Friday, 1 September 2017

महाराष्ट्रातील 15 शाळांना ‘ स्वच्छ विद्यालय’ पुरस्कार

3 गडचिरोली - कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, धानोरा.

नवी दिल्ली, दि.1 : स्वच्छतेच्या विविध मानकांची प्रत्यक्ष अंमलबाजवणी करणा-या राज्यातील 15 शाळांचा  राष्ट्रीय स्तरावरील ‘स्वच्छ विद्यालय’पुरस्काराने केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते  आज सन्मान करण्यात आला.
दिल्ली छावनी परिसरातील केंद्रीय विद्यालयाच्या डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन सभागृहात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह, सचिव आनंद स्वरूप, अपर सचिव अनिता करवल यावेळी उपस्थित होते. 3 राज्य, 11 जिल्हे आणि 172 शाळांना
यावेळी विविध श्रेणींमध्ये  गौरविण्यात आले.
मनुष्यबळ विकास मंत्रलयाच्यावतीने वर्ष 2016-17 साठी देशभरातील सर्व शाळांना ‘स्वच्छता विद्यालय पुरस्कार’ स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार देशभारातील 2 लाख 68 हजार शाळांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. शाळांमध्ये पाण्याची उपलब्धता, शौचालयांची व्यवस्था, हातधुण्यासाठीची व्यवस्था, देखभाल व्यवस्था आणि वर्तणूक बदल व क्षमता विकास या मानकांवर  शाळांची निवड झाली. यासाठी तालुका, जिल्हा, राज्य आणि देश पातळीवरील समित्यांनी गुणांकण करून
शाळांची निवड केली आहे. देशातील एकूण 172 शाळांची निवड करण्यात आली त्यात महाराष्ट्रातील 15 शाळांचा समावेश आहे. आज या शाळांना स्वच्छ विद्यालय
पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रशस्तीपत्र आणि 50 हजार रूपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुणे व अहमदनगर जिल्हयातून प्रत्येकी दोन
शाळांनी हा पुरस्कार पटकाविला आहे.
महाराष्ट्रातील शाळा खालील प्रमाणे
जिल्हा           शाळेचे नाव
नंदूरबार            मुलींची  शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा , कोठाली.
नांदेड                शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, किनवट
गडचिरोली         कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, धानोरा.
ठाणे                  एनएनएमसी माध्यमिक शाळा, आंबेडकरनगर.
बीड                   एससी, मुलांची शासकीय निवासी शाळा, शिरूर
अहमदनगर         जिल्हा परिषद शाळा , उंडेमळा
अहमदनगर         जिल्हा परिषद पब्लीक स्कुल, नेप्ती
बुलडाणा            जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा, धरणगांव
जळगांव            जिल्हा परिषद उर्दू शाळा , यशवंतनगर, टोनगांव
नाशिक            जिल्हा परिषद , विद्यानिकेतन, देवळा.
सातारा             जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शेंडेवाडी
पुणे                जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवनगर
पुणे                जिल्हा परिषद प्राथमिक शाळा  बाहुली
परभणी           जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोलवाडी
रत्नागिरी         जिल्हा परिषद प्राथमिक शाळा  कुरताडे
‘स्वच्छ विद्यालय’ स्पर्धेसाठी  विक्रमी नोंद करणा-या पुणे जिल्हा परिषदेचाही केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते  या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. स्वच्छ विद्यालय पुस्कारासाठी विक्रमी नोंद करणाऱ्या देशातील 11 जिल्ह्यांना मान्यता पुरस्काराने गौरविण्यात आले. महाराष्ट्रातून पुणे जिल्ह्याचा यावेळी सन्मान करण्यात आला. पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या जिल्हा शिक्षण अधिकारी शैलजा दराडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.प्रशस्तीपत्र आणि चषक असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुणे जिल्हा परिषदेने जिल्हयाच्या ग्रामीण भागातील 112 प्राथमिक तर 8 माध्यमिक शाळांची व शहरी भागातील 7 प्राथमिक व 6 माध्यमिक शाळांची स्वच्छ विद्यालय पुरस्कार 2016-17 साठी  नोंदणी केली.

