Sunday, 8 January 2017

देवरी येथे पेट्रोलपंपला वाहनाची धडक

देवरी- राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 वर असलेल्या स्थानिक जैन पेट्रोलपंपावर एका वाहनाने धडक दिल्याने एक इसम जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक जैन पेट्रोल पंपावर रामाजी मांदाळे हा एका दुचाकी वाहनात पेट्रोल टाकत असताना एक टाटा इंडिगो या कार ने पेट्रोल डिलिवरी पोस्टला जोरदार धडक दिली. यामुळे संपूर्ण पोस्ट कोलमडल्याने त्याखाली रामाजी मांदाळे दुचाकीसह आला. त्यामुळे मांदाळे याला गंभीर दुखापत झाली. पुढील उपचारासाठी त्याला गोंदियाच्या बजाज रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्या कारचा चालक त्याच पंपावर काम करणारा असल्याचे बोलले जाते.

तहसिलदाराच्या जाचाला कंटाळून तलाठी परातेचा आत्महत्येचा प्रयत्न


 गोंदिया- गोरेगावचे तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांच्या त्रासाला कंटाळून एका तलाठ्याने चक्क मंडळ कार्यालयातच विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न शनिवारी (ता.७) सकाळच्या सुमारास केला. त्या तलाठ्याची प्रकृती चिंताजनक असून महसूल प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली आहे.
सविस्तर असे की, गोरेगाव तालुक्यातील लीलाधर पराते नामक तलाठ्याने गोरेगावचे तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांच्या मानसिक व आर्थिक त्रासाला कंटाळून काल शनिवारी सकाळच्या सुमारास चक्क गोरेगावच्या मंडळ कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या तलाठ्याची प्रकृती खालावल्याने त्याला गोंदियाच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परातेची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालयाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. 
सन २०११ ते २०१६ या निलंबन काळातील वेतनासह अन्य कामासाठी तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांना विनंती केली. मात्र, डहाट यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने पराते यांचेवर उपासमारीची वेळ आली होती. गेल्या तीन दिवसापासून तलाठी पराते हे त्रस्त होते, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली. थकीत वेतन व भत्ते काढण्यासाठी ते सातत्याने पाठपुरावा करीत होते. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केले गेले. शेवटी तेढा परिसरात कार्यरत असलेले लीलाधर पराते यांनी तहसील कार्यालय परिसरातच विषप्राशन केले. लीलाधर पराते हे अनेक वर्षापासून कार्यरत असून गेल्या काही महिन्यापासून गोरेगाव येथील तहसीलदार कामाबाबत सतत दबाव आणत असल्याचा आरोप त्यांनी केला असून डिसेंबर महिन्यापासून त्याचे वेतन सुद्धा काढण्यात आले नव्हते. त्यामुळे आर्थिक तसेच मानसिक स्थितीला कंटाळून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे पीडित तलाठ्याचे म्हणणे आहे. शिवाय कामाचा अतिरिक्त दबाव गोरेगाव येथील तहसीलदार कल्याणकुमार डहाट तसेच कार्यालयातील दोन इतर कर्मचाèयांनी वाढविल्यामुळे आत्महत्येचे पाऊल उचलले असल्याचा आरोप लीलाधर पराते तसेच त्यांचा पत्नी मीना लीलाधर पराते यांनी केला आहे.
तलाठी पदावर असलेले लीलाधर पराते हे गेल्या ५ वर्षांपासून अकार्यक्षम असल्यामुळे त्यांना ५ वर्षात १६ महिने कामावरून कमी करण्यात आले होते. तसेच त्यांची पदोन्नती सुद्धा थांबली होती. याशिवाय हे प्रकरण तत्कालीन तहसीलदार यांनी निकाली न काढल्यामुळे त्यांचा वेतनाचे काम खोळंबले होते. मात्र, विद्यमान तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांनी त्यांचे काम बऱ्यापैकी निकाली काढून पुढील कार्यवाही करीत वरिष्ठ कार्यालयात पाठविले होते. मात्र, लीलाधर पराते यांच्या सेवा पुस्तिकेत काही त्रुट्या आढळल्याने त्याचे पगार आणि ५ वर्षाची वेतनवाढ अद्यापही निघाली नाही. म्हणून लीलाधर पराते यांची मनःस्थिती खालावल्याने त्यांनी शनिवारी गोरेगाव तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी यांच्या कार्यालयात कीटक नाशक प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार्यालयात इतर कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच लीलाधर पराते यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात तत्काळ दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या संदर्भात विद्यमान तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांच्याशी विचारणा केली असता हे प्रकरण माझ्या रुजू होण्याआधी पासून असून मी या संदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करून लीलाधर पराते यांचा थकीत वेतन आणि वेतनवाढ काढून देण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या सेवापुस्तिकेत त्रुट्या आढळल्याने पेमेंट निघू शकले नाही. त्यामुळे, त्यांनी विनाकारण कार्यालयात इतर कर्मचाऱ्यांवर आरोप केला आहे. मात्र, या संदर्भात अद्यापही कुठलीही पोलिस कार्यवाही करण्यात आली नाही. 

