाधारण गटासाठी असल्याने जि.प.सदस्य उज्ज्वला बोढारे यांना पुन्हा संधी मिळणार आहे. माजी अध्यक्ष संध्या गोतमारे यांना निलडोह व डिगडोह सर्क लमध्ये लढण्याची संधी कायम आहे. गोधनी रेल्वे ओबीसी महिलासाठी राखीव झाल्याने माजी सदस्य कुंदा राऊ त यांना निवडणूक लढण्याची संधी निर्माण झाली आहे. उमरेडमध्ये सिर्सी हे नवीन सर्कल तयार करण्यात आले. सर्कलच्या पुनर्रचनेत बदल झाल्यानंतरही सदस्यांना काही तरी अपेक्षा होती. परंतु आरक्षणाच्या सोडतीत त्यांचा अपेक्षाभंग झाला. मात्र मौदा तालुक्यातील दोन सर्कल सर्वसाधारण तर एक ओबीसीसाठी आरक्षित झाल्याने, माजी सदस्य देवेंद्र गोडबोले यांना लढण्याची संधी मिळणार आहे.
सभापती दीपक गेडाम यांचे सावनेर तालुक्यातील चिचोली सर्कलमध्ये पहिल्या सोडतीत सर्वसाधारण(महिला)साठी राखीव झाले होते. दुसऱ्या सोडतीत आता अनु. जमाती(महिला)साठी राखीव झाले. तिसऱ्या सोडतीत हेच आरक्षण कायम ठेवण्यात आले.
कामठी तालुक्यात नव्याने झालेल्या कोराडी सर्कलमध्ये निघालेले जुने आरक्षण हे खुल्या गटातील होते. त्यामुळे विद्यमान सदस्य नाना कंभाले यांनी जोर लावला होता. परंतु आरक्षणाच्या दुसऱ्या सोडतीत हे सर्कल सर्वसाधारण महिलासाठी आरक्षित झाल्याने त्यांचा अपेक्षाभंग झाला होता. तिसऱ्या सोडतीत सर्वसाधारण गटासाठी आरक्षण निघाल्याने कंभाले यांना दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये जि.प. सर्कलनिहाय आरक्षण
तालुका        सर्कल               आरक्षण
नरखेड :        बेलोना           अनुसूचित जाती महिला
सावरगाव      ना.मा प्र. महिला
जलालखेडा     अनुसूचित जमाती
भिष्णूर             ना.मा प्र. महिला
काटोल :           येनवा            ना.मा.प्र.
पारडसिंगा      ना.मा.प्र.
मेटपांजरा       सर्वसाधारण
कोंढाळी          सर्वसाधारण महिला
कळमेश्वर :    तेलकामठी        अनुसूचित जमाती महिला
धापेवाडा            अनुसूचित जाती
ब्राम्हणी (गोंडखैरी)    अनुसूचित जमाती
सावनेर :        बडेगाव                सर्वसाधारण महिला
वाकोडी              ना.मा.प्र.महिला
केळवद                  ना.मा.प्र.
पाटणसावंगी         अनुसूचित जाती महिला
वलनी                    सर्वसाधारण
चिचोली               अनुसूचित जमाती महिला
पारशिवनी : माहुली                सर्वसाधारण
करंभाड               ना.मा.प्र. महिला
गोंडेगाव               सर्वसाधारण
टेकाडी              अनुसूचित जाती महिला
रामटेक : पथरई-वडंबा          सर्वसाधारण
बोथीयापालोरा           ना.मा.प्र.
कांद्री                     सर्वसाधारण
मनसर             अनुसूचित जाती महिला
नगरधन              सर्वसाधारण
मौदा : अरोली                    ना.मा.प्र.
खात                     सर्वसाधारण महिला
चाचेर                   सर्वसाधारण
तारसा                 सर्वसाधारण महिला
धानला                  सर्वसाधारण
कामठी : कोराडी             सर्वसाधारण
येरखेडा             सर्वसाधारण
गुमथळा               ना.मा.प्र.
वडोदा              ना.मा.प्र. महिला
नागपूर : गोधनी रेल्वे       ना.मा.प्र. महिला
दवलामेटी          सर्वसाधारण
सोनेगाव निपाणी    अनु. जाती महिला
खरबी               अनु.जाती
बेसा                  अनु. जाती महिला
बोरखेडी फाटक      सर्वसाधारण महिला
हिंगणा : रायपूर                   सर्वसाधारण
निलडोह               ना.मा.प्र.
डिगडोह                ना.मा.प्र. महिला
डिगडोह इसासनी   ना.मा.प्र. महिला
सातगाव                 अनु.जमाती महिला
खडकी                   सर्वसाधारण महिला
टाकळघाट             अनु.जाती
उमरेड : मकरधोकडा         सर्वसाधारण महिला
वायगाव                सर्वसाधारण महिला
बेला                     सर्वसाधारण महिला
सिर्सी                   सर्वसाधारण महिला
कुही : राजोला                   ना.मा.प्र.
वेलतूर                  सर्वसाधारण महिला
सिल्ली                सर्वसाधारण महिला
मांढळ                सर्वसाधारण महिला
भिवापूर : कारगाव           अनु. जमाती
नांद                  अनु. जाती महिला