गोळी झाडून एसआरपी जवानाचा आत्महत्येचा प्रयत्न?

2336_suicide jawan

गडचिरोली, दि.१: राज्य राखीव दलाच्या एका जवानाने गोळी घालून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना (दि.३१) संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास अहेरी येथील प्राणहिता पोलिस उपमुख्यालयात घडली. किरण कांबळे असे जखमी जवानाचे नाव आहे. कांबळे हे राज्य राखीव दलाच्या गट क्रमांक १० ‘अ’ मध्ये कार्यरत असून, अहेरी येथील प्राणहिता पोलिस उपमुख्यालयात कर्तव्यावर होते.
काल संध्याकाळी किरण कांबळे यांनी स्वत:च्या सर्व्हीस रायफलमधून गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. जखमी अवस्थेत अहेरी येथील रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना तातडीने नागपूरला हलविण्यात आले. यासंदर्भात अहेरी पोलिस ठाण्याशी संपर्क साधला असता, कांबळे यांना अहेरी येथे उपचारासाठी भरती करुन नागपूरला हलविल्याची नोंद घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र, अद्याप गुन्ह्याची नोंद करण्यात आली नाही, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.

चौदा हजार मालमत्ता इन्कमटॅक्सच्या रडारवर

 नवी दिल्ली,01 (वृत्तसंस्था)- देशातील एक कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमत असलेल्या सुमारे १४ हजार मालमत्तांवर प्राप्तिकर विभाग लक्ष ठेवून आहे. या सर्व मालमत्तांच्या मालकांनी प्राप्तिकर विवरणपत्र न भरल्यामुळे या मालमत्तांची तपासणी करण्यात येईल, अशी माहिती प्राप्तिकर विभागाने गुरुवारी येथे दिली.
९ नोव्हेंबर २०१६ पासून सरकारने ५०० व एक हजार रुपये मूल्याच्या नोटा चलनातून बाद केल्या. या नोटाबंदी मोहिमेच्या परिणामांचे विवेचन करणारा अहवाल प्राप्तिकर विभागाने प्रसिद्ध केला. नोटाबंदी मोहिमेनंतर ३१ जानेवारी २०१७ पासून ‘ऑपरेशन क्लिन मनी’ ही मोहीम सुरू करण्यात आली. यामध्ये प्रथमतः नोटाबंदीनंतर बँक खात्यांतून मोठ्या प्रमाणावर रोकड भरलेल्या व या रकमेशी उत्पन्नाचा मेळ न बसणाऱ्या व्यक्तींची तपासणी करण्यात आली. या तपासणीतून १५ हजार ४९६ कोटी रुपये अघोषित संपत्ती उघड झाली, तर १३ हजार ९२० कोटी रुपये जप्त केले गेले.

नितीन गडकरी होणार रेल्वेमंत्री?


नवी दिल्ली,1-केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शनिवार-रविवारी होत असलेल्या विस्तार आणि खांदेपालटात व्यापक फेरबदल होण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर पाच केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामे दिल्याचे वृत्त आहे. यावेळी होणाऱ्या बदलात केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचेवर रेल्वमंत्रीपदाची जबाबदारी  येण्याची शक्यता आहे. सुरेश प्रभू यांना पर्यावरण मंत्रालय देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
कौशल्य विकास राज्यमंत्री राजीव प्रताप रुडी यांनी गुरुवारी रात्री मंत्रीपदाचा राजीनामा दिला. केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती यांनाही मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याची शक्यता असून उत्तर प्रदेशातील तीन तर बिहारमधील दोन मंत्र्यांसह सहा-सात मंत्र्यांची उचलबांगडी केली जाण्याचे संकेत आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा मोठा खांदेपालट असेल. काही मंत्र्यांना पक्षसंघटनेत स्थान देऊन तर काहींची राज्यपालपदी नियुक्ती करून मोदी मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांचा मार्ग प्रशस्त करण्यात येत आहे.
पंतप्रधान मोदी, रविवारी दुपारी म्यानमार आणि चीनच्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. दुसरीकडे राष्ट्रपती रामनाथ कोविंद शुक्रवारी तिरुपतीला जाणार असून ते शनिवारी परतणार आहेत. अशा स्थितीत मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा झाल्यास शनिवारी सायंकाळी किंवा रविवारी सकाळी होऊ शकेल, असे म्हटले जाते.

