Saturday, 18 February 2017

भर सभागृहात आमदारांनी विधानसभाध्यक्षांचे शर्ट फाडले

चेन्नई, दि. 18 -  तामिळनाडू विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच गदारोळ कायम राहिल्याने दुपारी तीन वाजेपर्यंत पुऩ्हा एकदा सभागृह तहकूब करण्यात आले आहे. गुप्तमतदानाची मागणी फेटाळल्यानंतर तामिळनाडू विधानसभेमध्ये द्रमुक आमदारांनी केलेल्या तोडफोडीनंतर एकच्या सुमारास पुन्हा एकदा कामकाजाला सुरुवात झाली होती. 
 
तामिळनाडू विधानसभाध्यक्ष पी.धनापाल यांनी सभागृहात जे घडले त्याबद्दल खेद व्यक्त केला. त्यांनी विधानसभेतील पोलिसांना द्रमुक आमदारांना सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश दिले. त्यानंतर द्रमुक आमदार विधानसभेच्या आत धरणे आंदोलनाला बसले. 
 
द्रमुक आमदारांनी माझे शर्ट फाडले. माझा अपमान केला. कायद्यानुसार मी माझे काम करत होतो असे धनपाल यांनी सांगितले. द्रमुक, पनीरसेल्वम गटाची गुप्तमतदानाची मागणी फेटाळल्यानंतर द्रमुक आमदार आक्रमक झाले. त्यांनी आसनांवर उभे राहून घोषणाबाजी केली. खुर्च्या, टेबलांची मोडतोड केली.

अपघातातील पिडीतांना नुकसान भरपाई मिळवून देणे ही सामाजिक बांधिलकी- न्या. अणेकर


गोंदिया- साथीच्या रोगाने वा युद्धाने जेवढी जिवीतहानी होत नाही त्यापेक्षा जास्त हानी ही अपघातांमुळे होते. अपघातातील बळींच्या नातेवाईकांना किंवा पिडीत व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवून तातडीने नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी अपघात दावा प्राधिकरण, पोलीस विभाग व विमा कंपन्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी केले.

