Friday 13 January 2017

'तक्रार मागे घेण्यासाठी जवानावर दबाव'

हरियाना (वृत्तसंस्था)- जम्मू-काश्‍मीरमधील सीमेवर तैनात असलेला बीएसएफचा जवान तेज बहादूर यादव यांनी व्हिडिओ पोस्ट करुन देशभर खळबळ उडवून दिल्यानंतर तक्रार मागे घेण्यासाठी माझ्या पतीवर दबाव आणला जात आहे, असे यादव यांची पत्नी शर्मिला यांनी आज (गुरुवार) म्हटले आहे.
पत्रकारांशी बोलताना शर्मिला म्हणाल्या, 'जवानांना मिळणाऱया अन्नाबाबत माझ्या पतीने व्हिडिओमधून परिस्थिती समोर मांडली आहे. सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर एकच खळबळ उडाली. या घटनेबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु, माझ्या पतीने मांडलेली बाजू मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात आहे. याबाबत पतीसोबत माझे बोलणे झाले आहे. त्यांनी काहीही चुकीचे केलेले नाही. सत्य परिस्थिती समोर मांडली आहे. जवानांना चांगले अन्न मिळावे एवढीच त्यांची मागणी आहे. ही मागणी चुकीची नाही.'
माझ्या पतीने सत्य परिस्थिती समोर मांडल्यानंतर त्यांची मानसिक स्थिती बरोबर नसल्याचे अधिकारी बोलतात. परंतु, त्यांची मानसिक स्थिती चांगली नसेल तर मग बंदूक त्यांच्या हातात देऊन सीमेवर का उभे केले? त्यांच्यावर उपचार का नाही केले? असा माझा प्रश्न आहे. त्यांनी जे काही केले ते योग्यच आहे. परंतु, आता त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे, असेही शर्मिला म्हणाल्या.
सीमा सुरक्षा दलाचे वरिष्ठ (बीएसएफ) अधिकारी स्थानिक विक्रेत्यांना अर्ध्या किंमतीमध्ये वस्तू विकत असून, यामध्ये पेट्रोल, डिझेल व अन्न पदार्थांचा समावेश असतो, अशी माहिती स्थानिकांनी दिल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. जवानाने अपलोड केलेला व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. सर्वसामान्य नागरिक जवानाच्या बाजूने उभे राहिले आहेत. याप्रकरणी चौकशीचे सुरू आहे.
दरम्यान, तेज बहादूर यादव यांनी केलेल्या आरोपानंतर सीमेवरून त्यांना हटविण्यात आले असून, मुख्यालयामध्ये त्यांना दुय्यम दर्जाचे (प्लंबर) काम देण्यात आले आहे. शिवाय, मेस कमांडरलाही हलविण्यात आले आहे, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...