Wednesday 11 January 2017

अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी नियोजन करा- अभिमन्यू काळे


28 वा रस्ता सुरक्षा अभियान
 गोंदिया,दि.11 : जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत रस्ता अपघातातील मृतांचा आकडा हा 75 टक्क्यांच्या खाली आणावयाचा आहे. रस्ता अपघातास कारणीभुत घटकांचा शोध महत्त्वाचा असून अपघात टाळण्यासाठी ज्या सूचना देण्यात आल्या आहेत त्याचे पालन होणे सुद्धा आवश्यक आहे. जिल्ह्यातील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी आतापासूनच योग्य नियोजन करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.
  आज उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय येथे आयोजित 28 व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे उदघाटक म्हणून ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, सहायक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संगीता भिसे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर अभियान दरवर्षी राबविण्यात येत असल्याचे सांगून जिल्हाधिकारी काळे पुढे म्हणाले, यावर्षी अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी काही उपक्रम हाती घेतले आहेत. या उपक्रमात पोलिस, सार्वजनिक बांधकाम विभाग, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, तसेच इतर यंत्रणासह विद्यार्थ्यांचा सहभाग महत्वाचा राहणार आहे. यावर्षी जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय बांधून जिल्हा हागणदारीमुक्त करावयाचा आहे. जिल्ह्यातील माता व बाल मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी देखील उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
मानवी चुकांमुळे अपघात होत असल्याचे सांगून श्री.काळे म्हणाले, ज्यांना वाहन चालविण्याचा परवाना देण्यात आला आहे त्याला योग्यप्रकारे वाहन चालविता येत असल्याची खात्री परिवहन विभागाने करावी. वाहनाची तांत्रिक तपासणी करणे देखील गरजेचे आहे. वाहन, रस्ता नादुरुस्त असेल तर संबंधित यंत्रणेला जबाबदार धरण्यात येईल, असे ते म्हणाले.
डॉ.पुलकुंडवार म्हणाले, केवळ अभियानाचे आयोजन करुन सुरक्षीतता मिळणार नाही. अपघात होण्याचे कारण शोधून त्यावर उपाययोजना गरजेची आहे. अलिकडच्या काळात आधुनिक वाहने मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आल्याचे सांगून डॉ.पुलकुंडवार पुढे म्हणाले की, पॉवर स्टेरिंग व जास्त इंजन क्षमतेची वाहने वेगाने धावताना दिसत आहेत. वेग मर्यादा प्रत्येक वाहनासाठी असली पाहिजे. स्पीड ब्रेकर सुध्दा चांगले असले पाहिजे. क्षमतेपेक्षा जास्त भार वाहून नेणारी वाहने धोकादायक असून अशा वाहनांवर कारवाई करण्यात यावी.  108 क्रमांकाच्या रुग्णवाहिका सेवेची माहिती प्रत्येकाला झाली तर अशाप्रसंगी अपघातग्रस्तांना वेळीच वैद्यकीय सुविधा पुरविता येईल असे त्यांनी सांगितले. यावेळी सोनाली चव्हाण व डॉ.संगीता भिसे यांनीही मार्गदर्शन केले. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.चव्हाण यांनी आपल्या  प्रास्ताविकातून राज्यातील अपघाताची स्थिती व रस्ता सुरक्षा अभियानाबाबत माहिती दिली. संचालन सुजाता बहेकार यांनी केले. उपस्थितांचे आभार संदिप पवार यांनी मानले. 
कार्यक्रमाला शहरातील अनेक शाळेतील विद्यार्थी, ड्रायव्हींग स्कूलचे संचालक, तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी सहायक मोटर वाहन निरिक्षक संदिप पवार, प्रभाकर पेन्‍सीलवार, अनिरुध्द देवधर, कर्मचारी प्रशांत मांडवेकर, राहूल कुरतोडवार, श्री.राठोड, श्री.गुल्हाणे, श्री.विग्रे, श्री.मोहोड, श्री.वानखेडे, करुणा बसवनाथे, सविता राजुरकर यांनी परिश्रम घेतले. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...