अर्जूनी मोरगाव बॅंक घोटाळाप्रकरणी पाच वर्षांनंतर आणखी दोघे अटकेत

अर्जुनी मोरगाव मध्यवर्ती सहकारी बँकेतील प्रकरण
साप्ताहिक बेरार टाईम्सने प्रकरण उचलून धरले होते

गोंदिया- गोंदिया जिल्ह्यातील बहुचर्चित दी गोंदिया डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑफ बँकेच्या अर्जुनी मोरगाव शाळेतील अफरातफरप्रकरणी तब्बल पाच वर्षांनंतर आणखी दोन आरोपींना शनिवारी अटक करण्यात आली आहे. या आरोपींची १0 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात मंजूर करण्यात आली असून या प्रकरणात आरोपींची संख्या पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. उल्लेखनीय म्हणजे हे प्रकरण त्यावेळी बेरारटाईम्सने लावून धरले होते, हे विशेष.
सविस्तर असे की, अर्जुनी मोरगाव येथील मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत १६ फेब्रुवारी २0१२ रोजी १ कोटी ९४ लाख रुपयांच्या अफरातफरीचे प्रकरण उजेडात आले होते. या प्रकरणात खोटा हिशेब व बनावट दस्तावेज तयार करून अफरातफर केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात दिलीप तुळशीराम गायधने (४३), भूमेश्‍वर काशीराम चामलाटे (३0), विनोद यशवंत नाकाडे (३२), खेमराज ऊर्फ बंडू सोनवाने (३४) सुनील पंढरी देशमुख (३३), शैलेश धीरेंद्रसिंग बडगुजर (३४), देवीदास बाजीराव हेमणे (३५) व संदीप रतीराम कापगते (३२) या आठ आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांच्याविरूद्ध गुन्हा न्यायप्रविष्ट आहे. 
२00६ ते २0११ या कालावधीत अफरातफर झाल्याने फेरलेखापरीक्षण करण्यात आले. सहकारी संस्था (साखर) नागपूरचे विशेष लेखा परीक्षक एम. एस. आटे यांनी ३0 नोव्हेंबर २0१६ रोजी अहवाल सादर केला. यावरून गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रामचंद्र चंपालाल त्रिवेदी यांनी ५ जानेवारी २0१७ रोजी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. लेखा परीक्षणाच्या अहवालात अफरातफरीची रक्कम १0 कोटी ८९ लाख ९७ हजार ३६६ रुपये असल्याचे समजते. याप्रकरणी आणखी अटक झालेल्या दोन आरोपीत जितेंद्र श्यामराव धरमशहारे (४0, रा. देवरी) तसेच तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय भालचंद्र पाटील (६६, रा. भंडारा) यांचा समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्यात कलम ४0९, ४१८, ४२0, ४६८, ४७९, ४७७ (अ), ४११, ४१३, १0९, ११४, १२0 (ब), ३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना शनिवारी सकाळी अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय पराग भट, पोहवा मुकेश थेर करीत आहेत. 