नोटबंदी हा प्रधानमंत्र्यांचा खासगी निर्णय- कॉंग्रेस


दिल्ली,01- गेल्या 8 नोव्हेंबर रोजी घेतलेला नोटबंदीचा निर्णय हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संपूर्णतः खासगी निर्णय होता. या निर्णयामुळे जीडीपी दीड टक्क्याने घसरून देशाचे सव्वादोन लाख कोटींचे नुकसान झाले. परिणामी, या नुकसानीला थेट नरेंद्र मोदी हेच जबाबदार आहेत, असा घणाघाती आरोप काल गुरुवारी कॉंग्रेसने केला आहे.
भ्रष्टाचार, काळापैसा, बनावट चलन, दहशतवादाला खतपाणी घालणारा पैसा संपविण्यासाठी हा निर्णय घेतल्याचा मोठा गाजावाजा करण्यात आला होता. पण काहीही साध्य झाले नाही. केवळ ४१ कोटींच्या नकली नोटा निघाल्या. रिझर्व्ह बँकेकडे ९९ टक्के पैसा परत आला. मोदींचा हा निर्णय पूर्णतः खासगी असल्याने त्यांनी जनतेची माफी मागितली पाहिजे. १५ ऑगस्टला देशाला संबोधताना ३ लाख कोटींचा काळा पैसा परत आल्याचा दावा त्यांनी केला. प्रधानमंत्र्यांनी चूक कबूल करून खरे बोलावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनी केली.
या आर्थिक आपत्तीसाठी जबाबदारी निश्चित करून संबंधितांना दंडित करण्याची मागणी माकपचे सीताराम येचुरी यांनी केली. मोदी यांच्या कार्यकाळात झालेला स्वतंत्र भारतातील सर्वात मोठा घोटाळा अशा शब्दात येचुरी यांनी नोटाबंदीचे वर्णन केले. ही यशस्वी ठरलेली मनी लाँडरिंग योजना असल्याचा टोला त्यांनी लगावला. बड्या उद्योजकांनी ११ लाख कोटींचे कर्ज बुडवल्यामुळे बँका मोडीत निघण्याची शक्यता असल्यामुळे नोटाबंदी केली का? त्यानंतर दहशतवादामुळे सुरक्षा जवानांना मोठ्या प्रमाणावर जीव गमवावे लागले. या निर्णयाचे उदात्तीकरण करण्यासाठी करदात्यांचा किती पैसा जाहिरातींवर खर्च झाला? श्रीमंतासाठी घेतलेल्या निर्णयामुळे अनौपचारिक क्षेत्र कोलमडले, ग्रामीण बाजारपेठ आणि कृषी क्षेत्राचे कंबरडे मोडल्याची टीका येचुरी यांनी केली. 

बेनझीर भुट्टो हत्या प्रकरणी मुशर्रफ फरारी घोषित


Musharraf_201707813


इस्लामाबाद, दि. 31(वृत्तसंस्था) – पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान दिवंगत बेनझीर भुट्टो यांच्या हत्येप्रकरणी पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना दहशतवाद विरोधी न्यायालयाने फरार घोषित केले आहे. तसेच, परवेझ मुशर्रफ यांची संपत्ती जप्त करण्याचे आणि या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींची सुटका करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
पाकिस्तान पीपल्स पार्टी पक्षाच्या अध्यक्षा आणि दोन वेळा पाकिस्तानच्या पंतप्रधान राहिलेल्या बेनझीर भुट्टो यांची 27 डिसेंबर 2007 रोजी रावळपिंडीतील लियाकत बाग भागात सभेदरम्यान गोळीबार आणि बॉम्बस्फोटाद्वारे हत्या करण्यात आली होती.
न्यूज डॉट कॉम डॉट पीकेने दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाने माजी रावळपिंडीचे सीपीओ सौद अझीझ आणि माजी रावळ टाउनचे एस. पी. खुर्रम शहजाद यांना दोषी ठरवत प्रत्येकी 17 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. यावेळी त्यांना न्यायालयातूनच अटक करण्यात आली आहे.
बेनझीर भुट्टो यांच्या हत्येनंतर सुमारे 10 वर्षांनंतर ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. बेनझीर भुट्टो यांच्या हत्येनंतर 2008 साली हा खटला सुरु झाला. तसेच, त्यांच्या हत्येप्रकरणी रफाकत हुसेन, हुसेन गुल, शेर झमान, ऐतियाज शाह, अब्दुल रशिद या पाचजणांना संशयित म्हणून अटक करण्यात आली होती. याचबरोबर, प्रांतीय तपास संस्थेने केलेल्या फेरतपासाच्या आधारे परवेझ मुशर्रफ यांना 2009 साली आरोपी केले गेले होते.

