Tuesday 31 January 2017

लग्नसमारंभातील जेवणातून १५० पाहुण्यांना विषबाधा

भंडारा - लाखनी तालुक्‍यातील सामेवाडा येथे रविवारी झालेल्या लग्नसमारंभातील अन्नामुळे सुमारे शंभर जणांना विषबाधा झाली. यातील रुग्णांना लाखनी, पिंपळगाव आणि भंडारा येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, गावात उपचार शिबिर सुरू आहेत.
सामेवाडा येथील रामू लक्ष्मण गिऱ्हेपुंजे यांच्या मुलीचे लग्न रविवारी भंडारा येथील सोनू बांगडकर याच्यासोबत झाले. गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत लग्नसमारंभ पार पडला.
मात्र, या समारंभातील जेवण करणारे गावकरी व वऱ्हाड्यांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला. आज सकाळी हगवण, उलटीचा त्रास झाल्याने अनेकांनी पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात व लाखनीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतले.
घटनेची माहिती झाल्यानंतर आरोग्य विभागाने सामेवाडा येथे उपचार शिबिर सुरू केले. गावातील सुमारे १०० लोकांवर उपचार करण्यात आले. गंभीर स्वरूपाच्या २७ जणांना लाखनीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पिंपळगाव येथे १३ आणि भंडारा येथे सहा जणांना उपचारासाठी दाखल करण्यात आले.
विषबाधेची घटना कशामुळे झाली, याची चौकशी करण्यासाठी जिल्हा स्तरावरून पथक रवाना झाले असून, अन्न व पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येत असल्याचे माहिती साथरोग विभागाचे डॉ. आंबेकर यांनी दिली. 
दरम्यान, वरपक्षाकडील काही जणांनासुद्धा पोटदुखी व उलटीचा त्रास झाला. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आलेत, असे बांगडकर कुटुंबीयांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...