Saturday, 3 September 2016

नेहरूंच्या त्यागाचा अनेकांना विसर - वरूण गांधींचा मोदींवर निशाणा



लखनऊ, दि. ३ - पंडित नेहरू श्रीमंत घराण्यातील होते आणि त्यांना सहजपण भारताचे पंतप्रधानपद मिळाले, असं अनेकांना वाटतं. पण नेहरू १५ वर्ष तुरूंगात राहिले होते, त्यांनी केलेल्या त्यागाचा अनेकांना विसर पडतो, अशी जाणीव करून देताना भाजपा नेते वरूण गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर अप्रतक्षपण निशाणा साधला. ते शुक्रवारी लखनऊ येथील युवा संमेलनात बोलत होते. यावेळी त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. तसेच केंद्र सरकारची धोरणे  व पंतप्रधान मोदींवर अप्रत्यक्षपण टीका केली. 
उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वरूण गांधींच्या विधानांमधून त्यांची नाराजी दिसत असून तो चर्चेचा विषय ठरला आहे. ' पंडित नेहरू अगदी सहजपणे भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले, त्यांची जीवनशैली ऐषोआरामी आणि राजासारखी होती, असे अनेकजण म्हणतात. मात्र, त्याच पंडित नेहरूंनी तब्बल पंधरा वर्षे तुरूंगात काढली, याचाच अनेकांना विसर पडतो' अशा शब्दांत वरूण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. ' मला आज जर कुणी म्हणालं, १५ वर्षं तुरूंगात राहा आणि त्यानंतर तुला पंतप्रधानपद देतो, तर मी तो प्रस्ताव कधीच स्वीकारणार नाही. १५ वर्षांच्या काळात माणसाच्या जीवनात खूप मोठा फरक पडतो, त्याचा जीवही जाऊ शकतो,'  असेही वरूण यांनी आपल्या भाषणात म्हटले.  तसेच ' आयुष्यात वेगाने पुढे जायचे असेल तर एकटे जा, पण दूरवर जायचे असेल तर सर्वांना सोबत घेऊन जा,'  हे नेल्सन मंडेला यांचे वचनही उधृत करत त्यांनी मोदींच्या कार्यशैलीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचे बोलले जात आहे. 

गणपतीची वर्गणी देण्यास नकार देणा-या दाम्पत्याला बेदम मारहाण

अहमदनगर, दि. ३ - गणपतीची वर्गणी दिली नाही म्हणून दुकानदार व त्याच्या बायकोला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमध्ये घडली आहे. एवढेच नव्हे तर मारहाणीनंतरते दाम्पत्य उपचारांसाठी रुग्णालयात गेले असता तेथेही त्यांना बडवण्यात आले. या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज हाती आले असून पोलिस आता त्यावर काय कारवाई करतात, याकडेच सर्वांचे लक्ष आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवानिमित्त दुकानदार राजू पाटोळे यांच्याकडे काही जण वर्गणी मागण्यास आले. मात्र पाटोळे यांनी त्यांना वर्गण देण्यास नकार दिला असता संतापलेल्या कार्यकर्त्यांनी पाटोळे यांना मारहाण केली. त्यांना वाचवण्यासाठी पाटोळे यांची पत्नी मध्ये पडली असता, त्यांनाही मारण्यात आले. एवढेच नव्हे तर त्या नराधमांनी दुकानाचीही तोडफोडही केली. मारहाणीत जबर जखमी झालेले पाटोळे रुग्णालयात उपचारांसाठी गेले असता काही जणांनी रुग्णालयात जाऊन तेथेही त्यांना पुन्हा बेदम मारहाण केली. त्यामुळे रुग्णालयात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.  मारहाणीची काही दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून जमाव बेदम मारहाण करताना दिसत आहे. 
दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी ज्यांनी  मारहाण त्यांची फिर्याद दाखल करून घेतली आहे, मात्र मारहाणीत जखमी झालेले पाटोळे यांचा अद्याप जबाबही नोंदवण्यात आलेला नाही ना फिर्याद दाखल करून घेतली. 