महाराष्ट्रातील तीन अंगणवाडी सेविकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

Aanganwadi National Award -1

नवी दिल्ली, ३१ : महाराष्ट्रातील तीन अंगणवाडी सेविकांना उल्लेखनीय योगदानासाठी केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री मनेका गांधी यांच्या हस्ते आज राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. प्रवासी भारतीय भवन येथे महिला व बाल विकास मंत्रालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी केंद्रीय महिला व बाल विकास राज्यमंत्री कृष्णाराज, सचिव राकेश श्रीवास्तव, अपर सचिव अजय टिक्री आणि संयुक्त सचिव राकेश कुमार उपस्थित होते.
केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्या एकात्मिक बाल विकास योजनेंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या देशभरातील ५१ अंगणवाडी सेविकांना यावेळी श्रीमती गांधी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. २५ हजार रूपये आणि सन्मान पत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. चंद्रपूर जिल्हयातील गोपालपूर येथील केंद्राच्या चंद्रकला झुरमुरे ,परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यातील पडेगाव अंगणवाडी केंद्राच्या अंगणवाडी सेविका लताबाई वांईगडे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील पैंडाखले अंगणवाडी केंद्राच्या सेविका चंद्रकला चव्हाण यांनाही राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.
चंद्रकला झुरमुरे गोपालपूर अंगणवाडी केंद्रात १९९१ पासून कार्यरत आहेत.एकात्मिक बाल विकास योजनेंतर्गत त्यांनी ६ कार्यक्रमांमध्ये उत्कृष्टरित्या कार्य केले आहे. तसेच, प्रत्येक बालक व त्यांच्या आई-वडीलांजवळ आधार कार्ड असावे हा ध्यास घेऊन त्यांनी जनजागृती केली, परिणामी त्यांच्या कार्यक्षेत्रात त्यांनी १०० टक्के आधार कार्ड बनवून घेतले. शालेय विद्यार्थी आणि ग्रामीण जनतेच्या विविध प्रश्नांसंबंधी जनजागृती केली. श्रीमती झुरमुरे यांनी दारूबंदी साठी केलेल्या जागरुकतेमुळे आज गोपालपूर गाव पूर्णपणे दारूमुक्त झाले आहे.

लताबाई वांईगडे या पडेगांव अंगणवाडी केंद्रात १९९६ पासून अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्या एकात्मिक बाल विकास योजनेंतर्गत त्यांनी ६ कार्यक्रमांमध्ये उत्कृष्टरित्या कार्य केले आहे. तसेच, ‘पल्स पोलिओ कार्यक्रम’, ‘कृमी नाशक दिन’ आणि ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानात सक्रीय
सहभाग घेऊन उत्तम कार्य केले आहे. एड्स आणि कुष्ठ रोग जनजागृतीच्या कार्यातही श्रीमती वांईगडे यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. चंद्रकला चव्हाण या पैंडाखले अंगणवाडी केंद्रात वर्ष २००० पासून कार्यरत आहेत. एकात्मिक बाल विकास योजनेंतर्गत त्यांनी ६कार्यक्रमांमध्ये उत्कृष्टरित्या कार्य केले आहे. तसेच, पल्स पोलिओ कार्यक्रम, स्वच्छ भारत अभियान आणि निर्मलग्राम अभियानात सक्रीय सहभाग घेतला

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...