तहसीलदार विजय बोरूडे यांचे तलाठी-ग्रामसेवक यांना कारवाईचे आदेश
देवरी,29(प्रतिनिधी)- चिखलाने माखलेल्या रस्त्यावर कोणतेही वाहन घसरून वाहनचालकाचा जीव जाऊ शकतो. रस्ते हे सुखकर प्रवासासाठी असतात. त्यामुळे रस्त्यावर चिखलाने माखलेले टॅक्टर आणता कामा नये. अन्यथा अशा ट्रॅक्टर चालक-मालकांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी सक्त ताकीद देवरीचे तहसीलदार विजय बोरुडे यांनी दिली आहे. दरम्यान, तालुक्यातील सर्व तलाठी व ग्रामसेवक यांना आपल्या हद्दीतील ट्रॅक्टर मालकांना सूचना देण्याविषयीचे लेखी आदेश तहसीलदार देवरी यांनी नुकतेच निर्गमित केले आहेत.

सविस्तर असे की, पावसाळ्याच्या तसेच रब्बी हंगामात ट्रॅक्टरचालक हे शेतात चिखलणी करून माखलेले ट्रॅक्टर मुख्य मार्गावर आणत असतात. त्यामुळे ट्रॅक्टरला लागलेले चिखल हे रस्त्यावर येते. बहुधा या चिखलाने संपूर्ण रस्ता माखलेला असतो. परिणामी, रस्ता निसरडा होऊन अनेक वाहनांना अपघात होण्याची दाट शक्यता असते. ट्रॅक्टरचालकांच्या अशा चुकांमुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. त्यामुळे सर्व ट्रॅक्टर चालकांनी शेतात चिखलणी केल्यानंतर आपले वाहन पाण्याने धुतल्यानंतरच मुख्य मार्गावर आणावे, अन्यथा संबंधित वाहन चालक-मालक यांच्यावर कडक कारवाई केली, जाणार असल्याचे तहसीलदार विजय बोरूडे यांनी सांगितले. दरम्यान, तालुक्यातील सर्व तलाठी आणि ग्रामसेवक यांना या संबंधी कारवाई करणाचे लेखी आदेश नुकतेच देण्यात आले आहेत.
No comments:
Post a Comment