Wednesday, 19 July 2017

केंद्रस्तरिय पहिली शिक्षण परिषद सम्पन्न

विषय शाळा सिद्धी
सावलीच्या शिक्षण परिषदेत उपस्थितांना मार्गदर्शन करताना विषयतज्ज्ञ डी.टी.कावळे
देवरी,19- देवरी पंचायच समिती अंतर्गत येणाऱ्या डोंगरगाव केंद्रातील  जि.प.व.प्राथ. शाळा सावली येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद मोठ्या उत्साहात  पार पडली.
यावेळी  देवरीचे गटशिक्षणाधिकारी यांची प्रमुख उपस्थितीत होती. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत शाळा सिद्धी मूल्यमापनाद्वारे  केंद्रातील सर्व शाळा अ श्रेणीत आणण्यासाठी करावयाचे प्रयत्न व त्यासाठी लागणारे पुरावे यासंबंधाने श्री शेंडे सर केंद्र प्रमुख व श्री कावळे सर विषयतज्ज्ञ देवरी यानी सखोल मार्गदर्शन केले.
 या परिषदेला गट साधन केंद्र देवरी चे विषयतज्ज्ञ श्री भरणे , श्री मस्के व श्री वलथरे आदी कर्मचारी उपस्थित होते.

Berartimes 19-25 Jul 2017





Tuesday, 18 July 2017

देवरी तालुक्यात हजारो टन खताची अवैध विक्री

?
चौकशीसाठी गेलेले कृषी अधिकारी रिकाम्या हाताने परतले.

गोंदिया,दि.१३- देवरी तालुक्यातील चिचगड व लगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर  रासायनिक खतांची अवैध विक्री सुरू असून  विनापरवाना रासायनिक खते आणि कीटकनाशक विकणाèयांचे कृषी अधिकाèयांशी लागेबांधे असल्याचा आरोप चिचगड येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाष सोनवाने आणि नागरिकांना आहे. या विषयी आरडाओरड सुरू झाल्याने अधिकाèयांच्या सूचनेवरून खतांचा साठा व्यापाèयांनी इतरत्र हलवायला सुरवात केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान देवरीचे कृषी अधिकारी पोहनकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी तक्रार प्राप्त झाली असून चौकशी सुरू असल्याचे सांगितले. दरम्यान,चौकशीची कुणकुण लागल्याने चौकशीसाठी गेलेल्या अधिकाèयांना संबंधित दुकानाना टाळे असल्याने रिकाम्या  हाताने परतावे लागले.

प्रकरणाची सत्यता जाणून घेण्यासाठी कृषी अधिकाèयांशी संपर्क केला असता कृषी अधिकारी पोहनकर यांनी तक्रार प्राप्त झाल्याचे सांगत चौकशी करीत असल्याचे सांगितले. तर देवरीचे तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी चौकशीसाठी गेले असता एक दुकान सोडता सर्व दुकाने बंद आढळल्याने चौकशी करता आली नसल्याची माहिती दिली.