भुपिंदरसिंह हुड्डांच्या घरावंर सीबीआयचा छापा

नवी दिल्ली - मानेसर जमीन वाटप गैरव्यवहार प्रकरणी हरियानाचे माजी मुख्यमंत्री भुपिंदरसिंह हुड्डा यांच्या रोहतकमधील निवासस्थानासह अन्य ठिकाणी छापे टाकण्यात आले.
आज (शनिवार) सकाळी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अधिकाऱ्यांनी भुपिंदरसिंह हुड्डा यांच्या निवासस्थानांवर छापे टाकले. यामध्ये त्यांच्या रोहतकमधील निवासस्थानासह गुडगावमधील तीन, दिल्लीतील नऊ, चंदिगडमधील तीन आणि पंचकूलामधील तीन निवासस्थानांचा समावेश आहे. हुड्डा यांच्यासह माजी आयपीएस अधिकारी छतरसिंह, एम. एल. दयाल आणि एस. बी. ढिल्लन यांच्या निवासस्थानांवरही छापे टाकण्यात आले आहेत. 
हरियानात काँग्रेसचे सरकार असताना मानेसर येथे सुमारे 912 एकर जमीन अधिग्रहण करून डीएलएफ व अन्य काही बांधकाम व्यावसायिकांना देण्यात आली होती. या प्रकरणी सध्याच्या भाजपप्रणित सरकारने चौकशीचे आदेश देत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला आहे.

मुलीचे पार्थिव घेऊन 6 किमी चालले आई-वडील


मल्कानगिरी (वृत्तसंस्था)- ओडिशामध्ये रुग्णवाहिकेस पैसे नसल्याने पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन चालत गेल्याची घटना ताजी असतानाच, आता मल्कानगिरी येथे रुग्णवाहिका चालकाने मृतदेह घरापर्यंत पोचविण्यास नकार दिल्याने आई-वडीलांना मुलीचा मृतदेह घेऊन 6 किमी चालत जावे लागल्याची घटना घडली आहे.
मल्कानगिरी जिल्ह्यातील कोरापूट गावातील वर्षा खेमांडू (वय 6) हि मुलगी काही दिवसांपासून आजारी होती. तिला जिल्हा प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, डॉक्टरांनी तिला मल्कानगिरीतील रुग्णालयात नेण्यास सांगितले. रुग्णवाहिकेतून तिला नेत असताना तिचा मृत्यू झाला. यावेळी चालकाने तिच्या आई-वडीलांना मृतदेह घरापर्यंत सोडण्यास नकार दिला आणि त्यांना रस्त्यावरच उतरविण्यात आले. मुलीचा मृतेदह घेऊन मुकुंद व त्याची पत्नी घरी परतत असताना रस्त्यावरील नागरिकांनी त्यांच्याकडे विचारपूस केली.
रुग्णवाहिका चालकाने कसे रस्त्यात उतरविले व मृतदेह चालत घेऊन येत असल्याची माहिती मुकुंदने नागरिकांना दिल्यानंतर त्यांना खासगी गाडीची सोय करून घरापर्यंत पोचविण्यात आले. या प्रकरणाची माहिती जिल्हाधिकाऱ्यापर्यंत पोहचल्यानंतर त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

सुरेश जैन यांची धुळे कारागृहातून सुटका

धुळे : घरकुल गैरव्यवहार प्रकरणी गेली साडेचार वर्षे कारागृहात असलेले राज्याचे माजी मंत्री सुरेश जैन यांना सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर आज (शनिवार) त्यांची धुळे कारागृहातून सुटका झाली.

सुरेश जैन यांना प्रमोद वाणी व विनोद वाणी यांनी प्रत्येकी दोन लाख, तर प्रदीप वाणी यांनी एक लाखाचा जामीन दिल्यावर आज त्यांची सुटका झाली. कारागृहाबाहेर जैन समर्थकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. जैन यांची कन्या मिनाक्षी यांनी औक्षण केल्यावर ते जळगावच्या दिशेने रवाना झाले.

घरकुल गैरव्यवहार प्रकरणी जळगाव महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला होता. प्रकरणी सुरेश जैन यांना 11 मार्च 2012 रोजी पोलिसांनी मध्यरात्री अटक केली होती. कारागृहात साडेचार वर्षे काढली तसेच या खटल्यातील महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्षही पूर्ण झाल्या या दोन मुद्यांच्या आधारावर जैन यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

कॅन्सर इन्स्टिट्यूट : औरंगाबादचा विचार

भावाने केला भावाचा खून

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...