Sunday 8 January 2017

अर्जूनी मोरगाव बॅंक घोटाळाप्रकरणी पाच वर्षांनंतर आणखी दोघे अटकेत

अर्जुनी मोरगाव मध्यवर्ती सहकारी बँकेतील प्रकरण
साप्ताहिक बेरार टाईम्सने प्रकरण उचलून धरले होते

गोंदिया- गोंदिया जिल्ह्यातील बहुचर्चित दी गोंदिया डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑफ बँकेच्या अर्जुनी मोरगाव शाळेतील अफरातफरप्रकरणी तब्बल पाच वर्षांनंतर आणखी दोन आरोपींना शनिवारी अटक करण्यात आली आहे. या आरोपींची १0 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात मंजूर करण्यात आली असून या प्रकरणात आरोपींची संख्या पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. उल्लेखनीय म्हणजे हे प्रकरण त्यावेळी बेरारटाईम्सने लावून धरले होते, हे विशेष.
सविस्तर असे की, अर्जुनी मोरगाव येथील मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत १६ फेब्रुवारी २0१२ रोजी १ कोटी ९४ लाख रुपयांच्या अफरातफरीचे प्रकरण उजेडात आले होते. या प्रकरणात खोटा हिशेब व बनावट दस्तावेज तयार करून अफरातफर केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात दिलीप तुळशीराम गायधने (४३), भूमेश्‍वर काशीराम चामलाटे (३0), विनोद यशवंत नाकाडे (३२), खेमराज ऊर्फ बंडू सोनवाने (३४) सुनील पंढरी देशमुख (३३), शैलेश धीरेंद्रसिंग बडगुजर (३४), देवीदास बाजीराव हेमणे (३५) व संदीप रतीराम कापगते (३२) या आठ आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांच्याविरूद्ध गुन्हा न्यायप्रविष्ट आहे. 
२00६ ते २0११ या कालावधीत अफरातफर झाल्याने फेरलेखापरीक्षण करण्यात आले. सहकारी संस्था (साखर) नागपूरचे विशेष लेखा परीक्षक एम. एस. आटे यांनी ३0 नोव्हेंबर २0१६ रोजी अहवाल सादर केला. यावरून गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रामचंद्र चंपालाल त्रिवेदी यांनी ५ जानेवारी २0१७ रोजी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. लेखा परीक्षणाच्या अहवालात अफरातफरीची रक्कम १0 कोटी ८९ लाख ९७ हजार ३६६ रुपये असल्याचे समजते. याप्रकरणी आणखी अटक झालेल्या दोन आरोपीत जितेंद्र श्यामराव धरमशहारे (४0, रा. देवरी) तसेच तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय भालचंद्र पाटील (६६, रा. भंडारा) यांचा समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्यात कलम ४0९, ४१८, ४२0, ४६८, ४७९, ४७७ (अ), ४११, ४१३, १0९, ११४, १२0 (ब), ३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना शनिवारी सकाळी अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय पराग भट, पोहवा मुकेश थेर करीत आहेत. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...