ग्रामीण भागातील उगवता तारा… क्षितिज मोहोड

खुशखबर..... येत्या १५ ऑगस्टला 'येडा' येतोय



सुरेश भदाडे/ सुजित टेटे

देवरी -चंदेरी दुनिया वा बॉलिवूड हे शब्द कानावर येताच आपल्या नजरेसमोर उभी ठाकतात ती मोठमोठ्या सेलिब्रिटी तारे आणि तारकांच्या प्रतिमा. रुपेरी पडद्यावरून सरकत जाणाऱ्या त्या प्रतिमा आपल्याला अलगद भुरट पाडून जातात. चित्रपट जगतात जे काही चालतयं त्याची साधी माहिती सुद्धा बऱ्याचदा ग्रामीण भागातील अनेकांना नसते. छबिगृहात चालणारे ते तीन तासाचे चित्रपट आणि त्याच्या भावनिक विश्वास रमणारे रसिक स्वतःला तेथील नायकाच्या वा नायिकेच्या भूमिकेत बघत आपल्या कल्पना विश्वात रममान होण्यापलिकडे फारसा काही विचार सुद्धा करीत नाही. खेड्यापाड्यात चित्रपट बघून आलेले युवक अनेकदा त्या चित्रपटातील संवादफेक वा गीतांच्या तालावर ठेका धरताना सहज दिसतात.
झाडीपट्टीत तसे कलेला फार महत्त्व आहे. झाडीबोलीतील कलामंचातूून सुद्धा बरीच कलावंत मंडळी घडली. नाट्यप्रयोग तर या भागात मोठ्या कुतूहलाचा विषय आहे. ढंढारी, तमाशे या प्रकाराची चांगली जाण या भागातील रसिकांना बऱ्यापैकी आहे. मात्र, चित्रपट म्हटले की, मोठमोठे कलावंत, निर्माते आणि दिग्दर्शक यांची कामे असून ते केवळ मुंबईच्या बड्या लोकांचे काम आहे, असाच काहीसा समज झाडीपट्टीत असल्याचे जाणवते.
गोंदिया जिल्हा म्हटले तर तसाही या चंदेरी दुनियेच्या मायावी प्रभावापासून फार लांब आहे. असे असताना देवरी सारख्या मागास आणि नक्षल भागातून चित्रपट कलावंत होणे किंवा चित्रपट काढणे म्हटले तर फार लांबची बाब समजली जाते. शिक्षणासह सोयीसुविधांचा अभाव असलेल्या देवरी सारख्या गावातून रुपेरी जगतात एका क्षितिज नामक ताऱ्याचा उदय झाला आहे. एका नव कलाकाराची बेरारटाईम्सने त्याची मुलाखत घेतली.
देवरी पासून उत्तरेला दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या लहानशा खेड्यात क्षितिजच जन्म झाला. गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत असताना त्याला नृत्याची ओढ लागली. या नृत्यकलेवर तो जीवापासून प्रेम करू लागला. मनात जिद्द असली तर आपले स्वप्न सहज साकार करता येऊ शकतात, असे क्षितिज अभिमानाने सांगत होता.
अंगात असलेल्या कलागुणांना क्षितिजने कॅरिअरचे रूप देण्याचे ठरविले. यातून त्याने प्रारंभी नृत्यांचे धडे देण्यासाठी शिकवणी सुरू केली. हे करता करता पुढे आपण आपला स्वतःचा अल्बम करण्याची कल्पना त्याच्या मनात आली. या कल्पनेला मूर्तरुप देण्यासाठी त्यांनी ग्रामीण भागातील उत्कृष्ट कलाकारांचा शोध घेण्यास सुरवात केली. पुढे यातून क्षितिजने १४ फेब्रुवारी २०१७ मध्ये 'यार मतलबी' हा पहिला अल्बम प्रदर्शित केला. महत्त्वाचे म्हणजे या अल्बमचे चित्रीकरण हे देवरी तालुक्यातील प्रेक्षणीय अशा ढासगडावर करण्यात आले. त्यात त्याची सहकलाकार म्हणून मेघाकुमारी हिने भूमिका साकारली. यानंतर मे २०१७ मध्ये त्याचा 'प्रेमऋतू' हा दुसरा अल्बम प्रदर्शित झाला. या अल्बमचे चित्रीकरण शिरपूर बांध परिसर आणि रूप रिसॉर्टमध्ये करण्यात आले. यामध्ये सहकलाकाराची भूमिका रोशनी शेवाटकर हिने साकारली. 'जिंदगी' या तिसऱ्या अल्बमचे चित्रीकरणसुद्धा देवरीमध्ये करण्यात आले. हा अल्बम महाविद्यालयीन जीवनावर आधारित आहे. हे तीन ही अल्बम देवरी सारख्या छोट्याशा खेड्यात तयार करूनही त्यांना कमालीची मागणी असल्याचे क्षितिज सांगत होता.
या तीनही अल्बमच्या यशाने क्षितिजाला लघुपट करण्याची कल्पना आली. आणि या कल्पनेतून जन्म झाला तो 'येडा'या लघुपटाच्या कथानकाचा. या लघुपटामध्ये तेजस्विनी खोब्रागडे, भूमाला कुंभरे, गोपी रणदिवे आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. ग्रामीण भागातील अंधश्रद्धा आणि अनिष्ट चालीरीतीवर कुठाराघात करणारा या लघुपटाचे चित्रीकरण पुराडा या आदिवासी गावात पूर्ण करण्यात आले, हे विशेष. सदर लघुपट हा येत्या १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शनासाठी तयार असल्याचे क्षितिजने बेरारटाईम्सला सांगितले.
ग्रामीण भागातील कलावंतांना मंच आणि संधी फारशा मिळत नसल्याने अनेक प्रतिभा दाबल्या जात असल्याची खंत क्षितिजने बोलून दाखविली. मी अशा कलावंतांना पुढे आणण्यासाठी काम करणार असल्याचा मानस सुद्धा त्याने व्यक्त केला.  यासाठी त्याने ग्रामीण भागातच काम करण्याचे ठरविले आहे. क्षितिजला देवरीचे यादोराव पंचमवार हे नेहमी प्रोत्साहित करीत असल्याने त्याचे मनोबल उंचावल्याचे त्याच्या बोलण्यातून जाणवत होते. तो पंचमवार यांना आपले प्रेरणास्थान सुद्धा मानतो. त्याच्या या प्रयत्नाला बेरारटाईम्स कडून खूप खूप शुभेच्छा