 पोलीस मुख्यालयाच्या कारंजा येथील प्रेरणा सभागृहात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय व जिल्हा पोलीस विभाग यांच्या संयुक्त वतीने नुकतेच आयोजित दावे मंजूर प्रक्रिया प्राधिकरण या विषयावरील कायदेविषयक जनजागृती शिबिराचे उदघाटक म्हणून न्या.आणेकर बोलत होते. अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सदस्य सचिव श्रीमती इशरत शेख, अपर पोलीस अधीक्षक डॉ.संदीप पखाले, न्या.वासंती मालोदे यांची तर तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून मुख्य न्यायदंडाधिकारी पी.एच.खरवडे,न्या.ए.एच.लध्दड व देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांची उपस्थिती होती.
डॉ.भूजबळ म्हणाले की, बऱ्याच घटनामधील पिडीतांना मानसिक आधार देण्यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. त्यापैकीच अपघातील पिडितांना किंवा अपघातामध्ये बळी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना मानसिक आधार मिळावा, यासाठी त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. या निर्देशाची योग्यप्रकारे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही पोलिस विभागाची आहे, असेही ते म्हणाले.
न्या.लध्दड यांनी अपघातांमध्ये बळी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना किंवा पिडीतांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही करण्याबाबत सर्वोच्च न्यायालय यांनी सन 2010 मध्ये अपघात दावा प्राधिकरण, पोलीस विभाग व विमा कंपन्या यांना निर्देश दिलेले आहेत. वाहनाने अपघात झाल्यानंतर वाहनचालक पळून जाणे, विमा नसलेल्या वाहनाकडून अपघात होणे व अपघात झालेल्या वाहनाचा विमा आहे पण विम्याच्या पॉलीसीमध्ये प्रवासी समाविष्ट नाही, अशा अपघातांमधील पिडीतांना किंवा आश्रितांना नुकसान भरपाई मिळत नाही. ज्या वाहनाने अपघात झाला, परंतू त्या वाहनाचा विमा नाही अशा अपघातामधील 20 टक्के पिडीतांना मोबदला मिळत नाही. ही टक्केवारी कमी करण्यासाठी ही योजना तसेच अपघात कमी करणे, अपघात तपासाची प्रक्रिया वेळेवर करणे, अपघातामध्ये नुकसान भरपाई मिळण्यासाठी आवश्यक दस्ताऐवजसहीत अहवाल 30 दिवसात प्राधिकरणास सादर करणे, जास्तीत जास्त वाहनांचा विमा करण्यास प्रोत्साहन देणे, जास्तीत जास्त अपघातामध्ये नुकसान भरपाई मिळते अशी माहिती दिली.
न्या.खरवडे यांनी मोटार वाहन कायदयानुसार वाहन रस्त्यामध्ये उभे करुन निघून जाणे, दहा तासांचे वर एकाच ठिकाणी रस्त्यामध्ये वाहन उभे ठेवणे, परवान्याविना वाहन चालविणे, गजबजलेल्या ठिकाणावरुन वेगाने वाहन चालविणे, वाहनात तांत्रिक बिघाड असूनही वाहन चालविणे, चुकीच्या दिशेने वाहन चालविणे, दुसऱ्या वाहनांना बाधा होईल अशा पध्दतीने वाहनात सामान भरुन वाहन चालविणे अशा प्रकारची वर्तणूक ही शिक्षेस पात्र आहे. पोलिसांनी अशी वर्तणूक करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करणे गरजेचे आहे. अपघात गुन्ह्यात गरजेनूसार विविध फौजदारी कलमा आरोपीवर लावाव्यात. अपघात गुन्ह्याचा तपास तपासी अधिकारी यांनी अत्यंत सावधपणे करणे गरजेचे आहे. साक्षीदारांना पंचनामे वाचून दाखविणे गरजेचे आहे. तसेच ज्या मुलांकडे वाहनाचा परवाना नाही त्यांच्या वडिलांवर किंवा गाडी मालकावर गुन्हे दाखल करावेत, ज्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल असे सांगितले.
उपविभागीय पोलीस अधिकारी जवळे यांनी अपघात गुनह्याचा तपास करताना तपासी अधिकारी यांनी घटनास्थळाचा पंचनामा अत्यंत सविस्तरपणे लिहिणे गरजेचे आहे. गाडी चालक, मालक व क्लिनर यांचे बयाण घेणे गरजेचे आहे असे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन मंजुश्री देशपांडे यांनी केले. उपस्थितांचे आभार वासंती मालोदे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहायक पोलीस निरिक्षक श्री.चौरे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे आर.जी.बोरीकर, महेंद्र पटले, एस.यु.थोरात, आर्यचंद्र गणवीर, पॅरालीगल व्हालंटीयर हेरॉल्ड बॅस्टनी यांनी सहकार्य केले.

विदर्भवादी नेते जांबुवंतराव धोटे यांचे निधन

यवतमाळ, दि. 18 - विदर्भ राज्याचे कट्टर पुरस्कर्ते,   माजी खासदार, विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांचे आज पहाटे  निधन झाले. पहाटे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्यांचे निधन झाले. धोटे हे महाराष्ट्राच्या विधानसभेवर पाचवेळा तर लोकसभेवर दोन वेळा निवडून आले होते. 2002 साली त्यांनी विदर्भ जनता काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती.