पतीनेच केला पत्नीचा विनयभंग!

अकोला, दि. ७- होमिओपॅथी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेली तसेच पतीसोबत पटत नसल्याने माहेरी राहत असलेल्या एका विवाहितेचा तिच्या पतीने तीन मित्रांना सोबत घेऊन विनयभंग केल्याची घटना शनिवारी सायंकाळी शिवाजी महाविद्यालय रोडवर घडली. याप्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी सदर चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
रामदासपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भीमनगर येथील रहिवासी युवतीचा दोन महिन्यांपूर्वी तुषार हिवाळे नामक युवकासोबत प्रेमविवाह झाला होता. काही दिवसच सुखी संसाराची वेल फुलत असताना त्यांच्यात खटके उडाले. त्यामुळे विवाहिता माहेरी परत गेली. सदर विवाहिता ही शहरातील एका होमिओपॅथी मेडिकल कॉलेजची विद्यार्थिनी असून, ती शनिवारी सायंकाळी काही दस्तावेजांच्या सत्यप्रती काढण्यासाठी जात असताना तिचा पती तुषार हिवाळे व त्याचे मित्र कुलजितसिंग चंडोलिया, रूपेश भातकुले आणि आकाश तंबोली यांनी दुचाकीवर येऊन तिचा विनयभंग केला.
त्यानंतर विवाहितेला भररस्त्यावर अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याचीही धमकी दिली. या घटनेनंतर विवाहितेने तत्काळ रामदासपेठ पोलीस स्टेशन गाठून तिचा पती तुषार हिवाळे व त्याचे तीन मित्र यांच्याविरोधात तक्रार केली. रामदासपेठ पोलिसांनी सदर प्रकरणाची चौकशी करून तुषार हिवाळे आणि कुलजितसिंग चंडोलिया, रूपेश भातकुले आणि आकाश तंबोली या चौघांविरुद्ध भादंविच्या कलम ३५४ नुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर चारही आरोपीस अटक करण्यात आली असून, त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.

Saturday, 7 January 2017

'मोदी सरकारचे रिचार्ज फक्त पाच वर्षांचे'

मुंबई - मोदी सरकार आयुष्यभराचे नाही. या सरकारचे "रिचार्ज' फक्त पाच वर्षांसाठी आहे. त्यातही अडीच वर्षांचा टॉकटाइम संपला आहे. त्यामुळे अंगठा दाबून नेटबॅंकिंग करा, असे सांगणाऱ्या या सरकारला व्होटिंग मशिनवर अंगठा दाबून खाली उतरवा, अशा शब्दांत अखिल भारतीय छात्र परिषदेचा नेता कन्हैया कुमारने केंद्र सरकारवर शुक्रवारी टीका केली. 
मुंबईत आझाद मैदानात महापालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांच्या सभेत बोलताना त्याने सरकारी कारभारावर टीका केली. तो म्हणाला, की नरेंद्र मोदींचे भक्त असलेल्या व्हॉट्‌सऍप प्रेमींनी हे ध्यानात घेतले पाहिजे, की व्हॉट्‌सऍपवरील सगळे खरे नसते. नोटाबंदीमुळे काळा पैसा जमा होत आहे, असे सांगण्यात येत असले तरी जोपर्यंत 15 लाख रुपये प्रत्येक भारतीयाच्या खात्यात येत नाहीत, तोपर्यंत सरकारवर विश्‍वास ठेवता येणार नाही. "गतिमान सरकार' म्हणून फडणवीस राज्यात कारभार करत असल्याचे सांगत आहेत; पण या सरकारकडे मती नाही, तर गती येईलच कशी, अशी बोचरी टीका त्याने केली. महागाईची झळ सामान्य माणसांना बसत आहे. त्याच्याशी या नेत्यांना काही घेणे-देणे नाही, असेही तो म्हणाला. 
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेतील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम केले जात नाही. सफाई कर्मचारी सकाळी तुमचा कचऱ्याचा डबा साफ करू शकतो, तर तोच तुम्हाला बदलूही शकतो, असे कन्हैया कुमार म्हणाला. मुंबई व ठाणे महापालिकेतील 7 हजार 500 कंत्राटी सफाई कामगारांना राज्य सरकारने फेब्रुवारी 2015 मध्ये किमान वेतन देण्याचे जाहीर केले होते. राज्यातील अन्य महापालिका व नगरपालिकांतही हीच परिस्थिती आहे. पाठपुरावा करूनही तिथे किमान वेतन दिले जात नाही. त्यामुळे आंदोलन अधिक तीव्र करण्याची गरज असल्याने कामगार आणि विद्यार्थ्यांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन त्याने केले. 