ब्लॉसमच्या विद्यार्थ्यांनी बजावला मतदानाचा अधिकार


देवरी,18- भारतीय लोकशाहीचे धडे विद्यार्थी जीवनात गिरविण्याच्या उद्देशाने आणि विद्यार्थ्यांनी मतदान प्रक्रियेची माहिती व्हावी, यासाठी देवरीच्या ब्लासम पब्लिक स्कूल येथे शालेय निवडणुक घेण्यात आली.
विद्यार्थ्यांनांना भारतीय लोकशाही पद्दत आणि निवडणुकीची प्रक्रिया याची जाण व्हावी, यासाठी शालेय विद्यांर्थ्यांच्या प्रतिनिधी मंडळाच्या निवडीसाठी ब्लासम पब्लिक स्कूल येथे निवडणुक घेण्यात आली. या प्रक्रियेची संपूर्ण वातावरण निर्मिती मुख्याध्यापक सुजित टेटे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली होती. यासाठी शाळेत नामांकन पत्र भरणे, मतदान कक्षाची उभारणी करणे, मतपत्रिकेची निर्मिती, मतदान केंद्र, मतदान अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आळी होती. प्रत्यक्ष गुप्तमत पद्धतीने ही निवडणूक घेण्यात आली. यावेळी एखाद्या राजकीय निवडणुकीसारखे वातावरण यावेळी शालेय परिसरात तयार झाल्याचे चित्र  होते.
या शालेय निवडणुकीत निवडून आलेल्या विद्यार्थी प्रतिनिधीच्या हस्ते येत्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यात ध्वजारोहण करण्यात येणार असल्याने सदर निवडणुक ही चुरशीची झाली.
या निवडणुकीत विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आर्य मोहुर्ले, आणि विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून पूर्वा चांदेवार हे विद्यार्थी बहुमताने निवडून आले.
सदर निवडणुक यशस्विरीत्या पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक सुजित टेटे यांचे मार्गदर्शनात शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. विजयी विद्यार्थ्यांचे श्री. टेटे यांनी अभिनंदन केले.


