Tuesday 18 July 2017

दारू ढोसणाऱ्या उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांना महिलांचा घेराव



  •  मराठा बीअरबार मधील प्रकर 
  •  नगरसेविकेच्या नेतृत्वात महिलांचा एल्गार
  • शहर पोलिसांत तक्रार दाखल 


गोंदिया,दि.18 - गेल्या वर्षभरापासून श्रीनगर परिसरातील बिअरबार बंदीसाठी महिलांचा लढा सुरू असताना आणि शासनाने राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील मद्यविक्रीवर बंदी आणली असताना चक्क राज्य उत्पादन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अडगडीत असलेल्या एका बिअरबार मध्ये मनसोक्त दारू ढोसण्याचा प्रकार केला. शासकीय वाहनाने या वादग्रस्त बिअऱबारमध्ये रात्रीच्या सुमारास येऊन मद्यधुंद अधिकारी कर्मचाऱ्यांना परिसरातील महिलांनी घेराव घातला. पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या या कर्मचाऱ्यांना शहर पोलिसांच्या ताब्यात देत बिअरबार बंदीसह या कर्मचाऱ्यांवर कार्यवाहीसाठी श्रीनगर परिसरातील महिलांनी एल्गार पुकारला आहे. या कर्मचाऱ्यांविरोधात शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हा प्रकार काल सोमवारी रात्री नऊच्या सुमारास श्रीनगर परिसरातील मराठा बिअर बारमध्येे घडला.
राज्य शासनाने नुकताच राज्य व महामार्गावरील दारू दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला असून 500 मीटर अंतरावर हा व्यवसाय करण्यास परवानगी दिली. परिणामी, शहरातील अनेक बीअरबार बंद झाले. मात्र, काही संधीसाधुंनी अडगडीत गेलेल्या श्रीनगर परिसरातील नागरी वस्तीतील मराठा बिअरबार कडे मोर्चा वळविला.  या सर्व प्रकरणाला राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी व कर्मचा-यांचे अभय अाहे. सदर बिअरबार बंद व्हावा, यासाठी स्थानिक महिलांनी वर्षभरापूर्वी मोर्चा उघडला होता. पण, महिलांच्या मागणीला या विभागाने वाटाण्याचा अक्षता लावल्या. उल्लेखनीय म्हणजे काल सोमवारी (ता.17) रात्री 9 वाजेच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचारी शासकीय वाहन क्रमांक एम.एच.35- डी- 539 नी या बिअरआरमध्ये दाखल झाले. उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी या बारवर कार्यवाही करण्यासाठी आले असावे, असा परिसरातील महिलांचा समज झाला. मात्र, याविषयी चौकशी केली असता सदर कर्मचारी हे बिअरबार मध्ये मनसोक्त दारू ढोसण्यात व्यस्त असल्याचे दिसून आले. यामुळे या महिलांचा राग अनावर झाला. हे मद्यधुंद कर्मचारी बिअरबारच्या बाहेर येताच महिलांनी त्यांचा घेराव करून त्यांची चांगलीच कानउघाडणी केली. हे अधिकारी व कर्मचारी तिथून पळ काढण्याच्या प्रयत्नात असताना त्यांना अडवून धरले. या प्रकरणाची तक्रार नगरसेविका निर्मला मिश्रा व परिसरातील महिलांनी शहर पोलिस ठाण्यात केली आहे.माहिती मिळताच पोलिस निरीक्षक दाभाडे ही घटनास्थळी ताफ्यासह दाखल झाले. दोन्ही पक्षांची समजूत काढून वाढलेला तणाव आटोक्यात आणला. तसेच महिलांना दुस-या दिवशी मंगळवारी शहर पोलिस ठाण्यात बोलाविले.
  श्रीनगर मालवीय वार्ड परिसरात नागरी वस्तीच्या मधोमध राज्य उत्पादन शुल्क विभागाने मराठा बिअरबार सुरू करण्याची परवानगी दिली. परवानगी पासून ते बिअरबार सुरू झाल्यानंतर याचा महिलांनी जोरदार विरोध केला. विशेष म्हणजे हे बिअर बार बंद व्हावे, यासाठी श्रीनगर परिसरातील महिलांनी यापूर्वी पाच ते सहा वेळा राज्य उत्पादन शुल्क विभाग, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय आदि ठिकाणी निवेदने दिली. मात्र, या निवेदनांना कुणीही गांभीर्याने घेतले नाही. दस्तुरखुद्द राज्य उत्पादन शुल्क विभागाचा आशीर्वाद असल्याने अधिकाऱ्यांनी महिलांचा विरोध झुगारून या बारला नवसंजीवनी दिली. परिणामी, आज महिलांना व विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. 
एकंदरीत या परिसरातील महिलांच्या मागणीला ठेंगा दाखवत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आपले फावते करण्यासाठी बीयरबारचा कसा उपयोग करतात, हे या प्रकरणावरून सिद्ध झाले असून पोलिस प्रशासन तक्रारीच्या आधारावर संबंधित बीयरबारवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी कर्मचा-यांवर कारवाई करणार काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

मराठा बीयर बार बंद करणारच - महिलांचा निर्धार
श्रीनगर मालवीयवार्ड येथील नागरी वस्तीतील मराठा बीयरबार बंद करावा, यासाठी महिलांचा लढा वर्षभरापूर्वीपासून सुरू आहे. अशात काल रात्री घडलेला प्रकार आमच्या डोळ्यादेखत झाला असून आता हा प्रकार खपवून घेणार नाही, असा निर्धार नगरसेविका निर्मला मिश्रा यांच्या नेतृत्वात पुष्पा दुबे, देवका सोनवाने, लक्ष्मी दियेवार, सुल्का यादव, बाली डहारे, सुनंदा क्षीिरसागर,पौर्णिमा चौबे, आशा ठाकरे,रेखा कनौजिया, विमला पिपरेवार, शीला क्षिरसागर, यशोदा पारधी,कविता वाधवानी, मीना वैद्य, बेबी तिडके, पूरवंता चौबे यासह परिसरातील महिलांनी घेतला आहे. तेव्हा संबंधित राज्य उत्पादन शुल्क विभाग आता तरी जागा होवून आपली पोळी शेकणार की महिलांना बार बंद करून न्याय देणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...