4 बायका, 40 मुलं; म्हणूनच लोकसंख्यावाढ- साक्षी महाराज

मेरठ (वृत्तसंस्था) - चार बायका आणि 40 मुले असलेले नागरिकच भारताच्या लोकसंख्या वाढीस जबाबदार असल्याचे वक्तव्य भाजप खासदार साक्षी महाराज यांनी आज (शनिवार) केले. साक्षी महाराज यांनी मुस्लिमांना अप्रत्यक्षरित्या लोकसंख्यावाढीस जबाबदार ठरविले आहे.
मेरठमध्ये एका कार्यक्रमासाठी आले असताना साक्षी महाराज यांनी आज (शनिवार) पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू झाल्यानंतर साक्षी महाराजांनी हे वक्तव्य केल्याने त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
साक्षी महाराज म्हणाले, ''मी जे बोलले आहे, त्यावर ठाम आहे. आपल्या देशाच्या लोकसंख्यावाढीसाठी एकच समुदाय कारणीभूत आहे. ज्यांच्या चार बायका आणि 40 मुले आहेत. लोकसंख्यावाढीला हिंदू जबाबदार नाहीत. लवकरच सरकार समान नागरि कायदा लागू करेल, अशी आशा आहे.''
साक्षी महाराजांच्या या वक्तव्यावर टीका करताना काँग्रेस नेते अखिलेश सिंह म्हणाले, की पंतप्रधान मोदींनी दिलेल्या आश्वासनांपासून लोकांचे लक्ष हटविण्यासाठी भाजप नेते अशी धार्मिक विधाने करत आहेत. भाजपने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली पाहिजे.

अजहरला दहशतवादी घोषित करण्यासाठी भारताला 'चिनचे' समर्थन

बिजिंग, दि. 7 - पाकिस्तानी दहशतवादी मसूद अजहरला संयुक्त राष्ट्र संघ समितीच्या दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्याच्या भारताच्या प्रयत्नांना यश मिळण्याची शक्यता आहे. चीनचे माजी राजदूत माओ सिवेई यांनी अजहरला यादीत टाकण्यासाठी विरोध करण्यावरुन आपल्याच देशाला चांगलंच फटकारलं आहे. या मुद्यावर चीनने आपली भूमिका बदलावी असा सल्लाही त्यांनी दिला आहे.  कोलकातामध्ये चीनचे काऊंसिल जनरल राहिलेल्या माओ सिवेई यांनी मसूद अजहर एक दहशतवादी असून चीनला आपली भूमिका सुधारायला हवी असं म्हटलं आहे. 
दहशतवादी मसूद अजहर आणि त्याची दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदसंबंधी चीन येत्या काही दिवसांत आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. चीनने घेतलेल्या निर्णयाच्या आधारावर भारत पुढचं पाऊल उचलणार आहे. चीनने 31 मार्च रोजी मसूद अजहरला दहशतवादी घोषित करण्यापासून रोखत आडकाठी केली होती. मसूद अजहरला संयुक्त राष्ट्र संघ समितीच्या दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्यास चीनने विरोध केला होता. चीन केलेल्या या विरोधावर भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. चीनने केलेला विरोध हा फक्त तांत्रिक आधारावर घेतला गेला असून अनाकलनीय असल्याची टीका भारताने केली होती. 

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...