मेळघाटात वाघ मृतावस्थेत आढळले

अमरावती,18 - मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे फेरी पलकंडी मध्ये एका वाघाचे मृतदेह अर्धवट कुजलेल्या अवस्थेत वन्यजीव विभागाच्या गस्ती पथकाला गेल्या रविवारी आढळून आल्याची घटना समोर आली आहे.
 मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अकोट वन्यजीव विभागातील अंबाबरवा परिक्षेत्रात मोडणाऱ्या उत्तर मंगेरी बीट कंपार्टमेन्ट क्रमांर 351 मध्ये एका उपप्रौढ वाघाचा मृतदेह गस्ती पथकातील वनरक्षक आसाराम कसदेकर यांना आढळून आला. या वाघाचा मृतदेह अर्धवट कुजलेल्या स्थितीत एख दांडा आणि पंजा पथकाच्या हाती लागल्याचे वन्यजीव विभागाच्या सूत्रांनी सांगितले. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्या वाघाचे निश्चित वय आणि लिंग यांचे निदान करता आले नाही. सदर वाघाचा मृत्यू हा दोन वाघांच्या संचारक्षेत्रातील क्षेत्राला घेऊन झालेल्या लढतीत झाला असल्याचा कयास वनाधिकाऱ्यांनी लावला आहे. अकोटच्या फिरत्या पथकाने लगतच्या गावातील काही पशू मृत झाला वा इतर घटना तर घडली नसावी, यासंबंधी तपास सुद्धा करण्यात आला.
अमरावती जिल्ह्यातील मानद वन्यजीव सदस्य सावंत देशमुख, अमरावतीचे प्रमुख वन्यजीव अधिकारी विशाल बन्सोड, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए) आणि बुलढाणा जिल्ह्यातील मानद वन्यजीव अभ्यासाचे मनजीत सिंग, यांच्या उपस्थितीत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. फारूकी यांनी वाघाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले.  

दारू ढोसणाऱ्या उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांना महिलांचा घेराव



  •  मराठा बीअरबार मधील प्रकर 
  •  नगरसेविकेच्या नेतृत्वात महिलांचा एल्गार
  • शहर पोलिसांत तक्रार दाखल 


