Sunday 8 January 2017

तहसिलदाराच्या जाचाला कंटाळून तलाठी परातेचा आत्महत्येचा प्रयत्न


 गोंदिया- गोरेगावचे तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांच्या त्रासाला कंटाळून एका तलाठ्याने चक्क मंडळ कार्यालयातच विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न शनिवारी (ता.७) सकाळच्या सुमारास केला. त्या तलाठ्याची प्रकृती चिंताजनक असून महसूल प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली आहे.
सविस्तर असे की, गोरेगाव तालुक्यातील लीलाधर पराते नामक तलाठ्याने गोरेगावचे तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांच्या मानसिक व आर्थिक त्रासाला कंटाळून काल शनिवारी सकाळच्या सुमारास चक्क गोरेगावच्या मंडळ कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या तलाठ्याची प्रकृती खालावल्याने त्याला गोंदियाच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परातेची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालयाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. 
सन २०११ ते २०१६ या निलंबन काळातील वेतनासह अन्य कामासाठी तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांना विनंती केली. मात्र, डहाट यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने पराते यांचेवर उपासमारीची वेळ आली होती. गेल्या तीन दिवसापासून तलाठी पराते हे त्रस्त होते, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली. थकीत वेतन व भत्ते काढण्यासाठी ते सातत्याने पाठपुरावा करीत होते. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केले गेले. शेवटी तेढा परिसरात कार्यरत असलेले लीलाधर पराते यांनी तहसील कार्यालय परिसरातच विषप्राशन केले. लीलाधर पराते हे अनेक वर्षापासून कार्यरत असून गेल्या काही महिन्यापासून गोरेगाव येथील तहसीलदार कामाबाबत सतत दबाव आणत असल्याचा आरोप त्यांनी केला असून डिसेंबर महिन्यापासून त्याचे वेतन सुद्धा काढण्यात आले नव्हते. त्यामुळे आर्थिक तसेच मानसिक स्थितीला कंटाळून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे पीडित तलाठ्याचे म्हणणे आहे. शिवाय कामाचा अतिरिक्त दबाव गोरेगाव येथील तहसीलदार कल्याणकुमार डहाट तसेच कार्यालयातील दोन इतर कर्मचाèयांनी वाढविल्यामुळे आत्महत्येचे पाऊल उचलले असल्याचा आरोप लीलाधर पराते तसेच त्यांचा पत्नी मीना लीलाधर पराते यांनी केला आहे.
तलाठी पदावर असलेले लीलाधर पराते हे गेल्या ५ वर्षांपासून अकार्यक्षम असल्यामुळे त्यांना ५ वर्षात १६ महिने कामावरून कमी करण्यात आले होते. तसेच त्यांची पदोन्नती सुद्धा थांबली होती. याशिवाय हे प्रकरण तत्कालीन तहसीलदार यांनी निकाली न काढल्यामुळे त्यांचा वेतनाचे काम खोळंबले होते. मात्र, विद्यमान तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांनी त्यांचे काम बऱ्यापैकी निकाली काढून पुढील कार्यवाही करीत वरिष्ठ कार्यालयात पाठविले होते. मात्र, लीलाधर पराते यांच्या सेवा पुस्तिकेत काही त्रुट्या आढळल्याने त्याचे पगार आणि ५ वर्षाची वेतनवाढ अद्यापही निघाली नाही. म्हणून लीलाधर पराते यांची मनःस्थिती खालावल्याने त्यांनी शनिवारी गोरेगाव तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी यांच्या कार्यालयात कीटक नाशक प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार्यालयात इतर कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच लीलाधर पराते यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात तत्काळ दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या संदर्भात विद्यमान तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांच्याशी विचारणा केली असता हे प्रकरण माझ्या रुजू होण्याआधी पासून असून मी या संदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करून लीलाधर पराते यांचा थकीत वेतन आणि वेतनवाढ काढून देण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या सेवापुस्तिकेत त्रुट्या आढळल्याने पेमेंट निघू शकले नाही. त्यामुळे, त्यांनी विनाकारण कार्यालयात इतर कर्मचाऱ्यांवर आरोप केला आहे. मात्र, या संदर्भात अद्यापही कुठलीही पोलिस कार्यवाही करण्यात आली नाही. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...