मी चिंधी चोर नाही- शशिकला

बंगळूर- मी, चिंधी चोर नाही, पोलिस जीपमध्ये बसणार नाही. कारागृहात जाऊन बसेल, अशा शब्दात व्हि. के. शशिकला यांनी पोलिसांना सुनावले.
तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्यासोबत पोस गार्डन परिसरातील बंगल्यात राहणाऱया शशिकला या सध्या कारागृहात राहात आहेत. कारागृहातील त्यांचा कैदी क्रमांक 9435 असून, त्यांना मेणबत्या बनविण्याचे काम देण्यात आले आहे. पुढील चार वर्षे त्यांना कारागृहात रहावे लागणार आहे.
पोलिस आपल्याला चोरासारखं जीपमध्ये बसवून कारागृहात नेत असल्याचे शशिकला सहनच झाले नाही. परंतु, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस त्यांना जीपमध्ये घेऊन जाणार होते. परंतु,  शशिकला यांनी पोलिसांना  स्पष्ट नकार दिला. पोलिसांना त्या म्हणाल्या, मी चिंधी चोर नाही. पोलिसांच्या जीपमध्ये बसणार नाही, असे सांगत चालत घेऊन जाण्याचा आदेशच दिला.
 
शशिकला यांनी बुधवारी (ता. 15) कारागृह परिसरापर्यंत चालत जाणे पसंद केले होते. कारागृह कितीही लांब असले तरी मी चालत येण्यासाठी तयार आहे, असे शशिकला म्हणाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Friday, 17 February 2017

उत्तम रुग्णसेवा देणाऱ्यांचा राष्ट्रवादीने केला सत्कार


देवरी- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रियमंत्री प्रफुल पटेल यांच्या हिरक महोत्सवानिमित्त देवरी तालुक्यातील 108 क्रमांकावर उत्तम रूग्णसेवा देणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार आज (ता.17) करण्यात आला.
ग्रामीण रुग्णालय परिसरात आयोजित या सत्कारप्रसंगी राष्ट्रवादीचे महेश जैन, रमेश ताराम, नगरसेवक रितेश अग्रवालआदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी रूग्णांना 24 तास सेवा पुरवून अनेकांचे जीव वाचविणारे डॉ. उमेश ताराम, डॉ. श्रीपात्रे, वाहन चालक सुनील खंगार, रवी भोयर, संजय राऊत, क्रिष्णा कोल्हारे आणि इतरांचा शाल व श्रीफळ देऊन मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
 संचालन नितेश वालदे यांनीे केले. उपस्थितांचे आभार संजय दरवडे यांंनी मानले.
  

जांभडी/दो. येथे वांझ जनावरांसाठी शिबीर

गोंदिया- जिल्हा परिषद गोंदिया आणि पंचायत समिती सडक अर्जुनी यांच्या संयुक्त विद्यमाने आज (ता.17) दोडके जांभडी येथे वांझ जनावरांवर उपचार व कृती शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबीराचे उद्घाटन डव्वा क्षेत्राचे जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जांभळीचे सरपंच विजय सोनवाने हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच शिसुकलाताई नेवारे, पोलिस पाटील नेहरु उईके, तमुस अध्यक्ष भागवत चुटे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक पशूधन विकास अधिकारी डॉ.बबन कांबळे यांनी केले. संचलन सहायक पशूधन अधिकारी डॉ.भांडारकर यांनी केले. उपस्थितांचे  डॉ.पी.एम.खंडागडे यांनी मानले. शिबीराला यशस्वी करण्यासाठी  डॉ.एन.आर.मलेवार, डॉ.मेहर,श्री.बावनकर,पारधी,गहाने,शहारे,गोमासे,कोकोडे, चामलाटे,डी.के.लांजेवार यांनी  सहकार्य केले.

सामनावर बंदीची मागणी चुकीची – व्यंकय्या नायडूंचा पक्षाला घरचा आहेर

पुणे, दि. १७ – शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’चे प्रकाशन तीन दिवस थांबविण्याची मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे. ‘ मात्र ही मागणी चुकीची असून पेपरवर बंदी घालू नये’ असे सांगत केंद्रीय नगरविकास मंत्री वैकंय्या नायडू यांनी पक्षालाच घरचा आहेर दिला. ‘ सामना पेपरवर बंदी घालण्याची भाजपा कार्यकऱ्यांकडून करण्यात आलेली मागणी चुकीची असून पेपरवर बंदी घालू नये. त्यांना मोदींविरोधात जे लिहायचे ते लिहू द्यावे, अखेर जनता निर्णय घेईल’ असे नायडू यांनी म्हटले.

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...