गोंदिया,दि.18 - गेल्या वर्षभरापासून श्रीनगर परिसरातील बिअरबार बंदीसाठी महिलांचा लढा सुरू असताना आणि शासनाने राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील मद्यविक्रीवर बंदी आणली असताना चक्क राज्य उत्पादन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अडगडीत असलेल्या एका बिअरबार मध्ये मनसोक्त दारू ढोसण्याचा प्रकार केला. शासकीय वाहनाने या वादग्रस्त बिअऱबारमध्ये रात्रीच्या सुमारास येऊन मद्यधुंद अधिकारी कर्मचाऱ्यांना परिसरातील महिलांनी घेराव घातला. पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या या कर्मचाऱ्यांना शहर पोलिसांच्या ताब्यात देत बिअरबार बंदीसह या कर्मचाऱ्यांवर कार्यवाहीसाठी श्रीनगर परिसरातील महिलांनी एल्गार पुकारला आहे. या कर्मचाऱ्यांविरोधात शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हा प्रकार काल सोमवारी रात्री नऊच्या सुमारास श्रीनगर परिसरातील मराठा बिअर बारमध्येे घडला.
राज्य शासनाने नुकताच राज्य व महामार्गावरील दारू दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला असून 500 मीटर अंतरावर हा व्यवसाय करण्यास परवानगी दिली. परिणामी, शहरातील अनेक बीअरबार बंद झाले. मात्र, काही संधीसाधुंनी अडगडीत गेलेल्या श्रीनगर परिसरातील नागरी वस्तीतील मराठा बिअरबार कडे मोर्चा वळविला.  या सर्व प्रकरणाला राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी व कर्मचा-यांचे अभय अाहे. सदर बिअरबार बंद व्हावा, यासाठी स्थानिक महिलांनी वर्षभरापूर्वी मोर्चा उघडला होता. पण, महिलांच्या मागणीला या विभागाने वाटाण्याचा अक्षता लावल्या. उल्लेखनीय म्हणजे काल सोमवारी (ता.17) रात्री 9 वाजेच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचारी शासकीय वाहन क्रमांक एम.एच.35- डी- 539 नी या बिअरआरमध्ये दाखल झाले. उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी या बारवर कार्यवाही करण्यासाठी आले असावे, असा परिसरातील महिलांचा समज झाला. मात्र, याविषयी चौकशी केली असता सदर कर्मचारी हे बिअरबार मध्ये मनसोक्त दारू ढोसण्यात व्यस्त असल्याचे दिसून आले. यामुळे या महिलांचा राग अनावर झाला. हे मद्यधुंद कर्मचारी बिअरबारच्या बाहेर येताच महिलांनी त्यांचा घेराव करून त्यांची चांगलीच कानउघाडणी केली. हे अधिकारी व कर्मचारी तिथून पळ काढण्याच्या प्रयत्नात असताना त्यांना अडवून धरले. या प्रकरणाची तक्रार नगरसेविका निर्मला मिश्रा व परिसरातील महिलांनी शहर पोलिस ठाण्यात केली आहे.माहिती मिळताच पोलिस निरीक्षक दाभाडे ही घटनास्थळी ताफ्यासह दाखल झाले. दोन्ही पक्षांची समजूत काढून वाढलेला तणाव आटोक्यात आणला. तसेच महिलांना दुस-या दिवशी मंगळवारी शहर पोलिस ठाण्यात बोलाविले.
  श्रीनगर मालवीय वार्ड परिसरात नागरी वस्तीच्या मधोमध राज्य उत्पादन शुल्क विभागाने मराठा बिअरबार सुरू करण्याची परवानगी दिली. परवानगी पासून ते बिअरबार सुरू झाल्यानंतर याचा महिलांनी जोरदार विरोध केला. विशेष म्हणजे हे बिअर बार बंद व्हावे, यासाठी श्रीनगर परिसरातील महिलांनी यापूर्वी पाच ते सहा वेळा राज्य उत्पादन शुल्क विभाग, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय आदि ठिकाणी निवेदने दिली. मात्र, या निवेदनांना कुणीही गांभीर्याने घेतले नाही. दस्तुरखुद्द राज्य उत्पादन शुल्क विभागाचा आशीर्वाद असल्याने अधिकाऱ्यांनी महिलांचा विरोध झुगारून या बारला नवसंजीवनी दिली. परिणामी, आज महिलांना व विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. 
एकंदरीत या परिसरातील महिलांच्या मागणीला ठेंगा दाखवत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आपले फावते करण्यासाठी बीयरबारचा कसा उपयोग करतात, हे या प्रकरणावरून सिद्ध झाले असून पोलिस प्रशासन तक्रारीच्या आधारावर संबंधित बीयरबारवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी कर्मचा-यांवर कारवाई करणार काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

मराठा बीयर बार बंद करणारच - महिलांचा निर्धार
श्रीनगर मालवीयवार्ड येथील नागरी वस्तीतील मराठा बीयरबार बंद करावा, यासाठी महिलांचा लढा वर्षभरापूर्वीपासून सुरू आहे. अशात काल रात्री घडलेला प्रकार आमच्या डोळ्यादेखत झाला असून आता हा प्रकार खपवून घेणार नाही, असा निर्धार नगरसेविका निर्मला मिश्रा यांच्या नेतृत्वात पुष्पा दुबे, देवका सोनवाने, लक्ष्मी दियेवार, सुल्का यादव, बाली डहारे, सुनंदा क्षीिरसागर,पौर्णिमा चौबे, आशा ठाकरे,रेखा कनौजिया, विमला पिपरेवार, शीला क्षिरसागर, यशोदा पारधी,कविता वाधवानी, मीना वैद्य, बेबी तिडके, पूरवंता चौबे यासह परिसरातील महिलांनी घेतला आहे. तेव्हा संबंधित राज्य उत्पादन शुल्क विभाग आता तरी जागा होवून आपली पोळी शेकणार की महिलांना बार बंद करून न्याय देणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. 

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...