एकूण मतदारसंघ ५८
अनुसूचित जाती ५
अनु. जाती (महिला) ५
अनुसूचित जमाती ३
अनु. जमाती (महिला) ४
ना.मा.प्र. ८
ना.मा.प्र. (महिला) ८
सर्वसाधारण १३
सर्वसाधारण (महिला) १२

नक्षल्यांच्या भूसुरुंगस्फोटात १५ जवान शहीद झाल्याची भिती




गडचिरोली(अशोक दुर्गम)दि..१: जिल्ह्यातील नक्षलग्रस्त तालुका असलेल्या कुरखेडापासून 6 किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळीले लेंढारी नाल्याजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला आहे. या स्फोटात 15 जवान शहीद झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. 
नक्षलवाद्यांच्या जाळपोळीनंतर बंदोबस्तासाठी कुरखेडा येथून टाटा एस या मालवाहू वाहनाने सी 60  जवानांचे पथक जात असताना नक्षलवाद्यांनी त्यांना लक्ष्य केले आहे. नक्षलवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात क्यूआरटी (क्विक रिस्पॉन्स टीम)चे 15 जवान शहीद झाल्याची माहिती मिळाली आहे.पहाटे वाहनांची जाळपोळ  झालेल्या घटनास्थळी एसडीपीओ शैलेश काळे हे गेले होते. तेथून त्यांनी या पथकाला तातडीने तिकडे पाचारण केले होते.सध्या घटनास्थळ परिसरात पोलीस व नक्षल्यामध्ये मोठ्याप्रमाणात चकमक सुरु असून गडचिरोली वरुन पोलीसांची अधिक कुमक पाठविण्यात आली आहे.तर गोंदिया जिल्ह्यातील देवरी सबकॅम्पमधूनही जवानांची तुकडी रवाना करण्यात आली आहे.

आज मध्यरात्री दादापूर येथे तब्बल ३६ वाहनांची जाळपोळ केल्यानंतर नक्षल्यांनी  पुन्हा कुरखेड्यापासून अवघ्या ६ किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळील लेंढारी नाल्याजवळ भूसुरुंगस्फोट घडविल्याने १५ जवान शहीद झाले असून, खासगी वाहनाचा चालकही ठार झाला आहे. महाराष्ट्र दिनी जिल्ह्यातील पोलिसांचा गौरव होत असताना आज १५ जवानांना शहीद व्हावे लागल्याने पोलीस विभागावर शोककळा पसरली आहे.या स्पोटापासून काही अंतरावरच पाणी पुरवठा विभागाच्या पाणी टाकीचेही बांधकाम सुरु आहे.गेल्या काही दिवसापासून गप्प बसलेल्या नक्षल्यानी केलेल्या या कृत्यामुळे पोलीस विभागाचे मोठे नुकसान झाले आहे.वाहनाच्या चिंधड्या उडाल्या आहेत.स्पोट एवढा मोठा होता की शहीद जवानांचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत पसरलेले असून स्पोट झालेल्या वाहनाचे तुकडे तुकडे झालेले आहेत.

01 ते 07 मे बेरार टाईम्सचा अंक........क्लिक करा berartimes.com





देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...